संगमनेर महाविद्यालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
संगमनेर महाविद्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार

संगमनेर नगरपालिका कला, दामोदर जगन्नाथ मालपाणी वाणिज्य आणि बस्तीराम नारायणदास सारडा विज्ञान महाविद्यालय, संगमनेर हे अहमदनगर जिल्ह्यातील एक प्रयोगशील महाविद्यालय आहे.[१][२] राष्ट्रीय मूल्यमापन आणि अधिमान्यता समितीच्या (National Assessment and Accreditation Council) सप्टेंबर २०१६ साली झालेल्या पुनर्मूल्यांकनात या महाविद्यालयास 'अ +' श्रेणी मिळाली. सन २०२१ पासून महाविद्यालयास 'स्वायत्त' तेचा दर्जा मिळाला. [३]

शिक्षण प्रसारक संस्था, संगमनेर या संस्थेचे हे महाविद्यालय "संगमनेर महाविद्यालय" या नावाने परिचित असून ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे. हे महाविद्यालय, अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पहिले आणि जिल्ह्यातील दुसरे महाविद्यालय आहे. महाविद्यालयाचे औपचारिक उद्‌घाटन तत्काlIन संरक्षणमंत्री आणि माजी मुख्य मंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले होते.

स्थापना[संपादन]

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देण्याच्या हेतूने हे महाविद्यालय स्थापन करण्यात आले. ही संस्था नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जन्मशताब्दी दिनास, २३ जानेवारी इ.स. १९६१ रोजी शिक्षण प्रसारक संस्था, संगमनेरचे कार्यवाह श्री. शंकरराव गंगाधर जोशी यांच्या पाठपुराव्याने झाली. स्थापना करण्यात येथील सामाजिक नेते ॲड. भास्करराव उर्फ नाना दुर्वे, व्यापारी भिकुसा यमासा क्षत्रिय, ज्येष्ठ नेते बी. जे. खताळ पाटील, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब थोरात, वकील हिंमतलाल मगनलाल शाह, व्यापारी जगन्नाथ मालपाणी यांनी पुढाकार घेतला होता. प्रा. मधुसूदन विष्णू कौंडिण्य हे पहिले प्राचार्य होते. त्यांनी या महाविद्यालयासोबत १९९३ पर्यंत ३३ वर्षांची दीर्घ प्रचालकीय कारकीर्द पार पाडली.

शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना १९६० साली करण्यात आली, तर १९६१ साली कला व वाणिज्य शाखा आणि १९६५ साली विज्ञान शाखा सुरू झाल्या. [४] श. ना. नवलगुंदकर हे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत तर डॉ. संजय ओंकारनाथ मालपाणी हे संस्थेचे विद्यमान (२०१६ साली) कार्याध्यक्ष आहेत[५] डॉ.अरुण गायकवाड यांची जुलै २०२१ प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.[६] "प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः" हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.

पारदर्शक व्यवस्थापन[संपादन]

संगमनेर महाविद्यालयाचा पारदर्शकता पुरावा

या महाविद्यालयाचा स्थापनेपासूनचा सर्व व्यवहार अतिशय प्रामाणिक आणि पारदर्शक म्हणून प्रसिद्ध आहे.

पहिला प्रस्ताव आणि ठराव[संपादन]

गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर १९५९ रोजी पेटिट विद्यालयात श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती [७] [ दुजोरा हवा], त्यावेळी शंकरराव जोशी यांनी संगमनेर येथे महाविद्यालय सुरू करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. तसा प्रस्ताव मांडला. तो सर्वांनी उत्स्फूर्तपणे मान्य केला आणि तसा ठराव मंजूर करण्यात आला. त्यादिशेने संगमनेर नगरपालिका आणि शहरातील इतर तत्कालिन सुजाण व सुबुद्ध नागरिकांनी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी महाविद्यालयाची पहिली देणगी म्हणून पुणे विद्यापीठाचे शुल्क रु. ५००/- शंकरराव जोशी यांनी भरले, यावेळी यांचे वय ७३ होते.

महाविद्यालयाची सुरुवात[संपादन]

२३ जानेवारी इ.स. १९६१ रोजी 'शिक्षण प्रसारक संस्था' स्थापन झाल्यानंतरच्या दरम्यान कॉलेज काढण्यासाठीची पुणे विद्यापीठाची अर्ज करण्याची मुदत जवळपास संपत आली होती. त्यावेळी संस्थेचे सचिव शंकरराव गंगाधर जोशी यांनी स्वतःचे रु. ५००/- (रु. पाचशे) डिपॉझिट म्हणून भरले. २४ फेब्रुवारी इ.स. १९६१ रोजी पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधी डॉ. शं. गो. तुळपुळे व प्रा. व. म. शिरसीकर यांनी भेट दिली व महाविद्यालयास मंजुरी दिली. कॉलेज सुरू करण्यासाठी इमारत म्हणून पेटिट विद्यालयाचा काही भाग तात्पुरता देण्याची विनंती गोखले एज्युकेशन सोसायटीला केली, पण त्यांनी नकार दिला.[८]त्यामुळे तीन महिन्यात प्राथमिक शाळा क्र. दोनच्या वर (जीवन शिक्षण मंदिर क्रमांक २ [९]) दोन मोठे हॉल बांधण्यात आले. त्यासाठी नगरपालिकेने रु. २५,००० (रु. पंचवीस हजार) खर्च केले.

१९ जून इ.स. १९६१ रोजी सायंकाळी गीता पठण, मंत्र जागरण व सत्यनारायण महापूजा करून नव्या इमारतीत महाविद्यालय सुरू करण्यात आले. सरस्वती पूजन समारंभ करण्यात आला. त्या समारंभाचे अध्यक्ष हिंमतलाल शाह उपस्थित विद्यार्थिवर्ग व नागरिक यांना म्हणाले, " तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही हे सारे करीत आहोत. आपल्या दिव्य यशाने तुम्ही आपल्या कुटुंबाला, संस्थेला, शहराला व राष्ट्राला ललामभूत ठराल, असा आमचा विश्वास आहे. ज्ञानाची गंगोत्री तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचे कार्य जनतेने केले. त्याचा विपुल फायदा घ्या"[१०] अशा रीतीने २० जून १९६१ रोजी महाविद्यालय सुरू झाले. [११]

स्थापना दिन अनिश्चिती[संपादन]

महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षीच्या नियतकालिकात [१२] १९ जून १९६१ रोजी सायंकाळी गीता पठण, मंत्र जागरण व सत्यनारायण महापूजा करून नव्या इमारतीत महाविद्यालय सुरू करण्यात आले आणि संगमनेर नगरपालिकेच्या स्मृतिग्रंथात [१३] २० जून १९६१ रोजी महाविद्यालय सुरू झाले, असे म्हंटले तरी संस्थेने राष्ट्रीय मूल्यमापन आणि अधिमान्यता समितीस (National Assessment and Accreditation Council) ०५ जानेवारी २०१६ रोजी सादर केलेल्या स्वयं अभ्यास अहवालात स्थापना दिन १४ सप्टेंबर १९६१ अशी दिली आहे.[१४] तथापि या तारखेचा संदर्भ दिलेला नाही.

