Jump to content

वासुदेव (लोककलाकार)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वासुदेव, लोककलाकार या पानावरून पुनर्निर्देशित)
वासुदेव

वासुदेव हा महाराष्ट्रातील गावांमध्ये सकाळच्या वेळी घरोघर हिंडून पांडुरंगावरील अभंग - गवळणी गात दान मागणारा लोककलाकार आहे.[]

वर्णन

[संपादन]

डोक्यावर मोरपिसांची टोपी, पायघोळ अंगरखा, पायांत विजार किंवा धोतर, कमरेभोवती शेलावजा उपरणे गुंडाळलेले, एका हातात चिपळ्या, दुसऱ्या हातात पितळी टाळ कमरेला पांवा, मंजिरी अशी वाद्ये आणि काखेला झोळी,गळ्यात कवड्यांच्या व रंगीबेरंगी मण्यांच्या माळा,हातात तांब्याचे कडे,कपाळावर व कंठावर गंधाचे टिळे असा वासुदेवाचा वेष असतो.[]

तत्त्वज्ञान

[संपादन]

वासुदेव ही समाज प्रबोधन करणारी एक संस्था आहे अशा शब्दात वासुदेवाचा गौरव केला जातो. वासुदेव आपल्या गीतातून जे तत्त्वज्ञान सांगतो त्यामध्ये दैववाद आहे. आपण चागंले काम करीत रहावे आणि आयुष्यात मिळणार-या चांगल्या वाईट अनुभवाची ईश्वरावर सोपवावी अशी वासुदेवाची जीवनदृष्टी आहे.

ऐतिहासिक दाखले

[संपादन]

वासुदेवाच्या साहाय्याने छत्रपति शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या घरी निरोप पाठवले आहेत. तसेच वासुदेवाचा हेरगिरीसाठी उपयोग करून शत्रूंच्या गोटातल्या बातम्याही मिळवल्या आहेत.

परंपरेचा उगम

[संपादन]

मराठी संस्कृतीतील वासुदेवांची परंपरा सुमारे हजार-बाराशे वर्षे जुनी असावी, असा अंदाज आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव यांच्या साहित्यात वासुदेवावरील रूपके आढळतात. परंतु एकनाथ महाराजांनी त्याला आणखी प्रसिद्धीच्या झोतात आणले.

वासुदेवावरील रूपकाचा नमूना

[संपादन]

गातों वासुदेव मी ऐका ।
चित्त ठायीं ठेवून ऐका ।
डोळे झांकून रात्र करूं नका ।
काळ करीत बैसला असे लेखा गा ॥
राम राम स्मरा आधीं ॥ ॥

वासुदेव हरी वासुदेव हरी |
सकाळच्या पारी आली वासुदेवाची स्वारी |
सीता सावली माना दान करी वासुदेवा |
श्रीकृष्ण घ्या सखा नाही होणार तुला धोका ||

वासुदेव आला हो वासुदेव आला

[संपादन]

चित्रपट: देवता, गायकः जयवंत कुलकर्णी, संगीत: राम-लक्ष्मण, गीत: मधुसूदन कालेलकर

दान पावलं बाबा दान पावलं
वासुदेव आला हो वासुदेव आला
सकाळच्या पारी हरीनाम बोला ||धृ||

नाही कुणी जागं झोपलं पहारा
दुःखी जीव तुला देवाचा सहारा
तुझ्यासाठी देव वासुदेव झाला ||१||

जागा हो माणसा संधी ही अमोल
तुझ्या रे जीवाला लाखाचं रे मोलं
घालतील वैरी अचानक घाला ||२||

इच्चेच्या झाडाला बांधलाय घोडा
घालूनिया घावं सारे बंध तोडा
नको रे उशीर,वेळ फार झाला ||३||

हे सुद्धा पहा

[संपादन]

भटके कलावंत आणि भिक्षेकरी

चित्रदालन

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ ढेरे, रामचंद्र (1996). लोकसंस्कृतीचे उपासक. पुणे: पद्मगंधा प्रकाशन. pp. 9–19. ISBN 978-93-84416-46-1.
  2. ^ "वासुदेव". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-07-04. 2020-09-22 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]