हॅरी पॉटर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हॅरी पॉटर लोगो.

हॅरी पॉटर ही जे.के. रोलिंग ह्या ब्रिटिश लेखिकेने तयार केलेली ७ कादंबऱ्यांची शृंखला आहे. ह्या पुस्तकांमधील काल्पनिक कथानकात हॅरी पॉटर हा जादूगार मुलगा आपला मित्र रॉन विजली व मैत्रिण हर्मायोनी ग्रेंजर ह्यांच्यासोबत हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट ॲन्ड विझार्ड्री नावाच्या जादूचे प्रशिक्षण देणाऱ्या शाळेत शिकत असतो. त्याच्या साहसाची, जादू कौशल्याची व लॉर्ड व्होल्डेमॉर्ट ह्या बलाढ्य व दुष्ट जादूगाराशी त्याच्या लढ्याची एकसंध कथा ह्या ७ पुस्तकांतुन जे.के. रोलिंगने वर्णन केली आहे.

१९९७ साली हॅरी पॉटर शृंखलेतील पहिले पुस्तक हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन या नावाने प्रकाशित झाले व त्यानंतर हॅरी पॉटरची लोकप्रियता वाढतच राहिली. जून २००८ अखेरीस हॅरी पॉटर पुस्तकांच्या ४० कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत व हॅरी पॉटर शृंखला ६७ भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आली आहे.

कथानक[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

हॅरी पॉटरच्या कथेची सुरुवात हॅरीच्या बाराव्या वर्षात पदार्पण करण्यापासुन होते. हॅरी लहानपणापासुन त्याच्या मावशीच्या घरी राहात असतो. त्या घरी त्याला कस्पटासमान वागणुक मिळत असते. बाराव्या वर्षी त्याला रुबियस हॅग्रीड नावाच्या दैत्याकडुन कळते की तो एक जादुगार आहे व ह्या विश्वाला समांतर असे एक जादुचे विश्व आहे. हॅरीची रवानगी हॉग्वार्ट्झ नावाच्या जादुचे प्रशिक्षण देणाऱ्या शाळेत होते. तिथे त्याला रॉन व हर्मायोनी हे मित्र भेटतात. त्याला हेही कळते की त्याच्या आई वडीलांना (जेम्स पॉटरलिली पॉटर) वॉल्डेमॉर्ट नावाच्या दुष्ट जादुगाराने, तो अवघा एक वर्षाचा असताना, ठार मारलेले असते व हॅरीला मारण्याचा प्रयत्न करताना तो मरणासन्न अवस्थेत पोचलेला असतो.

पहिल्या पुस्तकात वॉल्डेमॉर्ट प्रोफेसर क्विरलच्या देहाचा उपयोग करून अद्भुत असा परीस हॉग्वार्ट्झमधुन चोरण्याचा प्रयत्न करतो ज्यायोगे त्याची पूर्वीची शक्ती परत येणे शक्य असते. पण हॅरी आपल्या मित्रांच्या सहाय्याने त्याचा तो प्रयत्न हाणुन पाडतो.

दुसऱ्या भागात टॉम रिडलची डायरी रॉनची बहीण जिनी विजलीला पछाडते व तिच्याकरवे गुप्त चेंबर उघडविते. त्या चेंबरमध्ये असलेला बासिलिक सर्प हॉग्वार्ट्झमधील मगल विद्यार्थ्यांवर हल्ले करु लागतो. हॅरी परत एकदा रॉनच्या सहाय्याने ग्रिफिंडोरची तलवार वापरुन त्या सर्पाला ठार मारतो व मारलेल्या बासिलिक सर्पाचा सुळा वापरुन टॉमची डायरी नष्ट करतो आणि जिनीचे प्राण वाचवतो.

