Jump to content

रत्‍ने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शिलावरणातील खडकांमध्ये वेगवेगगळी खनिजे आढळून येतात. या खनिजांपैकी काही शुद्ध स्वरूपातील खनिजे रत्‍ने म्हणून वापरली जातात. या खनिजांच्या खड्यांना योग्य ते आकार देऊन ठराविक पद्धतीने पैलू पाडले जातात. पैलू पाडल्यावर त्यांना काळजीपूर्वक घासून झळाळी आणली जाते. मोहक रंग आणि पूर्ण पारदर्शक खड्यांना मौल्यवान समजतात. मात्र काही अंशपारदर्शक किंवा अपारदर्शक खडेही अलंकार व आभूषणे यासाठी वापरली जातात. सौंदर्य, टिकाऊपणा आणि दुर्मिळता हे रत्‍नांचे महत्त्वाचे निकष आहेत. पैलू पाडलेल्या रत्‍नातून प्रकाशकिरणे जाताना त्यांचे वक्रीभवन कितपत होते व प्रकाशाचे अपस्करण किती प्रमाणात होते यावरही रत्‍नाचे सौंदर्य अवलंबून असते. उत्तम प्रकारची रत्‍ने ही काही मर्यादित क्षेत्रातच विशिष्ट प्रकारच्या आणि विशिष्ट प्रकारे निर्माण झालेल्या खडकांमध्ये वा त्यांच्या सानिध्यात आढळून येतात.

एक मौल्यवान खडा (रत्न, सुरेख रत्न, पाचू, अमुल्य रत्न किंवा कमी-बहुमुल्य असा खडा) खनिज स्फटिकाचा एक असा तुकडा असतो, ज्याला कापून पॉलिश केले जाते आणि दागिने किंवा इतर सुशोभनासाठी वापरले जाते.[] परंतु, ठराविक खडक (जसे लॅप्सिज लाझुली, ओपल आणि जेड) किंवा कार्बनी पदार्थ खनिजे नसतात (जसे अंबर, जेट आणि पर्ल), आणि त्यांना देखील दागिन्यांसाठी वापरले जातात आणि त्यामुळे त्यांना देखील मौल्यवान खडे समजले जाते. बहुतेक मौल्यवान खडे कठीण असतात, परंतु चकाकी किंवा कलात्मक मूल्ये असलेल्या इतर भौतिक गुणधर्मांमुळे काही मऊ खनिजे दागिन्यांमध्ये वापरले जातात.दुर्मिळपणा हा एक आणखी गुणधर्म आहे जो त्या खड्याला अनमोल बनवितो.

दागिन्यांव्यतिरिक्त, प्राचीन काळात कोरलेली रत्ने आणि कठीण अशा खड्यांवरील कोरीवकाम, जसे कप, महत्त्वाचे विलासी कलेचे प्रकार होते. रत्न बनविणाऱ्याला रत्नाचे पैलूकाम करणारा किंवा जेमकटर असे म्हणले जाते; रत्नाचा कामगार एक रत्नाचा उत्पादक असतो. या परंपरेत कार्ल फॅबर्जचे कोरीवकाम उल्लेखनीय आहेत.

वैशिष्ट्ये आणि वर्गीकरण

[संपादन]

