कन्नड लिपी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कन्नड लिपी ही कन्नड भाषेची लिपी आहे.

कर्नाटक राज्यातील कन्नड भाषेच्या या लिपीत लिहिलेले लेख पाचव्या शतकापासून आढळतात. पल्लव, कदंब, पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील चालुक्य, राष्ट्रकूट, गंगवशी राजे, काकतीय वंशातील राजे आणि त्यांचे मांडलिक यांचे हजारो लेख उपलब्ध झालेले आहेत. ते एपिग्राफिया इंडिका, एपिग्राफिया कर्नाटिका, इंडियन ॲंटिक्वरी इ. नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेले आहेत.

भाषेच्या अवस्था[संपादन]

कन्नडच्या एकूण तीन अवस्था दिसून येतात :प्राचीन वळणाची कन्नड लिपी बनवासी येथील कदंबांच्या लेखांतून आढळून येते; त्याचप्रमाणे बदामीच्या चालुक्य राजांच्या लेखांतूनही ती दिसून येते. कदंबांचे लेख पाचव्या-सहाव्या शतकांतील असावेत. कदंब राजा काकुस्थवर्मन्‌ सु. ४०५ ते ४३५ या काळात होऊन गेला. या काळच्या लिपीतील अक्षरांचे साम्य सातवाहनाच्या लेखांतील अक्षरांशी दिसून येते. कदंब राजांच्या लेखांतून ‘अ ’, ‘र ’ या अक्षरांना थोडी गोलाई प्राप्त झालेली असली, तरी ‘आ ’ हे अक्षर आपले प्राचीनत्व टिकवून असल्याचे दिसून येते. चालुक्य राजवंशातील पहिला कीर्तिवर्मन्‌ आणि मंगलेश यांच्या बदामीयेथील लेखांतून ‘क’ या अक्षराचे डावे टवळे आडव्या दंडाला चिकटलेले दिसून येते; तथापि मंगलेशाच्या दानपत्रांतून मात्र अशा तऱ्हेचा ‘क’ दिसून येत नाही. दुसऱ्या पुलकेशीच्या ऐहोळे येथील लेखात जुन्या वळणाचेच ‘क ’ आणि ‘र’ दिसून येतात.

कन्नड वर्णमाला[संपादन]

कन्नडची द्वितीयावस्था सातव्या शतकापासून दहाव्या शतकापर्यंत दिसून येते. बदामीच्या चालुक्य राजांच्या,राष्ट्रकुटांच्या आणि वेंगीच्या चालुक्य राजांच्या लेखांतून ही लिपी आढळून येते. अक्षरांचे एकूण वळण बसके असून स्वरूप थोडे बेंगरूळ वाटते. या काळात ‘अ ’, ‘आ ’, ‘क ’ आणि ‘र’ या अक्षरांचे गोल वळण टिकून राहिले. ‘ब ’चे चौकोनी स्वरूप गेले, तसेच त्याच्या डोक्यावरील आडवी रेघ गेली आणि अक्षराला गोलाई प्राप्त झाली. असे कितीतरी फरक दाखविता येतात. द्राविडी भाषेतील ‘र’ आणि ‘ळ’ सातव्या शतकापासून आढळून येत असल्यामुळे कन्नड साहित्याची सुरुवातही सातव्या शतकापासून असली पाहिजे, असे एक मत आहे. कन्नडच्या तिसऱ्या अवस्थेतील अक्षरे वर्तमान कन्नड व तेलुगू लिपींपेक्षा फार भिन्न नाहीत. गंगवंशी राजाचे लेख या लिपीत लिहिलेले आहेत. अक्षराच्या डोक्यावर कोनाकृती दिसू लागली.

देवनागरी व कन्नड[संपादन]

प्रचलित कन्नडमध्ये देवनागरीपेक्षा ऱ्हस्व ‘ए’ आणि ऱ्हस्व ‘ओ ’ असे दोन स्वर अधिक आहेत; तसेच ‘ऐ’चा उच्चार ‘अइ’ आणि ‘औ’चा उच्चार ‘अउ’ असा होतो. अनुस्वाराचा उच्चार ‘अम्‌’ असा होतो. जोडाक्षरे लिहिताना पहिले व्यंजनपूर्ण लिहितात आणि दुसऱ्या जोडल्या जाणाऱ्या व्यंजनाला एकचिन्ह जोडतात. कन्नडमध्ये प्रत्येक व्यंजनाला एक चिन्ह आहे.

संदर्भ[संपादन]

  • Buhler, G.Indian Paleography, Calcutta, 1962.
  • ओझा,गौरीशंकर,भारतीय प्राचीन लिपिमाला,दिल्ली, १९५९.
    • मराठी विश्वकोश
  • http://mr.vikaspedia.in/
Translation arrow-indic.svg
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


हेही पहा[संपादन]