Jump to content

अंबाजोगाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अंबेजोगाई हे महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. यास प्राचीन काळी 'अंबानगरी' व जयवंती राजाच्या काळात 'जयवंतीनगर' म्हणून ही ओळखले जाई. निजामाच्या राज्यात या गावाचे नाव 'मोमिनाबाद' असे होते. नंतर १९६२ साली यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकाळात कांग्रेस ने अंबेजोगाई असे नामांतरण केले.[]

  ?अंबाजोगाई

महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: अंबानगरी, जयवंतीनगर
—  शहर  —
Map

१८° ४३′ ४८″ N, ७६° २२′ ४८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर परळी
प्रांत भारत
जिल्हा बीड
तालुका/के अंबेजोगाई
लोकसंख्या ७४,८८४ (२०११)
भाषा मराठी
नगराध्यक्ष
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 431517
• +०२४४६
• MH 44 + MH 23

[[वर्ग:महाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे]]


गावाचे नाव, येथे अवतरित झालेल्या देवी पार्वतीच्या (अंबाबाई) व तिचे येथेच माहेर असल्यामुळे (जोगाई) असे एकत्रित होऊन झालेले आहे. ही महाराष्ट्रातील बऱ्याच जणांची कुलदेवता, कुलदेवी असून, ते येथे दर्शनासाठी येत असतात.

मराठी भाषेचा उगम बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे झाला, याबाबत सर्व भाषातज्ज्ञांचे एकमत आहे. त्यामुळे अंबाजोगाई हे ठिकाण मराठी भाषेची जननी म्हणून ओळखले जाते. मराठी भाषेचे आद्यकवी मुकुंदराज यांनी विवेकसिंधू या ग्रंथांची रचना याच ठिकाणी केल्यामुळे अंबाजोगाईला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.[]

स्वामी रामानंद तीर्थ यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्याची सुरुवात देखील अंबाजोगाई येथे मराठी शाळा स्थापना करून केलेली आहे. तत्कालीन कुलगुरू डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या समितीने भाषा विद्यापीठ अंबाजोगाई येथे स्थापन करावे याबाबतचा अभ्यासपूर्ण अहवाल शासनास सादर केलेला आहे. जागतिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वेळोवेळी याबाबतचे ठराव झाले आहेत, असे असताना शासनाने मराठी भाषेचे पहिले अभिमत विद्यापीठ मुंबई येथे सुरू करण्याचा निर्णय घेणे चुकीचे आणि अन्यायकारक आहे. त्यामुळे अंबाजोगाई येथे मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्याची आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आ.अमरसिंह पंडित यांनी केली.  राज्य शासन मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असताना त्यांना मराठी भाषेची जननी म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्याचा विसर पडलेला आहे. राज्यातील भाषा तज्ञांनी मराठी भाषेचा उगम अंबाजोगाई येथे झाल्याचे पुराव्यानिशी सांगितले असून याबाबत कोणीही आक्षेप घेतला नाही.

इतिहास आणि संस्कृती

[संपादन]
योगेश्वरी (जोगाई) मंदिर

समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले अंबाजोगाई शहर ही मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी आहे.अंबाजोगाई हे शहर जयवंती या नदीच्या काठी वसलेले आहे. अंबेजोगाईमध्ये योगेश्वरी देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. खास करून कोकणी लोकांची (कोकणस्थ ब्राह्मणांची) आराध्य देवता म्हणून योगेश्वरी देवीच्या दर्शनास भाविक येत असतात. आणि जैन धर्मियांचे विमलनाथ , खोलेश्वर, मुकुंदराज स्वामी आणि दासोपंत महाराज यांची समाधी मंदिरे आहेत. हत्तीखाना म्हणून प्रसिद्ध असलेली दगडातील कोरीव लेणी तसेच नुकतेच उत्खनन करून इतिहासाचे साक्षीदार ठरलेले बाराखांबी हे महादेवाचे मंदिर याच परिसरात आहे. बाराखांबी या महादेव मंदिर परिसरात उत्खननादरम्यान अनेक पुरातन मूर्ती आढळल्या आहेत. तसेच अंबाजोगाईतील सदर बाजार परिसरात असलेले बडा हनुमान मंदिर देखील ऐतिहासिक महत्त्व असलेले मंदिर आहे. आणि नागनाथाचे मंदिर, सीतेची नहानी, नागझरी कुंड ही ठिकाणे देखील प्रेक्षणीय आहेत.