महाविद्यालयाचे उद्‌घाटन[संपादन]

संगमनेर नगरपालिकेस शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने १९६०-६१ हे शताब्दी वर्ष म्हणून साजरे केले गेले. ०३ मे १९६२ रोजी संगमनेर नगरपालिकेची शताब्दी साजरी करण्यात आली. तत्कालिन संरक्षणमंत्री आणि माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे प्रमुख पाहुणे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. यावेळी महाविद्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण भागातील या पहिल्या महाविद्यालयाचे कौतुक केले. ग्रंथालयासाठी रु. १०,०००/- (रु. दहा हजार)ची देणगी मुख्यमंत्री निधीतून जाहीर केली.

आधीचे नाव[संपादन]

संगमनेर महाविद्यालयाचे आधीचे नाव 'संगमनेर साहित्य व वाणिज्य महाविद्यालय' असे होते. ते १९७० पर्यंत कायम होते, त्यानंतर ते संगमनेर नगरपालिका (?) कला आणि वाणिज्य महाविद्यालय असे करण्यात आले.[१५]

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नता[संपादन]

येथे वाचा

योगदान आणि देणग्या[संपादन]

स्थापनेच्या वेळी मिळालेल्या देणग्या[संपादन]

रोख रक्कम[संपादन]

 • विडी कामगार, खाण कामगार, हमाल यांच्याकडून मिळालेली वर्गणी[१६]
 • संगमनेर अकोले विडी कामगार : १०,५००=०० (रु. दहा हजार पाचशे) (प्रत्येकी एक रुपया, एक दिवसाची मिळकत)
 • खाण कामगार, कोल्हार : ८००/- (रु. आठशे)
 • हमाल, बॉम्बे सेन्ट्रल, बॉम्बे : ४३३=०० (रु. चारशे तेहतीस)

व्यक्ती व संस्था यांच्याकडून मिळालेल्या देणग्या[१७]

 • मुख्यमंत्री निधी (यशवंतराव चव्हाण) : रु. १०,०००/- (रु. दहा हजार)
 • संगमनेर नगरपालिका, संगमनेर : १,४७,०००/- (रु. एक लाख सत्तेचाळीस हजार) आणि २,५०,०००/- (रु. अडीच लाख)
 • मे. ठाकूर सावदेकर आणि कंपनी : रु. १०,०००/- (रु. दहा हजार)
 • जिल्हा लोकल बोर्ड, अहमदनगर : रु. ७,०००/- (रु. सात हजार)
 • टी. के. जोशी, वकील संगमनेर : रु. ७,०००/- (रु. सात हजार)
 • शिर्डी संस्थान : रु. ५,०००/- (रु. पाच हजार)
 • दिगंबर गणेश सराफ व बंधु : रु. ५,०००/- (रु. पाच हजार)
 • शंकरराव गंगाधर जोशी ॲन्ड सन्स : रु. ५,०००/- (रु. पाच हजार)
 • प्रवरानगर साखर कारखाना  : रु. ५,०००/- (रु. पाच हजार)
 • मोतीलाल शिवनारायण नावंदर : रु. ५,०००/- (रु. पाच हजार)
 • लोहे ट्रस्ट, संगमनेर : रु. १०,०००/- (रु. दहा हजार)
 • अल्पबचत योजना बक्षिसातून रु. २०,०००/- (रु. वीस हजार)

स्थावर देणगी[संपादन]

शहरातील संस्था व नागरिकांकडून[१८]

 • कला विभागाची इमारत : नगरपालिकेच्या शताब्दीनिमित्त संगमनेर नगरपालिकेकडून महाविद्यालयातील कला विभाग इमारत.
 • अठरा एकर जमीन : प्रल्हादसा लहानुसा क्षत्रिय यांच्याकडून वडील लहानुसा यमासा क्षत्रिय यांच्या स्मरणार्थ.
 • बाजारपेठेतील दुमजली इमारत महाविद्यालयास देणगी : श्रीमती सीताबाई रामचंद्र ठाकूर यांच्याकडून त्यांचे पती कै. रामचंद्र अण्णाजी ठाकूर यांच्या स्मरणार्थ.
 • विज्ञान विभागाची इमारत - १९७० : व्यापारी बस्तीराम सारडा यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र देवकिसन सारडा व किसानलाल सारडा यांनी दिलेल्या देणगीतून.
 • वाणिज्य विभाग उभारणीसाठी व इमारतीसाठी : प्रसिद्ध व्यापारी दामोदर जगन्नाथ मालपाणी यांचे सुपुत्र विश्वनाथ, ओंकारनाथ, कालिदास, माधवलाल मालपाणी यांनी दिलेल्या देणग्यातून.

विद्यार्थांचे श्रमदान[१९] १९७२ च्या दुष्काळात महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व ३०० विद्यार्थ्यांना दिलेल्या रोजगारातून महाविद्यालयात सर्व रस्ते तयार केले गेले. त्यासाठी लागणारी खडी शासनाकडून मोफत मिळविण्यात आली. महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करण्यात आली.

नव्या देणग्या[संपादन]

मैत्री' मेळावा आणि 'मैत्री' कॅन्टीन

महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा घेण्याची पद्धत आहे. २०१५ या वर्षीच्या 'मैत्री' मेळाव्याचा आरंभ आणि 'मैत्री' कॅन्टीनचे उद्घाटन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि प्रसिद्ध बांधकाम उद्योजक अविनाश भोसले यांच्या हस्ते दि. २६ डिसेंबर २०१५ रोजी करण्यात आले. 'मैत्री' कॅन्टीनसाठी पुणे विद्यापीठाने यांनी आंशिक अनुदान दिले आहे. त्यावेळी अविनाश भोसले यांनी आणि अन्य माजी विद्यार्थी व मालपाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष राजेश ओंकारनाथ मालपाणी यांनी मालपाणी उद्योग समूहातर्फे देणगी जाहीर केली. देणगीचा धनादेश ओंकारनाथ मालपाणी यांच्या पत्‍नी श्रीमती ललिताभाभी यांच्या हस्ते खजिनदार बिहारीलाल डंग यांना सुपूर्द करण्यात आला.

प्रांगण[संपादन]

संगमनेर महाविद्यालय ५० एकर जागेवर आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांसाठी स्वतंत्र इमारती, साईबाबा सभागृह, क्रीडा मैदाने, वसतीगृहे, आदी सुविधा महाविद्यालयाच्या प्रांगणातच आहेत.

