पत्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मंगळागौर, हरतालिका आदी देवींच्या पूजेच्या वेळी त्यांना पत्री म्हणजे झाडांची पाने वाहण्याची प्रथा हिंदू धर्मात आहे. गणेश पूजनादरम्यानसुद्धा अशाच प्रकारे २१ प्रकारच्या पत्री वाहतात. या प्रथेमागे पूर्वजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे मानवाच्या सभोवताली असणाऱ्या निसर्गामधील अनमोल औषधी-खजिन्याचे ज्ञान पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा शास्त्रीय हेतू डोळ्यांसमोर ठेवूनच गणेशचतुर्थीसारख्या सर्वप्रिय सणावेळी पत्री वाहण्याची प्रथा पूर्वजांनी सुरू केली आहे. हजारो वर्षांच्या निरीक्षण व संशोधनानंतर मिळालेले औषधी-ज्ञान वेगवेगळ्या आजारांचा सामना करण्यासाठी पुढील पिढ्यांनाही विनासायास मिळावे हा महत्त्वाचा हेतू या पत्री वाहाण्यामागे आहे, हे उघड आहे.

कोणत्या देवाला काय चालते, काय नाही[संपादन]

  • गणपतीला दुर्वा चालतात, तुळस नाही. (दोघांचे गुणधर्म विरुद्ध आहेत.)
  • शंकराला केवडा चालत नाही.
  • देवीच्या दुर्गा, काली आदी उग्र रूपांना दुर्वा चालत नाहीत.

गणेशपूजनातील २१ पत्री[संपादन]

१. अगस्ती(हादगा)

अगस्तीची म्हणजेच हादग्याची पाने (Sesbania Grandiflors). प्राचीन ग्रंथांमध्ये नेत्रविकारांवर अगस्तीचे प्रयोग सापडतात. जीवनसत्त्व 'अ' हे दृष्टीला पोषक असतेत्या जीवनसत्त्वाचे वनस्पतिज रूप अर्थात बीटाकॅरोटिन हे तत्त्व अगस्तीच्या पानांमध्ये ४५००० यूजी- एवढय़ा प्रचंड प्रमाणात, म्हणजे गाजरापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात असते.

२. अर्जुन

अर्जुनपत्रे (Terminallia Arjuna). अर्जुन हा वृक्ष त्याच्या हृदयपोषक गुणधर्माबद्दल प्रसिद्ध आहे. 'अर्जुनारिष्ट' हे हृदयावरील औषध प्रसिद्ध आहेच. अर्जुनामध्ये मुबलक प्रमाणात असणाऱ्या नैसर्गिक कॅल्शिअममुळे अर्जुनाच्या सेवनाने हाडे हस्तिदंताप्रमाणे मजबूत होतात, अशी आयुर्वेदाची मान्यता आहे.

३. आघाडा

अपामार्ग म्हणजे आघाडा (Achyranthus Aspera). आघाड्याचे बरेचसे गुणधर्म हे स्त्रियांसाठी-स्त्रीरोगांवर, विशेष उपयुक्त असे आहेत.

४. कण्हेर

करवीर म्हणजे कण्हेर (Nerium Odorum). हिचा उपयोग तारतम्याने करतात, कारण कण्हेरीच्या विषबाधेने हृदय व श्वसनक्रिया बंद पडून आकडी येऊन तोंड वेडेवाकडे होते.

५. केवडा

केवड्याची पाने. (PendenusTectoritus). केवड्याच्या फुलाच्या रसामध्ये तयार केलेले तूप सेवन केल्यास ते मूत्रविकारावर उपयोगी पडते. दीर्घकालीन डोकेदुखीमध्ये किंवा इतर शिरारोगांमध्ये केवड्याचा लेप लावला जातो.

६. जातिपत्र

जातिपत्रे अर्थात जाईची पाने (Jasminum Oriculatum). जाई व्रणरोपक आहे. एखादा बरा न होणारा व्रण (जखम) जाईच्या पानांच्या काढ्याने धुऊन, त्या जखमेवर ठेचलेली पाने लावली असता जखम बरी होते.

७. डाळिंब

दाडिमपत्रे अर्थात डाळिंबाची पाने (Punica Granatum). चवीला आंबट असूनही पित्तशामक असलेल्या निवडक फळांमध्ये आवळ्याबरोबर डाळिंबाचा समावेश होतो. डाळिंब आतड्याच्या रोगांवरचे गुणकारी औषध आहे. मुळाची साल ही कृमिघ्न आहे; विशेषत टेपवर्मचा (चपटय़ा कृमीं) त्रास याने नाहीसा होतो. उपलब्ध औषधे: दाडिमावलेह, दाडिमाष्टक चूर्ण. लहान मुलांना होणाऱ्या जंत, जुलाब यांसारख्या आजारांमधील डाळिंबाची उपयुक्तता सर्वमान्य आहे.

८. डोरली

बृहतीपत्रे म्हणजे डोरलीची पाने (Solanum Indicum). डोरलीसारखे रूप असणाऱ्या रिंगणीच्या फळांचा व बियांचा धूर तोंडामध्ये घेतल्यास दंतकृमींचा त्रास कमी होतो, दातदुखी कमी होते आणि दात किडण्याची प्रक्रिया थांबते.