प्राचीन ग्रीक लोकांपासून चालत आलेले पाश्चिमात्य देशांमधील पारंपारिक वर्गीकरण, अनमोल आणि कमी-अनमोल रत्नांमध्ये विभेद करण्यापासून सुरू झाले आहे; तसेच इतर संस्कृतींमध्ये देखील विभेद करण्यात आले आहेत. आधुनिक काळातील वापरामध्ये मूल्यवान खड्यांमध्ये हिरे, माणिक, नीलम आणि पाचू यांच्यासह इतर सर्व कमी-अनमोल रत्नाच्या समावेश होतो.[] त्यांच्यातील विभेद प्राचीन काळातील संबंधित खड्यांची दुर्मिळता व त्यांची गुणवत्ता दर्शविते: रंगहीन हिऱ्यांचा अपवाद सोडल्यास, सर्व खडे त्यांच्या सर्वात शुद्ध स्वरूपात सुरेख रंगातील पारदर्शक असतात, आणि अतिशय कठीण असतात, ज्यांचा कठीणपणा मोहच्या श्रेणीवर ८ ते १० इतका असतो. इतर खड्यांचे वर्गीकरण त्यांचा रंग, पारदर्शिता आणि कठीणपणानुसार केले जाते. पारंपारिक विभेद आधुनिक मूल्य कदाचित दर्शविणार नाही, उदाहरणार्थ, लाल रत्ने तुलनात्मकदृष्ट्या स्वस्त असतात, तर हिरवी रत्ने मध्यम-गुणवत्तेच्या पाचूंपेक्षा अतिशय महाग असतात, ज्यांना सॅवोराईट असे म्हणतात.[] कलेच्या इतिहासात आणि पुरातत्त्वशास्त्रात वापरल्या जाणाऱ्या कमी-अनमोल खड्यासाठी अशास्त्रीय संज्ञा आहे हार्डस्टोन किंवा कठीण खडा. ‘अनमोल’ आणि ‘कमी अनमोल’ या संज्ञांचा व्यापारी दृष्टिकोनातील वापर, विवादास्पद रूपाने, दिशाभूल करणार असून त्यात असे चुकीचे दर्शविले जाते की काही खडे स्वाभाविक रूपाने इतरांपेक्षा मूल्यवान असतात,जे प्रत्यक्षात जरुरी नाही.

आधुनिक काळात जेमोलॉजिस्ट्स अमुल्य खड्यांना ओळखतात, जे जेमोलॉजि क्षेत्रासाठी खास बनविलेल्या तंत्रज्ञानाच्या परिभाषेचा वापर करीत रत्नांचे आणि त्यांच्या वैशिष्ट्यांचे वर्णन करतात. एखाद्या अमुल्य खड्याला ओळखताना जेमोलॉजिस्ट्स वापरत असलेले सर्वात पहिले वैशिष्ट्य म्हणजे त्याची रासायनिक संरचना असते. उदाहरणार्थ, हिरे कार्बनने (c) बनलेले असतात, तर माणिक ॲल्युमिनियम ऑक्साईड (Al2O3) पासून बनलेले असतात. पुढे, स्फटिक असलेल्या अनेक रत्नांना त्यांच्या क्रिस्टलच्या व्यवस्थेद्वारा वर्गीकृत केले जाते, जसे घनाकृती किंवा त्रिकोणीय किंवा एकनताक्ष. दुसरी वापरली जाणारी संज्ञा म्हणजे स्वरूप आहे, ज्या आकारात सामान्यपणे रत्न आढळते तो असतो. उदाहरणार्थ, हिरे, ज्यांच्यात घनाकृती स्फटिक रचना असते, जी सहसा अष्टफलक स्वरूपात असते.

कोणत्याही पदार्थांचे रंग प्रकाशाच्या स्वतःच्या स्वभावामुळे असतात. दिवसाच्या उजेडात, जिला सहसा सफेद प्रकाश असे म्हणतात, वास्तविक एकत्रित स्पेक्ट्रमच्या सर्व रंगांचा समावेश असतो. जेव्हा प्रकाश एखाद्या पदार्थावर पडतो, तेव्हा बहुतेक प्रकाश शोषला जातो, तर अतिशय लहान प्रमाणात एका विशिष्ट आवर्ततेचे किंवा तरंगलांबीचे परावर्तन होते. तो परावर्तित भाग डोळ्यांपर्यंत संवेदित स्वरूपात पोहोचतो. माणिक लाल दिसते, कारण ते सफेद प्रकाशातील इतर सर्व रंगांना (हिरवा आणि निळा) शोषून घेते, तर लाल रंगला परावर्तित करते.[]

रत्‍ने

[संपादन]

स्पायनेल

[संपादन]
स्पायनेल

याचे रासायनिक सूत्र MgAl2O4.[] असे आहे. हे रत्‍न रासायनिकदृष्ट्या मॅग्नेशियम ॲल्युमिनेट आहे. स्पायनेलचा शुद्ध पारदर्शक खडा रंगविरहित असतो. काही वेळा या खनिजात मॅग्नेशियमच्या जागी लोह, जस्त किंवा मॅंगनीज यापैकी एक धातू प्रतिस्थापित झालेला असतो. तर काही वेळा ॲल्युमिनियमच्या जागी लोह किंवा क्रोमियम हे धातू प्रतिस्थापित झालेले असतात. स्पायनेल या रत्‍नाचे खडे लाल, निळा किंवा जांभळा या रंगांचे असतात. स्पायनेलचे खडे खडकांच्या अपक्षयातून निर्माण झालेल्या वाळू (ग्रॅव्हेल) मध्ये माणिक या रत्‍नाच्या खड्यासमवेत आढळून येतात. याची काठीण्‍यता ७.५ ते ८ इतकी आहे.