महाविद्यालयाचे अडीच एकराचे मैदान

महाविद्यालय परिसरातील इमारती[संपादन]

 • लहानुसा यमासा क्षत्रिय वाणिज्य भवन
 • श्रीमान बस्तीरामशेठ नारायणदास सारडा विज्ञान विभाग
 • मुक्तांगण स्वायत्त ग्रामीण विद्यापीठ केंद्र
 • योग आणि निसर्गोपचार केंद्र
 • प्राचार्य म.वि. कौंडिण्य संशोधन भवन
 • श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय
 • ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालय
 • शिक्षणशास्त्र पदवी महाविद्यालय
 • शिक्षणशास्त्र पदविका महाविद्यालय
 • श्री साईबाबा सभागृह
 • नेल्सन मंडेला खुले सभागृह
 • ग्रंथालय व कार्यालय
 • मैत्री उपहारगृह

मूल्याधिष्ठित ग्रामविकास प्रकल्प[संपादन]

मुक्तांगण स्वायत्त ग्रामीण विद्यापीठ केंद्र[संपादन]

मुक्तांगण स्वायत्त ग्रामीण विद्यापीठ केंद्र

मुक्तांगण स्वायत्त ग्रामीण विद्यापीठ केंद्राच्या माध्यमातून रोजगारक्षम जोडशिक्षणाची सुविधा पुरवली जाते.[२१][ दुजोरा हवा] प्राचार्य मधुसूदन विष्णू कौंडिण्य सरांनी मुक्तांगण स्वायत्त ग्रामीण विद्यापीठ केंद्राची उभारणी केली. या केंद्राच्या माध्यमातून सामाजिक जीवनात निरनिराळे शैक्षणिक प्रयोग केले.[२२]बदलत्या काळाची पावले ओळखून तंत्रज्ञानाचीही जोड अभ्यासक्रमांना दिली. स्थानिक पातळीवरच रोजगार कसे निर्माण होतील, याकडेही त्यांनी विषेश लक्ष तर पुरवलेच पण जरूर तेथे त्याकरिता गरजूंना बँकामार्फत योग्य अर्थसाहाय्य मिळण्यासाठीही प्रयत्‍न केले.[२३]

पु. ल. देशपांडे प्रतिष्ठानची देणगी[संपादन]

पु. ल. देशपांडे प्रतिष्ठान देणगी कोनशिला

महाराष्ट्र टाइम्सच्या ०२ फेब्रु. इ.स. २०१३ च्या अग्रलेखानुसार रोजगाराचे कौशल्य आणि मूल्यसंस्कार देणाऱ्या मुक्तांगण प्रकल्पास पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे आणि इतर मान्यवरांचे पाठबळ लाभले. पु.लं.नी या कार्याचे महत्त्व जाणून संस्थेस आपल्या प्रतिष्ठतर्फे बारा लाख रुपयांची देणगी दिली.[२४]. ३० मार्च १९९१ रोजी झालेल्या देणगी कोनशिला समारंभाच्या अध्यक्षपदी प्रा.मधु दंडवते होते.

इमारतीचे उद्‌घाटन कविवर्य कुसुमाग्रज ऊर्फ वि.वा. शिरवाडकर यांच्या हस्ते झाले.

योग आणि निसर्गोपचार केंद्र[संपादन]

'मुक्तांगण' परिसरात सध्याचे योग आणि निसर्गोपचार केंद्र आहे. या केंद्राचा फायदा अनेक लोकांना होत असून अनेक असाध्य आजार, व्याधी इत्यादीवर येथे उपचार केला जातो. तथापि वाढत्या प्रतिसादामुळे केंद्रासाठी नवी इमारत उभी राहात आहे.

मान्यता[संपादन]

मान्यवरांच्या भेटी[संपादन]

महाविद्यालयास प्राचार्यांच्या हयातीत आणि प्रयत्‍नांमुळे माजी पंतप्रधान चंद्रशेखर, विजय तेंडुलकर, पु.ल. देशपांडे, नानाजी देशमुख, अजित वाडेकर, राजा गोसावी, शंकर पाटील, द.मा. मिरासदार, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले, गो. नी. दांडेकर, वि. म. दांडेकर, शरद पवार, माजी राज्यपाल आय. एच. लतीफ, बाबा आमटे, प्रकाश आमटे, इत्यादी मान्यवरांनी भेटी दिल्या. आजही अनेक मान्यवर वेगवेगळ्या कारणांनिमित्त महाविद्यालयास भेट देत असतात.

शैक्षणिक मान्यता[संपादन]

 • 'अ +' श्रेणी : राष्ट्रीय मूल्यमापन आणि अधिमान्यता समिती (National Assessment and Accreditation Council) २०१६ साली.
 • 'अ' श्रेणी : राष्ट्रीय मूल्यमापन आणि अधिमान्यता समिती (National Assessment and Accreditation Council) २००९ साली.
 • ११ फेब्रुवारी २०१३ ते १० फेब्रुवारी २०१६ या कालावधीसाठी आयएसओ २००८:९००१ प्रमाणपत्र

श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय

श्रीमान लहानुसा यमासा क्षत्रिय वाणिज्य भवन, संगमनेर महाविद्यालय, संगमनेर
श्रीमान बस्तीरामशेठ नारायणदास सारडा यांचा विज्ञान इमारतीसमोर उभारण्यात आलेला अर्धपुतळा
संस्थेचा विस्तार दर्शविणारी नावे असलेले संगमनेर महाविद्यालयाचे प्रवेशद्वार क्रमांक २

प्राचार्य म.वि.कौंडिण्य संशोधन भवन[संपादन]

प्राचार्य म. वि. कौंडिण्य संशोधन भवन

कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांमध्ये संशोधनाची सोय आहे. एम.फिल., पीएच्‌डीपर्यंत संशोधन करण्यात येते. पहिले प्राचार्य मधुसूदन विष्णू कौंडिण्य यांच्या स्मरणार्थ येथील संशोधन इमारतीस १६ मार्च २०१३ रोजी 'प्राचार्य म. वि. कौंडिण्य संशोधन भवन' असे नाव देण्यात आले. वाणिज्य शाखा, मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत, तत्त्वज्ञान, बी. व्होकेशनल असे विभाग या इमारतीत असून तत्त्वज्ञान, बी. व्होकेशनल वगळता सर्व विभागांचे संशोधन केंद्र येथे आहे.

