ज्योतिबा मंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

[१]

Shri Jyotiba of Kolhapur
Jyotiba1.jpg
Lua error in विभाग:Location_map at line 383: Unable to find the specified location map definition. Neither "Module:Location map/data/India Maharashtra" nor "Template:Location map India Maharashtra" exists.
Name
Other names Jotiba
Proper name Jyotiba
Devanagari ज्योतिबा
Tamil ஜோடிபா
Marathi ज्योतिबा
Geography
Coordinates 16°42′00″N 74°14′00″E / 16.7, 74.233333गुणक: 16°42′00″N 74°14′00″E / 16.7, 74.233333
Country India
State/province Maharashtra
District Kolhapur
Locale Jyotiba


ज्योतिबास ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ, सौदागर अशा विविध नावांनीही उल्लेखतात.

कोल्हापूरच्या वायव्येस १४.४८ किलोमीटर अंतरावर ज्योतिबाचा डोंगर आहे. या डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे. ज्योतिबाला केदारेश्वर-केदारलिंग असेही म्हणतात. सपाट प्रदेशात एक हजार फूट उंचीवर, शंखाकृती, हत्तीच्या ‘सोंडे’सारख्या पसरलेल्या ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्नागिरी म्हणतात. हा डोंगर पन्हाळय़ापासून कृष्णेकडे गेलेल्या सह्याद्रीच्या फाटय़ाचाच भाग आहे. या डोंगरावरील पठारी भागात ज्योतिबा मंदिर व गाव आहे. ज्योतिबा हे दैवत शिव व सूर्याचे रूप मानण्यात येते.

भौगोलिक स्थान[संपादन]

इतिहास[संपादन]

ज्योतिबा डोंगरावर तीन प्रमुख देवळे आहेत. ती ज्योतिबाचा अवतार असलेल्या केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंगाची आहेत.

कथा[संपादन]

ज्योतिबासंदर्भात एक कथा आहे. प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हाहाकार माजवला होता. येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती. कोल्हापूरच्या अंबाबाईलाही या दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. या राक्षसांच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्याकरिता अंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वराला या दैत्याचा संहार करण्याची विनंती केली. केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी पडले. रत्नासुराच्या वधानंतर अंबाबाईने अशी प्रार्थना केली, की ‘पुन्हा असे संकट येऊ नये म्हणून तुझी दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे’ म्हणून अंबाबाईच्या रक्षणाकरिता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे.

ज्योतिबाच्या मंदिराची रचना[संपादन]

देवळांकडे जाताना प्रथम मराठाशैलीतील भव्य दगडी प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर पायर्‍या उतरताच तीन देवळांचा समूह दृष्टीस पडतो. या तीन देवळांच्या मध्यभागी केदारलिंगाचे मुख्य देवालय आहे. या मूळ देवालयाचे बांधकाम जोतिबा भक्त किवळ गावच्या नावजी ससे पाटलांनी (संत नावजीनाथ) केलेले आहे असे म्हणतात. १७३० मध्ये राणोजीराव शिंदे यांनी या जागी हल्लीचे देवालय बांधले. हे देऊळ ५७ फूट लांब, ३७ फूट रुंद असून त्याच्या शिखराची उंची ७७ फूट आहे. या देवळाशेजारी केदारेश्वराचे देवालय आहे. या देवालयाचे बांधकाम १८०८ मध्ये दौलतराव शिंदे यांनी केलेले आहे. या देवळाची लांबी ४८ फूट असून रुंदी २२ फूट आहे. शिखर ८९ फूट उंच आहे. केदारेश्वर देवळासमोर दोन पाषाणाचे नंदी आहेत. येथे असलेल्या रामलिंग मंदिराचे बांधकाम १७८० मध्ये मालजी निकम पन्हाळकर यांनी केलेले आहे. या मंदिराची लांबी १३ फूट, रुंदी १३ फूट असून शिखर ४० फूट उंच आहे. या देवळाजवळ चोपडाई देवीचे मंदिर असून या मंदिराचे बांधकाम १७५० मध्ये प्रीतिराव चव्हाण हिम्मतबहादूर यांनी केलेले आहे. या देवळांपासून थोडय़ा अंतरावर यमाईदेवीचे मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम १७५० मध्ये राणोजीराव शिंदे यांनी केले. या मंदिरासमोर पाण्याची दोन तीर्थ असून जवळच सहा कुंड व दोन विहिरी आहेत. कोल्हापूर परिसरातील मंदिराच्या शिखरांप्रमाणेच येथील मंदिरांच्या शिखरांची रचना आहे. यादवकालीन वास्तुशैलीत थोडा फरक करून मराठा कारागिरांनी या शिखरांचे बांधकाम केले. या शिखरांवर तळापासून वपर्यंत ‘रथपट्ट’ पद्धतीची साधी नक्षी आहे. येथील मंदिर हेमाडपंती पद्धतीची असून तत्कालीन मराठा वास्तुशैलीचा प्रभाव येथे आढळतो. या मंदिराच्या बांधकामाकरिता याच डोंगरात सापडणाऱ्या काळय़ा बेसॉल्ट दगडांचा वापर करण्यात आलेला आहे. या देवालयाच्या प्रांगणात पारंपरिक दगडी दीपमाळ आहेत.