झिरकॉन

[संपादन]

[ चित्र हवे ] हे खनिज म्हणजे झिर्कोनियम धातूचे खनिज आहे. याचे रासायनिक सूत्र ZrSiO4 [] हे आहे. या खनिजाचे स्फटिक चतुष्कोनाकृती असतात. या रत्‍नाचा रंग लाल, पिवळा, निळा किंवा हिरवा अशा रंगछटांचा असू शकतो. झिरकॉनला पैलू पाडून उत्तम झळाळी आणता येते. झिरकॉनचे खडे पेग्मटाइट जातीच्या खडकांमध्ये आढळून येतात.

टूर्मलीन

[संपादन]
टूर्मलीन

हे रत्‍न म्हणजे रासायनिकदृष्ट्या एक मिश्र बोरोसिलिकेट आहे. या मिश्रसिलिकेटमध्ये ॲल्युमिनियम लोह आणि मॅग्नेशियम यांच्या जोड्या आढळून येतात. याचे रासायनिक सूत्र (Ca,K,Na,)(Al,Fe,Li,Mg,Mn)3(Al,Cr, Fe,V)6
(BO3)3(Si,Al,B)6O18(OH,F)4 [] आहे. आम्लधर्मी धातू व मॅग्नेशियम युक्त टूर्मलीन हे पारदर्शक आणि रंगीत असते. याची काठीयता ७ ते ७.५ इतकी असते. हे अग्निजन्य खडकांमध्ये तसेच पेग्मटाइट जातीच्या खडकांमध्ये व काही वेळा रूपांतरित खडकांमध्येही आढळते.

हिरा (Diamond)

[संपादन]

[[चित्र:Koh-INoor old version copy.jpg|thumb|right|150px|राइश देर क्रिस्ताल या म्युनिक, जर्मनी येथील संग्रहालयामधील कोहिनूर हिर्याची काचेची प्रतिकृती. यात कोहिनूरचा ब्रिटिश राणी व्हिक्टोरिया हिचा पती अल्बर्ट याने इ.स. १८५३ मध्ये, त्याला पुन्हा पैलू पाडून घेण्याआधीचा आकार दिसतो आहे.]] हे रासायनिकदृष्ट्या कार्बन या मूलतत्त्वाचे शुद्ध स्वरूपातील स्फटिकरूप असते. हिर्याचे स्फटिक घनाकृती प्रणालीचे असून या स्फटिकामधले कार्बनचे सर्व अणू समांतर अंतरावर असतात. हिर्याचा प्रकाश वक्रीभवनांक सर्व रत्‍नाच्या तुलनेत जास्त आहे. हिर्याचा काठीण्यांक १० आहे. हिरे पिंडाश्म जातीच्या खडकांमध्ये आढळून येतात. पिंडाश्माचे थर काही ठिकाणी क्वार्टझाइट या खडकांच्या खाली आढळतात. हिरे रंगहीन असतात तसेच कधीकधी त्यामध्ये पिवळट किंवा निळसर रंगछटाही दिसतात.

माणिक (Ruby)

[संपादन]
माणिक

हे खनिज षटकोनी स्फटिकप्रणालीचे असून कोरॅंडम या खनिजाचा शुद्ध प्रकार आहे. रासायनिकदृष्ट्या माणिक हे ॲल्युमिनियम ऑक्साइडचे स्फटिकरूप आहे. याचे रासायनिक सूत्र Al2O3:Cr[] आहे. अल्युमिनियम ऑक्साइडचे स्फटिक रंगहीन असतात पण त्यात क्रोमियम ऑक्साइडचा अंश मिसळला तर लाल रंगाचे माणिक तयार होते. माणकाचे खडे गर्द लाल तर काही तपकिरी रंगछटांचे असतात. माणिक या रत्‍नाचा काठीण्यांक ९ आहे. काहीवेळा माणकाचे षटकोनी स्फटिक निर्माण होत असताना त्यामध्ये इतर काही खनिजांचे लांबट स्फटिक समाविष्ट होतात. त्यामुळे माणकाच्या खड्यात ६ आरे असलेल्या ताऱ्याची आकृती दिसते. असे माणकाचे रत्‍न तारांकित माणिक म्हणून ओळखले जाते.