ग्रामीण विकास 'दर्शन'[संपादन]

संस्था व महाविद्यालय यांची प्रगती आणि आर्थिकदृष्ट्या सक्षमता दर्शविण्यासाठी २००० साली 'दर्शन' हा महाग्रंथ प्रकाशित करण्यात आला. हा ग्रंथ कामगार नेते व आदिवासींसाठी काम करणाऱ्या भास्करनाना दुर्वे यांना समर्पित करण्यात आला आहे. या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याने रु. २५,०००/- (रु. पंचवीस हजार)ची देणगी दिली.

या स्मरणिकेचे स्वरूप 'केवळ माहिती देणारे पुस्तक' असे न ठेवता तिला एका भरीव, संग्राह्य संदर्भग्रंथाचे स्वरूप येईल, अशी योजना केली. संगमनेर तालुक्याची भूतकालीन, वर्तमानकालीन सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक, औद्योगिक, आर्थिक, कृषिविषयक, इत्यादी अंगानी पाहणी करून त्या आधारे भविष्यकालीन विकास कसा होईल, याची दिशा दाखविण्याचा प्रयत्न करावा, असे ठरले. त्यानुसार ग्रंथाचे पाच विभाग करण्यात आले :

 1. महाविद्यालय दर्शन : महाविद्यालयाचा इतिहास व सद्यकालीन चित्र (१९६१ ते २०००दरम्यानचे).
 2. विचार दर्शन :संगमनेर तालुक्याची अनेक अंगानी केलेली पाहणीवर आधारित प्राध्यापक, तज्ज्ञ, स्थानिक नेते, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते यांनी लिहिलेले लेख.
 3. तालुका दर्शन : 'खरा भारत खेड्यात पसरलेला आहे, त्याची सुधारणा हीच देश सुधारणा' या भावनेने तालुक्याची पाहणी करण्याचा उपक्रम राबवून त्यावर विस्तृत टिपण तयार केले. पाहणी संगमनेर तालुक्यापुरती असली तरी प्रायः महाराष्ट्रातील सगळ्याच तालुक्यांचे ते प्रातिनिधिक चित्र ठरेल व त्यातूनच बदलत्या परिस्थितीचे भान येईल, असे पाहिले गेले. नगर व ग्रामीण जीवनातील अंतर कमी करण्याच्या प्रयत्नातील एक पाऊल म्हणून 'प्रत्यक्ष गावांना भेटी देऊन अडचणी जाणून घेतल्या गेल्या. या अडचणी दूर करण्यासाठी त्या गावाच्या गावकऱ्यांच्या शासनाकडून असलेली अपेक्षा, स्वतः ग्रामस्थ काय आणि कोणते प्रयत्न करण्यास तयार आहेत, याचा शोध घेऊन प्रत्येक गावावर एक स्वतंत्र टिपण तयार केले गेले.ही पाहाणी ११० गावांची होती.
 4. व्यक्ति दर्शन : या ग्रंथाच्या निर्मितीच्या माध्यमातून देणग्या मिळविण्यात आल्या; अनेक व्यापारी, उद्योजक, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, कष्टकरी, कामकरी, हमाल इत्यादी शुभ चिंतक मंडळीनी देणग्या दिल्या. अशा व्यक्तींचा परिचय या भागात दिला आहे. तो "परिचय देण्यातून त्या व्यक्तींमार्फत त्यांच्या कार्याच्या, कामाच्या माध्यमातून परिसराचा झालेल्या विविधांगी विकासाचे दर्शन व्हावे" या हेतूने Who's Whoच्या धर्तीवर परिचय मांडण्यात आले. प्राध्यापक व तज्ज्ञ मंडळींनी तयार केलेल्या प्रश्नावलीच्या आधारे हे व्यक्ति-परिचय तयार झाले. या परिचयांतून त्यांच्या जीवनाचे विविध दृष्टिकोण, जगण्याच्या विविध पद्धती यांचा अंतर्मुख करणारी ओळख घडते.
 5. व्यवसाय दर्शन : यात विविध व्यवसाय, सेवा, पेशा यांच्या जाहिराती आहेत.

ग्रामीण भागात विकासविषयक अपेक्षित असलेली जाग कोणती, याचा अनुभव या प्रत्यय या ग्रंथातून येतो. शैक्षणिक संस्था ज्या परिसरात कार्य करीत असते त्या परिसराशी, तिच्या प्रत्येक अंगाशी, त्या जीवनाशी ती बांधील आहे" या उत्कट जाणीवेतून ही ग्रंथ निर्मिती करण्यात आल्याचे संपादकीयात प्राचार्य म. वि. कौंडिण्य यांनी अतिशय सुस्पष्टरीत्या अधोरेखित केले आहे.

ग. स. महाजनी यांचा अभिप्राय[संपादन]

'दर्शन’ हा ग्रंथ संगमनेर तालुक्याचे सर्वांगीण 'दर्शन' घडविणारा संदर्भग्रंथ झाला आहे, असे मत पुणे विद्यापीठाचे निवृत्त कुलगुरू ग.स. महाजनी यांनी त्यांच्या प्रस्तावनेत म्हंटले आहे. ग्रंथाच्या दुसऱ्या विभागातील आशयाविषयी ते म्हणतात की " दिल्लीतील The Institute of Applied Economics या संस्थेने अशी आर्थिक पाहणी केली. प्रा. सी.डी. देशमुख यांनी स्वातंत्र्यापूर्वी कर्नाटकाची अशी पाहणी करून पुस्तक लिहिले. इंद्रायणी महाविद्यालयाने इंद्रायणी खोऱ्याविषयी असाच अहवाल लिहिला. पण या तिन्ही बाबतीत पाहाणी मर्यादित होती. प्रस्तुत 'दर्शन' ग्रंथात संगमनेर तालुक्याच्या माहिती बरोबरच वैचारिक लेख व व्यक्तिदर्शन या विभागामुळे एक जिवंतपणा आहे. वस्तुतः प्रत्येक तालुक्याची, जिल्ह्याची, राज्याची आणि देशाचीच अशी पाहाणी व्हायला हवी. " [२५]

शिक्षणक्षेत्रातील लोकांनी असे हे प्राथमिक केल्यानंतर त्यात कोणती, कशी सुधारणा करावयाची याची आखणी राज्यकर्त्यांना करता येईल, असे प्रकल्प पथदर्शी ठरतील, असे मत डॉ. महाजनी यांनी व्यक्त केले आहे. ज्या तालुक्यात आपण शिक्षण प्रसाराचे कार्य करीत आहो त्या मातीचे आपण देणे लागतो ही या ग्रंथप्रसिद्धीमधील जाणीव मोलाची आहे. [२६]संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य व त्यांचे सर्व सहकारी ह्या सर्वांनी पुणे विद्यापीठाची "यः क्रियावान्स पंडितः " ही बोधोक्ति सार्थ केली आहे म्हणून त्या सर्वाना धन्यवाद"[२७]

संलग्न महाविद्यालये[संपादन]

श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय[संपादन]

आधी वरिष्ठ महाविद्यालयास जोडलेले कनिष्ठ महाविद्यालय नंतर स्वतंत्र करण्यात आले आहे. त्यासाठी नवी इमारत उभी करण्यात आली.

ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालय[संपादन]

परिसरात जनतेची आणि विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन संस्थेने विधी महाविद्यालय सुरू केले आहे. या महाविद्यालयास संस्थेचे माजी कार्याध्यक्ष (दिवंगत) ओंकारनाथ मालपाणी यांचे नाव देण्यात आले आहे.संगमनेर महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील ज्येष्ठ प्रा. ओंकार बिहाणी हे विधी महाविद्यालयाचे इन्चार्ज प्राचार्य आहेत.

श्री ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालय, संगमनेर

शिक्षणशास्त्र पदवी आणि पदविका महाविद्यालय[संपादन]

संस्थेने शिक्षणशास्त्र विभाग स्थापन केला असून त्या अंतर्गत एक पदवी महाविद्यालय व पदविका महाविद्यालय सुरू आहे.प्रा. ज्युईली वेल्हाळ या शिक्षणशास्त्र पदवी महाविद्यालयाच्या प्राचार्या आहेत तर प्रा. सविता घुले या शिक्षणशास्त्र पदविका महाविद्यालयाच्या प्राचार्या आहेत.

महाविद्यालयातील अभ्यासक्रम[संपादन]

महाविद्यालयात कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांमध्ये एकूण १६ पदवी आणि ११ पदव्युत्तर असे २७ पारंपरिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. विनाअनुदानित तत्त्वावर बिझिनेस मॅनेजमेन्ट, व्होकेशनल कोर्सेस, कॉम्पुटर ॲप्लिकेशन, कॉम्पुटर सायन्स, वृत्तपत्रविद्या पदविका हे अभ्यासक्रम चालविले जातात.

संस्कृत आणि तत्त्वज्ञान विभाग[संपादन]

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कक्षेतील २१३ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयांपैकी संस्कृत आणि तत्त्वज्ञान या विषयांचे अध्ययन व अध्यापन ज्या काही मोजक्या महाविद्यालयांत केले जाते त्यात संगमनेर महाविद्यालयाचा समावेश आहे. महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाची स्थापना १९६० साली आणि तत्त्वज्ञान विभागाची स्थापना १९६५ साली करण्यात आली. या दोन्हीही विषयांचे सामान्य (जनरल) स्तरावरील आणि विशेष (स्पेशल) स्तरावरील अध्ययन, अध्यापन व संशोधन होते. हे दोन्ही विभाग 'प्राचार्य म. वि. कौंडिण्य संशोधन भवन' येथे आहेत.

संस्कृत विभाग[संपादन]

संस्कृत हा विषय विशेष स्तरावर स. प. महाविद्यालय, पुणे, फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे, हंसराज प्रागजी ठाकरसी (एच्‌पीटी कॉलेज) नाशिक आणि संगमनेर महाविद्यालय अशा केवळ चार महाविद्यालयांत आहे. महाराष्ट्रातील दोन संस्कृत प्रगत केंद्रांपैकी पहिले पुणे विद्यापीठात आणि दुसरे पदव्युत्तर अध्ययन व संशोधन केंद्र संगमनेर महाविद्यालयात आहे. या संशोधन केंद्राची स्थापना २००४ साली झाली. शिक्षण प्रसारक संस्थेचे माजी कार्याध्यक्ष ओंकारनाथ मालपाणी यांच्या स्मरणार्थ मालपाणी परिवार विश्वस्त निधीने संस्कृत विभागास संशोधन व इतर शैक्षणिक उपक्रमांकारिता दहा लाख रुपयांची विशेष देणगी दिली आहे. त्या देणगीच्या व्याजातून संस्कृत पंडितास 'संस्कृतात्मा' पुरस्कार, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व ग्रंथ खरेदी हे उपक्रम राबवविले जातात

संस्कृत विभागः तथाच संकृतात्मा श्री. ओंकारनाथ मालपाणी पदव्युत्तर-संस्कृत-संशोधन-केन्द्रम्" असे या संस्कृत विभागाचे नाव आहे. या केंद्रात संस्कृत संवर्धन मंडळ व गीर्वाण भारती मंडळ यांच्यातर्फे विविध कायर्क्रम आयोजित केले जातात.

तत्त्वज्ञान विभाग[संपादन]

तत्त्वज्ञान हा विषय विशेष स्तरावर पुणे विद्यापीठाच्या परिक्षेत्रात स.प. महाविद्यालय, पुणे, फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे, न्यू आर्ट्‌स, सायन्स ॲन्ड कॉमर्स कॉलेज, अहमदनगर आणि संगमनेर महाविद्यालय अशा केवळ चारच महाविद्यालयांत आहे.

प्रकल्प[संपादन]

तत्त्वज्ञान विभाग अध्ययन, अध्यापन आणि विविध पातळीवर संशोधनात आघाडीवर आहे. विभाग प्रमुख डॉ. श्रीनिवास हेमाडे यांना विद्यापीठ अनुदान मंडळाने "माध्यमांचे तत्त्वज्ञान: समस्या आणि परिप्रेक्ष्य" (The Philosophy of Media:Issues and Perspectives) या प्रकल्पासाठी मेजर रिसर्च प्रोजेक्ट अंतर्गत अनुदान दिले आहे. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून कला विभागात सामाजिक विज्ञाने आणि मानव्य शाखेत, विद्यापीठ अनुदान मंडळाचा पहिला मेजर रिसर्च प्रोजेक्ट पुरस्कार मिळविण्याचा मान या विभागास मिळाला आहे.

मराठीतून तत्त्वज्ञान निर्मिती[संपादन]

विद्यार्थ्यांसाठी अध्ययनासाठी उपयुक्त वाचनसाहित्य व संदर्भ साहित्य मराठीतून उपलब्ध करून दिले आहे. तत्त्वज्ञानाचे अध्ययन व अध्यापन साहित्य मराठीतून उपल्ब्ध करून देणारा हा महाराष्ट्रातील एकमेव विभाग आहे."मराठीतून तत्त्वज्ञान निर्मिती" हा विभागाचा विशेष उपक्रम आहे. त्यासाठी तत्त्वज्ञान विभागाचे स्वतंत्र संकेतस्थळ निर्माण केले आहे. महाराष्ट्रात तत्त्वज्ञान विषयासाठी वाहिलेले हे एकमेव संकेतस्थळ आहे; .त्याचा विद्यार्थ्यांसह अनेक तत्त्वज्ञानप्रेमी, चाहते यांना उपयोग होतो.

तत्त्वज्ञान विभागाचे स्वतंत्र संकेतस्थळ[संपादन]

www.tatvajnanvibhaagsangamnercollege.yolasite.com

महाविद्यालयातील उपक्रम[संपादन]

संस्था व महाविद्यालयासाठी[संपादन]

 • संस्थेतील सर्वांसाठी: 5 S : फ़ाईव्ह एस म्हणजे शाश्वत ५ - सद्विचार, सदसद्‌विवेक, सदाचार, सद्‌भाव, सच्चरित्र सामाजिक आणि नैतिक जाणिवा मानल्या गेलेल्या या सद्गुणांची आद्याक्षरे घेऊन शाश्वत ५ असे योजनेचे नामकरण केले आहे. या योजनेचे (सर्व जाणिवांचे) म्हणजे सद्विचार, सदसद्‌विवेक, सदाचार, सद्‌भाव, सच्चरित्र यांचे स्वरूप स्पष्ट करणारे आणि त्यांचे विश्लेषण करणारे फलक श्रीसाईबाबा सभागृहात लावलेले आहेत. ही योजना २००५ साली सुरू करण्यात आली. या योजनेचे दोन भाग करण्यात आले आहेत.
 1. पहिला भाग : संस्थेचे अध्यक्ष, कार्याध्यक्षांपासून सर्व व्यवस्थापन अधिकारीवर्ग, महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्राध्यापकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिवर्ग यांच्यात सामाजिक आणि नैतिक जाणिवा विकसित करणे
 2. दुसरा भाग : महाविद्यालयातील विविध विभागांतील साफसफाई, अनावश्यक, कालबाह्य वस्तू, फर्निचर, उपकरणे, यंत्रे, फायली काढून टाकणे; नवी विकास योजना राबविणे.

प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी[संपादन]

 • प्राध्यापक चर्चामंडळ : प्राध्यापकांसाठी, हा बौद्धिक संवाद-चर्चा उपक्रम संस्थेच्या स्थापनेपासून आहे. व्याख्यान आणि चर्चा ही सॉक्रेटिक संवाद पद्धती प्राचार्य म. वि. कौंडिण्य यांनी सुरू केली.
 • 'सहविचार सभा' :'प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी: संस्थेने संस्थेतील शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी १४ जानेवारी २००७ रोजी हा उपक्रम सुरू केला.
 • 'सुसंवाद': २६ ऑगस्ट २०१५ पासून हा आणखी एक वेगळा उपक्रम सुरू झाला. कार्याध्यक्ष संजय मालपाणी यांनी पहिली विशेष संवाद सभा नेल्सन मंडेला सभागृह येथे ८ डिसेंबर २०१५ सकाळी १०.१५ ते ११ दरम्यान भरवली.

विद्यार्थ्यांसाठी विविध योजना[संपादन]

 • शैक्षणिक योजना : आविष्कार : विद्यार्थी संशोधन स्पर्धा
 • सांस्कृतिक योजना : कलामंडळ, विद्यार्थी कल्याण मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वादविवाद स्पर्धा
 • विद्यापीठाच्या योजना : एन.एस.एस., एन.सी.सी., कमवा आणि शिका : या योजनेंतर्गत 'मागेल त्या विद्यार्थ्यास काम' या तत्त्वानुसार येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास काम दिले जाते. योजनेकरिता संख्येचे आणि बजेटचे बंधन नसलेले हे पुणे विद्यापीठ परिक्षेत्रातील एकमेव महाविद्यालय आहे.
 • महाविद्यालयाने सुरू केलेल्या आर्थिक मदतीच्या योजना :
 1. विद्याधन कलश योजना (२०१३)
या योजनेंतर्गत संस्थेने २२ लाख रुपयांचा निधी जमविला होता. त्यात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि प्रसिद्ध बांधकाम उद्योजक अविनाश भोसले यांनी रु. ७८,००,०००/- (रु. अठ्ठ्याहत्तर लाख)ची भर टाकली. त्यामुळे हा निधी एक कोटीचा झाला आहे.
 1. ग्रंथदान योजना (जुलै २०१५)
 2. 'आविष्कार : विद्यार्थी संशोधन स्पर्धां'साठी मदत

माजी विद्यार्थी संघ[संपादन]

महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा घेण्याची पद्धत आहे. २०१५ या वर्षीच्या 'मैत्री' मेळाव्याचा आरंभ आणि 'मैत्री' कॅन्टीनचे उद्‌घाटन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि प्रसिद्ध बांधकाम उद्योजक अविनाश भोसले यांच्या हस्ते दि. २६ डिसेंबर २०१५ रोजी करण्यात आले. यानिमित्त प्रथमच माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यात आला.

यश[संपादन]

पहिले प्राचार्य मधुसूदन विष्णू कौंडिण्य यांना प्राचार्य कोगेकर अमृतमहोत्सव ट्रस्टतर्फे दिला जाणारा इ.स. १९९०चा "आदर्श शिक्षक' पुरस्कार, १९९१ चे जी. डी. पारीख ॲवॉर्ड, १९९२ चेएस.व्ही. कोगेकर ॲवॉर्ड, चतुरंग प्रतिष्ठान(मुंबई)चा इ.स. १९९३चा जीवनगौरव अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. संगमनेर महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ. केशव काशीनाथ देशमुख ह्यांना इ.स. २००७-०८ च्या पुणे विद्यापीठाच्या ’उत्कृष्ट प्राचार्य’ या पुरस्काराने गौरवण्यात आले.[ दुजोरा हवा]

इ.स. २०१२ सालच्या "सकाळ करंडक' आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेच्या नाशिक केंद्राच्या प्राथमिक फेरीत संगमनेर महाविद्यालय, संगमनेरच्या "कुक्कुटवध' एकांकिकेस द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.[२८]

महाविद्यालयातील नामवंत साहित्यिक/लेखक[संपादन]

 1. प्राध्यापिका कु. विमल लेले - वरिष्ठ महाविद्यालयात संस्कृत विभागप्रमुख, जुन्या पिढीतील संस्कृतच्या अभ्यासक आणि लेखिका (दिवंगत)
 2. रंगनाथ गबाजी पठारे (निवृत्त), भौतिकशास्त्राचे विभागप्रमुख, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते आणि प्रयोगशील मराठी साहित्यिक
 3. रावसाहेब राणोजी कसबे (निवृत्त) राज्यशास्त्राचे प्राध्यापक, अभ्यासक व प्रसिद्ध विचारवंत
 4. प्रा. अलीम वकील (निवृत्त), सुफी संप्रदायाचे अभ्यासक आणि राज्यशास्त्राचे व्यासंगी
 5. सु.रा. चुनेकर (निवृत्त), ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक
 6. प्रा. मा. रा. लामखडे (निवृत्त), मराठी विभागप्रमुख, लोकसाहित्याचे संशोधक आणि लेखक
 7. कवी पोपट सातपुते (निवृत्त), मराठी विभाग, कनिष्ठ महाविद्यालय
 8. प्रा.मधुकर विश्वनाथ दिवेकर, विज्ञानकथा लेखक, वनस्पती विभाग प्रमुख, गेल्या तीस वर्षांपासून कायर्रत.
 9. श्रीनिवास ओंकार हेमाडे, स्तंभलेखक (तत्त्वभान[२९] -लोकसत्ता), अनुवादक आणि विकिपीडिया लेखक-संपादक, वरिष्ठ महाविद्यालयात तत्त्वज्ञान विभाग प्रमुख, १९९१ पासून कार्यरत.

