कुराण
कुराण | |
---|---|
अंतिम क्रांती, القرآن, al-Qurʾān | |
उघडलेले कुराण शरीफ | |
माहिती | |
धर्म | इस्लाम |
भाषा | शास्त्रीय अरबी |
कालावधी | ६१०–६३२ इसव |
अध्याय | ११४ (सूची) |
कुराण (अरबी: القرآن उच्चार: अल् कुरआन) हा इस्लाम धर्माचा प्रमुख व पायाभूत धर्मग्रंथ आहे. इस्लामधर्मीय लोक या ग्रंथाला प्रत्यक्ष परमेश्वराचा (अल्लाचा) शब्द मानतात. अल्लाने त्याचा प्रेषित मोहम्मद पैगंबरामार्फत हा ग्रंथ संपूर्ण मानवजातीसाठी बोधला, अशी इस्लामाची धारणा आहे. इस्लामाच्या धारणेनुसार कुराण परमेश्वराने पाठवलेला अंतिम व सर्वोच्च धर्मग्रंथ आहे.
इस्लामी मतानुसार परमेश्वराने आपला दूत जिब्राईल याच्याकरवी मोहम्मद पैगंबराकडे कुराण पोहचवले. त्यांच्या मान्यतेनुसार कुराणाचे अवतरण सलग झाले नसून इ.स. ६१० ते इ.स. ६३२ सनांदरम्यान अधूनमधून ते अवतीर्ण होत गेले. प्रेषितांच्या हयातीतच ते लिपीबद्ध करण्यात आले होते. आदरणीय ज़़ैद, आदरणीय अबूू बकर, आदरणीय उस्मान, आदरणीय अली इब्न अबु तालीब, आदरणीय उबई इब्न क़ाब, आदरणीय अब्दुल्लाह बिन मसूद, आदरणीय मुआवीया इब्न अबु सुफियान यांच्याकरवीकरवी स्वतः प्रेषितांनी समोर बसवून लिपीबद्ध केले होते.
व्युत्पत्ती
[संपादन]कुराण या शब्दाची व्युत्पत्ती कुरआन या अरबी शब्दापासून झाली असून त्याचा शब्दशः अर्थ वाचणे, असा होतो. कुराण हा शब्द प्रत्यक्ष कुराणामध्येच उल्लेखला असून जवळपास ७० वेळा हा शब्द कुराणात वापरला आहे.
रचना
[संपादन]कुराण अरबी भाषेत लिहिले आहे. कुराणातील विभागांना सूरा असे संबोधले जाते. सूरा (नामभेद : सूरः) याचा शब्दशः अर्थ 'कुंपणाने घेरलेली जागा' असा होतो. कुराणाची रचना एकूण ११४ सूरांमध्ये मांडण्यात आली आहे. कुराणाच्या सूरा मक्की व मदीनी अश्या दोन भागांत विभागल्या असून मोहम्मदाच्या मदिनेकडील प्रस्थानाअगोदर अवतीर्ण झालेल्या सूरांना मक्की, तर त्यानंतर अवतरलेल्या सूरांना मदीनी असे म्हणतात. एका सूरेमधील प्रत्येक ओळीस आयत असे म्हणतात. आयत याचा शब्दशः अर्थ चिन्ह असा होतो. कुराणामध्ये एकूण ६२३६ (काही मतांनुसार ६३४९) आयती आहेत.