तिसऱ्या भागात हॅरीला कळते की सिरियस ब्लॅक नावाचा कैदी अझकाबान नावाच्या तुरुंगातून पळाला आहे व तो हॅरीच्याच मागावर आहे. त्या निमित्ताने हॉग्वार्ट्झला पिशाच्च्यांची सुरक्षाव्यवस्था पुरविण्यात येते जे अझकाबानचे रक्षक असतात. पिशाच्चांच्या अवतीभवती येण्याऱ्या कुणाच्याही आनंदाच्या आठवणी ते शोषून घेतात. त्यामुळे विद्यार्थ्याना शाळेच्या बाहेर पडण्यास बंदी असते. त्याच सुमारास हॉग्वार्ट्झमध्ये काळ्या जादुविरुद्ध बचाव हा विषय शिकविण्यासाठी रिमस ल्युपिन नावाच्या एका नव्या शिक्षकाची नेमणुक होते. हॅरीला कळते की त्याला पिशाच्चांच्या शक्तीचा सर्वाधिक त्रास होत असतो. त्यापासून बचाव करण्यासाठी तो रिमसकडुन पॅट्रोनस मंत्र शिकून घेतो व आत्मसात करतो, जे आजवर भल्याभल्या जादुगारांनाही शक्य झालेले नसते. शेवटी हॅरीचा सामना सिरियसशी होतो, तेथे त्याला कळते की सिरियस हा हॅरीचा शत्रू नसून हितचिंतक असतो व तरुणपणी तो हॅरीचे वडील जेम्सचा व ल्युपिनचा मित्र असतो. त्यांचा चौथा मित्र पीटर पॅटिग्र्युने हॅरीच्या वडीलांबद्दल विश्वासघात केलेला असतो व जेम्स व लिलीच्या लपण्याचे ठिकाण त्याने वॉल्डेमॉर्टला सांगितले असते. शिवाय चतुरपणे त्याने सगळे खापर सिरियसवर फोडलेले असते व जगाच्या लेखी त्याला वीरमरण आलेले असते. हे सत्य कळल्यावर हॅरी व त्याचे मित्र पीटरला पिशाच्चांच्या हवाली करण्यास निघतात. परंतु पौर्णिमेचा चंद्र पाहताच ल्युपिन हिंस्र लांडग्यामध्ये परिवर्तित होतो व ह्या गोंधळाचा फायदा उठवून पीटर त्यांच्या तावडीतून निसटतो. सिरियस मग सुटकेसाठी पुरावे नसल्यामुळे तुरुंगवास टाळण्यासाठी भुमिगत होतो.

हॅरी पॉटर पुस्तके[संपादन]

क्र. नाव प्रकाशन तारीख
हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन ३० जून १९९७
हॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सिक्रेट्स २ जुलै १९९८
हॅरी पॉटर अँड द प्रिझनर ऑफ अझकबान ८ जुलै १९९९
हॅरी पॉटर अँड द गॉब्लेट ऑफ फायर ८ जुलै २०००
हॅरी पॉटर अँड ऑर्डर ऑफ फिनिक्स २१ जून २००३
हॅरी पॉटर अँड हाफ ब्लड प्रिंस १६ जुलै २००५
हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज २१ जुलै २००७

चित्रपट[संपादन]

हॅरी पॉटर शृंखलेच्या ७ पुस्तकांपैकी सर्व पुस्तकांवर आधारित चित्रपट (ह्याच नावाचे) आजपर्यंत प्रदर्शित झाले आहेत. फक्त ७व्या पुस्तकावर आधारित दोन चित्रपट निघाले आहेत.

  1. हॅरी पॉटर ॲन्ड द फिलॉसॉफर्स स्टोन
  2. हॅरी पॉटर ॲन्ड द चेंबर ऑफ सीक्रेट्स
  3. हॅरी पॉटर ॲन्ड द प्रिझनर ऑफ ॲझकाबान
  4. हॅरी पॉटर ॲन्ड द गॉब्लेट ऑफ फायर
  5. हॅरी पॉटर ॲन्ड ऑर्डर ऑफ फिनिक्स
  6. हॅरी पॉटर ॲन्ड हाफ ब्लड प्रिन्स
  7. हॅरी पॉटर ॲन्ड द डेथली हॅलोज - भाग १
  8. हॅरी पॉटर ॲन्ड द डेथली हॅलोज - भाग २

मुख्य पात्रे[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत