गौतमीपुत्र सातकर्णि

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गौतमीपुत्र सातकर्णी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search


मिसळा
शककर्ता शालिवाहन या लेखाचा व प्रस्तुत लेखाचा विषय एकच आहे. या दोन्ही लेखातील मजकूर एकत्र करून तो गौतमीपुत्र सातकर्णि या प्रधान नावाने ठेवावा व अन्य नावांवरून त्यास पुनर्निर्देशने ठेवावीत.


गौतमीपुत्र सातकर्णि (जन्म ? मृत्यू इ.स. ८६) हा सातवाहन वंशातील एक राजा होता. सातवाहन साम्राज्याच्या विस्तारात याचा मोठा वाटा होता. त्याने बेनाकटस्वामी अशी पदवी धारण केलेली होती.

राज्यविस्तार[संपादन]

गौतमीपुत्र सातकर्णि याने विदर्भावर चाल करून तेथील क्षत्रपांचा पराभव केला. पश्चिम महाराष्ट्रातील नहपान या महाक्षत्रपाचाही पूर्ण पराभव केला. महाराष्ट्रातील शक, यवन यांचाही बिमोड केला. तसेच आपले राज्य उत्तरेस सौराष्ट्र, पश्चिमेस कोकण, पूर्वेस आंध्र आणि दक्षिणेस मलय पर्वतापर्यंत (कर्नाटक) पसरविले.

कार्य[संपादन]

सातवाहन राजांनी दीर्घकाळ महाराष्ट्र व शेजारील प्रदेशावर राज्य केले. शालिवाहन हे शक सातवाहन राजांशी संबंधित आहे. सातवाहनांची राजधानी तत्कालीन प्रतिष्ठान आणि आताचे पैठण ही होती. इसवी सनाच्या पहिल्या शतकात शकांनी पश्चिम भारतावर आक्रमण करून सातवाहनांची या प्रदेशावरची सत्ता उखडून टाकली. त्यामुळे महाराष्ट्र, व शेजारील प्रदेशावरील सातवाहनांचे वर्चस्व संपले आणि त्यांना दक्षिणेत जावे लागले.

याच सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा तेवीसावा राजा अतिशय पराक्रमी होता. त्याच्या पित्याचे नाव शिवस्वाती व आईचे नाव गौतमी बलश्री असे होते. सातवाहन राजांमध्ये मातृसत्ताक पद्धत होती. त्यामुळे राजे आपल्या नावापुढे आईचे नाव लावित असत. गौतमी ही सातकर्णीची आई होती. म्हणूनच त्याचे नाव गौतमीपुत्र सातकर्णी असे होते. नाशिकजवळ गोवर्धन येथे सातकर्णी व शकांमध्ये तुंबळ लढाई झाली. यात शकांचा राजा नहपान हा मृत्युमुखी पडला. सातकर्णी विजयी झाला. त्याने या प्रदेशात पुन्हा एकदा सातवाहनांचे वर्चस्व प्रस्थापित केले याच्या कार्यकाळात सातवाहन राज्याने भरभराटीचा कळस गाठला होता.

नाशिकजवळ बौद्धलेणी आहेत. या लेण्यांमध्ये सातकर्णीविषयीची माहिती मिळते. सातकर्णी याचा उल्लेख येथील लेखांत वेदांचा व ब्राह्मणांचा आश्रयदाता असा केला आहे. सातकर्णी वैदिक धर्माचा पोषक असूनही तो अत्यंत धार्मिक व सहिष्णू होता. बौद्ध धर्माच्या बाबतीत तो अतिशय उदार होता. बौद्धांच्या तत्कालीन संघांना त्याने बरीच मदतही केली होती. मुंबईजवळील कार्ले येथी बौद्ध संघालाही त्याने करजक नावाचे गाव दिले होते. तसेच सुप्रसिद्ध नाणेघाट यांच्याच शासन काळात घडवला गेला. एका समकालीन कविच्या अनुसार प्रुथ्वीला दोन भार वहावे लागतात उत्तरेला हिमालयाचा आणि दक्षिणेला सातवाहनांच्या पराक्रमाचा.

