Jump to content

तारा भवाळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तारा भवाळकर

डॉ. तारा भवाळकर (जन्म : १ एप्रिल. १९३९) या प्रामुख्याने वैचारिक लेखन करणाऱ्या एक मराठी लेखिका आहेत.

भवाळकर या लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककला या विषयांशी संबंधित असून या विषयांच्या त्या गाढ्या अभ्यासक आहेत. त्यांनी लोकसंस्कृती, नाट्यसंशोधन, संतसाहित्य, एकांकिका, ललित लेखन, लोककला यांविषयी तसेच स्त्री जाणिवांवर लक्ष केंद्रित करणारे विपुल लेखन केले आहे आणि लोककला आणि लोकसाहित्य या विषयांशी संबंधित अनेक चर्चा, परिसंवाद, संमेलने यांत भाग घेतला आहे.

तारा भवाळकरांनी पौराणिक नाटक, लोकनाट्य, दशावतार, तंजावरची नाटके, यक्षगान, कथकली अशा नाट्य प्रकारांची जडणघडण शोधली. त्यांचे समग्र लेखन वस्तुनिष्ठ, यथार्थ व चिकित्सक दृष्टी आणि सैद्धांतिक अभ्यासाचा वस्तुपाठच आहे. मराठी विश्वकोश, मराठी वाड्मयकोश आणि मराठी ग्रंथकोश या महत्त्वाच्या कार्यातही त्यांनी बहुमोल योगदान दिले आहे.[]

शिक्षण आणि ते घेताना केलेले विविध उपक्रम

[संपादन]

त्यांनी हरिवंशराय बच्चन यांच्या मधुशालाचे मराठीतले पहिले मराठी भाषांतर केले आहे. इंडिया बुक हाऊसने ते प्रकाशित केले होते. हे भाषांतर केले तेव्हा भवाळकर कॉलेजात शिकत होत्या. भवाळकरांनी विद्यार्थीदशेतच नाट्य एकांकिका स्पर्धांसाठी लेखन, दिग्दर्शन, व अभिनय केला. शिक्षण संपल्यावर त्यांनी स्वतःची ए.डी.ए. ही नाटक संस्था सुरू केली. त्या संस्थेच्या माध्यमातून शाळा, कॉलेजच्या मुलांची नाटके बसवून दिली आणि त्यांना राज्य नाट्य एकांकिका स्पर्धेसाठी तयारी करून दिली.

याच दरम्यान त्यांनी एम.ए. केले आणि त्यानंतर त्यांनी नाटककार विष्णूदास भावे आणि मराठी पौराणिक नाटकाची जडण-घडण (प्रारंभ ते १९२०) हा प्रबंध लिहून पीएच.डी. मिळवली. त्यासाठी त्यांनी सांगली, केरळ, गोवा, कर्नाटक, कारवार, कोकणात जाऊन या विषयीची माहिती गोळा केली. यात त्यांनी नमन , दशावतार मंडळे, इ. साठीची माहिती गोळा केली.

नोकरी

[संपादन]

सन १९५८ ते १९७० या काळत भवाळकर माध्यमिक शाळेत शिक्षिका होत्या. नंतर सन १९७०मध्ये त्या सांगलीच्या श्रीमती चंपाबेन वालचंद शहा महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर वर्गांत मराठीचे अध्यापन करू लागल्या व १९९९ मध्ये प्राध्यापक म्हणून निवृत्त झाल्या. दरम्यानच्या काळात त्या विद्यावाचस्पतीसाठी विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शक होत्या.

निवृत्तीनंतर भवाळकर पुणे विद्यापीठाच्या ललित ॲकॅडमीच्या आणि मुंबई विद्यापीठाच्या लोककला ॲकॅडमीच्या अतिथी प्राध्यापक म्हणून काम पहात होत्या. वाईच्या विश्वकोशातील लोकसाहित्य विभागाच्या त्या अतिथी संपादक होत्या.

