दुर्ग
Appearance
(किल्ले या पानावरून पुनर्निर्देशित)
दुर्ग, छत्तीसगढ याच्याशी गल्लत करू नका.
दुर्ग म्हणजे जिथे शिरकाव करणे दुर्गम(कठीण) असते असे बांधलेले ठिकाण आहे. मध्ययुगीन मराठीत ह्यासाठी अरबीतून आलेला किल्ला हा शब्द वापरला जाई . शिवछत्रपतींच्या प्रेरणेने रचल्या गेलेल्या राजव्यवहारकोषात किल्ल्यासाठी दुर्ग हा प्रतिशब्द सुचवला आहे. अगदी प्राचीन काळापासून दुर्गांचा उल्लेख आढळतो. किल्ला ही इतिहासाची ओळख मानली जाते.हा प्रेक्षणीय किल्ला आहे.
दुर्गांचे प्रकार
[संपादन]प्राचीन ग्रंथांत दुर्गांचे वेगवेगळे प्रकार सांगतलेले आहेत. ते पुढीलप्रमाणे :
मनुस्मृती
[संपादन]मनुस्मृतीत सांगितलेले किल्ल्यांचे प्रकार- धन्वदुर्गं महीदुर्गमब्दुर्गं वार्क्षमेव वा । नृदुरगं गिरीदुर्गं वा सामाश्रित्य वसेतपरम् ।।... मनुस्मृती ७०.
- धनदुर्ग : सभोवार २० कोसापर्यंत पाणी नसलेला दुर्ग.
- महीदुर्ग : ज्या बारा हातापेक्षा अधिक उंचीच्या, युद्धाचा प्रसंग आल्यास ज्यावरून व्यवस्थित फिरता येईल आणि झरोक्यांनी युक्त असलेल्या खिडक्या (जंग्या) ठेवलेल्या आहेत, अशा तटाने युक्त असलेला दुर्ग.
- अब्दुर्ग : सभोवार पाणी असल्याने नैसर्गिक संरक्षण असलेला दुर्ग.
- वार्क्षदुर्ग : वृक्षदुर्ग. तटाच्या बाहेर चारी बाजूला चार कोसपर्यंत मोठाले वृक्ष, काटेरी झुडपे आणि वेलीच्या जाळ्या यांनी वेष्टिलेला दुर्ग.
- नृदुर्ग : हत्ती, घोडे, रथ, पायदळ या चतुरंग सेनेने रक्षण केलेला दुर्ग.
- गिरिदुर्ग : डोंगरी उंचवट्यावर पुरेसा पाणीपुरवठा असणारे, झाडे असून धान्य पिकवता येईल असे, पण जाण्यासाठी एकच वाट असलेले स्थान.
देवज्ञविलास ग्रंथ
[संपादन]लाला लक्ष्मीधर याने राजा कृष्णदेवराय याच्या काळात लिहिलेल्या 'देवज्ञविलास' या ग्रंथात किल्ल्यांचे वर्गीकरण केलेले आढळते.(उपयुक्ततेच्या क्रमानुसार). ते असे :-
- गिरिदुर्ग
- वनदुर्ग
- गव्हरदुर्ग : गुहेचा किल्ला म्हणून उपयोग.
- जलदुर्ग
- कर्दमदुर्ग : दलदलीचा प्रदेश असलेल्या ठिकाणी बांधलेला किल्ला.
- मिश्रदुर्ग : वरीलपैकी दोन अथवा तीन प्रकार एकत्रित करून बांधलेला.
- मृतिका दुर्ग
- दारू दुर्ग
- ग्रामदुर्ग
- कोट : सभोवताली लाकूड वापरून तयार केले संरक्षण.
हे सुद्धा पहा
[संपादन]- आंध्रप्रदेशातील किल्ले
- कर्नाटकातील किल्ले
- केरळ मधील किल्ले
- गोव्यातील किल्ले
- तमिळनाडूतील किल्ले
- महाराष्ट्रातील किल्ले
- महाराष्ट्रातील घाट रस्ते
- राजस्थानातील किल्ले
हे सुद्धा पहा
[संपादन]- महाराष्ट्रातील घाट रस्ते
- महाराष्ट्रातील किल्ले - प्रकार आणि अवयव
- शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादी
- स्ट्रॉंगहोल्ड्ज ऑफ वेस्टर्न इंडिया : फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र (इंग्रजी पुस्तक)
- महाराष्ट्र देशातील किल्ले भाग १ व २ - पुस्तके लेखक - चिं.गं. गोगटे
- ‘लोकसत्ता’च्या वास्तुरंग पुरवणीत जानेवारी २०१८ ते जानेवारी २०१९ या कालावधीत डॉ. मिलिंद पराडकर यांनी लिहिलेली, ‘दुर्ग’या विषयाचा ऊहापोह करणारी एक दीर्घ लेखमाला ‘दुर्गविधानम्’ या नावाने प्रकाशित झाली होती…‘दुर्ग’ या संकल्पनेच्या जन्मापासून ते अठराव्या शतकापर्यंत या संकल्पनेने घेतलेली विविध रूपे यांची शास्त्रीय मांडणी या ‘दुर्गविधानम्’ लेखमालेच्या सव्वीस भागात करण्यात आली. वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेली ही लेखमाला दि. १९ फेब्रुवारी २०२० रोजी, सायंकाळी ६ वाजता शिवजयंतीच्या मुहूर्तावर, विख्यात अभिनेत्री व दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णींच्या हस्ते ‘दुर्गविधानम्’ नावाने पुस्तकरूपात प्रकाशित झाली.
- महाराष्ट्रातील एखाद्या किल्ल्यावर किंवा किल्ल्याच्या पायथ्याशी वर्षातून एकदा दुर्ग साहित्य संमेलन भरते. सन २००९पासून २०१५पर्यंत हे संमेलन भरल्याची विकीवर नोंद आहे.
- १ मे २०१९ रोजी अजिंक्यतारा किल्ल्यावर पहिली दुर्गपरिषद भरली होती. त्या परिषदेमध्ये गडकोटांवर काम करणाऱ्या १८ संस्था सामील झाल्या होत्या. संस्थांपैकी काहींची नावे : सह्याद्री गिर्यारोहक संघ (केंजळगड), शिववंदनेश्वर प्रतिष्ठान (चंदन - वंदन), दातेगड (स्वराज्यरक्षक संभाजी राजे प्रतिष्ठान), शिवदुर्ग संवर्धन संस्था (नांदगिरी), पांडवगड येथील भटकंती, महिमानगड प्रतिष्ठान, टीम वसंतगड, सह्याद्री परिवार (वाई), वारूगड फाऊंडेशन, राजधानी प्रतिष्ठान (सज्जनगड),शिवसह्याद्री दुर्गसंवर्धन संस्था (संतोषगड), सदाशिवगड मावळा प्रतिष्ठान, धर्मरक्षक राजधानी सातारा, शिवराय ट्रेकिंग ग्रुप, शिवसंकल्प परिवार (सातारा), स्वप्नदुर्ग प्रतिष्ठान (सातारा), (अपूर्ण यादी).