Jump to content

"नरेंद्र दाभोलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १४५: ओळ १४५:
* [[शिवछत्रपती पुरस्कार]] - [[कबड्डी]]
* [[शिवछत्रपती पुरस्कार]] - [[कबड्डी]]
* शिवछत्रपती युवा पुरस्कार - कबड्डी
* शिवछत्रपती युवा पुरस्कार - कबड्डी
* पुणे विद्यापीठाचा साधना जीवनगौरव पुरस्कार (मरणोत्तेर)
* भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार (मरणोत्तर)
==दाभोलकरांच्या नावाचे पुरस्कार==
==दाभोलकरांच्या नावाचे पुरस्कार==

२२:१४, १२ फेब्रुवारी २०१४ ची आवृत्ती

नरेंद्र दाभोलकर
जन्म नरेंद्र
नोव्हेंबर १, इ.स. १९४५
सातारा
मृत्यू ऑगस्ट २०, इ.स. २०१३
पुणे
मृत्यूचे कारण अज्ञात मारेकऱ्यांनी डोक्यात गोळ्या घालून हत्या केली
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
प्रशिक्षणसंस्था मिरज वैद्यकीय महाविद्यालय
पेशा वैद्यकीय
प्रसिद्ध कामे अंधश्रध्दा निर्मुलन समिती
मूळ गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दाभोली
ख्याती साधना (साप्ताहिक)
पदवी हुद्दा संपादक
कार्यकाळ १ मे १९९८ ते पासून
पूर्ववर्ती वसंत बापट
धर्म हिंदू
जोडीदार शैला
अपत्ये डॉ मुग्धा दाभोलकर देशपांडे(कन्या); हमीद(पुत्र)
वडील अच्युत लक्ष्मण दाभोलकर
आई ताराबाई अच्युत दाभोलकर
नातेवाईक डॉ. देवदत्त दाभोलकर(बंधू)
संकेतस्थळ
www.antisuperstition.org


नरेंद्र अच्युत दाभोलकर (नोव्हेंबर १, इ.स. १९४५ - ऑगस्ट २०, इ.स. २०१३) हे मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी इ.स. १९८९ साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना स्थापली.

जीवन

नरेंद्र हे, अच्युत लक्ष्मण दाभोलकर व ताराबाई अच्युत दाभोलकर यांच्या दहा अपत्यांपैकी सर्वात धाकटे होय. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील माहुली या गावी झाला. सुप्रसिद्ध तत्त्वचिंतक कै. डॉ. देवदत्त दाभोळकर हे त्यांचे सर्वात थोरले बंधू होते.

शिक्षण

नरेंद्र दाभोलकरांचे माध्यमिक शिक्षण साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत झाले. त्यांनी सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयातून विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उत्तम कबड्डीपटू म्हणून क्रीडाजगतात प्रसिद्ध होते. कबड्डीवर उपलब्ध असलेले एकमेव शास्त्रशुद्ध पुस्तकही त्यांनी लिहिले. कबड्डीतील योगदानासाठी त्यांना मानाचा शिवछत्रपती पुरस्कारही मिळाला. इ.स. १९७० साली मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शाखेचे शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर त्यांनी सातारा यथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.[]

सामाजिक कार्य

बाबा आढाव यांच्या एक गाव - एक पाणवठा या चळवळीत दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर त्यांनी श्याम मानव यांच्या इ.स. १९८३ साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती मध्ये कार्य सुरू केले. पण नंतर इ.स. १९८९ मध्ये त्यापासून वेगळे होऊन त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली. साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साधना या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते डिसेंबर २००६पासून मृत्यूपर्यंत संपादक होते.

अंधश्रद्धेविरोधात आयुष्यभर लढा

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, परंपरा मोडीत काढण्यासाठी लोकप्रबोधन करण्यात येते. महाराष्ट्र जादूटोणाविरोधी विधेयक विधीमंडळात मंजूर व्हावे, यासाठी दाभोलकर गेल्या काही वर्षांपासून कार्यरत होते. यासंदर्भात सातत्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन विधेयकाच्या बाजून सर्वपक्षीय मत बनवण्याचे काम ते करीत होते. समाजातील अनेक भोंदू बाबांचे पितळ दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सप्रयोग उघडे केले होते. []

