विज्ञानकथा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विज्ञानकथा हा एक वैशिष्ट्यपूर्ण वाङ्‌मय प्रकार आहे. हा ललितकथेच्याच निकषाला अनुसरून गुंफला जातो. विज्ञानकथा ही माणसांची कथा असते. विद्यमान विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा भविष्यकाळात प्रक्षेप करून भविष्यकाळातील माणसाच्या जीवनावर त्याचा काय परिणाम होतो, त्या काळातील समाज कसा असेल, मानवी परस्परसंबंध कसे असतील याचे चित्रण करणारे साहित्य म्हणजे विज्ञानकथा.

विज्ञानसाहित्याचा उगम पाश्चिमात्य देशात झाला. इंग्रजीतली पहिली विज्ञानकथा फ्रँकेस्टाईन ही १८१८ साली मेरी शेली या लेखिकेने लिहिली. त्यानंतर बऱ्याच काळानंतर इंग्रजी साहित्यात निर्माण झालेला विज्ञानसाहित्याचा प्रवाह मराठी भाषेतही यायला सुरुवात झाली.  

विज्ञानकथेची सुरुवात सर्वप्रथम १९०० मध्ये कृष्णाजी आठले यांच्या ज्यूल्स व्हर्नच्या कादंबरीच्या 'चंद्रलोकची सफर' या नावाने केलेल्या  अनुवादाने झाली.   त्याचे  प्रकाशन 'केरळकोकिळ' या मराठी नियतकालिकात झाले.  ते काम सहा वर्े चालू होतं. त्यानंतर  १९११ साली श्रीधर रानडे यांनी लिहिलेल्या ' तारेचे हास्य' या त्यांनी स्वतः लिहिलेल्या कथेने विज्ञानकथा लेखनाची खरी पायाभरणी झाली. वा.म. जोशी यांनी लिहिलेल्या दोन कथा 'अप्रकाशित किरणांचा दिव्य प्रकाश ' आणि ' वामलोचना' १९१४ साली प्रकाशित झाल्या.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी विज्ञान कथा, कादंबऱ्या लिहिण्याचे काम थंडावले. पण, स्वातंत्र्योत्तर काळात १९५० नंतर अनुवादित विज्ञान कथांचे व कादंबऱ्यांचे लेखन पुन्हा सुरू झाले.  भा.रा. भागवत यांनी ज्यूल्स व्हर्न आणि एच.जी. वेल्स यांच्या अराउंड द वर्ल्ड इन ८० डेज , ट्वेन्टी थाऊजंड लीग अंडर द सी , इनव्हिजिबल मॅन या कथा इथल्या मातीचा स्पर्श करून लिहिल्या. त्या कथा बालमित्रमध्ये छापून येत होत्या. त्यामुळे, त्या कथा जरी लहान थोर सगळ्यांना आवडल्या तरी विज्ञानकथेवर मात्र बालसाहित्य, साहसकथा असा शिक्का बसला. आणि त्यामुळे त्या कथांना जरी यश आले तरी विज्ञानकथांच्या प्रगतीत त्यामुळेच मोठा अडसर निर्माण झाला. त्याचा परिणाम यशवंत रांजणकरनारायण धारप, द.पां. खांबेटे, दि बा. मोकाशी यांच्या लेखनावर झाला. त्यातील बरेच लेखन हे अनुवादित वा रूपांतरित होते. पण, दि.बा. मोकाशी यांनी लिहिलेल्या विज्ञानकथा मात्र स्वतंत्र होत्या. 

भा.रा. भागवत यांचा ' उडती छबकडी ' हा सगळ्यात पहिला विज्ञान कथासंग्रह १९६६ साली आला. त्या पाठोपाठ द.पां. खांबेटे यांचा ' माझे नाव रमाकांत वालावलकर' हा विज्ञान कथासंग्रह आला.  द.पां. खांबेटे यांच्या या संग्रहातील सगळ्या कथा रहस्यरंजनमध्ये प्रकाशित झालेल्या होत्या. 

