माका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वनस्पतीशास्त्रीय नाव: Eclipta prostrata
कुळ: Asteraceae
नाम:- (सं.) भृंगराज, मार्कव; (हिं.) भांगरा; (बं.) केसराज; (क.) गर्ग.
वर्णन:- माक्याचे छोटे झुडूप पावसाळ्यात उगवते व ओलसर जागेंत किंवा पाणी दिल्यास बाराही महिने जगते. ह्यांत पांढरा माका आणि पिवळा माका अशा दोन जाती आहेत. दक्षिणेंत विशेषकरून श्वेत जात मिळते आणि बंगालमध्ये पीत जात आढळते. माक्याची पाने समोरासमोर दोन असतात आणि ती देठविरहित असतात.


रसशास्त्र:- माक्यांत एका जातीची राळ व एक सुगंधी कडू द्रव्य आहे. माका उकडल्यास त्याचा गुण जातो. ह्याचा रस गोंदण्यासाठी वापरतात.
ह्याची पंचांगे(मूळ, साल, पान, फूल व फळ) औषधांत वापरतात. धर्म:- माका कडू, उष्ण, दीपक, पाचक, वायुनाशी, आनुलोमिक, मूत्रजनक, बल्य, वातहर, त्वग्दोषहर, व्रणशोधक, व्रणरोपक आणि वर्ण्य आहे. माक्यास रसायन मानतात ही अतिशयोक्ति नाही. ह्याची मुख्य क्रिया यकृतावर होत असते. यकृताची विनिमयक्रिया सुधारते, पित्तस्राव नीट होतो, आमाशयांतील आणि पक्वाशयांतील पचनक्रिया सुधारते व ह्या तीन मुख्य ठिकाणच्या क्रिया सुधारल्याने सर्व शरीरास तेज येते. रोज माका खाल्याने वृद्धाचा तरुण होतो ही म्हण केवळ अतिशयोक्ति नाही. माक्याचे धर्म टॅरॅक्झेकम्‌ सारखे किंबहुना त्यापेक्षा उत्तम तऱ्हेचे आहेत. अधिक प्रमाणात माका खाल्यास उलट्या होतात.
मात्रा:- ताजा अंगरस १ ते २ थेंब.
उपयोग:-

  1. माक्याचा रस यकृताची क्रिया बिघडली असता देतात. यकृताची क्रिया सुधारली म्हणजे कावीळ नाहीशी होते, यकृतवृद्धी आणि प्लीहावृद्धी कमी होते. मूळव्याध आणि पचनाचे विकार बरे होतात व कुपचन नाहीसे होते. कावीळ, मूळव्याध आणि पचन हे बहुतकरून यकृताच्या रोगावर अवलंबून असतात, म्हणून यकृतावर सुपरिणाम करणारी औषधें द्यावी लागतात. यकृताची क्रिया बिघडल्याने, ज्यास आयुर्वेदात आम असे म्हणतात असे एका जातीचे शारीरिक विष शरीरांत जमते व त्यामुळे आमवात, भोवळ, डोकेदुखी, द्दष्टिमांद्य आणि तऱ्हेतऱ्हेचे त्वचारोग उत्पन्न होतात. ह्या रोगांत माका दिल्यास फार फायदा होतो.
  2. जुन्या त्वचारोगांत (उदा:- कंडू, इंद्रलुप्त(चाई) वगैरे) माका पोटांत देतात आणि त्याचा लेप करितात. अकालपलित रोगांतही हाच उपाय करतात.
  3. माक्याच्या रसाने केस वाढतात आणि त्यांचा रंग सुधारतो. माक्याचा रस व हिराकस ह्यांच्या लेपाने केस काळे होतात.
  4. मद्रासकडे विंचवाच्या दंशावर माक्याचा लेप करितात व पोटांत देतात.
  5. अग्निदग्ध व्रणावर माका, मरवा व मेंदी यांचा पाला वाटून लावला असता आग नाहीशी होते व नवीन येणारी त्वचा शरीराच्या रंगाची येते. व्रणावर याचा लेप करितात.
  6. तान्ह्या मुलाच्या घशांत बोळ जमला असता माक्याच्या अंगरसाचे १-२ थेंब मधाबरोबर जिभेवर चोळतात. ह्याने घशातील घरघर कमी होते.
  • संदर्भ: ओषधीसंग्रह- डॉ.वा.ग.देसाई