साहित्य

  • अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - राजहंस प्रकाशन
  • अंधश्रद्धा विनाशाय - राजहंस प्रकाशन
  • ऐसे कैसे झाले भोंदू - मनोविकास प्रकाशन
  • ज्याचा त्याचा प्रश्न (अंधश्रद्धा या विषयावरील नाटक - लेखक : अभिराम भडकमकर). या नाटकाचे साडेचारशेहून अधिक प्रयोग झाले आहेत.
  • झपाटले ते जाणतेपण - संपादक नरेंद्र दाभोळकर व विनोद शिरसाठ.
  • ठरलं... डोळस व्हायचंय - मनोविकास प्रकाशन
  • तिमिरातुनी तेजाकडे - राजहंस प्रकाशन
  • प्रश्न मनाचे (सहलेखक डॉ हमीद दाभोलकर) - राजहंस प्रकाशन
  • भ्रम आणि निरास - राजहंस प्रकाशन
  • मती भानामती- राजहंस प्रकाशन (सहलेखक माधव बावगे)
  • विचार तर कराल? - राजहंस प्रकाशन
  • विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी - दिलीपराज प्रकाशन
  • श्रद्धा-अंधश्रद्धा - राजहंस प्रकाशन (इ.स. २००२)


विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी

विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी’[] हे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे पुस्तक. महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची पार्श्वभूमी या पुस्तकातील सर्व लेखांना आहे. प्रस्तावनेत डॉ. दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाची चतु:सूत्री दिली आहे. ती अशी,
१) शोषण करणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणे,
२) वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करणे व त्याआधारे विविध घटना तपासणे,
३) धर्माची विधायक कृतिशील चिकित्सा करणे म्हणजे धर्माबाबत काही आकलन व धर्मनिरपेक्षतेचा वेगळा दृष्टिकोन रुजवणे,
४) व्यापक परिवर्तनाचे भान जागृत करणे, सजग करणे,’
ही चतु:सूत्री मनात ठेवून या पुस्तकातील सर्व लेखांकडे वाचकांनी पहावे, असे या प्रस्तावनेत नमूद केले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनचा विचार, प्रसार, अंगीकार करण्याचे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे सूत्र या पुस्तकातील सर्व लेखांच्या मुळाशी आहे. या पुस्तकात धर्माची कृतिशील आणि विधायक चिकित्सा केलेली आहे. पुस्तकात छत्तीस लेख आहेत.

पैशाच्या पावसाच्या लोभापायी नांदोस येथे घडलेल्या हत्याकांडाच्या निमित्ताने लिहिलेल्या लेखात डॉ. दाभोलकर लिहितात, ‘शिक्षणक्षेत्र, प्रसारमाध्यमे व ओपीनियन लीडर यांनी कणखर कृतिशील भूमिका घेण्याची गरज आहेच, पण त्याचबरोबर आणखी काही बाबींचे अवधान राखावयास हवे. संयम शिकवणारा धर्म आज आंधळ्या अतिरेक्यांच्या मुठीत कैद झाला आहे. एका बाजूला कथित धार्मिकतेला उदंड उधाण आलेले, तर दुसरीकडे सर्वच धर्मानी उद्‌घोषिलेली नीतितत्त्वे मात्र सरपटणाऱ्या प्राण्याप्रमाणे खुरडत चाललेली. असे का घडत आहे, का घडवले जात आहे, याचाही विचार करावयास हवा. हे चित्र बदलण्यासाठी प्रबोधनासोबतच एका व्यापक समाज परिवर्तनाची गरज आहे. उघडपणे शोषणावर आधारलेल्या व्यवस्थेने ज्या समाजाचा पाया रचला आहे, त्या समाजातील माणसाच्या मनाचे उन्नयन करणे, हे चर्चेने घडणारे काम राहत नाही. त्यासाठी शोषण संपवून व सृजनशील जीवन शक्य होईल, अशा समाज-व्यवस्था निर्मितीचे आव्हानही पेलावे लागेल, याचे भानही आवश्यक आहे’[] हे विवेचन फार महत्त्वाचे आहे. शिक्षणक्षेत्र, प्रसारमाध्यमे, ओपीनियन लीडर, सुशिक्षित असणारा मध्यमवर्ग, वेगवेगळ्या पदांवरील उच्चशिक्षित, इंजिनिअर, डॉक्टर, वकील वगैरे व्यक्तींनी सभोवतीच्या अंधश्रद्धेच्या दूषित पर्यावरणाची सखोल चिकित्सा केली पाहिजे. आपण अंधश्रद्धा शोषणाच्या व्यवस्थांना खतपाणी घालत आहोत का? या व्यवस्थेचा आपण घटक आहोत का, हे समजून घेतले पाहिजे, हे भान या पुस्तकातील या लेखासह इतरही लेख वाचताना येते.

