भोगावती नदी
Appearance
(भोगावती या पानावरून पुनर्निर्देशित)
भोगावती नदी (कोल्हापूर) याच्याशी गल्लत करू नका.
| भोगावती नदी | |
|---|---|
| पाणलोट क्षेत्रामधील देश | सोलापूर जिल्हा, महाराष्ट्र |
| ह्या नदीस मिळते | सीना |
भोगावती नदी ही महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील एक नदी आहे. ही सीना नदीची उपनदी आहे. धाराशिव येथे हिचा उगम आहे. बार्शी व माढा तालुक्यांतून ती वाहते. वराई, नागझरी, नीलकंठा व सीरा या तिच्या उपनद्या आहेत.मोहोळ तालुक्यातील भोयरे गावाजवळ भोगावती नदीचा सीना नदीशी संगम होतो. भोगावती नदीची एकूण लांबी ६५ किलोमीटर आहे.
उत्पत्ती व प्रवाह
- भोगावती नदीची उत्पत्ती उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातील बळघाट पर्वतरांगांच्या दक्षिण उतारांवरून होते.
- नदी प्रथम धाराशिव शहरातून वाहते.
- पुढे राघूचीवाडी येथे “पाझर तलाव” बांधलेला आहे.
- त्यानंतर नदी पिंपरी व चिलवडी गावांतून वाहते.
- येथे ती मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रात प्रवेश करते आणि सोलापूर जिल्ह्यात झरेगाव येथे येते.
- झरेगावात नदीचा प्रवाह दक्षिणेकडून उत्तरेकडे आहे, जे हिंदू धार्मिक परंपरेनुसार विशेष मानले जाते.
- झरेगावात भोगावती व वलगुड नदीचा संगम आहे.
- पुढे नदीवर हिंगणी तलाव बांधले गेले आहे, जे सिंचनासाठी महत्त्वाचे आहे.
उपनद्या
भोगावती नदीला अनेक लहान उपनद्या मिळतात. प्रमुख उपनद्या अशा आहेत :
- बोधकी (Bodki)
- नागसरी (Nagsari)
- शिरा (Sira)
- राम (Ram)
- नीलकंठ (Nilkantha)
- कवळदार (Kavaldara)
- खडकी (Khadki)
ऐतिहासिक व पुरातन महत्त्व
- इ.स.पू. ६व्या शतकापासून ते इ.स. ४थ्या शतकापर्यंत नदीच्या काठावर मानवी वस्ती व संस्कृती विकसित झाल्याचे पुरावे सापडतात.
- बार्शी तालुक्यातील झाडी, पानगाव, पिंपळगाव येथे पुरातन वस्तू व मातीची भांडी (Black & Red Ware, Red Polished Pottery, Black Slipped Pottery) सापडली आहेत.
- यावरून त्या काळातील व्यापारी संबंध, सामाजिक घडामोडी आणि सांस्कृतिक देवाणघेवाण स्पष्ट होते.
धार्मिक महत्त्व
- हिंदू धर्मग्रंथांनुसार नदीचा प्रवाह दक्षिणेकडून उत्तरेकडे (उत्तरवाहिनी) असेल, तर त्या नदीला विशेष धार्मिक महत्त्व असते. उत्तर दिशा ही मोक्ष, धर्म व देवतांची दिशा मानली जाते. त्यामुळे उत्तरवाहिनी नदीत स्नान, श्राद्ध व दान यांचे पुण्य अधिक मानले जाते. वाराणसीतील गंगा, नाशिकमधील गोदावरी, उज्जैनमधील शिप्रा या नद्यांप्रमाणेच भोगावती नदीही झरेगाव ते वलगुड संगम यादरम्यान उत्तरवाहिनी असल्यामुळे तिला विशेष महत्त्व प्राप्त होते. पारंपरिक दृष्टिकोनात दक्षिण दिशा म्हणजे यमलोकाची दिशा मानली जाते, तर उत्तर दिशा म्हणजे धर्म, मोक्ष, हिमालय व देवतांची दिशा. त्यामुळे जेव्हा नदीचा प्रवाह दक्षिणेकडून उत्तरेकडे म्हणजे उत्तरवाहिनी असतो, तेव्हा तो यमलोकातून देवलोकाकडे जाणाऱ्या प्रवाहाचा प्रतीक मानला जातो. उत्तरवाहिनी नदीत स्नान, दान, श्राद्ध व इतर धार्मिक विधी केले तर त्याचे पुण्य अधिक असल्याचे गरुड पुराण व स्कंद पुराण यांत उल्लेख आहेत. त्यामुळे स्थानिक लोक या प्रवाहाला धार्मिक व पवित्र महत्त्व देतात.
- तसेच उपळे दुमाला (रामनाथाचे उपळे) येथे स्थानिक लोककथेनुसार वनवासकाळात प्रभू श्रीरामांनी आपल्या वडिलांचे श्राद्धकार्य भोगावती नदीच्या काठावर केले असे मानले जाते. त्यामुळे या स्थळाला विशेष धार्मिक ओळख आहे.