जयंत सावरकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जयंत सावरकर
जन्म जयंत सावरकर
३ मे, १९३६
मृत्यू २४ जुलै, २०२३ (वय ८७)[१]
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

जयंत सावरकर (३ मे १९३६, गुहागर - २४ जुलै २०२३) हे एक मराठी नाट्य आणि चित्रपट अभिनेते होते. वयाच्या विसाव्या वर्षी, इ.स. १९५४ साली त्यांनी आपल्या अभिनयाच्याच कारकीर्दीस सुरुवात केली.

सावरकर मूळ गुहागरचे. वडील लहानमोठा व्यवसाय करायचे. सकाळी चार वाजता उठून रोज चरकातून उसाचा हंडाभर रस काढून ते चालत चालत आरे गावापर्यंत जाऊन विकायचे. त्यांना २१ मुले होती. जयंत सावरकर सर्वात धाकटे. त्यांचा मोठा भाऊ मुंबईत नोकरी करत होता, त्याच्याकडे जयंत सावरकरांना पाठवले. ते त्याच्याबरोबर गिरगावात राहू लागले, व नोकरी करू लागले.

नोकरी सोडून जयंत सावरकर यांनी पूर्णपणे नाटकातच काम करायचे जेव्हा ठरविले तेव्हा त्यांचे सासरे नटवर्य मामा पेंडसे यांनी नोकरी सोडण्याला विरोध केला, पण अभिनयाच्या कामासाठी पूर्ण पाठिंबा दिला. सावरकरांनी सासरेबुवांचा सल्ला मानला आणि श्रद्धा व निष्ठेने रंगभूमीची सेवा सुरू केली.

सुरुवातीची बारा वर्षे सावरकर यांनी ‘बॅक स्टेज आर्टिस्ट’ म्हणून काम केले. त्याच वेळी ते नोकरीही करत होते. नाटकाची आवड होतीच. हौशी नाट्यसंस्थांमधून त्यांनी सुरुवातीला लहानसहान कामे केली. मुंबई मराठी साहित्य संघात स्वयंसेवक, कार्यकर्ता म्हणूनही काही काळ काम केले. पुढे साहित्य संघाच्या नाट्य शाखेत त्यांचा प्रवेश झाला. साहित्य संघात होणाऱ्या सर्व नाटकांच्या प्रयोगांना त्यांची हजेरी असायची. साहित्य संघाच्या दरवाज्यावर उभे राहून ते तिकिटे कापत. आचार्य अत्रे लिखित आणि पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ‘किंग लिअर’ (सम्राट सिंह) या नाटकात त्यांना मा. दत्ताराम यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली. नाटक फारसे चालले नसले तरी त्यांनी साकारलेल्या ‘विदूषक’ या भूमिकेचे कौतुक झाले.

मा. अनंत दामले ऊर्फ नूतन पेंढारकर, केशवराव दाते, जयराम शिलेदार, मा. दत्ताराम, दादा साळवी, नानासाहेब फाटक, पंडितराव नगरकर, परशुराम सामंत, बाळ कोल्हटकर, भालचंद्र पेंढारकर, रमेश देव, राजा परांजपे, रामदास कामत, सुरेश हळदणकर, ते आजच्या पिढीतील अद्वैत दादरकर, मंगेश कदम यांच्याबरोबर त्यांनी काम केले आहे. कमलाकर सारंग, दामू केंकरे, भालचंद्र पेंढारकर या जुन्या दिग्दर्शकांबरोबर कामे केल्यानंतर अद्वैत दादरकर, चंद्रकांत कुलकर्णी, मंगेश कदम, समीर विद्वांस अशा नव्या पिढीतल्या दिग्दर्शकांबरोबरही त्यांनी कामे केली आहेत.

जयंत सावरकर यांनी शंभरहून अधिक मराठी आणि तीसहून अधिक हिंदी चित्रपटांत कामे केली आहेत. वयाच्या पंचाहत्तरीनंतर त्यांनी हिंदी चित्रपटांत कामे करायला सुरुवात केली. अजय देवगण, इरफान खान, जॉन अब्राहम यांसारख्या तरुण कलाकारांबरोबर त्यांना कामे करायला मिळाली.