अधिकृत टपाल पत्ता व संपर्क[संपादन]

 • सर्व्हे नंबर २३९, घुलेवाडी, पोस्ट : घुलेवाडी, पुणे-नासिक महामार्ग, संगमनेर ४२२ ६०५ जिल्हा : अहमदनगर, महाराष्ट्र, भारत.
 • दूरध्वनी : ०२४२५ + २२३ १८१, २२५ ८३१.

अधिकृत संकेतस्थळ[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=130319:2011-01-18-19-13-30&Itemid=1
 2. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/edit/ravivar-mata/-/articleshow/26282010.cms
 3. ^ "Sangamner College Nagarpalika Arts, D. J. Malpani Commerce & B. N. Sarda Science College". sangamnercollege.edu.in. 2020-12-09 रोजी पाहिले.
 4. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/edit/manasa/-/articleshow/18299960.cms?
 5. ^ http://sangamnercollege.edu.in/our-people/
 6. ^ http://sangamnercollege.edu.in
 7. ^ "असे आहेत आमचे नाना !"- कु. विमल लेले, प्राध्यापिका - संस्कृत विभाग, संगमनेर महाविद्यालय, संगमनेर; संपादकीय, नियतकालिक, संगमनेर आर्ट्‌स ॲन्ड कॉमर्स कॉलेज, संगमनेर, वर्ष ७ वे, १९६७—६८, प्रकाशक : म. वि. कौंडिण्य, प्राचार्य, संगमनेर साहित्य व वाणिज्य महाविद्यालय, संपादक मंडळ : प्राचार्य, म. वि. कौंडिण्य, प्रा. श. वि. पानसे, प्रा. प्र. ना. अवसरीकर, प्रा. कु. विमल लेले, प्रा. ग.म. कांबळे प्रा. सु. शं. कलवडे, मुद्रक : चंद्रकांत शंकर जोशी, शिवाजी प्रिंटर्स, २२१२, संगमनेर पान १०-१२ व १११
 8. ^ (शताब्दी) स्मृती ग्रंथ, संगमनेर नगरपालिका (१८६०-१९६०), पान ५७-५८, शतसांवत्सरिक महोत्सव ३ मे १९६२, प्रकाशक : चिन्नप्पा व्यंकप्पा झुंजूर, अध्यक्ष, संगमनेर नगरपालिका, २२ ऑक्टोबर १९६२, मूल्य: पांच रुपये, मुद्रक : चंद्रकांत शंकर जोशी, शिवाजी प्रिंटर्स, २२११, संगमनेर
 9. ^ (शताब्दी) स्मृती ग्रंथ, संगमनेर नगरपालिका (१८६०-१९६०), पान ४३, शतसांवत्सरिक महोत्सव ०३ मे १९६२, प्रकाशक : चिन्नप्पा व्यंकप्पा झुंजुर, अध्यक्ष, संगमनेर नगरपालिका, २२ ऑक्टोबर १९६२, मूल्य: पांच रुपये, मुद्रक : चंद्रकांत शंकर जोशी, शिवाजी प्रिंटर्स, २२११, संगमनेर
 10. ^ संपादकीय, नियतकालिक, संगमनेर आर्ट्‌स ॲन्ड कॉमर्स कॉलेज, संगमनेर, अंक १-२, वर्ष १९६२—६३, प्रकाशक : म. वि. कौंडिण्य, प्राचार्य, संगमनेर साहित्य व वाणिज्य महाविद्यालय, संपादक मंडळ : प्राचार्य, म. वि. कौंडिण्य, प्रा. श. वि. पानसे, प्रा. प्र. ना. अवसरीकर, प्रा. कु. विमल लेले, प्रा. ग.म. कांबळे प्रा. सु. शं. कलवडे, मुद्रक : चंद्रकांत शंकर जोशी, शिवाजी प्रिंटर्स, २२१२, संगमनेर, पान ०५
 11. ^ (शताब्दी) स्मृती ग्रंथ, संगमनेर नगरपालिका (१८६०-१९६०), पान ५८, शतसांवत्सरिक महोत्सव ०३ मे १९६२, प्रकाशक : चिन्नप्पा व्यंकप्पा झुंजुर, अध्यक्ष, संगमनेर नगरपालिका, २२ ऑक्टोबर १९६२, मूल्य: पाच रुपये, मुद्रक : चंद्रकांत शंकर जोशी, शिवाजी प्रिंटर्स, २२११, संगमनेर
 12. ^ संपादकीय, नियतकालिक, संगमनेर आर्ट्‌स ॲन्ड कॉमर्स कॉलेज, संगमनेर, अंक १-२, वर्ष १९६२—६३, प्रकाशक : म. वि. कौंडिण्य, प्राचार्य, संगमनेर साहित्य व वाणिज्य महाविद्यालय, संपादक मंडळ : प्राचार्य, म. वि. कौंडिण्य, प्रा. श. वि. पानसे, प्रा. प्र. ना. अवसरीकर, प्रा. कु. विमल लेले, प्रा. ग.म. कांबळे प्रा. सु. शं. कलवडे, मुद्रक : चंद्रकांत शंकर जोशी, शिवाजी प्रिंटर्स, २२१२, संगमनेर, पान ०५
 13. ^ (शताब्दी) स्मृतिग्रंथ, संगमनेर नगरपालिका (१८६०-१९६०), पान ५८, शतसांवत्सरिक महोत्सव ०३ मे १९६२, प्रकाशक : चिन्नप्पा व्यंकप्पा झुंजूर, अध्यक्ष, संगमनेर नगरपालिका, २२ ऑक्टोबर १९६२, मूल्य: पाच रुपये, मुद्रक : चंद्रकांत शंकर जोशी, शिवाजी प्रिंटर्स, २२११, संगमनेर
 14. ^ SELF STUDY REPORT, (THIRD CYCLE), volume I, SECTION B: PREPARATION OF SELF-STUDY REPORT Part A: PROFILE OF THE AFFILIATED / CONSTITUENT COLLEGE, Page 13, column 07, http://sangamnercollege.edu.in/wp-content/uploads/sangamner_ssr_2015.pdf, ११ जानेवारी २०१६ रोजी दुवा पहिला.
 15. ^ पहिले नियतकालिक, संगमनेर आर्ट्‌स ॲन्ड कॉमर्स कॉलेज, संगमनेर, अंक १-२, वर्ष १९६२—६३, प्रकाशक : म. वि. कौंडिण्य, प्राचार्य, संगमनेर साहित्य व वाणिज्य महाविद्यालय, संपादकमंडळ : प्राचार्य, म. वि. कौंडिण्य, प्रा. श. वि. पानसे, प्रा. प्र. ना. अवसरीकर, प्रा. कु. विमल लेले, प्रा. ग.म. कांबळे प्रा. सु. शं. कलवडे, मुद्रक : चंद्रकांत शंकर जोशी, शिवाजी प्रिंटर्स, २२१२, संगमनेर