पाचू (Emerald)

[संपादन]
पाचू

हे रत्‍न म्हणजे बेरिल या षटकोनी स्फटिक प्रणालीच्या खनिजाचा एक प्रकार आहे. याचा रंग पोपटी किंवा गडद हिरवा असा असतो. याचे रासायनिक सूत्र Be3Al2(SiO3)6[] आहे. पाचूचा काठीण्‍यांक ७.५ आहे. पाचू हे खनिज बेरिलियम व अ‍ॅल्युमिनियम यांचे मिश्र सिलिकेट आहे. पाचूचे स्फटिक निर्माण होत असताना त्यामध्ये क्रोमियम ऑक्साइडचा अंश मिसळून त्याला हिरवा रंग प्राप्त होतो. पाचूचे स्फटिक हार्नब्लेड शिस्ट जातीच्या खडकांमधील शिरांमध्ये आढळणाऱ्या बायोटाइटमध्ये आढळते.

वैडूर्य

[संपादन]
वैडूर्य

हे रत्‍न म्हणजे क्रिसोव्हेरिल या खनिजाचे शुद्ध व पारदर्शक रूप आहे. क्रिसोव्हेरिलचे स्फटिक समचतुर्भुज प्रणालीचे असतात. क्रिसोव्हेरिल हे खनिज रासायनिकदृष्ट्या बेरिलियम व अ‍ॅल्युमिनियमचे संमिश्र ऑक्साइड आहे. याचे रासायनिक सूत्र BeAl2O4[१०] आहे. या खनिजाचे पारदर्शक खडे पिवळे, तपकिरी किंवा हिरव्या रंगछटांचे असतात. वैडूर्य या रत्‍नाचा काठीण्‍यांक ८.५ आहे. या रत्‍नाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या खड्याला जर वरच्या बाजूला घुमटासारखा आकार दिला तर या रत्‍नामध्ये मांजराच्या डोळ्यामध्ये दिसते तशी पिवळी चमकदार फिरती प्रकाशरेषा दिसते. त्यामुळे या रत्‍नाला मार्जारनेत्र (कॅट्स आय) असेही म्हणतात. वैडूर्य या रत्‍नाचे खडे कुरुंदाच्या खडकात अ‍ॅपेटाइट नामक खनिजासमवेत आढळतात.

गोमेद

[संपादन]
गोमेद

याचे रासायनिक सूत्र X3Y2(Si O4)3[११] आहे. हे रत्‍न गर्द लाल रंगाचे असून गार्नेट या खनिजाच्या गटातील एक प्रकार आहे. गार्नेट या गटात एकूण सहा प्रकारची खनिजे आहेत. यातील प्रत्येक खनिज हे दोन धातूंचे मिश्र सिलिकेट असते. गोमेद हे खनिज रासायनिकदृष्ट्या कॅल्शियम ॲल्युमिनियम सिलिकेट आहे. याच्या खड्यांमध्ये काही प्रमाणात लोह आणि मॅग्नेशियमचे अंश आढळून येतात. गोमेदचे खडे घनीय स्फटिक प्रणालीचे असतात. काही खडे पूर्ण पारदर्शक असतात तर काही खड्यात थोडासा गढूळपणा आढळून येतो. या रत्‍नाचा काठीण्यांक ७.२५ ते ७.५० इतका आहे.

कायनाइट

[संपादन]
कायनाइट

हे रत्‍न म्हणजे रासायनिकदृष्ट्या अ‍ॅल्युमिनियम सिलिकेट आहे. याचे रासायनिक सूत्र Al2SiO5[१२] आहे. या खनिजाचे स्फटिक भिनताक्ष स्फटिक प्रणालीचे (ट्रायक्लिनिक सिस्टिम) असतात. कायनाइट या खनिजाचे शुद्ध पारदर्शक खडे फिकट ते गर्द निळा या रंगाचे असतात. कायनाइट हे खनिज व त्याचे रत्‍नासाठी उपयुक्त खडे शिस्ट आणि ग्रॅनाइट याप्रकारच्या खडकांमध्ये आढळतात.