‘बाळू मामाची नवसाची मेंढरं’ या लेखात अंधश्रद्धांच्या संदर्भातील मानसिक गुलामगिरीची बेडी माणसांच्या मनात किती घट्ट बसली आहे, त्याचे प्रत्यंतर येते. ‘वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कार्यकारण भाव, चमत्कार म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव, हे नाते प्रकाश अंधारासारखे आहे. एकाचे असणे म्हणजे अपरिहार्यपणे दुसऱ्याचे नसणे.. मानसिक गुलामगिरीची सर्वात भयानकता ही की त्या अवस्थेत माणसाच्या बुद्धीला प्रश्न विचारलेला चालत नाही मग तो पडणे तर दूरच राहिले. व्यक्तीचे बुद्धिवैभव, निर्णयशक्ती, सारासार विचारांची क्षमता या सर्व बाबी चमत्काराच्या पुढे गहाण पडतात. व्यक्ती परतंत्र बनते. परिवर्तनाची लढाई मग अधिक अवघड बनते. म्हणूनच जनमानस शोधक, निर्भय व कृतिशील बनवून ते व्यापक परिवर्तनाच्या चळवळींसाठी तयार करावयास हवे’ [] हे मनापासून समजून घेणे हे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या दिशेने उचललेले पहिले पाऊल असेल, तेव्हा प्रत्येकाने आपण स्वत:वरचा विश्वास गमावला आहे का, ते प्रामाणिकपणे तपासून पाहण्याची गरज आहे. ‘मानसिक गुलामगिरीचे गडेकोट’ हा लेख या संदर्भात लक्षणीय आहे. अघोरी अंधश्रद्धांबाबत कायदा करण्याची गरज आहे, पण ‘पुरोगामी’ म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रास असा कायदा करणे कसे अवघड आहे, त्याची हकीकत तीन लेखांमध्ये सांगितली आणि धर्माची कृतिशील आणि विधायक चिकित्सा करण्यासंदर्भात महाराष्ट्रात कसे मौन बाळगले गेले आहे, त्याची मीमांसा काही लेखांमधून केली आहे. सुशिक्षित आणि पुरोगामी म्हणवून घेणाऱ्यांनी हे लेख आवर्जून वाचावेत.

‘विरोध धर्माला नसून धर्मवादाला’ आणि ‘माझी धर्मनिरपेक्षता’ हे दोन लेख वेगळे आहे. महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीची धर्माबाबतची भूमिका आणि डॉ. दाभोलकरांची धर्मनिरपेक्षतेच्या संदर्भातली भूमिका या दोन लेखांमधून कळते.

‘विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी’, ‘सामाजिक समतेचे मन्वंतर घडविणारी वारी’, या लेखांमधून हिंदू हितरक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या आकांडतांडवाची चिकित्सा आणि पंढरपूरच्या वारीने सामाजिक समतेचे मन्वंतर कसे घडू शकते, याचीही चिकित्सा केली आहे, तर एका लेखात अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या यशापयशाची चिकित्सा केली आहे. शिक्षणक्षेत्र, प्रसारमाध्यमे आणि प्रशासन हे तीन घटक विवेकवादाचे सामाजिक आधार कसे ठरू शकतात, ते विशद केले आहे. ‘विवेकवादी चळवळ: उद्याची आव्हाने’ या लेखात ‘वैज्ञानिक दृष्टिकोन, शोधक बुद्धी, सामाजिक सुधारणा व मानवतावाद याचा पाठपुरावा हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य असल्याचे भारतीय घटनेत सांगितले आहे. शिक्षण, प्रसारमाध्यमे, प्रशासन या तीनही स्रोतांसह वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्यक्ष अंगीकारणाऱ्या प्रत्येक माणसाने घटनेतील या कर्तव्यपालनाबाबत आग्रही असण्याचे आवाहन पुस्तकात केले आहे.

ऐसे कैसे झाले भोंदू?

  • डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे परखड विचार-

दिल्लीतील बलात्कार प्रकरणानंतर प्रतिक्रिया देताना अनेकांनी अकलेचे तारे तोडले.[]- आसारामबापू आणि अनिरुद्धबापू यांनी तर कहरच केला. बलात्कारित तरुणीने सरस्वती मंत्राचा जप केला असता तर बलात्कार झालाच नसता, मी दिलेल्या एका विशिष्ट मंत्रामुळे बलात्कारी नपुंसक होतील अशी या बुवाबापूंची विधाने म्हणजे निव्वळ भोंदूगिरीच नाही तर समाजाची दिशाभूल आहे. दिल्लीतील बलात्कार पीडित तरुणीच्या मृत्यूने सारा देश व्यथित झाला. संताप उसळला. पुन्हा असे घडू नये यासाठी अनेक उपाय सर्व समाजघटकांतून व स्तरांतून पुढे आले. मग कथित आध्यात्मिक गुरू तरी मागे कसे राहणार? आसारामबापू व अनिरुद्धबापू या दोघांनी सुचवलेले उपाय सर्वत्र गाजले. आसारामबापूंच्या मते घरी सरस्वती स्तोत्र म्हणून जर ती तरुणी बाहेर पडली असती, तर तिच्यावर बलात्कार होऊच शकला नसता. अत्याचार करणाऱ्यांपैकी काही जणांना तुम्ही माझे भाऊ आहात, मला वाचवा, अशी मनधरणी तिने करावयास हवी होती. अनिरुद्धबापूंचे म्हणणे असे की, जर स्त्रीने ‘अनिरुद्ध चालीसा’ रोज १०८ वेळा असे अकरा दिवस म्हटले तर बलात्काराचा प्रयत्न करणारी व्यक्ती आपोआप नपुंसक होईल व तसे सर्वाना कळेल. मुळात ‘अनिरुद्ध गुरुक्षेत्र’ मंत्राचा जप केला तर बलात्कार होऊच शकणार नाही. शिवाय त्यांच्या चंडिका गटाच्या व अहिल्या संघाच्या महिलांना ते असे टेक्निक शिकवणार आहेत की, बलात्कार करणाऱ्याला त्या नपुंसक करतील. आसारामबापूंनी याही पुढे जाऊन एका हाताने टाळी वाजत नाही, असेही तारे तोडले. याबाबत टीका करणाऱ्या माध्यमांना त्यांनी भुंकणाऱ्या कुत्र्याची उपमा दिली.

ही बाबा मंडळी स्वत:मध्ये विलक्षण गुंतलेली असतात. त्यांची सर्व आखणी व्यक्तिमाहात्म्य वाढवणाऱ्या तंत्राची असते.
प्रश्न या कथित आध्यात्मिक गुरूंच्या बरळण्याचा नाही, तर आज अशा स्वयंघोषित बाबा, बापू, स्वामी, भगवान, महाराज यांची जी साम्राज्ये उभी राहिली आहेत आणि त्यांना लक्षावधीचा अनुयायी वर्ग लाभत आहे, त्या सामाजिक मानसिकतेच्या व व्यवस्थेचा शोध घेण्याचा आहे. विशेषत: साडेतीनशे वर्षांपूर्वी तुकाराम महाराज म्हणाले,

‘ऐसे कैसे झाले भोंदू। कर्म करूनि या म्हणती साधू। अंगा लावूनिया राख। डोळे झाकून करती पाप।। दावूनी वैराग्याचा कला। भोगी विषयाचा सोहळा।। तुका म्हणे सांगू किती। जळो तयाची संगती।।
असे परखड बोल ऐकणाऱ्या समाजात आज ‘जळो तयाची संगती याऐवजी ‘मिळो तयाची संगती’ अशी अवस्था का आली याचा शोध घ्यावयास हवा.[]