 16. ^ म. वि. कौंडिण्य : "संघर्षातून सामंजस्याकडे", दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. २५१ क, शनिवार पेठ, पुणे ४११०३०, १५ मार्च २००८, प्रकाशन क्र. १५७३, प्रकाशक : राजीव दत्तात्रय बर्वे, दिलीपराज प्रकाशन ; पान ४५-५२ ISBN 978-81-7294-634-0, मूल्य: २२०/- रु.
 17. ^ संपादकीय, नियतकालिक, संगमनेर आर्ट्‌स ॲन्ड कॉमर्स कॉलेज, संगमनेर, अंक १-२, वर्ष १९६२—६३, प्रकाशक : म. वि. कौंडिण्य, प्राचार्य, संगमनेर साहित्य व वाणिज्य महाविद्यालय, संपादक मंडळ : प्राचार्य, म. वि. कौंडिण्य, प्रा. श. वि. पानसे, प्रा. प्र. ना. अवसरीकर, प्रा. कु. विमल लेले, प्रा. ग.म. कांबळे प्रा. सु. शं. कलवडे, मुद्रक : चंद्रकांत शंकर जोशी, शिवाजी प्रिंटर्स, २२१२, संगमनेर, पान ०५
 18. ^ दर्शन ग्रंथ, पान ०२, संपादक - प्रा. सु. चुनेकर,शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रकाशन, १९८०
 19. ^ म. वि. कौंडिण्य : "संघर्षातून सामंजस्याकडे", दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. २५१ क, शनिवार पेठ, पुणे ४११०३०, १५ मार्च २००८, प्रकाशन क्र. १५७३, प्रकाशक : राजीव दत्तात्रय बर्वे, दिलीपराज प्रकाशन ; पान ४५-५२ ISBN 978-81-7294-634-0, मूल्य: २२०/- रु.
 20. ^ संगमनेर महाविद्यालयात माजी विद्यार्थी रमले भूतकाळात , दिव्य मराठी, अहमदनगर आवृत्ती, http://epaperdivyamarathi.bhaskar.com/ahmednagar/256/28122015/0/1/, २९ डिसेंबर २०१५ रोजी पाहिले.
 21. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/edit/manasa/-/articleshow/18299960.cms?
 22. ^ अनुराधा परब, 'चतुरंग जीवनगौरव पुरस्काराचे बहुविध मानकरी'http://www.globalmarathi.com/20101218/4683538052284450912.htm
 23. ^ http://www.globalmarathi.com/20101218/4683538052284450912.htm
 24. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/edit/manasa/-/articleshow/18299960.cms?
 25. ^ "दर्शन" ग्रंथ, पान २१; संपादक - प्रा. सु. चुनेकर, प्रा. भ. वि. जोशी, प्रा. ह. रा. देवचके, प्रा. डॉ. दि. रा. महाजन; सूत्रचालक : प्राचार्य म. वि. कौंडिण्य; संयोजक व निमंत्रक : प्रा. सु.दा. मालवाडकर; मूळ कल्पना : कायर्कारी मंडळ, शिक्षण प्रसारक संस्था, संगमनेर; सहायक : प्रा. श्री. स. गोसावी; प्रकाशक : बा. ल. काटे, जनरल सेक्रेटरी, शिक्षण प्रसारक संस्था, संगमनेर; मांडणी सजावट : आय ॲड्‌ज, पुणे; मुद्रक : चि. सं. लाटकर, कल्पना मुद्रणालय ४६१/४, 'शिवपार्वती', टिळक रस्ता, पुणे ३०; प्रसिद्धी काल : १९८०, देणगी मूल्य: रु. १००/-
 26. ^ "दर्शन" ग्रंथ, पान २३; संपादक - प्रा. सु. चुनेकर, प्रा. भ. वि. जोशी, प्रा. ह. रा. देवचके, प्रा. डॉ. दि. रा. महाजन; सूत्रचालक : प्राचार्य म. वि. कौंडिण्य; संयोजक व निमंत्रक : प्रा. सु.दा. मालवाडकर; मूळ कल्पना : कायर्कारी मंडळ, शिक्षण प्रसारक संस्था, संगमनेर; सहायक : प्रा. श्री. स. गोसावी; प्रकाशक : बा. ल. काटे, जनरल सेक्रेटरी, शिक्षण प्रसारक संस्था, संगमनेर; मांडणी सजावट : आय ॲड्ज, पुणे; मुद्रक : चि. सं. लाटकर, कल्पना मुद्रणालय ४६१/४, 'शिवपार्वती', टिळक रस्ता, पुणे ३०; प्रसिद्धी काल : १९८०, देणगी मूल्य: रु. १००/-
 27. ^ "दर्शन" ग्रंथ, पान २४; संपादक - प्रा. सु. चुनेकर, प्रा. भ. वि. जोशी, प्रा. ह. रा. देवचके, प्रा. डॉ. दि. रा. महाजन; सूत्रचालक : प्राचार्य म. वि. कौंडिण्य; संयोजक व निमंत्रक : प्रा. सु.दा. मालवाडकर; मूळ कल्पना : कायर्कारी मंडळ, शिक्षण प्रसारक संस्था, संगमनेर; सहायक : प्रा. श्री. स. गोसावी; प्रकाशक : बा. ल. काटे, जनरल सेक्रेटरी, शिक्षण प्रसारक संस्था, संगमनेर; मांडणी सजावट : आय ॲइज, पुणे; मुद्रक : चि. सं. लाटकर, कल्पना मुद्रणालय ४६१/४, 'शिवपार्वती', टिळक रस्ता, पुणे ३०; प्रसिद्धी काल : १९८०, देणगी मूल्य: रु. १००/-
 28. ^ http://www.esakal.com/esakal/20120119/5247962706381264026.htm
 29. ^ Unknown (2015-05-21). "तत्त्वभान अनुक्रम". Tattvabhan तत्त्वभान. 2020-12-09 रोजी पाहिले.