पुष्कराज

हे रत्‍न म्हणजे ॲल्युमिनियम फ्लोरोसिलिकेट असून त्यातील फ्लोरीनचा काही अंश हा हैड्रोक्सिल गटाने प्रतिस्थापित(रिप्लेस) झालेला असतो. याचे रासायनिक सूत्र Al2SiO4(F,OH)2[१२] आहे. पुष्कराज खडा शुद्ध, पूर्ण पारदर्शक आणि स्वच्छ असेल तर रंगहीन असतो. पण जर पुष्कराजचे स्फटिक निर्माण होताना त्यात लोहाचा अंश मिसळला तर त्या खड्याला निळसर, पिवळट रंगछटा प्राप्त होतात. पुष्कराज हे टोपाझ या खनिजाचा प्रकार आहे. टोपाझचे स्फटिक समचतुर्भुजी प्रणालीचे असतात. या रत्‍नाचा काठीण्यांक ८ आहे. हे खनिज पेग्मटाइट या खडकामध्ये आढळते.

इंद्रनील

[संपादन]
इंद्रनील

इंद्रलील किंवा नील हे खनिज षटकोनी स्फटिक प्रणालीचे असून याचा पारदर्शक, स्वच्छ, शुद्ध, गर्द निळसर रंग, मखमली चमक व पांढरट झाक असलेला खडा मौल्यवान समजला जातो. याचे रासायनिक सूत्र Al2O3 आहे. हा कुरूंद या खनिजाचा एक प्रकार आहे. रासायनिकदृष्ट्या ॲल्युमिनियम ऑक्साइड असलेल्या या खनिजाचे स्फटिक निर्माण होत असताना त्यात लोहटिटॅनियमचे अंश मिसळल्यामुळे या खड्याला निळसर रंग प्राप्त होतो. या रत्‍नाचा काठीण्‍यांक ९ इतका आहे. हे रत्‍न बायोटाइट व हॉर्नब्लेड शिस्ट जातीच्या खडकांमध्ये आढळते. तसेच काही वेळा स्फटिकयुक्त चुनखडीमधील केओलिनाइज्ड मॅग्नेसाइट या जातीच्या खडकामध्ये देखील आढळते.

आयोलाइट

[संपादन]

हे रत्‍न म्हणजे आयोलाइट या खनिजाचे शुद्ध पारदर्शक रूप आहे. आयोलाइट हे खनिज रासायनिकदृष्ट्या ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम धातूंचे मिश्र सिलिकेट असते. या खनिजाचे स्फटिक समचतुर्भुज प्रणालीचे असतात. या रत्‍नाचे खडे पिवळ्या, निळ्या किंचा जांभळ्या रंगाचे असतात. हे खनिज पेग्मटाइट या खडकामध्ये आढळून येते.

पेरिडॉट

[संपादन]
पेरिडॉट

हे रत्‍न म्हणजे ऑलिव्हीन या खनिजाचा शुद्ध पारदर्शक रूपातील स्फटिक आहे. ऑलिव्हीन हे खनिज म्हणजे लोहमॅग्नेशियम या धातूंचा मिश्र सिलिकेट आहे. याचे रासायनिक सूत्र (Mg, Fe)2SiO4 आहे. ऑलिव्हीनचे खडे हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचे असतात.

असाधारण रत्‍ने

[संपादन]

सर्वसामान्यपणे दागिने व इतर आभूषणे यामध्ये वापरल्या जाणाऱ्या हिरे, माणिक, पाचू या रत्‍नांबरोबरच इतरही काही खनिजांचे स्वच्छ पारदर्शक स्फटिक वा खडे यांना योग्य प्रकारे पैलू पाडून आणि चमक आणून ते रत्‍नांप्रमाणेच वापरले जातात अशा प्रकारची रत्‍ने असाधारण रत्‍ने समजली जातात.

ॲन्डेल्युसाइट

[संपादन]

हे खनिज अ‍ॅल्युमिनियम सिलिकेट असून त्याचे स्फटिक समचतुर्भुजी प्रणालीचे असतात. स्फटिकांचा आकार चौकोनी असतो. या रत्‍नाच्या रंगछटा लाल, गुलाबी असतात. हे स्फटिक शिस्ट जातीच्या खडकांमध्ये आढळते.