आसारामबापू निखालस अवैज्ञानिक असामाजिक विधाने करून समाजाला संकटाच्या मार्गाकडे ढकलत आहेत. हा आजचा मामला नाही. त्यांच्यातर्फे मराठीत प्रसिद्ध होणाऱ्या ‘ऋषिप्रसाद’ या मासिकातील पान क्र. १२ वरील हा मजकूर पाहा- ‘एका भोजपत्रावर’ ‘टं’ लिहून उजव्या दंडावरील ताईतामध्ये बांधल्यास तो ताईत सर्व विघ्ननाशकांच्या रूपात काम करतो. कॅल्शियमची कमतरता, स्त्रियांमधील दुधाची कमतरता, नवजात बालकाचे जास्त रडणे यासाठी कागदावर हा ‘टं’ लिहून गळ्यात ताईताप्रमाणे बांधल्यास मुलाचे रडणे, किंचाळणे शांत होते. मंत्र जप महिमा (हिंदू पा. क्र. ३५) यातील इलाज पाहा- ‘सात वेळा हरी ॐ चा उच्चार केल्याने मूलाधार केंद्रात स्पंदने होतात. कित्येक रोगांचे किटाणू पळून जातात. प्रा. गटेचे म्हणणे आहे की, जर एक तासपर्यंत क्रोध करणाऱ्या व्यक्तीच्या विषारी श्वासाचे कण एकत्रित करून इंजेक्शन तयार केले, तर त्याने २० लोक मरू शकतात.’ अनिरुद्धबापूंच्या दरबाराच्या रांगेत उभे राहिले की, जितक्या इच्छापूर्तीची अपेक्षा असेल तितक्या सुपाऱ्या हातात घ्यायच्या. बापूंनी तपश्चर्येने त्या सिद्ध केलेल्या असल्यामुळे तुमचे काम होतेच; शिवाय ‘अनिरुद्ध उपासना ट्रस्ट’च्या प्रकाशनात संकट येण्यापूर्वीच बापू त्या ठिकाणी कसे हजर होतात, ते भक्तांना कधी श्रीकृष्ण, कधी राम, कधी विठोबा यांच्या रूपात कसे दर्शन देतात, ते भक्ताचा पूर्वजन्म आणि पुनर्जन्म कसा जाणतात याची रसभरित वर्णने आढळतात.
प्रत्यक्षात ही बाबा मंडळी स्वत:मध्ये विलक्षण गुंतलेली असतात. त्यांची सर्व आखणी व्यक्तिमाहात्म्य वाढवणाऱ्या तंत्राची असते. बाबांच्या भक्तांचे विशिष्ट रंगाचे कपडे, विशिष्ट माळा, महाराजांचा फोटो असलेला बिल्ला, पेन, मंत्रजप या साऱ्यांतून एक प्रभावी वातावरणनिर्मिती होते.
काही वर्षांपूर्वी आसारामबापूंनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते- ‘ज्याप्रमाणे आपण चांगली शाळा, चांगला शिक्षक, चांगला डॉक्टर शोधतो त्याप्रमाणेच प्रत्येकाने चांगला गुरूही शोधावा. गुरू हा शिष्याचा सर्व संशय मुळापासून उखडून काढतो, भीती घालवतो. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून त्याला वाचवतो. त्याच्या दर्शनाने वासना, विकार गळून पडतात व अक्षय आनंदाचा ठेवा मिळतो. आपल्या भक्ताचे दु:ख ध्यान, मंत्र असे आध्यात्मिक मार्ग, सत्संग व गुरूभोवतालचे दैवी वलय आणि स्पंदने याद्वारे गुरू बरा करतो.’
गुरूच्या पायावर आपली बुद्धी गहाण ठेवल्याशिवाय अशी गुरुभक्ती सुचणे अवघड आहे; परंतु ज्या वेगाने आज बाबा-बुवा, गुरू, सद्गुरू, स्वामी, महाराज यांचे पीक वाढते आहे ते लक्षात घेता ही मानसिकताच जनमानसावर प्रत्यक्ष अधिकार गाजवते आहे असे दिसते. उपचार, चमत्कार करणारे वा न करणारे बाबा अथवा महाराज हे सर्व परमार्थ, ईश्वरशक्ती, ईश्वरप्राप्ती, ब्रह्मज्ञान या नावानेच करत असतात. त्यांची खरी ताकद फसवणूक करण्याच्या कसबात नसते, तर लोकमानसात कथित परमार्थाबद्दल परंपरेतून आलेली जी विलक्षण मान्यता आहे त्यामध्ये असते.
बाबांचे विचार, पारायणे, गुरुभक्ती यातच भक्ताला जीवनाचा आधार व कृतार्थता वाटते. त्यामधून मग अव्वल दर्जाची मानसिक गुलामगिरी निर्माण होते.[] बाबा ती मोठय़ा खुषीने आपणाशी जोडतात. ही ‘परमार्थ मार्गातील लुच्चेगिरी’ आहे.[] म्हणूनच बुवाबाजीची व्याख्या ‘जो व्यवस्थेतून निर्माण होणाऱ्या दु:खांची कारणे व त्यावरील उपाय विवेकवादी विचाराशी विसंगत अशा दैवासारख्या भ्रामक कल्पना, अन्याय रूढी, पुराणमतवादी कल्पना व परंपरा यांच्या आधारे व त्यांचे समर्थन करत सांगतो, प्रश्न सोडवण्याचा चुकीचा अवैज्ञानिक मार्ग दाखवतो व सर्वागाने फसवणूक व शोषणच करतो तो म्हणजे बुवा व त्याची कार्यप्रणाली म्हणजे बुवाबाजी अशी करता येईल. बुवाच्या नादी लागणे, निदान त्याचा अनुग्रह घेणे ही आजच्या काळातील रूढी होऊ लागली काय असे हल्ली जाणवते, अन्यथा सुशीलकुमार शिंदेसारख्यांनी मुख्यमंत्री असताना नाणीजच्या नरेंद्र महाराजांची भेट घेऊन त्यांना स्वामी विवेकानंदांची उपमा दिली नसती. व्यक्तीला व्यावहारिक व राजकीय मोठेपणाबरोबर धार्मिक मोठेपणाही पाहिजे असतो. मग धार्मिक म्हणवून घेण्याचा राजमार्ग म्हणजे महाराजांचे दर्शन, अनुग्रह घेणे. अर्थात या आचरणात अज्ञान, अनुकरण, बुद्धिदौर्बल्य व धार्मिक म्हणवून घेण्याची इच्छा सर्वकाळी असते. आपल्याकडील पारंपरिक धार्मिक विचार, अवतार कल्पना यामुळे ईश्वरी वचन बाबांच्या मुखातून आपणापर्यंत पोचते आणि आपले परमकल्याण करते, असे भक्ताला वाटत असते. गुरूला समर्पित होणे, ही त्याच्या लेखी बुद्धीची शरणागती नव्हे, तर आनंदाची अनुभूती असते. स्वतंत्र बुद्धीने विचार करून त्यासाठी संघर्ष करणे या बाबी भक्तगणांना क्षुल्लक वाटतात. बाबांचे विचार, पारायणे, गुरुभक्ती यातच जीवनाचा आधार व कृतार्थता वाटते. त्यामधून मग अव्वल दर्जाची मानसिक गुलामगिरी निर्माण होते.

बाबांचा शब्द हे 'ब्रह्मवाक्य' व नैतिकता असते. विरोधी ‘ब्र’ उच्चारणाऱ्याला धमकावण्यापासून ते ठोकण्यापर्यंत सर्व मार्ग वापरले जातात. स्वत:च्या चरणी रुजू होणाऱ्यांचे सर्व कल्याण करण्याची ग्वाही घेतलेली असते. अट एकच असते, स्वत:ची बुद्धी वापरावयाची नाही.

बुवाबाजीचे पीक या भूमीत भरघोस येण्याचे कारण या देशाच्या मनोभूमीची मशागत नियती, विधिलिखित, दैव, नशीब, प्रारब्ध या कल्पनांनी केली आहे. या सर्व शब्दांचे अर्थ काहीसे भिन्न आहेत, परंतु बुवाबाजीचे पीक येण्यासाठी त्यामुळे काही फरक पडत नाही. अगदी आजही चांगली घटना सुदैव व वाईट घटना कमनशीब मानले जाते. सोसाव्या लागणाऱ्या अन्याय, अत्याचार, दु:ख यांना नियतीचा अटळ तडाखा म्हणून बघितले जाते. चांगल्या वर्तनाला आज ना उद्या चांगलेच फळ येणार आणि वाईट कर्माचे तसेच परिणाम संबंधितांना कधी तरी सोसावे लागणारच, हा निष्कर्ष सदिच्छेवर आधारित आहे, सत्यावर नाही. समाजस्थापनेचा प्रवास खूप प्रदीर्घ आहे. मानवाची निर्मिती असलेला न्याय अवघ्या तीन-चार हजार वर्षांपूर्वीच निर्माण झाला आणि आजही न्याय फारच थोड्या प्रमाणात प्रत्यक्षात येतो. कर्मसिद्धांताच्या बाजूने केले जाणारे सर्व युक्तिवाद अतिशय दुर्बल व गैरलागू आहेत.[] मात्र कर्मसिद्धान्त हे भारतीय तत्त्वज्ञानाचे एक वैशिष्ट्य आहे. तो विश्वाचा नियम मानला आहे. अपवादात्मक दर्शन वगळता सर्व भारतीय दर्शनांनी कर्मसिद्धान्त स्वीकारला आहे. यामुळेच नियतीची दृढ कल्पना या देशातील बहुसंख्य लोक मानतात व या काल्पनिक गोष्टींच्या आहारी जाऊन आणखी भयभीत बनतात. कर्मविपाकाला सत्य मानून आज होणारे त्यांचे शोषण प्रारब्ध होते, अशी स्वत:च्या मनाची ते समजूत करून घेतात. पूर्वसंचितावर अवलंबून असलेल्या प्रारब्धातून सुटका होणे अवघडच, पण गुरूंच्या, बाबांच्या कृपाप्रसादाने ते शक्य आहे असे मानले जाते, कारण बापू अथवा महाराज साक्षात देव असतात वा त्यांचे दूत असतात. यामुळे शोषणाचे मूळ सामाजिक आणि भौतिक परिस्थितीत शोधण्याऐवजी ते प्राक्तनात शोधले जाते. जीवनातील शोषण प्रारब्धाने होते या वृत्तीला खतपाणी घातले तर त्यापासून सुटका होण्यासाठी असा कोणी तरी हवा असतो जो प्रारब्ध समजू शकेल व बदलू शकेल. कर्मविपाकाच्या सिद्धांताने बुवाबाजीला ताकद मिळते. बुवाबाजीविरुद्ध लढण्यासाठी आणि लोकांची मानसिक गुलामगिरी संपविण्यासाठी कर्मसिद्धान्त व दैव या कल्पनेतील तर्कदुष्टता लोकांना सांगावयास हवी.