व्याख्याने

[संपादन]

टाटा इन्स्टिट्यूटने त्यांचे स्त्रियांच्या मराठी ओव्या या विषयावर व्याख्यान ठेवले होते. आकाशवाणीच्या रत्‍नागिरी केंद्रावर संत कवयित्रीची मुक्ती संकल्पना आणि आधुनिक स्त्रीमुक्ती यांचा अनुबंध या विषयावर व्याख्यान झाले होते. त्यांनी अमेरिकेच्या ॲरिझोना विद्यापीठातील एका चर्चासत्रातही भाग घेतला.

मराठी भाषेतील कोश निर्मितीसाठी सहभाग

[संपादन]
  • मराठी वाङ्मयय कोशासाठी ९ लेख
  • मराठी ग्रंथ कोशासाठी ७ लेख
  • मराठी विश्वकोशासाठी ४ लेख
  • विश्वकोशातील लोकसाहित्य विभागाच्या अतिथी संपादक

पुस्तके

[संपादन]
  • अभ्यासक स्त्रिया (ज्येष्ठ लेखिका मालती दांडेकर, विदुषी दुर्गा भागवत यांच्यापासून ते प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्यापर्यंत ज्ञात-अज्ञात अशा २५ अभ्यासक स्त्रियांच्या संशोधन कार्याचा परिचय करून देणारे पुस्तक)
  • आकलन आणि आस्वाद (साहित्यिक)
  • तिसऱ्या बिंदूच्या शोधात (वैचारिक)
  • निरगाठ सुरगाठ (लेखसंग्रह)
  • प्रियतमा ( गडकरी साहित्यातील स्त्री प्रतिमा)
  • बोरीबाभळी (रा.रं. बोराडे यांच्या ग्रामीण स्त्रीविषयक कथांचे संपादन आणि प्रस्तावना)
  • मधुशाळा (हरिवंशराय बच्चन यांच्या ‘मधुशाला’चे मराठीतले पहिले मराठी भाषांतर)
  • मरणात खरोखर जग जगते (कथासंग्रह)
  • मराठी नाटक : नव्या दिशा, नवी वळणे
  • मराठी नाट्यपरंपरा : शोध आणि आस्वाद
  • महामाया
  • माझिये जातीच्या (सामाजिक)
  • मातीची रूपे (ललित)
  • मायवाटेचा मागोवा
  • मिथक आणि नाटक
  • यक्षगान आणि मराठी नाट्य परंपरा
  • लोकनागर रंगभूमी (माहितीपर)
  • लोकपरंपरा आणि स्त्रीप्रतिभा (माहितीपर)
  • लोकपरंपरेतील सीता
  • लोकसंचित (वैचारिक)
  • लोकसाहित्य : वाड्मयप्रवाह
  • लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा (माहितीपर)
  • लोकांगण (कथासंग्रह)
  • संस्कृतीची शोधयात्रा (माहितीपर)
  • स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर (वैचारिक)
  • स्नेहरंग (वैचारिक)

सन्मान आणि पुरस्कार

[संपादन]
  • पीएच.डी.च्या प्रबंधाला सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा पुणे विद्यापीठाचा पुरस्कार.
  • आवास (अलिबाग) येथे भरलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
  • इस्लामपूर येथे भरलेल्या जागर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
  • इस्लामपूर येथे भरलेल्या राजारामबापू ज्ञानप्रबोधिनी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
  • उचगाव (बेळगाव) येथे भरलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रदेशीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
  • कादरगा येथे भरलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रदेशीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
  • जळगाव येथे भरलेल्या सूर्योदय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
  • मुंबईतील मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघातर्फे सुं.ल. गद्रे साहित्य पुरस्कार. (२२-१-२०१७)
  • 'लोकसंचित' या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा १९९१ सालचा पुरस्कार
  • पुणे शहरात ५ जानेवारी २०१९ रोजी झालेल्या पर्यावरण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "लोकोत्तर असं काही नसतं...!". महाराष्ट्र टाईम्स. ८ एप्रिल २०१८. 2018-07-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ११ एप्रिल २०१८ रोजी पाहिले.