स्वातंत्र्यपूर्व काळात तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामात स्वामी रामानंद तीर्थ आणि बाबासाहेब परांजपे (जे रझाकारांविरुद्ध लढले) या प्रसिद्ध व्यक्तींचा या शहराशी संबंध आला आहे. निजामकालीन काही अवशेष आजही या शहरात अस्तित्वात आहेत. खोलेश्वर मंदिर परिसरात निजामकालीन बुरूज आहे, तर सध्या अस्तित्वात असलेल्या वैद्यकीय महाविद्यालय परिसरात पूर्वी निजामकालीन घोड्यांचा खूप मोठा तबेला होता. या गावात मुकुंद राजाची समाधी आहे.[]

दळणवळण

[संपादन]

अंबाजोगाईला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मध्यवर्ती बस स्थानक असून, महाराष्ट्र तसेच गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील शहरांशी हे शहर जोडले गेले आहे. जवळील रेल्वे स्थानक परळी २५ किमी व अहमदपूर 58 किमी येथे आहे. तर जवळील विमानतळ लातूर येथे आहे. अंबाजोगाईहून पुणे ३०५ किमी, मुंबई ४४८ किमी, हैदराबाद ३२४ किमीवर आहेत.

शिक्षण

[संपादन]

अंबेजोगाई विद्येचे पुण्यानंतर दुसरे माहेरघर समजले जाते. येथे बऱ्याच शैक्षणिक संस्था असून एक वैद्यकीय आणि तंत्रशिक्षणाचे महाविद्यालय आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात १९१८ मध्ये योगेश्वरी शिक्षण संस्थेची योगेश्वरी नूतन विद्यालय ही शाळा स्थानिक व्यापारी व वकिलांच्या प्रयत्नातून उभी राहिली.[] पुढे स्वामी रामानंद तीर्थ यांनी ५ मे १९३५ला या शाळेचे पुनर्जीवन करत आठवीचा वर्ग उघडला.[] आजही या संस्थेचा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दबदबा आहे. या संस्थेच्या विविध शाळा कॉलेजांमधून इयत्ता पहिली ते पदव्युत्तर शिक्षण घेण्याची सोय आहे.

दुसरी शिक्षण संस्था म्हणजे भारतीय शिक्षण प्रसारक संस्था. या संस्थेची स्थापना सन १९५१ मध्ये वैद्य काका, खारकर गुरुजी, धायगुडे गुरुजी आणि कोदरकर गुरुजी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी केली. आज मराठवाड्यात जवळपास ३५ ठिकाणी या संस्थेचे कामकाज चालते आहे. ही मराठवाड्यातील क्रमांक दोनची संस्था आहे. विविध कोर्सेस या संस्थेत चालवले जातात. ज्ञान प्रबोधिनी,अंबेजोगाई हे ज्ञान प्रबोधिनीचे विस्तार केंद्र अंबेजोगाईत कार्यरत आहे.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "जिल्हा बीड, महाराष्ट्र शासन | बीड जिल्हा औरंगाबाद विभागाच्या पश्चिमेस मध्यभागी वसलेला आहे. | भारत". 2022-08-15 रोजी पाहिले.
  2. ^ "जिल्ह्याविषयी | जिल्हा बीड, महाराष्ट्र शासन | भारत". 2020-08-20 रोजी पाहिले.
  3. ^ "First Poet Shri.Mukundraj, Ambajogai | District Beed, Government of Maharashtra | India" (इंग्रजी भाषेत). 2022-07-20 रोजी पाहिले.
  4. ^ "संग्रहित प्रत". 2020-08-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-08-19 रोजी पाहिले.
  5. ^ https://sahitya.marathi.gov.in/scans/Maharashtra%20che%20Shilpkar%20-%20Swami%20Ramanand%20Tirtha.pdf