शकांचे दमन करणारा शालिवाहन (सातवाहन) गौतमीपुत्र सातकर्णी असा त्याचा उल्लेख सापडतो. त्यामुळे शालिवाहन शकाचा प्रारंभ त्याच्या जीवनकाळात झाला. त्याचा कार्यकाळ इसवी सन १०६-१३० असा मानला जातो. इसवी सन ७८ पासून हे शालिवाहन शक सुरू झाले. पण गौतमीपुत्र सातकर्णीच्या शासनकाळाशी ही तिथी जुळत नाही. त्यामुळे त्याच्या जन्मापासून हे संवत सुरू झाल्याचे मानले जाते. याने चातुवर्ण्यसंकर बंद केला व बौद्ध धर्मास उदार आश्रय दिला.


संमातर लेखशीर्षक शककर्ता शालिवाहन लेखातील मजकुर विलिनीकरण/एकत्रीकरणा साठी स्थानांतरीत[संपादन]

  • शककर्ता शालिवाहन या समांतर लेखातून स्थानांतरीत मजकुर, सुयोग्य मजकुर ठेवून विलिन करण्यात आणि उर्वरीत वगळण्यात साहाय्य करावे.

गौतमीपुत्र शातकर्णी (ऊर्फ शालिवाहन) (राज्यकाळ: इ.स. ७८-इ.स. १०६) हा सातवाहन घराण्यातील २३ वा राजा मानला जातो. [१]

गौतमीपुत्र शातकर्णीच्या आधीही याच नावाचा एक राजा या कुळात होऊन गेला होता. त्याने ५० वर्षांहून अधिक काळ राज्य केल्याचे सांगितले जाते. त्याच्या राज्यकाळात त्याने दोन अश्वमेध यज्ञ पार पाडून राज्याची घडी बसवली. परंतु गौतमीपुत्र शातकर्णी गादीवर बसला तेव्हा सातवाहन राज्यात शक, यवन, पल्हव यांच्या हल्ल्यांमुळे अशांतता नांदत होती. गौतमीपुत्र शातकर्णीने या सर्व टोळ्यांचे पारिपत्य करून राज्यात सुव्यवस्था स्थापन केली.

अपरांत, अनूप, सौराष्ट्र, कुरुक, अकारा आणि अवंती अशा अनेक राज्यांवर त्याने आपली सत्ता प्रस्थापित केली. नहपान या राजाचा पराभव करून त्याने विदर्भावर आपले राज्य प्रस्थापित केले आणि दक्षिणेकडेही सत्ताविस्तार केला. कांचीपर्यंत त्याची सत्ता असल्याचे सांगितले जाते. प्रतिष्ठान किंवा पैठण http://santeknath.org/paithan.html हे प्राचीन नगर त्याच्या राज्याची राजधानी होते. त्याच्या राज्यविस्ताराचे वर्णन केले जाते की त्याच्या घोड्यांनी तीन समुद्रांचे पाणी प्यायले होते.

आपल्या राज्यकाळात त्याने अनेक नाणी पाडली. त्यापैकी काही नाण्यांवर शातकर्णीचा चेहरा दिसतो. नहपान राजाच्या पराभवानंतर शातकर्णीने नहपानाची सर्व नाणी ताब्यात घेऊन त्यावर आपल्या शिक्क्यांचे मुद्रण केले. आपल्या प्रजेला तो पित्यासमान वाटत होता असे समजते. राजा म्हणून धर्म, राजकारण, अर्थकारण या सर्व बाबतीत तो कोठेही कमी पडला नाही असे सांगण्यात येते. युद्धशास्त्रात तो प्रवीण होता आणि एक अत्युत्तम धनुर्धारी मानला जाई. याचबरोबर असेही सांगितले जाते की त्याने आपल्या राज्यात जातिव्यवस्था कडक केली आणि धर्माचे, ब्राह्मणांचे संरक्षण होईल याकडे जातीने लक्ष पुरवले.


