मांडव्य ऋषी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


या लेखातील मजकूर / विभागातील मजकूर मिसळपाव येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.(१२/०९/२०१६)



मांडव्य ऋषी मोठे तपस्वी होते. रानातील आपल्या झोपडीबाहेरील झाडाखाली ते एकदा मौनव्रत धारण करून तप करीत बसले होते. शेजारच्या राजधानीत चोरी करून काही चोर पळून रानात आले. मागे राजाचे शिपाई पाठलाग करत होते. चोर झोपडीत लपून बसले. शिपाई मागून आले व मांडव्यांना विचारू लागले की "चोरांना पाहिले का ?" मौनव्रत असल्याने माडव्य काही बोलले नाहीत. शिपायांना संशय आला. त्यांनी झोपडीत तपास केला व चोरांना पकडले. धनही मिळाले. मांडव्य काही बोलला नाही म्हणजे तोही चोरांचा साथीदार असला पाहिजे असे समजून त्यालाही पकडून राजधानीत नेले. राजाला कळवल्यावर त्याने चौकशी न करता सगळ्यांना देहदंडाची शिक्षा दिली.

शिक्षा भोगत असतानाही काही न बोलता मांडव्य वेदपठण करत तपच करत होते. काही दिवसांनी रक्षकांच्या ध्यानात आले हा एकच माणूस वेदना होत असतांनाही ओरडत नाही व इतके दिवस अन्नपाण्याशिवाय जिवंत आहे. त्यांनी राजाला त्याप्रमाणे कळविले व राजा घाईघाईने तेथे आला व आपली चूक लक्षात आल्यावर हात जोडून मांडव्यांना म्हाणाला "अज्ञानाने माझ्या हातून चूक झाली, मला क्षमा करा." माडव्यांनी "तुझी काही चूक नाही" असे सांगितले.

मग त्यांना सुळावरून उतरवले व सूळ काढण्याचा प्रयत्न केला. पण सुळाचे टोक पोटात अडकून बसले होते ते निघेना. शेवटी शूळ तोडून काढला व टोक तसेच पोटात राहिले. त्याच्या वेदना सहन करत मांडव्य तपश्चर्या करत राहिले व त्यांनी तपाने प्राप्त होणारे सर्व दुर्लभ लोक प्राप्त करून घेतले. मग एकदा यमध्रर्माच्या सभेत जाऊन त्यांनी धर्मराजाला विचारले " प्रभो, माझ्या हातून जाणूनबुजून तर काही अपराध घडला नाही, तर मग कोणत्या नकळत घडलेल्या अपराधामुळे मला सुळावर चढण्याची शिक्षा मिळाली ? " यमधर्म म्हणाला " हानपणी तू एका पतंगाच्या शेपटीला काडी टोचली होतीस. त्याचे हे फळ. लहानसे दान केले तरी त्याचे नोठे फल मिळते तसे स्वल्प अधर्माचे फल मोठे दुःख देणारे मिळते."

मांडव्य म्हणाले " धर्मा ! जन्मापासून बारा वर्षेपर्यंत जीवाच्या हातून जे काय होते त्याबद्दल तो जबाबदार नाही. या वयात त्याच्या हातून पातक होतच नाही. धर्मशास्त्रज्ञ या वयातील कृत्ये हिशेबातच घेत नाहीत. असो. माझा अपराध लहान असतांना तू मला ही असह्य पीडा होईल असा दंड केलास म्हणून मनुष्यजातीच्या शूद्र वर्णात तुला जन्म प्राप्त होईल. मी आजपासून असा धर्मफलाचा उदयकारी नियम बांधून देतो की यापुढे चौदा वर्षेपर्यंत घडलेल्या दुष्कृत्याबद्दल जीवास दंड असू नये, कारण ते त्याचे दुष्कृत्य अज्ञानजन्य असल्याने पापकारक होत नाही."

  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले