Jump to content

देऊळ (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
देऊळ
दिग्दर्शन उमेश विनायक कुळकर्णी
निर्मिती देविशा फिल्म्स
(अभिजीत घोलप)
कथा गिरीश कुलकर्णी
पटकथा गिरीश कुलकर्णी
प्रमुख कलाकार गिरीश कुलकर्णी, नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, सोनाली कुळकर्णी, मोहन आगाशे, ज्योती सुभाष, उषा नाडकर्णी, किशोर कदम, विभावरी देशपांडे, हॄषिकेश जोशी, श्रीकांत यादव, अतिषा नाईक, नासिरुद्दीन शाह[१]
संवाद गिरीश कुलकर्णी
गीते स्वानंद किरकिरे, सुधीर मोघे
संगीत मंगेश धाकडे
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित ४ नोव्हेंबर, इ.स. २०११
संकेतस्थळ देऊळ.कॉम अधिकृत संकेतस्थळ


देऊळ हा इ.स. २०११ साली चित्रपटगृहांत झळकलेला, गिरीश कुलकर्णी-लिखित व उमेश विनायक कुलकर्णी-दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. यांत गिरीश कुलकर्णी, नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, सोनाली कुळकर्णी, मोहन आगाशे, किशोर कदम, उषा नाडकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. जागतिकीकरणाचे वारे लागल्याने महाराष्ट्रातल्या गावाचे विसविशीत होत जाणारे गावपण आणि विकासाची संधी साधण्यासाठी देवाच्या माहात्माचा घडणारा धंदेवाईक उपयोग हे या चित्रपटाचे मुख्य सूत्र आहे.

कथानक[संपादन]

यात मंगरूळ असे काल्पनिक नाव असलेल्या, एका छोट्या गावाची कहाणी चितारण्यात आलेली आहे. या गावात नवे वारे वाहणे सुरू होते. या गावास विकासाचा ध्यास लागतो. ते गाव मग विकासापोटी त्रस्त होते. गावखेड्यातील स्थानिक राजकारण व तेथील तरुणांच्या आशा काय असतात याचेही चित्रण त्यात करण्यात आले आहे. नव्या गोष्टींचा ध्यास म्हणजे दूरचित्रवाणी वाहिन्या व मोबाईल फोन याचा तरुण पिढीवर काय प्रभाव पडतो, ते आत्मसात करण्यास ते कसे धडपडतात व त्यायोगे आपण सुखी कसे होऊ असे त्यांना वाटते. भ्रष्टाचारावरही यात चित्रीकरण करण्यात आले आहे. या बदलांवर चित्रपटात अतिशय खुबीने औपरोधिक टिप्पण्या केल्या आहेत.

किशा उन्हातान्हात करडी गाईचा शोध घेतो. भोवळ आल्याने त्याला तंद्रीत दत्त दिसतो, तेही औदुंबराच्या झाडाजवळ. दरम्यान एक सुतार मोबाईलवरून मापे सांगताना त्याच झाडावर खाणाखुणा करतो आणि गावातील मंडळी त्यातून दत्तरूपाचा आकार शोधतात. गावातील राजकारणी भाऊ (नाना पाटेकर)चा पुतन्या आप्पा, महासंग्रामचा पत्रकार व त्यांचे एक दोघे बेकार मित्र याचा फायदा घ्यायचे ठरवतात. दत्त अवतरल्याची बातमी छापतात. महिला सरपंचांचा वापर करून ग्रामसभेत भाऊंच्या तोंडून दत्तमंदिर बांधण्याचे वदवून घेतात. त्यामुळे नाना कुलकर्ण्यांचे ग्रामीण रुग्णालयाचे मॉडेल बाजूला पडते आणि टगेगिरी करणारे तरुण हे त्यांच्या `स्टाईलने` वर्गण्या गोळा करू लागतात. मग सुरू होते साक्षात्काराचे, चमत्काराचे मार्केटिंग. दत्ताच्या कृपेने सारे घडते असे एसेमेस फारवर्ड करणे, यात्रेतल्या स्टॉंलचा लिलाव पुकारणे, चमत्कारासाठी साधू आणून बसवणे, करडी मातेचे मंदिर बाधण्याचा घाट घालणे, नव्या मंदिर विस्तारासाठी मंदिरामागची जमीन अधिग्रहित करणे, वेगवेगळे टेंडर काढून त्यातून आपला खिसा भरणे, असे वरवर धार्मिक पण आतून आर्थिक, स्वार्थी व्यवहार सुरू होतात. मुन्नी बदनाम हुई सारख्या लोकप्रिय गाण्यांच्या चालीवर दत्ताची गाणी रचली जातात आणि गावात बरकत येते.

>धार्मिक मार्केटिंग करणारी ‘देऊळ’मधील तरुण पिढी आधी फॅंशन टीव्ही पाहत असते; तर चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या गृहिणी, म्हाताऱ्या, तरण्या स्त्रिया सुद्धा मालिका पाहण्यात व्यस्त असतात. राहणीमानाचा दर्जा खालावलेला पण मनोरंजनाची चैन हवी असा नवा ग्रामीण चंगळवाद देऊळ मध्ये टिपलाय. एक किशा सोडला तर कुणीच कष्ट करताना दिसत नाही. तरुण मंडळी चहाच्या टपरीवर नाहीतर टी व्ही वरील चावट कार्यक्रम पाहण्यात मग्न. त्यांचे नेतृत्व करणारे भाऊ मधल्या वेळेत बायकोशी सागरगोट्या खेळतात. गावातील सरपंच महिला, पण तिला सासुरवास आहे. राजकीय सत्ता प्राप्त झाली तरी अजून सामाजिक आणि सांस्कृतिक सत्ताप्राप्तीत आरक्षण मिळाले नाही हाही संदेश येथे आहे. नवरा मुंबईला पोट भरण्यासाठी गेलेला. सरपंच महिलेला झेंडावंदनाचाही आत्मविश्वास नाही. भाऊंच्या घरी मोडका संडास तर सरपंचांचाला नीट घरही नाही. तर असे हे निष्क्रिय, आतून असांस्कृतिक असलेले, पोखरलेले गाव. खरेतर आलटून पालटून महाराष्ट्रातील बऱ्याच गावाची स्थिती अशीच.