आपल्याकडे स्वातंत्र्योत्तर काळात विज्ञान तंत्रज्ञानाला जसजसे महत्त्व यायला लागले तसा त्याचा प्रसारही वेगाने व्हायला लागला. विज्ञान जीवनाला सर्व अंगांनी भिडायला लागले. आणि त्यानंतर आधुनिक विज्ञानकथांचा उदयकाल १९७५ पासून झाला असे मानले जाते. 

जयंत नारळीकर यांच्या कृष्णविवर या कथेपासून विज्ञानकथेकडे गंभीरपणे पाहिले जायला लागलं. अर्थात, जयंत नारळीकर यांच्याआधीही  निरंजन घाटे विज्ञान कथा लेखन करत होतेच.  निरंजन घाटे १९७१पासून विज्ञान कथास्पर्धेत बक्षीसे मिळवणारे विज्ञान साहित्य लेखक आहेत. १९७५ च्या साहित्य संमेलनात दुर्गाबाई भागवत यांनी जयंत नारळीकर यांच्या विज्ञानकथांची आणि ते करत असलेल्या प्रयत्नांची दखल घेतली आणि त्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. तेव्हापासून विज्ञानकथा या प्रकाराला समीक्षकांनी गंभीरपणे घेतले. आणि मग तिची दिवसेंदिवस प्रगती होतच राहिली. त्याच काळात ललित कथांशी जवळीक साधून ललित कथांच्या निकषाला अनुसरून विज्ञान कथा  लिहायला सुरुवात केली ती विज्ञान कथा लेखक बाळ फोंडके यांनी.  विज्ञानकथा लेखन या प्रकारात बाळ फोंडके यांचे योगदान फार मोलाचे आहे.विज्ञानातल्या नव्या शोधांमुळे मानवी नातेसंबंधांचा जो विचित्र गुंता होतो याचे चित्रण त्यांच्या विज्ञानकथांमधून दिसून येते. लक्ष्मण लोंढे यांच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय विज्ञान कथाकारांची यादी अपूर्णच राहील. त्यानंतर विज्ञानकथा लेखकांत श्री. सुबोध जावडेकर यांनी लिहिलेल्या विज्ञानकथांची शैली विशेष उल्लेखनीय अशी आहे.  त्यांच्या कथेतील काल्पनिकता श्वास रोखून ठेवणारी असून कथाही उल्लेखनीय अश्या आहेत.

याव्यतिरिक्त अरुण साधू , अरुण हेबळेकर, अरुण मांडे, संजय ढोले , शुभदा गोगटे यांच्या विज्ञानकथांतून त्यांनी माणसांचा वेध घेतला आहे. लेखनात तंत्रज्ञानाच्या झपाट्यात माणूसपणाच्या खुणा शोधण्याचा प्रयत्न प्रा. माधुरी शानभाग यांच्या विज्ञानकथांचा दिसून येतो. तर अरुण मांडे यांच्या विज्ञानकथेत विशेष शैली दिसते. 

इतर साहित्याच्या तुलनेत विज्ञान साहित्याकडे जास्त मूलभूत पातळीवर जीवनदर्शन घडवण्याची क्षमता असते. मराठी विज्ञानकथेने गेल्या पन्नास साठ वर्षात गाठलेला पल्ला प्रशंसनीय आहे. आणि आता पुढे तशीच वाटचाल कायम चालू राहील असं आशादायी लिखाण होत आहे.

काही प्रसिद्ध विज्ञानकथा लेखक[संपादन]

आधुनिक विज्ञानकथा लेखक[संपादन]

काही प्रसिद्ध विज्ञान कथासंग्रह/कादंबऱ्या[संपादन]

काही प्रातिनिधिक विज्ञानकथा संग्रह[संपादन]

हेही वाचा[संपादन]

मराठी विज्ञानकथा लेखक

आजची मराठी विज्ञानकथा कशी आहे? - मेघश्री दळवी आणि प्रसन्न करंदीकर, अक्षरनामा, एप्रिल ३०, २०१७

मराठी विज्ञानकथेची शतसंवत्सरी - निरंजन घाटे, लोकसत्ता, एप्रिल १४, २०१६