शंकरराव गंगाधर जोशी
शंकरराव गंगाधर जोशी (जन्म :१७ मे १८८७ संगमनेर, अहमदनगर, - ०१ सप्टेंबर १९६९ संगमनेर) हे संगमनेर येथील जुन्या पिढीतील बहुश्रुत सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ व द्रष्टे आणि निष्ठावंत देशभक्त होते. ते 'नाना' नावाने परिचित होते. केवळ त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उच्चशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. ते लोकमान्य टिळकांचे भक्त आणि अनुयायी होते.[१] तत्कालिन प्रायमरी ट्रेनिंग कॉलेज आणि विद्यमान संगमनेर महाविद्यालयाचे मूळ प्रवर्तक आणि संस्थापक होते.
शंकरराव जोशी यांना संगमनेर शहर तालुका आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात महत्त्वाचे स्थान आहे. शिक्षण प्रसारक संस्था स्थापन करण्याच्या घटना समितीचे ते पहिले सभासद, नंतर शिक्षण प्रसारक संस्थेचे पहिले सचिव आणि नंतरचे उपाध्यक्ष होते.[२]
स्वातंत्र्यपूर्वकाळात 'विद्यार्थी संसद' स्थापन करून त्याद्वारे विद्यार्थांना लोकशाहीचे भान देण्याचा आणि शिक्षकवर्गाचे प्रश्न मांडण्यासाठी आणि शिक्षकांमध्ये राष्ट्र्भान जागे करण्यासाठी 'शिक्षक संघटना' स्थापन करण्याचा देशातील पहिला मान शंकरराव जोशी यांच्याकडे जातो. प्रायमरी ट्रेनिंग कॉलेज आणि संगमनेर महाविद्यालयाच्या रूपाने अनेक शैक्षणिक, सामाजिक, राजकीय उपक्रमांना त्यांनी चालना दिली. लेखन, चिंतन आणि चळवळी यांनी त्यांचे जीवन भारलेले होते. ते राष्ट्रीय काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते, लोकमान्य टिळकांचे अनुयायी आणि प्रखर राष्ट्रभक्त होते.
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, लोकमान्य टिळक, म. गांधी, साने गुरुजी, पैसा फंडचे अध्यक्ष अंताजी दामोदर काळे [१] यांच्या सभा संगमनेर येथे व्हाव्यात, राष्ट्रभक्तीविषयी लोकजागृती व्हावी यासाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. स्वातंत्र्यपूर्व काळात पत्रके छापण्यातील आणि ते वाटण्यातील अडचणी ध्यानात येताच स्वतःचा छपखाना काढणारे ते अहमदनगर जिल्ह्यातील पहिले राष्ट्रभक्त होते.
कौटुंबिक माहिती
[संपादन]शंकरराव जोशी यांचा जन्म त्यांच्या आजोळी गरीब जोशी कुटुंबात संगमनेर येथे झाला. दत्तात्रय (दत्तोपंत, मृत ), प्रभाकर (बाळासाहेब, मृत) आणि चंद्रकांत (बंडोपंत, मृत) ही त्यांच्या मुलांची आणि मैनाताई, वत्सलाताई ही त्यांच्या दोन मुलींची नावे आहेत.
शिक्षण
[संपादन]परिस्थिती हलाखीची असल्याने मराठी पाचवीनंतर नानांनी नोकरी करावी, अशी त्यांचा आजोबांची (गंगाधर यांचे वडील ?) इच्छा होती. तथापि नानांना इंग्रजी विद्येची आस होती. त्यामुळे त्यांनी नेटाने इंग्रजी पाचवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतरच्या शिक्षणाची सोय संगमनेर येथे नव्हती. आईकडूनचे आजोळ निजामपूरकर मुंबईत असल्याने पुढील शिक्षणाकरिता ते मुंबईत गेले. तेथे मॅट्रिक उत्तीर्ण झाले. त्याचवेळी बाहेरून त्यांनी चित्रकलेचे शिक्षण घेतले. त्यांचे शिक्षण :
- मराठी प्राथमिक : पेटीट विद्यालय, संगमनेर
- १९०३ : इंग्रजी पाचवी
- १९०४ : चित्रकलेची पहिली परीक्षा
- १९०८ : डी. टी. सी. चित्रकला, मुंबई
व्यावसायिक कारकीर्द
[संपादन]मॅट्रिकनंतर त्यांनी प्रथम ब्रिटिश टपाल खात्यातील काम केले, त्यानंतर ते बॉम्बे गॅझेट प्रेसमध्ये कॉपीरीडर होते. तथापि ते इंग्रजांच्या वर्णभेदाच्या विदारक अनुभवामुळे ते संगमनेरात परतले आणि पेटीट विद्यालयात कला शिक्षक म्हणून रुजू झाले. तीस वर्षांच्या सेवेनंतर तेथून १९३८ साली निवृत्त झाले[१]
संगमनेर येथे आणि अहमदनगर येथे त्यांनी तीन छापखाने सुरू केले. संगमनेर येथे शिवाजी प्रिंटींग प्रेस, अहमदनगर येथे नवभारत प्रिंटींग प्रेस (१९३६) आणि कल्पना ब्लॉक मेकर्स अँड आर्ट प्रिंटर्स.
सामाजिक कारकीर्द
[संपादन]पेटीट विद्यालयात असतानाच पेटीट विद्यालय नावारूपाला आणण्याकरिता विद्यालयात आणि संगमनेर शहराच्या सर्वागीण विकासासाठी संगमनेरात अनेक उपक्रम नानांनी सुरू केले. त्यातील ठळक उपक्रम पुढीलप्रमाणे :
- चित्रकला परीक्षांचे केंद्र – १९०९.
- शिमग्यासारख्या सार्वजनिक उत्सवातील पैशाचा अपव्यय, गैरप्रकार बंद करून मैदानी व इतर खेळांचे सामने व शर्यती सुरू केल्या.
- माजी विद्यार्थी-शिक्षक निधी - १९१९ : रु. ११०००/- (रु. अकरा हजार) : गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणाची सामाजिक जबाबदारीचे भान विद्यार्थी-शिक्षक जागे केले.
- 'विद्यार्थी संसद' : विद्यार्थांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि त्यांना लोकशाहीचे प्रशिक्षण देण्यासाठी स्थापन केली.
- 'शिक्षक संघटना' : शिक्षक वर्गाचे प्रश्न मांडण्यासाठी आणि शिक्षकांमध्ये राष्ट्र्भान जागे करण्यासाठी स्थापन केली.
- हातमाग व चरखे यांचा विणकर वर्गात (साळी, कोष्टी इत्यादी जातीत) प्रसार व प्रचार : १९२१
- ट्रेनिंग कॉलेज आणि संगमनेर महाविद्यालयाची स्थापना केली
लेखन
[संपादन]- चित्रकलेवर काही पुस्तके
- हिंदी शब्दकोश, म्हणी, व्याकरण विषयक ग्रंथ.
- 'हिंदी कहावत कोश' : १९४१.
- स्वतंत्र भारत संकीर्तन
- अहमदनगर जिल्ह्याचा इतिहास
पदे
[संपादन]- कार्याध्यक्ष : अहमदनगर जिल्हा वाचनालय इमारत समिती
- उपाध्यक्ष : शिक्षण प्रसारक संस्था, संगमनेर
- सचिव : शिक्षण प्रसारक संस्था, संगमनेर
- सचिव : कन्या विद्या मंदिर, अहमदनगर
- सचिव : पेटीट विद्यालय हिरक महोत्सव, संगमनेर – १९४६
लोकमान्य टिळकांचे शिष्यत्व
[संपादन]पुरस्कार
[संपादन]'हिंदी कहावत कोश' या पुस्तकास डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्सलेटर सोसायटीचा पुरस्कार
कृतज्ञता लेख
[संपादन]शंकरराव गंगाधर जोशी यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाविद्यालयातील तत्कालिन संस्कृत विभागाच्या शिक्षिका कु. विमल लेले यांनी महाविद्यालयाच्या १९६७ सालच्या वार्षिक नियतकालिकात "असे आहेत आमचे नाना ! " हा लेख लिहिला.[१]
संदर्भ
[संपादन]- ^ a b c d "असे आहेत आमचे नाना !"- कु. विमल लेले, प्राध्यापिका - संस्कृत विभाग, संगमनेर महाविद्यालय, संगमनेर; संपादकीय, नियतकालिक, संगमनेर आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, संगमनेर, वर्ष ७ वे, १९६७—६८, प्रकाशक : म. वि. कौंडिन्य, प्राचार्य, संगमनेर साहित्य व वाणिज्य महाविद्यालय, संपादक मंडळ : प्राचार्य, म. वि. कौंडिन्य, प्रा. श. वि. पानसे, प्रा. प्र. ना. अवसरीकर, प्रा. कु. विमल लेले, प्रा. ग.म. कांबळे प्रा. सु. शं. कलवडे, मुद्रक : चंद्रकांत शंकर जोशी, शिवाजी प्रिंटर्स, २२१२, संगमनेर, पान १०-१२ व १११
- ^ संपादकीय, नियतकालिक, संगमनेर आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, संगमनेर, अंक १-२, वर्ष १९६२—६३, प्रकाशक : म. वि. कौंडिन्य, प्राचार्य, संगमनेर साहित्य व वाणिज्य महाविद्यालय, संपादक मंडळ : प्राचार्य, म. वि. कौंडिन्य, प्रा. श. वि. पानसे, प्रा. प्र. ना. अवसरीकर, प्रा. कु. विमल लेले, प्रा. ग.म. कांबळे प्रा. सु. शं. कलवडे, मुद्रक : चंद्रकांत शंकर जोशी, शिवाजी प्रिंटर्स, २२१२, संगमनेर पान ०३,- ०५