अशा गावात परिवर्तन कसे आणि कोणाकडून घडेल? अशा निष्क्रिय आणि बिना कष्टाने बदल हवा असलेल्या समाजाला `दत्त` लागतो. देऊळ लागते. पुरातत्त्व विभागातर्फे संशोधन सुरू असतेच गावात, त्या पार्श्वभूमीवर दत्त अवतरतात. दत्ताच्या निमित्ताने सर्वांना कारकीर्द करण्याची संधी चालून येते. साधा वर्तमानपत्रवाला पत्रकार न्यूझ चॅंनलचा प्रतिनिधी बनतो. भाऊ आमदार होतात. गावातील सर्वांचे दुकानं, हॉटेल जोरात चालू लागतात. गावात आता रस्ता, वीज, एस. टी. साऱ्या सुविधा होतात. आप्पा- भाऊंचा नवा पुढारी होतो. त्याचे डिजीटल बोर्ड लागतात. हा बदल दिग्दर्शकाने फार सुंदर साकारला आहे. भाऊंच्या मुली इंग्लिश मिडिअम मध्ये शिकतात. घरातील फर्निचर, अंगावरील कपडे बदलतात. खुद्द किशा दुकानातून नवे कपडे घेऊन ते नानाला दाखवायला जातो... तात्पर्य सगळीकडे आनंदी आनंद होतो. दुखी कुणीच नाही. मग अडचण काय?

चित्रपट पाहताना प्रेक्षकाला एक सामाजिक दर्शन घडत जाते. पण या दर्शनाने तो हळहळतो. नाना कुलकर्णी म्हणतात, देव हवा त्याने शोधावा, नको त्याने शोधू नये. देव ही अत्यंत खाजगी गोष्ट आहे. साक्षात्कार ही देखील एक अत्यंत वैयक्तिक बाब आहे. आता त्याचे मार्केटिंग, व्यापारीकरण, बाजारीकरण, नव्हे जागतिकीकरण होत आहे. हा मौलिक संदेश चित्रपटात दडला आहे. तो बटबटीतपणे न सांगून गिरीश कुलकर्णी यांनी नकळत फार मोठी उंची गाठली आहे. संवादातून देखील ते सांगितले नाही. नाही तर हा चित्रपट प्रचारकी झाला असता.

विकास म्हणजे नेमके काय? त्याचे मार्ग कोणते? विकास राजकारण आणि धर्म यांचे नेमके परस्पर संबंध काय? ते आता कसे एकमेकात मिसळून गेले आहेत. आधी धार्मिक राजकारणाला विरोध करणारे भाऊ त्यांचा देखील लोकेच्छेपुढे कसा उपाय हटतो? शिवाय ही लोकेच्छा पण कशी कृत्रिम व राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी जन्मास येते, ते सारे वेगवेगळ्या पातळ्यांवर स्पष्ट होत जाते. हे मुळातून खटकते ते नाना आणि किशाला. ज्या गावात शांतता होती तिथे आता कोलाहल आलाय, सामाजिक हितापेक्षा धार्मिक उन्माद आता वाढलाय हे जाणवून नाना गाव सोडून निघून जातो. तर किशाच्या करडी गायीचा मृत्यू होतो. जिने दत्तदर्शन घडवले तिला देव बनवून पैसे लाटण्याच्या नादात तिच्या आजाराची आणि मृत्यूचीही कुणाला फिकीर नाही. दत्त दर्शनाला आसुसलेली आपली आईसुद्धा आता समृद्धी आल्याने पंधरा पंधरा दिवस देवाकडे जात नाही, आणि पहिला साक्षात्कारी पुरुष असून राजकीय नेत्यांसाठी आपल्यालाच देवदर्शनाची बंदी होते हे पाहून किशा अस्वस्थ होतो. मग तो देवाची मूळ मूर्तीच चोरून नदीत विसर्जित करतो. पण त्यामुळे फरक काहीच पडत नाही. दोन दिवसात वाजत गाजत नवी दत्त मूर्तीची स्थापना मंदिरात होते आणि चित्रपट संपतो.

प्रदर्शन[संपादन]

हा चित्रपट नियोजित वेळापत्रकानुसार २३ सप्टेंबर, इ.स. २०११ रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र निर्मितीपश्चात कामांना अधिक वेळ लागल्याने त्याचे प्रदर्शन नोव्हेंबर महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आले[२]. यानंतर बूसान चित्रपट महोत्सव, दक्षिण कोरिया, न्यू यॉर्कचा आंतरराष्ट्रीय दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सव, अबू धाबी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव व मामी चित्रपट महोत्सव, मुंबई या चित्रपट महोत्सवांत या चित्रपटाचे विशेष खेळ लावण्यात आले. ४ नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी भारतभर हा चित्रपट प्रदर्शित झाला.

बाह्य दुवे[संपादन]

  • "अधिकृत संकेतस्थळ".

संदर्भ व नोंदी[संपादन]

साचा:अप्रकाशित लेख : प्रा. देवानंद सोनटक्के

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "अधिकृत संकेतस्थळ".
  2. ^ "देऊळ रिलीज डेट पोस्टपोन्ड (देऊळ चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर)" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2011-09-24. ११ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)