किरण डेंबला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
किरण डेंबला
जन्म १० नोव्हेंबर, १९७४ ( 1974-11-10) (वय: ४९)
आग्रा
निवासस्थान हैदराबाद
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
शिक्षण संगीत विशारद,
पेशा तंदुरुस्ती तज्ज्ञ
धर्म सिंधी, हिंदू
जोडीदार
अजित डेंबला (ल. १९९७)
अपत्ये दोन

किरण डेंबला या हैदराबाद स्थित एक तंदुरुस्ती तज्ज्ञ आणि प्रशिक्षक (फिटनेस ट्रेनर) असून, त्या एका आधुनिक व्यायामशाळेच्या मालक देखील आहेत. डेंबला यांनी दक्षिणात्य सिनेसृष्टीतील विशेषतः टॉलीवूड मधील जवळपास सर्व कलाकारांना तसेच समाजातील उच्चभ्रू व्यक्तीना व्यायामाचे आणि तंदुरुस्तीचे प्रशिक्षण दिले आहे.[१]

याशिवाय डेंबला एक संगीत शिक्षिका, प्रेरणादायी वक्ता, फोटोग्राफर, डिस्को जॉकी (डीजे) आणि गिर्यारोहक आहे, जिने आतापर्यंत तीनदा माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पचा ट्रेक केला आहे.[२]

वैयक्तिक आयुष्य[संपादन]

किरण डेंबलाचा जन्म आग्रा येथे १० नोव्हेंबर १९७४ रोजी एका सिंधी परिवारात झाला. लहानपणापासून डेंबलाने गाणे शिकण्यास सुरुवात केली होती. वयाच्या चौथ्या वर्षी डेंबलाने प्रथमच रंगमंचावर गाणे गायले होते. इ.स. १९९७मध्ये त्यांचा विवाह अजित डेंबला सोबत झाला. अजित हे बहुराष्ट्रीय कंपनीत विक्रीव्यवस्थापन विभागात कार्यरत होते. कामानिमित्त डेंबला जोडपे बेंगळुरू, जपान, जर्मनी आणि अमेरिकेत काही काळ घालवला आणि शेवटी २००६ मध्ये तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे स्थिरावले.[३] तोपर्यंत त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली होती. किरण डेंबला यांना शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे त्यांच्या मेंदूत रक्ताची गाठ निर्माण झाली. औषधी उपाचारामुळे आजार तर दूर झाला पण शारीरिक सुस्ती आणि ७५ किलो पर्यंत वाढलेले वजन यामुळे डेंबला त्रस्त झाल्या. जलतरणिके पोहणे आणि विद्यार्थ्यांना गाणे शिकवणे काही काळ चालले. नंतर डेंबला यांनी एका व्यायामशाळेत जाण्यास सुरुवात केली. घरगृहिनी म्हणून पूर्वायुष्य काढलेल्या डेंबला यांना वर्तमान परिस्थितीशी जुळवून घेण्यास प्रथम त्रास झाला. नंतर मात्र त्यांना व्यायामाची नशा चढली.[२][३]

तंदुरुस्ती आणि बांधेसूदपणा[संपादन]

व्यायामशाळेचे प्रशिक्षक लक्ष्मण रेड्डी आणि डेंबला यांची येथून ओळख निर्माण झाली. योग्य व्यायाम, बायसेप्स आणि ट्रायसेप्स यांचे ज्ञान मिळवून डेंबलाचे शरीर साचेबद्ध झाले. अवघ्या सात महिन्यात डेंबला यांनी २४ किलो वजन कमी केले होते. डेंबला यांनी यासाठी व्यायाम आणि साचेबद्ध शरीर निर्मितीचे हैदराबादच्या व्यायामशाळेतून तसेच अमेरिकेतील 'मसल अँड फिटनेस पर्सनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट' मधील पत्रव्यवहाराचा एक कोर्स देखील अचूकपणे पूर्ण केला.[४][५] पुढे घरातील दागिने विकून आणि काही कर्ज काढून डेंबला व लक्ष्मण यांनी २००७ मध्ये बेगमपेट येथे भागीदारीत 'स्वेटझोन जिम' नावाची आधुनिक व्यायामशाळा उघडली. २०१० मध्ये लक्ष्मण यांनी मिस्टर वर्ल्ड हा पुरस्कार जिंकला. त्यामुळे त्यांची व्यायामशाळा प्रसिद्धीस आली. मग दक्षिणात्य अभिनेता राम चरण यांची भेट झाली आणि राम चरण यांच्या होणाऱ्या पत्नीला म्हणजे उद्योजिका 'उपासना कामिनेनी' यांना डेंबला यांनी व्यायामाचे प्रशिक्षण देऊन बांधेसूद बनवले. त्यानंतर तमन्ना भाटिया आणि अनुष्का शेट्टी यांना अनुक्रमे मिर्ची आणि बाहुबली चित्रपटासाठी तयार केले.[१] इथून पुढे नयनतारा, दीक्षा सेठ, तापसी पन्नू, लक्ष्मी मंचू, प्रकाश राज तसेच एस.एस. राजामौली यांनी डेंबला आणि लक्ष्मण यांच्या कडून व्यायामाचे आणि अहारविहाराचे प्रशिक्षण घेतले.[३][२]

एका महिलेकडून व्यायामाचे प्रशिक्षण घेणे अजूनही अनेक लोकांच्या गळी उतरत नव्हते. तसेच व्यायाम आणि व्यवसायाची गोडी डेंबला यांना शांत बसू देत नव्हती. इ.स. २०१२ पर्यंत त्यांनी अचूक आहारविहार आणि व्यायामाचे वेळापत्रक बनवले. लवकरच परिणाम दिसू लागला, ज्यात त्यांनी शरीरसौष्ठवाचा असा साचा प्राप्त केला की त्यात पोटावरील सहा स्नायूंचा संच उभारून आला, ज्याला इंग्रजीत 'सिक्स पॅक ॲब' असे म्हणतात. यामुळे डेंबला यांच्यावर लोकांचा विश्वास वाढला.[१] इतकेच नव्हे तर हैद्राबादचे पोलीस आयुक्तांनी देखील त्यांना पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची विनंती केली.[५]

किरण डेंबला यांनी इ.स. २०१३ मध्ये 'वर्ल्ड बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप'मध्ये भाग घ्यायचे ठरवले. पण त्यात भाग घेण्यासाठी त्यांना आधी कुटुंबाशी झगडावे लागले. पती अजितने या स्पर्धेत भाग घेण्यास थेट नकार दिला होता. शेवटी हट्टाला पेटलेल्या पत्नीपुढे अजित नमले. या स्पर्धेत डेंबला यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आणि सहावे स्थान मिळवले. थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळवणारी एकमेव स्पर्धक म्हणून डेंबला यांचे कौतुक केले गेले. ही स्पर्धा हंगेरी देशातील बुडापेस्ट येथे पार पडली होती आणि येथून डेंबला यांचा आत्मविश्वास अजून वाढला. या यशामुळे डेंबला यांना कुटुंबाचा आणि आप्तस्वकीयांचा देखील चांगला पाठिंबा मिळाला.[४]

सन्मान आणि पुरस्कार[६][संपादन]

  • सेलिब्रेटी फिटनेस ट्रेनर तेलंगणा महिला ब्रँड नेतृत्व पुरस्कार २०१९ म्हणून ओळखले जाते.
  • आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेता फिटनेस ऍथलीट.
  • प्रशिक्षित तमन्ना भाटिया, तापसी पन्नू, दीक्षा सेठ, प्रकाश राज, एस.एस. राजामौली आणि अनुष्का शेट्टी सहित दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींना प्रशिक्षण दिले.
  • वर्ल्ड बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिप - २०१३ मध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आणि सहावा क्रमांक मिळविला.
  • तेलंगणा चेंबर इव्हेंट इंडस्ट्री (TCEI) कडून '२०१७ मधील सर्वोत्कृष्ट डीजे' पुरस्कार.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ a b c "Meet Hyd's bodybuilding champ Kiran Dembla, one of the few women in the field". thenewsminute.com (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2020-06-03. २२ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ a b c "25 किलो Weight Loss करके बॉडी बिल्डर बनी ये महिला, उम्र 45-2 बच्चों की मां के डोले-शोले कर देंगे हैरान". hindi.asianetnews.com. Archived from the original on 2021-12-22. २२ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ a b c "Ab(solutely) six!". thehindu.com (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2021-08-10. २२ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  4. ^ a b "40 की उम्र, दो बच्चों की मां किरण बन गईं फेमस बॉडी बिल्डर, सुपरस्टार्स ले रहे हैं फिटनेस टिप्स". aparajita.amarujala.com (हिंदी भाषेत). Archived from the original on 2021-12-22. २२ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  5. ^ a b "From fat to fit… and how!". timesofindia.indiatimes.com (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2021-12-22. २२ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  6. ^ "Kiran Dembla's voyage from Housewife to Bodybuilder". Archived from the original on 2021-12-23. 2021-12-23 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]