कौटुंबिक[संपादन]

  • सासरे - कै. मामा पेंडसे
  • पत्‍नी - उषा पेंडसे
  • मुलगा - कौस्तुभ
  • कन्या - सुषमा आणि सुवर्णा

नाटके[संपादन]

  • अपराध मीच केला (गोळे मास्तर)
  • अपूर्णांक (ब्रम्हे)
  • अलीबाबा चाळीस चोर (खुदाबक्ष)
  • अल्लादीन जादूचा दिवा (हुजऱ्या)
  • अवध्य (नाचणे)
  • आम्ही जगतो बेफाम (चिवटे)
  • एकच प्याला (तळीराम)
  • एक हट्टी मुलगी (गृहस्थ)
  • ओ वुमनिया
  • कळलाव्या कांद्याची कहाणी (कारभारी; मंगळ्या)
  • के दिल अभी भरा नही
  • खोली नंबर ५
  • गणपती बप्पा मोरया (राजा)
  • चव्हाटा (कुळबुडवे)
  • जादूचा खेळ (गावकरी
  • जावई माझा भला
  • तुझे आहे तुजपाशी (आचार्य; श्याम)
  • दिवा जळू दे सारी रात (पोस्टमास्तर)
  • दुरितांचे तिमिर जावो
  • धंदेवाईक (विमा एजंट)
  • टिळक आणि आगरकर (गोपाळराव जोशी)
  • नयन तुझे जादुगार (पतंगे रिपोर्टर)
  • नाथ हा माझा (विनयकुमार)
  • प्रेमसंन्यास (गोकुळ)
  • प्रेमा तुझा रंग कसा (बच्चाजी बल्लाळ)
  • बेबंदशाही (खंडोजी, खाशाबा)
  • भानगडीशिवाय घर नाही (मोठा भाऊ; विवाहित)
  • भावबंधन (कामण्णा)
  • मातीच्या गाड्याचे प्रकरण (चेट)
  • यमाला जेव्हा डुलकी लागते (बजाबा)
  • ययाति आणि देवयानी
  • लग्नाची बेडी (अवधूत)
  • लहानपण देगा देवा
  • लैला होलैला (इन्स्पेक्टर मालपाणी)
  • वन रूम किचन (जोशी)
  • वरचा मजला रिकामा (पोपट)
  • वाजे पाऊल आपुले (भाऊराव)
  • व्यक्ती आणि वल्ली (अंतू बर्वा; हरितात्या)
  • सम्राट सिंह (विदूषक)
  • सूर्यास्त (गायकवाड)
  • सूर्याची पिल्ले
  • सौजन्याची ऐशी तैशी (मंडलेकर)
  • हंगामी नवरा पाहिजे (आचारी, नायक)
  • हॅम्लेट (नाटकातल्या नाटकातली राणी)
  • हं हं आणि हं हं हं (राजा)
  • हाच खेळ उद्यापुन्हा (नंदलाल)
  • हा तेराव्वा
  • हिमालयाची सावली (केशव)
  • हिरा जो भंगला नाही (राजज्योतिषी)

चित्रपट[संपादन]

  • इजा बिजा तिजा
  • इना मिना डीका (हिंदी)
  • कुरुक्षेत्र (हिंदी)
  • गडबड गोंधळ
  • गुलाम-ए-मुस्तफा (हिंदी)
  • जावई माझा भला
  • तेरा मेरा साथ रहें (हिंदी)
  • धमाल बाबल्या गणप्याची
  • प्रतिसाद : द रिस्पॉन्स (हिंदी)
  • पोलीस लाईन
  • बडे दिलवाला (हिंदी)
  • बिस्कीट
  • झांगडगुत्ता, वगैरे
  • युगपुरुष (हिंदी)
  • रिंगा रिंगा
  • रॉकी हॅन्डसम (हिंदी)
  • लव्ह का तडका (हिंदी)
  • वक्रतुंड महाकाय
  • वास्तव : द रिॲलिटी (हिंदी)
  • विघ्नहर्ता महागणपती
  • वोह छोकरी (हिंदी, दूरचित्रवाणी चित्रपट)
  • व्यक्ती आणि वल्ली (अंतू बर्वा; हरितात्या)
  • शासन (हिंदी)
  • समुद्र (हिंदी)
  • सिंघम (हिंदी)
  • हरिओम विठ्ठला
  • येड्यांची जत्रा

इतर कार्यक्रम[संपादन]

  • गजरा (दूरदर्शन)
  • प्रपंच (टेकाडे भावजी, आकाशवाणी)
  • चला हवा येऊ द्या

आत्मचरित्र[संपादन]

  • मी एक छोटा माणूस

पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "ज्येष्ठ मराठी अभिनेते जयंत सावरकर काळाच्या पडद्याआड, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास". maharashtratimes.com.
  2. ^ "अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव शनिवारी रंगणार". दैनिक सकाळ. ५ ऑगस्ट २०२३ रोजी पाहिले.