चांगदेव मंदिर (चांगदेव)
?चांगदेव मंदिर चांगदेवाच मंदिर महाराष्ट्र • भारत | |
— मंदिर — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
• २१९ मी |
हवामान तापमान • उन्हाळा |
• ४६ °C (११५ °F) |
जवळचे शहर | मुक्ताईनगर |
भाषा | मराठी |
चांगदेव मंदिर मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव गावाजवळ आहे. पूर्णा नदीच्या काठी आहे. इथे मंदिरा जवळ उत्तरेस तापी आणि पूर्णा नदीचां सांगम आहे. दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात महाशिवरात्रीला इथे जत्रा भरते ज्यात आजू बाजूच्या क्षेत्रातून मोठ्या संख्येने भाविक चांगदेव महाराजांच्या दर्शनाला येतात. इथे चांगदेव महाराजांनी समाधी घेतली होती अशी अख्यिका आहे[१] येथील मंदिर प्राचीन आहे व भारतीय पुरातत्त्व विभागाने येथे केलेल्या उत्खननात अनेक प्राचीन गणपतीच्या, विष्णूच्या प्राचीन मुर्त्या सापडलेल्या आहेत.मंदिर काळ्या रंगाच्या दगडा पासून बनवलेले आहे. अत्यंत बारीक आणि प्रभावी नक्षीकाम येथील मंदिराच्या भिंतींवर केलेले आहे. मंदिराच्या परिसरात शनिदेवाच आणि महादेवाचं मंदिर आहे.
श्री चांगदेव मंदिर
[संपादन]दक्षिण-उत्तरेला जोडणारा खानदेश हा दुवा असल्यामुळे मुसलमानी हल्ल्यांचा व आक्रमणाचा सर्व जोर या भागावर पडला. त्यामुळे तेराव्या शतकानंतर या भागात महत्त्वाच्या नवीन धार्मिक वास्तू निर्माण झाल्या नाहीत. तरीसुद्धा खानदेशच्या वास्तुशैलीचे व मांडणीचे चांगदेवाचे मंदिर हे उत्तम उदाहरण आहे. गुरुकुल पद्धतीचा या भागात प्रसार होता व त्याप्रमाणेच मुख्य मंडप व बाजूला ओवऱ्यांची मांडणी, तसेच समाधीसाठी खास योजना चांगदेव परिसरात दिसून येते. बौद्धधर्मीयांच्या गुंफा व वास्तुस्थापत्य यांचा परिणाम येथील वास्तुकलेवर आहे. मंदिराची घडण उत्तर व पूर्व भारतीय वास्तुकारांच्या मार्गदर्शनाखाली झाल्यामुळे वास्तूवर प्रादेशिक कलेप्रमाणे त्या त्या भागातील कलेचाही ठसा दिसतो. उथळ शिल्पे, आडवे पाषाणपट्ट, वेलपत्ती, तोरणे, शंकरपाळ्यासारख्या आकृती व सुंदर मूर्ती यांचा अंतर्बाह्य वापर केला आहे.
मंदिर दगडी असल्यामुळे कोरीव काम स्पष्ट असून टिकून राहिले आहे, चांगदेवाचे मंदिर जळगांव जिल्ह्यातील चांगदेव गावी आहे. चांगदेव गांव (भुसावळ-इटारसी रेल्वेमार्गावर) सावदा रेल्वे स्टेशनापासून सुमारे आठ किलोमीटर दूर, तापी व पूर्णा नद्यांच्या संगमावर वसले आहे.
हिंदू धर्माप्रमाणे योग, मंत्र, तंत्र यांच्या साह्याने साधकाची मानसिक उन्नती होऊन क्रमाक्रमाने तो मोक्षाप्रत पोहोचतो. या क्रिया अत्यंत शांत व पवित्र वातावरणात होणे आवश्यक समजले जाते. त्यासाठी मठांची योजना असते. अकराव्या व बाराव्या शतकांत या भागात मठांची मोठ्या प्रमाणात बांधणी झाली. महामंडलनाथ सेऊना किंवा दुसरा सेनू या देवगिरीच्या यादव सम्राटाचा मांडलिक गोविंदराजा याने हे मंदिर अकराव्या शतकात बांधले असावे. वाघुलीचे सूर्यमंदिर व संगमश्वराचे महादेवाचे मंदिर ही चाळीसगावमधील देवळे या राजाच्या कारकिर्दीत झाली.
चांगदेव हे नांव योगी चांगदेवाशी संबंधित नाही. चांगदेव हा निकुंभ राजा गोवन याचा सरदार होता व त्यासंबंधीचा आलेख चाळीसगावपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर पाटण गावच्या महेश्वर मंदिरावर आहे, या चांगदेवाच्या कारकिर्दीत हे देऊळ बांधले गेले असावे असा समज आहे. चांगदेव हे नांव प्रसिद्ध ज्योतिषी व खगोलशास्त्र भास्कराचार्य यांच्या नातवाचेही होते. यादव राजा सिंधन याने इ.स. १३०६ मध्ये मोठ्या जमिनी चांगदेवास इनाम दिल्या. शिल्परत्नाकर वगैरे वास्तुशिल्पावरील ग्रंथ येथे शिकविण्यात येत व त्यामुळे येथे एका जोमदार नव्या वास्तुप्रकाराचा उगम झाला.
अर्धस्तंभ, मूर्ती, अंतराळाचे सुंदर कोरीव छत, वेलपत्ती व आडवे शिल्पपट्ट, लाकडी वास्तुकलेप्रमाणे बाहेरील सज्जाजवळ वापरलेल्या दगडी लोलकाकृती नक्षी, अशी अनेक वास्तुवैशिष्ट्ये या भागात दिसून येतात.
देवळाची वास्तू
[संपादन]चांगदेवाचे मंदिर दगडात बांधलेले आहे. या दगडांचा वापर चुन्याशिवाय करण्यात आला आहे. दगड घोटून व घडवून एकावर एक बसवून मंदिराच्या भिंती उभारल्यामुळे वास्तू फार मजबूत आहे. देऊळ ३२ मीटर लांब व सुमारे ४० मीटर रुंद आहे. सभामंडप सुमारे १४ मीटर उंच असून प्रत्येक कोपऱ्यात चार पूर्ण स्तंभ व चार अर्ध स्तंभ आहेत. या सोळा पूर्ण स्तंभ व सोळा अर्ध स्तंभावर मजबूत छत असून त्यावर दगडी कलशाची योजना असावी. परंतु परचक्रामुळे किंवा राजकीय परिस्थितीमुळे काम अर्धवट सोडावे लागून नंतर वरचा शिखराचा भाग विटांचा बांधला असावा, अंतराळावर अंडाकृती, नक्षीदार उतरते छत आहे डॉ. हेन्री कुझिन्सच्या मते वरचा भाग विटांचा बनविण्याचीच योजना असावी.
शंकरपाळ्याच्या आकाराची नक्षी, उथळ शिल्प, आडवे पट्टे. उभी शिल्पे सामाऊन घेणारी वेलपत्ती वगैरे खुब्यांचा वापर दर्शनी भागावर करण्यात आला आहे. खांबाचे आकार व कोरीव काम लक्षणीय आहे.
भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक ३ एप्रिल, इ.स. १९१६ रोजी घोषित केलेले आहे.[२]
चांगदेवाचा उत्सव
[संपादन]प्रत्येक खानदेशकर एकदा तरी बैलगाडीत बसून चांगदेवाच्या यात्रेला गेलेला असतो. गाड्या सोडून नदीच्या वाळवंटातच अनेक लोक मेळ्यासाठी जमतात. यात्रेच्या काळात शिवरात्री निमित्त शंकराची आराधना केल्यावर डाळबट्टीच्या नैवेद्यानेच उपासाची सांगता होते. भरड्या डाळीच्या व गव्हाच्या पिठापासून केलेल्या व उघड्या विस्तवावर भाजलेल्या व शिजवलेल्या या डाळबट्टीच्या नैवेद्याला वेगळीच चव असते. यात्रेत अनेक प्रकारची दुकाने- विशेषतः पितळी भांड्याची दुकाने- रामायण व महाभारत गाऊन दाखविणारी नाटकपथके, ही वैशिष्ट्ये असतात. माघातील तिसऱ्या दिवसापासून अमावास्येपर्यंत हा उत्सावाचा काळ असतो. चंद्र व सूर्यग्रहणाच्या काळांत नद्यांचा संगम असल्यामुळे येथे जत्रा भरते. खानदेशातील खास देवस्थानांत चांगदेवाचे स्थान आहे
संदर्भ
[संपादन]- ^ https://maharashtratimes.com/others/like-share-readers-own-page/story-of-trip/shishadur-temple-that-fulfills-the-wish/articleshow/66030574.cms
- ^ "नोटीफिकेशन ऑफ सेंट्रली प्रोटेक्टेड मॉन्यूमेन्ट्स इन इंडिया" (PDF) (इंग्रजी भाषेत). 2016-03-04 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. १२ ऑक्टोबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)