व्यक्तिगत कर्तृत्वाने समाजव्यवस्था बदलू अशी आशा बहुसंख्य जनसामान्यांना राहिलेली नाही. त्यासाठी त्यांना कोणी तरी स्वामी, महाराज, बापू, संत-महंत लागतो. प्रत्यक्षात ही बाबा मंडळी स्वत:मध्ये विलक्षण गुंतलेले असतात. त्यांची सर्व आखणी व्यक्तिमाहात्म्य वाढवणाऱ्या तंत्राची असते. बाबांच्या भक्ताचे विशिष्ट रंगाचे कपडे, विशिष्ट माळा, महाराजांचा फोटो असलेला बिल्ला, पेन, मंत्रजप या साऱ्यांतून एक प्रभावी वातावरणनिर्मिती होते. त्यात सुरुवातीला समाधान, सामथ्र्य जाणवते. मग नकळत सक्ती निर्माण होते. सर्व कारभारात एक प्रकारची गुप्तता असते. भक्त हा कडवा सैनिक बनेल व बुवाबाजी ही एक अभेद्य व्यूहरचना बनेल यासाठी सततचे ब्रेनवॉशिंग व कंडिशनिंग चालू राहते. भक्तांची चिकित्सक बुद्धी तहकूब होते वा केली जाते. याचबरोबर एका व्यापकतेचे भानही या लढाईत ठेवावे लागते. विज्ञानामुळे माणसाच्या हातात आलेला प्रकाशझोत परिस्थितीतून निर्माण झालेली अगतिकता दूर करू शकत नाही. समाजात उदंड भ्रष्टाचार, हिंसाचार, अपघात, वाढती व्यसनाधीनता, महागाई असे रोजचे जीवन अशक्य करणारे जीवघेणे प्रश्न आहेत. स्वत:च्या व्यक्तिगत कर्तृत्वाने वा समाजव्यवस्था संघर्षांने बदलून यामधून मार्ग काढता येईल अशी आशा बहुसंख्य जनसामान्यांना राहिलेली नाही. मग त्यासाठी त्यांना कोणी तरी स्वामी, महाराज, बापू, संतमहंत लागतो. दुसऱ्या बाजूला प्रसारमाध्यमे रोज जगण्याचे नवे चंगळवादी मानदंड मनावर लादत असतात. ते मिळवावयाचे तर भ्रष्टाचार करावयास हवा. त्यातून सहीसलामत सुटण्यासाठी आणि पापक्षालनासाठी मग लोक बाबाच्या मागे लागतात. त्याच्या सूचनेप्रमाणे उदी लावतात, अंगठी घालतात, मंत्र जपतात, बाबाच्या पुढे संपूर्ण शरणार्थी बनून आपले सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटतील, अशी आशा बाळगतात. खरे तर प्रश्न प्रामुख्याने जोडलेले असतात समाजाच्या जडणघडणीशी. ते सोडविण्यासाठी व्यवस्था परिवर्तनाच्या लढ्यात उतरावे लागते; परंतु त्यापेक्षा धार्मिक, सांस्कृतिक परंपरेतून आलेला आणि जणू थेट अलीबाबाच्या गुहेत घेऊन जाणारा बिनसंघर्षांचा मार्ग बहुसंख्यांच्या मानसिकतेला जवळचा व हवाहवासा वाटतो.[]

