तरुण भारत (नागपूर)

तरुण भारत हे महाराष्ट्रातील अनेक शहरांतून प्रकाशित होणारे मराठी भाषेतील अग्रगण्य दैनिक वृत्तपत्र आहे. गेल्या शतकभरापासून नागपुरातून प्रकाशित होत असलेल्या या वृत्तपत्राचे संचालन श्री नरकेसरी प्रकाशन लि. नागपूर या संस्थेतर्फे केले जाते. तरुण भारतचा मोठा आणि निष्ठावान वाचकवर्ग आहे.नागपूर येथे याचे मुख्यालय असून, विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, अकोला, खामगाव, वाशिम, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली अशा सर्व भागांत त्याचे वितरण होते. दि. ५ मार्च २०२६ पासून या दैनिकाची पुणे आवृत्ती सुरू करण्यात आली आहे.
इतिहास आणि वर्तमान
[संपादन]भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षांतर्गत सक्रिय असलेल्या स्वराज्य पक्षाच्या बॅरिस्टर नरकेसरी मोरोपंत अभ्यंकर, दादासाहेब उधोजी आदींच्या पुढाकाराने २० जानेवारी, इ.स. १९२६ रोजी हे तरुण भारत नावाचे वृत्तपत्र साप्ताहिकाच्या स्वरुपात प्रकाशित करायला सुरुवात केली.[१].ना.भा. खरे याचे संस्थापक-संपादक होते. इ.स. १९३० च्या दशकातील असहकार आंदोलनादरम्यान ब्रिटिश भारतीय शासनाकडून या वृत्तपत्राशी संबंधित लोकांची धरपकड झाल्याने साप्ताहिक बंद पडले. बॅरिस्टर अभ्यंकरांच्या मृत्यूनंतर २ जानेवारी, इ.स. १९४४ रोजी अभ्यंकरांच्या ९व्या स्मृतिदिनी वृत्तपत्राचे पुनरुज्जीवन करण्यात आले[१]. या पुनरुज्जीवित वृत्तपत्राच्या संपादकत्वाची सूत्रे पत्रमहर्षी गजानन त्र्यंबक माडखोलकर यांनी स्वीकारली. १९४९ मध्ये या दैनिकाचे संचालन श्री नरकेसरी प्रकाशनाकडे आले. नंतरच्या काळात या दैनिकाच्या मुख्य संपादकपदाची जबाबदारी पां. चिं. करकरे, मा. गो. उपाख्य बाबूराव वैद्य, दि. भा. उपाख्य मामासाहेब घुमरे, ल. त्र्यं. जोशी, वामन तेलंग, सुधीर पाठक, महेश म्हात्रे, गजानन निमदेव यांनी सांभाळली. सध्या या वृत्तपत्राचे मुख्य संपादक म्हणून प्रख्यात लेखक-कवी शैलेश पांडे कार्यभार सांभाळत आहेत. दशकानुदशके आपल्या विचारांवर अविचल निष्ठा ठेवून वाचकसेवा करणाऱ्या मोजक्या मराठी दैनिकांमध्ये तरुण भारतचा समावेश होतो. या दैनिकाची मुंबई व नवी दिल्ली येथे कार्यालये आहेत. श्री नरकेसरी प्रकाशन लि. तर्फे भारतवाणी या हिंदी साप्ताहिकाचेही प्रकाशन केले जाते. www.tarunbharat.net हे डिजिटल तरुण भारतचे पोर्टल असून, या दैनिकाचा ई-पेपरही त्यावर उपलब्ध होत असतो. ख्यातनाम होमिओपॅथ पद्मश्री डॉ. विलास डांगरे हे सध्या श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष आहेत. श्री. अनिल दांडेकर हे कार्याध्यक्ष असून, श्री. धनंजय बापट व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहत आहेत.
या दैनिकासोबत दर शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत या वाचनीय व वैचारिक खाद्य असलेल्या पुरवण्या वाचकांना दिल्या जातात. तसेच आठवड्यातून पाच दिवस फिचर पेजेसची मेजवानी असतेच. तरुण भारतचा दिवाळी अंक, या दैनिकाचे अन्य विशेषांक बृहन्महाराष्ट्रात जातात. हे दैनिक ऑनलाईन स्वरुपात देशाच्या विविध भागांत तसेच विदेशांतही वाचले जाते. [२]
पुणे आवृत्ती
[संपादन]२० जानेवारी १९५७ पासून तरुण भारतची पुणे आवृत्ती प्रकाशित होऊ लागली होती. या आवृत्तीच्या संपादकपदी गजानन विश्वनाथ केतकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. सध्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक म्हणून सचिन कापसे काम पाहतात.
पुण्याच्या ‘तरुण भारत’च्या आवृत्तीचे पहिले संपादक ग.वि. केतकर यांनी ही संपादकत्वाची धुरा, सुमारे सात वर्षे म्हणजे १९६४ पर्यंत आपल्या खांद्यावर वाहिली. त्यानंतर दीर्घ काळ पुण्याचा तरुण भारत सुरू होता. काही कारणास्तव त्याचे प्रकाशन स्थगित करण्यात आले होते. मात्र, २०२६ मध्ये पुणे येथे नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेचा तरुण भारत पुन्हा सुरू करण्यात आला आहे.
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |