Jump to content

दस्तापूर (मंगरुळपीर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?दस्तापूर

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर मंगरुळपीर
जिल्हा वाशिम जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

दस्तापूर हे मंगरुळपीर तालुक्यातील वाशीम जिल्ह्यातील एक खेडेगाव आहे. वाशीम आणि मंगरुळपीरला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग १६१E वर वाशीमवरून २८ किलोमीटर अंतरावर वसलेले हे गाव. दस्तापूर हे इसवी सन १८५७ साली पडलेल्या भीषण दुष्काळामुळे सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यातील सांगोला, माण, आटपाडी, मंगळवेढा, खटाव, इत्यादी तालुक्यातून उदरनिर्वाहासाठी स्थलांतरित झालेल्या लोकांनी वसविले गाव आहे. त्यामुळे विदर्भात असूनही वऱ्हाडी भाषे ऐवजी इथले सगळे रहिवासी अजूनही पश्चिम महाराष्ट्रसारखी मराठी भाषा बोलतात.

भौगोलिक स्थान

[संपादन]

समुद्र सपाटीपासून साधारण ४०२ मीटर उंचीवर असलेले हे गाव जिल्हा मुख्यालय वाशीम पासून ईशान्येकडे २८ किमी, मंगरुळपीर पासून नैऋत्येकडे ९ किमी आणि राज्याची राजधानी मुंबईपासून पूर्वेकडे ५६९ किमी अंतरावर आहे. दस्तापूर हे महाराष्ट्र राज्याच्या मध्य भागात २०° २७’ उत्तर अक्षांश आणि ७७° ३०’ पूर्व रेखांश या ठिकाणी वसलेले गाव. हे गाव वाशिम विधानसभा मतदारसंघ आणि यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघ यात समाविष्ट होते.

हवामान

[संपादन]

उन्हाळ्यात थोडे जास्त उष्ण आणि हिवाळ्यात थंड हवामान असते. जवळील मानोरा आणि मंगरूळपीर तालुके हे मध्यम पर्जन्य क्षेत्राअंतर्गत येतात.

लोकजीवन

[संपादन]

इसवी सन २०११ च्या जगणनेनुसार गावाची लोकसंख्या ११७२ असून ५६७ (४८.४ %) महिला व उरलेले ६०५ (५१.६ %) पुरुष आहेत. गावातील एकूण घरांची संख्या २८९ असून साक्षरतेचे प्रमाण हे ७१ % आहे.

शेती

[संपादन]

दस्तापूरचे एकूण क्षेत्र ४४४.२४ हेक्टर आहे. त्यापैकी अकृषी क्षेत्र ०.४ हेक्टर आणि एकूण सिंचन क्षेत्र ४३१.२४ हेक्टर आहे. गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे. गावामध्ये १९५० साली बांधण्यात आलेला तलाव आहे व नजीकच्या काळात बांधलेले धारण आहे. धरणातील पाण्याचा वापर हा प्रामुख्याने शेतीसाठी केला जातो. शेतीमध्ये सोयाबीन, मूग, उडीद, कपाशी, ज्वारी, गहू ही पिके घेतली जातात.

नागरी सुविधा

[संपादन]

दळणवळण

[संपादन]

मंगरुळपीर हे दस्तापूरपासून जवळचे शहर आहे. दस्तापूरपासून मंगरुळपीर ९ किलोमीटर आहे. मंगरुळपीर ते दस्तापूरपर्यंत रस्ता जोडणी आहे व मुबलक प्रमाणात वाहनांची सोया आहे. सर्वात जवळचे रेल्वे स्थानक वाशीम येथे आहे. वाशीम हे सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांशी जोडलेले आहे.

शिक्षण

[संपादन]

गावामध्ये अंगणवाडी केंद्र व ज़िल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. गावामधील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ४ थ्या वर्गापर्यंत शिक्षणाची उत्तम सोया आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी जवळील कसोळा (४ किलोमीटर), धानोरा (३ किलोमीटर) किंवा मंगरुळपीर (९ किलोमीटर) येथे जातात.

आरोग्य

[संपादन]

नजीकचे प्राथमिक आरोग्य केंद्र हे ४ किलोमीटर अंतरावरील कसोळा येथे आहे.

इतर सुविधा

[संपादन]

सिंगल फेजिंगमुळे गावात २४ तास वीजपुरवठा असतो. शेतीसाठी मात्र १२ तास वीज उपलब्ध असते. त्याव्यतिरिक्त  गावात जन्म आणि मृत्यू नोंदणी कार्यालय आहे. गावात सर्व मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क आहे.

जवळपासची गावे

[संपादन]

दस्तापूरच्या दक्षिणेस वाशिम तालुका, पूर्वेस मानोरा तालुका, पश्चिमेस मालेगाव तालुका व उत्तरेस बार्शीटाकळी तालुका आहे.

गावाची वैशिष्ट्ये

[संपादन]

१. गावातील लोकांनां कुस्तीची फार आवड आहे. त्यामुळे पंचक्रोशीत दस्तापूर हे गाव पहेलवानांचे गाव म्हणून ओळखले जाते. परंतु ती परंपरा आता संपुष्टात आली आहे.

२. दस्तापूर हे नावारूपाला आले ते येथील सामूहिक विवाह सोहळ्यामुळे. गेले १५ वर्षांपासून ही परंपरा चालू आहे. २०१५ साली साम वृत्त वाहिनेने याची दाखल घेऊन एक माहितीपट बनविला होता.

३. गावात हनुमानाचे, संतोषीमातेचे व मायाक्का देवीचे मंदिर आहे. दरवर्षी हनुमान जयंती, संतोषी मातेची आणि मायाक्का देवीची यात्रा उत्साहात साजरा होते.

पुरस्कार

[संपादन]

१. दस्तापूर या गावाला इसवी सन २००७-०८ मध्ये निर्मल ग्राम आणि संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान हे दोन जिल्हास्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत.

२. तसेच इसवी सन २००८-०९ मध्ये शाहू फुले आंबेडकर स्वच्छ दलित वस्तीचा पुरस्कार प्राप्त झाला.

३. त्यानंतर इसवी सन २०१०-११ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानातंर्गत पुरस्कार मिळाला आहे.

४. दस्तापूर हे पर्यावरण-संतुलित-समृद्ध-ग्राम-विकास-योजने द्वारे दिला जाणारा पर्यावरण विकासरत्न पुरस्कार प्राप्त गाव आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/