गौतमीपुत्र शातकर्णीने उज्जैनीचा राजा विक्रमादित्य (सुप्रसिद्ध विक्रम-वेताळ आणि सिंहासन बत्तिशीचा नायक) याचा पराभव करून दिनमान पद्धती रूढ केली. ही पद्धत हिंदू कालगणना म्हणून आजही महाराष्ट्र, आंध्र, गुजरात आणि पार कंबोडियातील बौद्धांमध्येही वापरली जाते. शातकर्णी गादीवर बसल्यावर म्हणजेच इ.स. ७८ मध्ये ही कालगणना सुरू झाल्याने तिच्यात सांगितलेला वर्षगणनेचा(शालिवाहन शकाचा) आकडा ग्रेगरियन कॅलेंडरमधील सनाच्या अंकापेक्षा ७८ ने कमी असतो.

स्वतःला राजर्षिवधू म्हणवून घेणाऱ्या त्याच्या आईने-गौतमी बलश्रीने-नाशिक येथील शिलालेखात आपल्या पुत्राच्या मागे "क्षहरातवंश-निरवशेषकर शकपल्हवनिषूदन समुद्रतोयपीतवाहन" अशी बिरुदावली कोरवून घेतली आहे. त्याचा स्वैर अनुवाद पुढीलप्रमाणे --

"क्षत्रियांचा (त्याकाळचे इतर राजे, राजघराणी) गर्व आणि अभिमान यांचा नि:पात करणारा, शक, यवन आणि पल्लव यांचा सर्वनाश करणारा, क्षहरात घराण्याचा पराभव करून सातवाहन घराण्याची उज्ज्वल परंपरा पुन:स्थापित करणारा....."


आख्यायिका[संपादन]

या राजाबद्दल प्रसिद्ध असणाऱ्या काही आख्यायिकांची नोंद येथे केली आहे.

शालिवाहनाने दक्षिणेत आपले साम्राज्य वसवले आणि स्वतःला सार्वभौम राजा घोषित केले. ह्यावर उत्तरेकडील तत्कालीन राजांनी हशा उडवला आणि शालिवाहनाला आवाहन म्हणून एक हत्ती भेट म्हणून पाठवला. त्याबरोबर निरोप पाठवला की शककर्ता व्हायचे सामर्थ्य असेल तर ह्या हत्तीचे नक्की वजन करून कळवावे. ह्यावर शालिवाहनाच्या पंडितांनी एक उपाय काढला. पैठणच्या नागघाटावर गोदावरी नदीत एक नाव सोडली. हत्तीला नावेत चढवले आणि पाणी नावेच्या बाजूवर किती चढते आहे ह्याची नावेवर खूण केली. त्यानंतर हत्तीला बाहेर काढले आणि नावेत बरोब्बर त्या खुणेपर्यंत पाणी चढेल इतकी माती भरली. मग त्या मातीचे वजन केले व तो हत्ती वजनाच्या आकड्यासकट परत पाठवला. त्याच्या ह्या बौद्धिक विजयाने त्याने सुरू केलेला शालिवाहन शक सर्वांच्या व्यवहारात येण्यासाठी मान्यता पावला.

संदर्भ[संपादन]

  1. ^ इसवी सन १९४५ पर्यंत गौतमीपुत्र हा २३ वा राजा अशी कल्पना होती. पण त्या साली पहिल्या सातवाहन राजाची नाणी सापडली. तोपर्यंत त्याच्या अस्तित्वाची कुणाला कल्पनासुद्धा नव्हती. त्यामुळे तोच ह्या घराण्याचा मूळ पुरुष आणि आद्य राजकर्ता असला पाहिजे असे महामहोपाध्य वा. वि. मिराशी यांनी सिद्ध केले आणि ते अनेक विद्वानांनी मान्य केले.(पहा:संशोधन मुक्तावली, सर २ रा, पृष्ठ ६४ ).