बिस्मिल्लाहिर्-रहिमानिर्-रहीम (चित्रित) (अर्थ: अल्लाच्या नावाने, जो अत्यंत दयाळू, अत्यंत कृपावंत आहे.) ही कुराणाची पहिली ओळ आहे. ही ओळ कुठल्याही सूरेचा भाग नसली, तरीही ती प्रत्येक सूरेची पहिली ओळ मानली जाते. केवळ सूरा क्रमांक ९ अत् तौबा ही या नियमास अपवाद असून तिला स्वतंत्र सूरा न मानता अल अनफाल या तिच्या पूर्ववर्ती सूरेशी सलग मानतात [१]. कुराणातील सूरांचा अवतरण्याचा क्रम कुराणातील सध्याच्या क्रमाप्रमाणे नव्हता. सूरा क्रमांक ९६ अल अलक़ हिच्या पहिल्या पाच आयती सर्वप्रथम अवतरल्या, असे सर्वमान्य मत आहे. اقْرَأْ بِاسْمِ رَبِّكَ الَّذِي خَلَقَ, अर्थात: वाच आपल्या ईश्वराच्या नावाने, ज्याने निर्माण केले (सूरा ९६, १) ही कुराणातील सर्वप्रथम अवतरलेली आयत मानली जाते. त्यामागोमाग अल क़लम सूरेमधील काही आयती व त्यानंतर अल मुझम्मिल सूरेमधील काही आयती अवतरल्या असे मानले जाते. या प्रसंगानंतर जवळपास एका वर्षाचा खंड पडला व त्यानंतर कुराणाचे अवतरण अधिक वेगात सुरू झाले. सर्वांत शेवटी अवतरलेल्या सूरा व आयती यांबद्दल मात्र विद्वानांमध्ये एकमत नाही.[२]
कुराण सार
[संपादन]कुराणाचे मूळ अरबी नाव रूह्ल्कुराण असे आहे. विनोबा भावे यांनी या ग्रंथाचे सुलभ मराठीत भाषांतर केले आहे जे कुराण सार म्हणून प्रसिद्ध आहे. कुराणातील वेच्यांची यामध्ये मांडणी करताना विनोबांनी त्यांच्या एका कार्यकर्त्याला लिहिले होते- "इस्लामची आध्यात्मिक शिकवण काय आहे, ती निवडून निवडून आम्ही समोर मांडली आहे, सर्व धर्मांच्या अनुयायांसमोर आणि सर्व जगासमोर....." या पुस्तकाच्या अनुवादात श्री. अच्युतराव देशपांडे यांनी महत्त्वाचे काम केले. हा अनुवाद कुराणाचे उर्दू पांच अनुवाद आणि चार भाष्य व इंग्रजी दोन अनुवाद व एक भाष्य यांच्या आधाराने आणि कुराणावरील अरबी-उर्दू आणि अरबी-इंग्रजी कोशांच्या साह्याने मूळ अरबीवरून करण्यात आलेला आहे.[३]
शिकवण
[संपादन]कुराणाची मुख्य शिकवण एकेश्वरवाद ही आहे. ला इलाह् इल्लिल्लाह् मुहम्मदुर् रसूलिल्लाह् अर्थात 'अल्लाशिवाय इतर कुणीही पूजनीय नाही, मोहम्मद हा अल्लाचा प्रेषित आहे' ही कुराणाची मुख्य शिकवण आहे.
संदर्भ
[संपादन]- ^ हजरत मिर्झा बशीरुद्दिन महमूद अहमद. 'द होली कुरान इंग्लिश ट्रान्सलेशन ॲंड कमेंटरी. टीका सूरा ९:१
- ^ उपरोक्त टीका, सूरा ९६:१
- ^ कुराण सार , (जुलै १९६७), विनोबा ,परंधाम प्रकाशन, ग्रामसेवा मंडळ पो.पवनार ,(वर्धा) महाराष्ट्र
बाह्य दुवे
[संपादन]- Quran Archive - Texts and Studies on the Quran ((कुराण))[permanent dead link]
- Quran Word by Word // QuranAcademy.org
- Al-Quran (कुराण) Archived 2009-01-29 at the Wayback Machine.
- कुराण मूळ अरबी
- संपूर्ण कुराण मराठी अनुवाद
हा लेख या लेख-मालिकेतील लेख आहे: |
इस्लाम |
---|