दाभोलकरांच्या संस्था

मृत्यू

नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट, २०१३ मंगळवारी सकाळी साडेसात वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरानजिक असलेल्या महर्षी शिंदे पुलावर(प्रचलित नाव ओंकारेश्वर पूल) अज्ञातांनी ४ गोळ्या झाडून हत्या केली. पुण्यामध्ये असताना ते रोज सकाळी घरापासून ते बालंगधर्व रंगमंदिरापर्यंत फिरायला जात असत.[१०]

मंगळवार २० ऑगस्ट, २०१३ रोजी सकाळी घरून निघाल्यावर दाभोलकर शिंदे पुलावरून रस्त्याच्या ओंकारेश्वर मंदिराच्या विरुद्ध बाजूला असलेल्या कडेने साधना साप्ताहिक कार्यालयाच्या दिशेने निघाले होते. पुलावर असताना सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्यावर दोन अज्ञात हल्लेखोऱांनी चार गोळ्या झाडल्या. एक गोळी त्यांच्या पाठीच्या बाजूला लागली, एक चुकीच्या दिशेने गेली. चार गोळ्यांपैकी दोन गोळ्या त्यांच्या डोक्याला लागल्यामुळे दाभोळकर घटनास्थळीच कोसळले .
गोळीबार केल्यावर हल्लेखोर स्प्लेंडर दुचाकीवरून पळून गेले. हल्लेखोर २५ ते ३० वयोगटातील होते. हल्लेखोरांपैकी एकाने टोपी घातली होती आणि दुसऱ्याच्या पाठीवर बॅग होती. घटना घडल्यावर हल्लेखोर रविवार पेठेच्या दिशेने पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. एका प्रत्यक्षदर्शीने ही घटना बघितल्यावर पोलिसांना त्याबद्दल माहिती दिली.

पोलिसांनी दाभोलकरांना ससून रुग्णालयात हलविले. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दाभोलकर यांच्या शर्टच्या खिशामध्ये एक छायाचित्र आणि दोन धनादेश होते. त्यापैकी एका धनादेशावर दाभोलकर यांचे नाव लिहिले होते, असे पोलिसांनी सांगितले
छायाचित्रावरून आणि साधना साप्ताहिकाच्या काही कार्यकर्त्यांनी ओळख पटविल्यावर पोलिसांनी नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्याचे घोषित केले. [११]

पुरस्कार

  • अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनने त्यांच्यातर्फेचा पहिला समाजगौरव पुरस्कार ’अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ला दिला होता.
  • समाज गौरव पुरस्कार- रोटरी क्‍लब
  • दादासाहेब साखवळकर पुरस्कार
  • शिवछत्रपती पुरस्कार - कबड्डी
  • शिवछत्रपती युवा पुरस्कार - कबड्डी
  • पुणे विद्यापीठाचा साधना जीवनगौरव पुरस्कार (मरणोत्तेर)
  • भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार (मरणोत्तर)

दाभोलकरांच्या नावाचे पुरस्कार

  • अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या महाराष्ट्र फाउंडेशनने २०१३सालापासून समाजहितार्थ एखाद्या कार्यात वाहून घेणाऱ्या व्यक्तीला डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार सुरू केला आहे. पहिल्याच वर्षी हा पुरस्कार महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL)चे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांना जाहीर झाला आहे.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ दाभोलकर म्हणजेच अंनिस
  2. ^ http://www.loksatta.com/pune-news/narendra-dabholkar-shot-dead-in-gun-attack-by-anonymous-178490. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ http://www.loksatta.com/pune-news/vivekachi-pataka-gheu-khandyavari-by-dr-narendra-dabholkar-178664/. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी-डॉ. नरेंद्र दाभोलकर,पृष्ठ १३
  5. ^ विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी-डॉ. नरेंद्र दाभोलकर,>पृष्ठ २३, २४
  6. ^ a b c http://www.lokprabha.com/20130125/cover01.htm. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ http://www.lokprabha.com/20130125/cover01.htm
  8. ^ http://www.lokprabha.com/20130125/cover01.htm
  9. ^ http://www.lokprabha.com/20130125/cover01.htm
  10. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/narendra-dabholkar-no-more/articleshow/21929518.cms?. Missing or empty |title= (सहाय्य)
  11. ^ http://www.loksatta.com/pune-news/how-narendra-dabholkar-shoot-dead-in-pune-178540/. Missing or empty |title= (सहाय्य)
  • खरेखुरे (लेखसंग्रह), युनिक फीचर्स, २००६, संपादक सुहास कुलकर्णी, 'डॉ. नरेंद्र दाभोलकर', लेखक विनोद शिरसाठ, पाने ९५ ते ९९