Jump to content

पंडितराव नगरकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


मराठी रंगभूमीवरील व चित्रपटातील प्रसिद्ध गायक-नट. पूर्ण नाव गोविंद परशुराम नगरकर परंतु पंडितराव याच नावाने प्रसिद्ध. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील भातोडी-पारगाव येथे झाला. त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंतच झाले. लहानपणापासूनच पंडितरावांचा गायनाकडे कल होता. सुप्रसिद्ध गायक-नट विष्णुपंत पागनीस यांच्याकडे प्रथम आणि नंतर पुणे येथील भारत गायन समाजात त्यांनी शास्त्रोक्त गायनाचा अभ्यास केला. मित्रमंडळीच्या आणि चाहत्यांच्या वर्तुळात पंडितरावांनी गायिलेल्या गीतांचा बोलबाला झाल्यामुळे, १९३० साली ओडियन कंपनीने त्यांच्या काही गीतांच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या. त्यांपैकी ‘जा के मथुरा’, ‘बोल हसरे बोल प्यारे’, ‘रामरंगी रंगले मन’ इ. गीतांच्या ध्वनिमुद्रिका बऱ्याच लोकप्रिय झाल्या. आकाशवाणीच्या मुंबई केंद्राशी त्यांचा संबंध सुरुवातीपासून होता. इंपीरिअल कंपनीच्या रुक्मिणीहरण (१९३४) या मराठी चित्रपटात त्यांनी काम केले. त्यावेळी त्यांचा परिचय सुलोचना पालकर या गायिकेशी झाला आणि तो दीर्घकाळ टिकून राहिला. त्यांचे दोन विवाह झाले होते.

हरिभाऊ शुक्ल यांच्या मंगला  नाटकात काम करून पंडितरावांनी नाट्यसृष्टीत प्रवेश केला. पुढे सुलोचना पालकर हिच्या सहकार्याने पंडितरावांनी १९३४ साली ‘सुलोचना संगीत मंडळी’ या नाट्यसंस्थेची स्थापना केली व १९३७ पर्यंत कंपनीच्या नाट्यप्रयोगांत नायकाच्या भूमिका केल्या. संशयकल्लोळ तसेच खाडिलकर यांचे संगीत त्रिदंडी संन्यास  ही नाटके ‘सुलोचना संगीत मंडळी ’ करीत असे. त्यांशिवाय मृच्छकटिक, मानापमान, सौभद्र, लग्नाची बेडी, ना. सी. फडक्यांचे संजीवन  इ. नाटकेही या संस्थेने रंगमंचावर आणली होती. १९३७ मध्ये कंपनी बंद पडली. नंतर दामुअण्णा जोशी यांच्या ‘कलाविलास’च्या देहूरोड या नाटकात पंडितरावांनी काम केले. त्यातील ‘मी गातो नाचतो’ हे पंडितरावांचे गाणे खूपच गाजले. शेवटी १९७६ मध्ये रांगणेकरांच्या पिकली पाने  या गद्य नाटकात त्यांनी भूमिका केली व ही त्यांची शेवटचीच भूमिका ठरली.

व्ही. शांताराम यांनी १९५०-५१ साली त्यांच्या अमरभूपाळी  या बोलपटातील होनाजीच्या भूमिकेसाठी पंडितरावांची निवड केली. त्या बोलपटात लता मंगेशकर आणि पंडितराव यांनी जोडीने गायिलेली ‘घनःश्याम सुंदरा’ ही भूपाळी अविस्मरणीय ठरली. मधुर आवाज, मार्दवता, तल्लीनता आणि भावमधुरता हे त्यांच्या गायनातले उल्लेखनीय गुण होते. पुणे येथे त्यांचे निधन झाले.