अपेराइट

[संपादन]

हे खनिज कॅल्शियम फॉस्फेट असून याचे स्फटिक षटकोनी प्रणालीचे असतात. या रत्‍नाच्या रंगछटा निळ्या, जांभळ्या, हिरव्या किंवा पिवळट अशा असून हे खडे कमी कठीण असतात.

युक्लेज

[संपादन]

हे अ‍ॅल्युमिनियम बेरिलियमचे मिश्र सिलिकेट आहे. रंग निळसर किंवा हिरवट असतो. पेग्मटाइट खडकांमध्ये सापडते.

लाझुलाइट

[संपादन]

हे अ‍ॅल्युमिनियम-मॅग्नेशियम धातूंचे मिश्र फॉस्फेट आहे. हे शिस्टोन क्वार्टझाइट जातीच्या खडकांमध्ये आढळते.

रूटाईल

[संपादन]

हे टिटॅनियम डाय ऑक्साइड असून अंशपारदर्शी स्फटिकाच्या रूपात आढळते. याचा रंग लाल तपकिरी किंवा काळा असतो.

उपरत्‍ने

[संपादन]

काही अंशपारदर्शी असलेली खनिजे चांगली चमक देऊ शकतात आणि शोभिवंतही असतात. या खनिजांना योग्य आकार देऊन उपरत्‍ने म्हणून ती आभूषणे, शोभेच्या वस्तूसाठी वापरली जातात.

चाल्सिडोनी क्वार्ट्‌झ

[संपादन]

या गटातील खनिजे स्फटिकी सिलिका आणि अस्फटिकी सजलित सिलिका यांचे मिश्रण असते. या गटात ॲगेट, ॲगेट जास्पर, कॉर्नेलियस, ओनिक्स या खनिजांचा समावेश होतो. ही खनिजे अग्निजन्य अशा ज्वालामुखी खडकांमध्ये आढळून येतात.

ॲमेझॉन

[संपादन]

हे फेल्डस्पार खनिजांपैकी पोटॅशियम ॲल्युमिनियम सिलिकेट आहे.

नेफ्राइट

[संपादन]

हे खनिज एकनताक्ष स्फटिक प्रणालीचे आहे. हे स्फटिक कॅल्शियममॅग्नेशियमचे मिश्र सिलिकेट आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ एल्देन, नॅन्सी (२००९). फक्त रत्नजडित: मन रत्न रत्न स्टोन तयार करण्यासाठी डिझाइन्स. न्यूयॉर्क: रॅंडम हाऊस. p. 136. ISBN 978-0-307-45135-4.
  2. ^ मॅक्स बायूर. प्रेसिवस स्टोन्स. p. २.
  3. ^ वाईसे.आर.डब्लू. (२००६). जॅम ट्रेडचे सिक्युरिटीज, द कॉन्सिअर्स'स गाइड टू प्रेसिस्टीस जस्टीम्स . ब्रनसविक हाऊस प्रो. ISBN 0-972-8223-8-0.
  4. ^ "रत्नांचे फायदे". रुद्राक्ष-रत्ना.कॉम.
  5. ^ स्पायनेलविषयी माहिती (इंग्रजी मजकूर)
  6. ^ झिरकॉनविषयी माहिती (इंग्रजी मजकूर)
  7. ^ मिन्डॅट संकेतस्थळावरील माहिती (इंग्रजी मजकूर) ऑक्टोबर १, २०११ ला पाहिले.
  8. ^ मिन्डॅट संकेतस्थळावरील माहिती (इंग्रजी मजकूर) ऑक्टोबर १, २०११ ला पाहिले.
  9. ^ मिन्डॅट संकेतस्थळावरील माहिती (इंग्रजी मजकूर) ऑक्टोबर १, २०११ ला पाहिले.
  10. ^ मिन्डॅट संकेतस्थळावरील माहिती (इंग्रजी मजकूर) ऑक्टोबर १, २०११ ला पाहिले.
  11. ^ मिन्डॅट संकेतस्थळावरील माहिती (इंग्रजी मजकूर) ऑक्टोबर १, २०११ ला पाहिले.
  12. ^ a b मिन्डॅट संकेतस्थळावरील माहिती (इंग्रजी मजकूर) ऑक्टोबर १, २०११ ला पाहिले.