शमी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शमी

अन्य नावे[संपादन]

  • अरबी - घफ
  • इंग्रजी -
  • कानडी - बन्‍नी, शमी
  • गुजराथी - खिजडो, सागरी, सामी
  • तमिळ - कलिनम, जंबू, वण्णी
  • तेलुगू - जंबी, जांबी
  • पंजाबी - जांद
  • बंगाली - शाईगाछी, सुई बावला
  • बलुची - कहूर
  • बिश्नोई - जांटी
  • मराठी - शमी
  • अहिरानी - आपटा , आभोटा
  • राजस्थानी - खेजडी. लूंग
  • शास्त्रीय नाव - Prosopis spicigera/Prosopis cineraria
  • संस्कृत - शमी
  • सिंधी - कांडी, जांद, जांदी
  • सिंहली - वण्णी अंदरा, काटु आंदरा, लूणू अंदरा
  • हिंदी - खेजडा, खेजडी, छोंकर, जांद, सफेद कीकर

वर्णन[संपादन]

शमी (शास्त्रीय नाव : Prosopis spicigera - प्रॉसोपिस स्पिसिगेरा) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिची पाने गणपतीला वाहतात. अज्ञातवासात जाण्यापूर्वी पांडवांनी आपली शस्त्रे कापडामध्ये गुंडाळून शमी वृक्षावरील एका ढोलीत ठेवली होती. काहीतरी अमंगळ आहे असे समजून कोणीही त्यांना हात लावला नाही. दसऱ्याच्या दिवशी लोक सीमोल्लंघनासाठी गावाबाहेर जाऊन शमी वृक्षाचे दर्शन घेतात व त्याची प्रार्थना करतात कारण 'शमी शमयते पापम्' असे संस्कृतमध्ये एक वचन आहे. त्या दिवशी शस्त्रांची पूजा करताना शस्त्रांवर शमीपत्रे वाहतात, आणि आपट्याची पाने सोने म्हणून एकमेकांना देतात.(हल्ली आपट्याची पाने मिळणे दुर्मीळ झाल्यामुळे, तशीच दिसणारी पण काहीशी मोठ्या आकाराची कांचनाची पाने द्यावी-घ्यावी लागतात.)

इतर माहिती[संपादन]

शमी वृक्ष प्रतिकूल हवामानातही उत्तम रितीने वाढतो. जमिनीत आत ओलावा आणि वर वाळू असली तरी हा वृक्ष चांगला वाढतो. हा वृक्ष काटेरी आहे. पानांच्या विरुद्ध बाजूला अणकुचीदार, बाकदार काटे असतात. जुनी पाने गळण्याच्या वेळेसच नवीन पालवी फुटते. फुले पिवळी, लहान आणि एका दांड्यावर असतात. मार्च ते मेपर्यंत फुले येऊन गेल्यावर जून ते ऑगस्टच्या दरम्यान शेंगा पिकतात. शेंगेत गोड, घट्ट गर असतो. त्यात लांबटगोल पण चपट्या बिया बसविल्यासारख्या असतात. पिकलेल्या शेंगा आपोआप फुटत नाहीत, शेंगेत कप्पे असतात. एका कप्प्यात एकच बी असते.

उपयोग[संपादन]

शमीच्या लाकडाचा उपयोग बाभळीसारखाच इंधनासाठी करतात. लाकूड कणखर असते, पण कीड लवकर लागते. शमीची लाकडे एकमेकांवर घासून अग्नी निर्माण करता येतो. म्हणून, यज्ञकर्मात शमीच्या समिधा असतात, बाभळीच्या नसतात. ’शमीच्या अंगी जसा अग्नी असतो, तसा राणीच्या पोटात गर्भ राहिला आहे असे राजाच्या ध्यानात आले’ असे कालिदासाने रघुवंशात म्हटले आहे.

शमीमिवाभ्यंतरलीनपावकां नृप: ससत्त्वां महिषीं अमन्यत । .. रघुवंश(३.९)

दुष्काळात शमीची पाने गुरांसाठी चारा म्हणून देतात. शेंगाही उत्तम खाद्य आहे. पूर नियंत्रणासाठी शमी हा उत्तम वृक्ष आहे. झाडाच्या सालीपासून विहिरीतल्या पाणी काढण्याच्या मोटेकरता "नाडा' तयार करतात. पाने, झाडावर, पानांवर येणाऱ्या गाठी, शेंगा औषधी आहेत.

औषधी उपयोग[संपादन]

दुर्वांप्रमाणेच शमी शरीरातील कडकीचा नाश करतो. शरीरातील उष्णता घालविण्यासाठी शमीच्या फुलांचा किंवा पाल्याचा रस, जिरे व खडीसाखर एकत्र करून १५ दिवस द्यावे. उष्णतेमुळे आगपेण होते. या विकारावर शमीचा पाला गाईच्या दुधापासून केलेल्या दह्यात वाटून लेप करतात. उन्हाळी लागल्यासही शमीच्या फुलांचे तुरे गाईच्या दुधात वाटून त्यात जिरे व खडीसाखर घालून देतात. नखदंतविषारावर शमी, कडुनिंबवड यांची साल वाटून लेप करतात. शरीरावर जखमेचे व्रण राहिल्यास शमीच्या झाडाची साल उगाळून लेप लावतात. अतिसारावर शमीच्या झाडाची साल ताकात उगाळून देतात. धुपणीवर शमीच्या कोवळ्या शेंगा व जास्वंदीच्या कळ्या तुपात परतून दुधातून देतात.

आराध्य वृक्ष[संपादन]

शमी हा धनिष्ठा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.

राज्यवृक्ष[संपादन]

शमीला भारतातील राजस्थान राज्यात खेजडी म्हणतात. हा राजस्थानचा राज्यवृक्ष आहे.तसेच तेलंगणा राज्याचा राज्य वृक्ष पण आहे.

संदर्भ[संपादन]