९. तुळस

तुळशीची पाने (Ocimum Sanctum), तुळशीचा सर्वप्रसिद्ध गुणधर्म म्हणजे तुळस ही सर्दी-कफ-तापावरचे प्रभावी औषध आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर घरामध्ये तुळस असायलाच हवी, इतकी तुळस त्या दिवसांमधील विविध आजारांवर उपयुक्त आहे. गजकर्ण (रिंगवर्म) या त्वचाविकारावर तुळशीचा रस लावल्यास फायदा होतो.

१०.दूर्वा

दूर्वा (Cynodon Dectylon). गणपती हे तेज (उष्ण) तत्त्वप्रधान दैवत आहे आणि उष्णतेचे शमन करणारी एक प्रमुख वनस्पती म्हणजे दूर्वा. आयुर्वेदात वर्णिलेल्या पित्तशामक वनस्पतींमध्ये दूर्वा हे एक आद्य औषध आहे.

११.देवदार

चरकसंहितेमधील अनेक रोगांवरील औषधी-प्रयोगांमध्ये देवदाराचा (Pinus Deodora) समावेश आहे. देवदाराच्या झाडाला सुरदारू असेसुद्धा म्हटले जाते.

१२.धोत्रा

धत्तूरपत्र म्हणजे धोत्र्याची पाने (Datura Stramonium) हे श्वसनविकारावरील एक प्रभावी औषध आहे. परंतु धोत्र्याचा विषारी गुण योग्य-पर्याप्त मात्रेमध्ये वापरल्यासच औषधासारखा उपयोगी पडतो; अन्यथा घातक होऊ शकतो.

१३.पिंपळ

अश्वत्थ पत्रे अर्थात पिंपळाची पाने (Phycus Religiosa). पिंपळ हा भारतातील अतिशय प्राचीन असा वृक्ष आहे; ज्याचे संदर्भ आयुर्वेदच नव्हे तर ऋग्वेदामध्येही सापडतात. संपूर्ण समाजाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या पिंपळासारख्या वृक्षांची लागवड आणि जतन करण्याची आठवण गणेशपूजनाच्या निमित्ताने करून देण्यात आलेली आहे.

१४.बेल

बेलाची पाने (Aegle Marmelos. बिल्व या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती आतड्यांच्या आजारांवरील एक उत्तम औषध आहे. बेलाची तयार औषधे : बिल्वादी चूर्ण, बिल्वावलेह, बेल-मुरांबा, इत्यादी.

१५.बोर

बदरीपत्र म्हणजे बोरीची पाने (Zizyphus Vulgaris). बोराच्या बीचे चूर्ण पाण्याबरोबर घेतल्यास सारखी खा-खा होण्याचा आजार कमी होतो. बोराच्या पानांची चटणी तांदुळाच्या कांजीबरोबर घेतल्यास माणसाचा लठ्ठपणा कमी होतो.

१६.मरवा

मरुपत्र म्हणजे मरव्याची पाने (Origanum Margorana). मरवा अतिशय आल्हाददायक सुगंधी असतो. शरीराच्या कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे हार्मोन्स तयार करणाऱ्या सर्व अंतस्रावी ग्रंथींची राणी समजल्या जाणाऱ्या पियूषिका ग्रंथीला उत्तेजना देण्याचा नैसर्गिक सुगंधाहून दुसरा सोपा उपाय नाही, असे आयुर्वेद म्हणतो.

१७.मधुमालती

मधुमालती म्हणजे मालती (शास्त्रीय नाव - Jasminum Grandiflorum). ही पत्री प्रामुख्याने मुखरोगांवर उपयुक्त वनस्पती आहे.

१८.माका

भृंगराजपत्र अर्थात माक्याची पाने (Eclipta Alba) माक्याचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे 'केश्य गुणधर्म'. केसांची वाढ आणि रंग या दोन्ही पातळ्यांवर तो उपयोगी ठरतो.

१९.रुई

अर्कपत्रे म्हणजे रुईची पाने. (Calotropis procera.) रुई उत्तम कफनाशक औषध आहे. एकंदरच शरीरातील विविध ग्रंथींना उत्तेजना देऊन त्यांचे कार्य सुधारणारे आणि पर्यायाने शरीराचा चयापचय निरोगी करणारे असे हे औषध आहे.

२०.विष्णूक्रान्ता

विष्णूक्रान्ता म्हणजे शंखपुष्पी (Evolvulus Alsinoides). बुद्धि-स्मृतिवर्धक म्हणून सुप्रसिद्ध असणारी ही शंखपुष्पी, बुद्धीवर आलेले मांद्याचे विघ्न दूर करते.

२१.शमी

शमीची पाने (Prosopis Spicigera). शमी हा शब्द 'शमयति रोगान् इति' म्हणजे रोगांचे शमन करणारी ती शमी असा तयार झालेला आहे.

पुस्तके[संपादन]

  • गणेशपत्रीवन (दीपक जोशी) : गणेशपूजेत वापरल्या जाणाऱ्या २१ वनस्पतींची औषधी, वैज्ञानिक माहिती.