ज्योतिबा

ज्योतिबाची मूर्ती[संपादन]

ज्योतिबाची मूर्ती काळ्या घोटीव पाषाणात घडविलेल्या या चर्तुर्भुज मूर्तीच्या हातात खड्ग, पानपात्र, डमरू व त्रिशूळ आहे. शेजारीच ज्योतिबाचे उपवाहन शेष आहे. ज्योतिबाचा शरीररक्षक काळभैरव बाहेरच्या बाजूस असून तेथे मूळ ज्योत तेवत असते. ज्योतिबाचे दर्शन घेण्याअगोदर काळभैरव व ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. ज्योतिबाची भार्या यमाई हिची मूर्ती दगडाची असून या मूर्तीला शेंदूर लेपलेला असतो. येथील वाडी रत्‍नागिरी गावात पुजारी व दुकानदारांची घरे आहेत.

उत्सव[संपादन]

ज्योतिबाच्या जन्मदिवशी रविवारी व श्रावणशुद्ध षष्ठीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते. रत्नासुरावर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ चैत्री पौर्णिमेस येथे भव्य जत्रा भरते. कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व देशाच्या इतर भागांतूनही लाखो भाविक येथे गोळा होतात. ज्योतिबाचा डोंगर माणसांनी अक्षरश: फुलून जातो. येथे धान्य, कापड, तांब्या-पितळेची भांडी, पूजासाहित्य व मेवामिठाई इत्यादी साहित्याची दुकाने थाटली जातात. चैत्री पौर्णिमेच्या दिवशी ज्योतिबाच्या मूर्तीची प्रदक्षिणा देवळाभोवती घातली जाते. नंतर ज्योतिबाच्या चांदीच्या मूर्तीची मिरवणूक पालखीतून वाजत गाजत यमाईदेवीच्या मंदिराकडे निघते. या मिरवणुकीत अनेक सासणकाठय़ा नाचवत नेल्या जातात. ज्योतिबाच्या यात्रेत पन्नासहून अधिक छोटया मोठ्या सासन काठ्या असतात. या मध्ये पहिला सासनकाठीचा मान निनाम गावाचा असतो. या पाडळी (निनाम) गावाचे भक्त १०० कीलो मीटर हून जास्त अंतर म्हणजे रत्नागिरीवाडी ते पाडळी (निनाम) या गावी ५ दिवसांमध्ये सासनकाठी पायी उचलुन त्यांच्या गावी यात्रेदिवशी भक्तांच्या दर्शनासाठी उपलब्ध करून देतात. सासनंकाठीचा रत्नागिरीवाडी ते पाडळी (निनाम) हा प्रवास सुरु असतांना सासन काठीचे वजन ३०० किलो हुन जास्त असते.(सासनंकाठी आणि श्रीफळाची तोरणे,धन,हारतुरे इत्यादी) सासणकाठी म्हणजे ३० ते ३५ फूट उंचीच्या वेळूला पांढरी व तांबडी पागोटी एकाआड एक तिरपी गुंडाळलेली असतात. काठीच्या टोकाला गंगावनाचे काळे किंवा पांढरे झुपके बांधतात. या बांबूच्या तळापासून चार ते पाच फूट उंचीवर आडवी फळी घट्ट बांधलेली असते. ही फळी खांद्यावर घेऊन भक्तगण काठी नाचवतात. या काठीचा तोल जाऊ नये म्हणून काठीला बांधलेले दोर ताणून लोक उभे असतात. या फळीवर घोडय़ाची व देवाची प्रतिमा ठेवलेली असते. यातील काही काठय़ा पूर्वापार मानाच्या असतात. ढोल-ताशाच्या तालावर भक्तगण देहभान विसरून काठय़ा नाचवत असतात. निळसर गुलाबी गुलालाच्या धुराळय़ात या रंगबिरंगी काठय़ांची शोभा अवर्णनीय असते. या वेळी भाविक चांगभलेचा गजर करीत असतात. पूर्वी ज्योतिबा देवस्थानास शिंदे सरकारांकडून अनुदान मिळत असे. सध्या इनामी गावांच्या उत्पन्नातून देवस्थानचा खर्च भागविण्यात येतो.

ख्याती व माहात्म्य[संपादन]

ज्योतिबा किंवा केदार या दैवताचा उल्लेख यादवपूर्व काळातही आढळतो. महानुभावाच्या पोथ्यांमध्ये पैठण व जळगाव येथील केदारेश्वर मंदिरांचा उल्लेख आहे. खोलेश्वराच्या शिलालेखातही केदारेश्वराचा उल्लेख आहे. अग्नी, तेज व ज्ञानाचे प्रतीक असलेला ज्योतिबा भक्तांना आपलासा वाटतो. ग्रामीण लोकगीतांतून व ओव्यांतून ज्योतिबाला मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे. भक्तिरसाने न्हाऊन निघालेल्या या ओव्या व लोकगीते ज्योतिबाच्या प्रती बहुजनांची उमटलेली स्पंदने आहेत. चैत्री पौर्णिमेच्या सोहळ्यांत भक्तांच्या ओठांतून शब्द फुटतात.

‘देवामंदी देव ज्योतिबा लई मोठा
चैत्याच्या मईन्यात त्याच्या फुलल्या चारी वाटा’

श्री ज्योतिबाची महाराष्ट्रातील अन्य देवळे[संपादन]

  • जळव ज्योतिबा
  • निनाम (पाडळी) ज्योतिबा
  • तसेच संपूर्ण महाराष्ट्राभर गावोगावी श्री ज्योतिबाची अनेक मंदिरे आहेत.

छायाचित्रे[संपादन]

हेसुद्धा पाहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  • १) बॉम्बे गॅझिटियर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट
  • २) Temples of Maharashtra - G. K. Kanhere
  • ३) कुलदैवत - महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग प्रकाशन - १९७४

बाह्य दुवे[संपादन]

  • పాదసూచిక పాఠ్యాన్ని ఇక్కడ చేర్చండి