Jump to content

दुर्गा भागवत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दुर्गाबाई भागवत या पानावरून पुनर्निर्देशित)
दुर्गा भागवत
जन्म नाव दुर्गा नारायण भागवत.
जन्म १० फेब्रुवारी १९१०
इंदूर, मध्यप्रदेश
मृत्यू ७ मे २००२
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, संशोधन
भाषा मराठी
साहित्य प्रकार संशोधनपर, ललित
प्रसिद्ध साहित्यकृती ऋतुचक्र

दुर्गा भागवत (जन्म : इंदूर, १० फेब्रुवारी १९१०; - मुंबई, ७ मे २००२) या मराठी लेखिका होत्या. ९२ वर्षांचे दीर्घायुष्य त्यांना लाभले. वैविध्यपूर्ण साहित्यप्रकारात त्यांचे मोठे योगदान आहे. यांत लोकसाहित्य, बालसाहित्य, बौद्धसाहित्य, कथा, चरित्र, ललित, संशोधनपर, समीक्षात्मक, वैचारिक लेखन यांचा समावेश होतो. त्यांना फ्रेंच, जर्मन, इंग्रजी, संस्कृत, पाली या भाषा चांगल्या अवगत होत्या. त्यांचे संस्कृत, पाली आणि इंग्लिश भाषेमध्येही लेखन आहे.

१९७५ साली इंदिरा गांधींनी देशावर लादलेल्या आणीबाणीला स्पष्ट विरोध करणाऱ्या म्हणून दुर्गाबाई विशेष मान्यता पावलेल्या आहेत.[]

शिक्षण

दुर्गा भागवत यांचे मूळ गाव पंढरपूर होय. पण त्यांच्या आजोबांनी दुर्गाबाईंच्या आईला दिलेल्या वाईट वागणुकीची चीड येऊन त्यांनी पंढरपूर कायमचे सोडले. शालेय शिक्षण मुंबई, नगर, नाशिक, धारवाड, पुणे येथे. १९२७ साली त्या मॅट्रिक उत्तीर्ण झाल्या. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयात झाले. १९३२ मध्ये त्या पहिल्या वर्गात बी.ए. (संस्कृतइंग्रजी) झाल्या. १९२९ साली शिक्षण स्थगित करून दुर्गा भागवत यांनी महात्मा गांधींच्या चळवळीत सक्रिय भाग घेतला. १९३५ मध्ये त्या एम्.ए. झाल्या. त्यासाठी 'इंडियन कल्चरल हिस्टरी' शाखेत 'अर्ली बुद्धिस्ट ज्युरिसप्रूडन्स' या विषयावर त्यांनी प्रबंधलेखन केले. पीएच्.डी.च्या प्रबंधासाठी 'सिंथिसिस ऑफ हिंदू अँड ट्रायबल कल्चर्स ऑफ सेंट्रल प्रॉव्हिन्सेस ऑफ इंडिया' या विषयावर त्यांनी संशोधन कार्य केले; परंतु प्रबंध सादर केला नाही. त्यांच्या प्रबंधातील निवडक भाग परदेशी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाला होता. महात्मा गांधी, टॉलस्टॉय, हेनरी डेव्हिड थोरो, मिल, रॉबर्ट ब्राउनिंग, राजारामशास्त्री भागवत, डॉ. श्री.व्यं. केतकर ही दुर्गाबाईंची काही प्रेरणास्थाने होती.

कौटुंबिक माहिती

दुर्गाबाईंचे वडील शास्त्रज्ञ होते.भारताच्या आद्य स्त्री-शास्त्रज्ञ कमला सोहोनी या दुर्गा भागवतांच्या भगिनी होत्या. आचार्य राजारामशास्त्री भागवत हे दुर्गाबाईच्या आजीचे बंधू होते.

कारकीर्द

सुस्पष्ट पामाणिक विचार, छोटी छोटी वाक्ये, नादमय शब्द आणि अर्थातील सुबोधता हे दुर्गाबाईंच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते. दुर्गाबाईंच्या लेखनात भारतातील सांस्कृतिक, पौराणिक, सामाजिक जीवनातले अनेक संदर्भ अभ्यासपूर्वक नोंदविलेले दिसतात. अभ्यास आणि लिखाण हे त्यांचे आस्थेचे विषय होते. म्हणूनच त्यांच्या लिखाणात संशोधन, विद्वत्ता आणि माहितीचा प्रचंड साठा या त्रयींचा अपूर्व संगम आढळतो. त्यांच्या लिखाणात स्पष्ट आणि प्रामाणिक विचारांबरोबरच कवी मनाची कोमलता आढळते. आणि "आपणाला जे जे ठावे ते इतरांना सांगावे" हा समर्थ रामदासांचा विचार प्रत्यक्षात आणण्याची तळमळ दुर्गाबाईंमध्ये दिसून येते. आणीबाणीच्या विरोधात त्यांनी घेतलेल्या भूमिकेत हा ठामपणा दिसून येतो. लोकसाहित्याच्या व्यासंगात बुडलेल्या दुर्गाबाईंच्या लेखनात लोकसाहित्याचा जिवंत रसरशीतपणा, मोहक साधेपणा, बोलभाषेची मांडणी आढळते, तसेच व्यासंग-चिंतन-मनन यांतून आलेले त्यांचे विचारही त्यांच्या साहित्यात दिसून येतात. दुर्गाबाईंच्या लेखनातील मौलिकता, अस्सल भारतीयत्व, सनातनत्व यांचा वेध घेण्याची शक्ती यांमुळे ललित निबंधाच्या क्षेत्रात त्यांनी एक नवा मानदंड निर्माण केला आहे. फ् पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी दोन वर्षे समाजशास्त्र विभागप्रमुख म्हणून काम पाहिले. मुंबईतील एशियाटिक सोसायटीच्या त्या क्रियाशील कार्यकर्त्या होत्या. भारतातील सन्माननीय लेखिका म्हणून रशिया भेटीचे निमंत्रण त्यांना मिळाले होते. कऱ्हाड येथे १९७५ साली झालेल्या ५१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले.

अनुवादित साहित्य

"पैस", "ॠतुचक्र", "डूब", "अशा ललित लेखांच्या पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. बाणभट्टाची "कादंबरी","जातककथा", यांचा अनुवाद करणाऱ्या दुर्गाबाईंनी थोरो या अमेरिकन विचारवंताच्या पुस्तकाचा " वॉल्डनकाठी विचारविहार "नावाचा अनुवादही केला. रवींद्रनाथ टागोरांच्या "गीतांजली"चा संस्कृतात अनुवाद करण्याचे कौतुकास्पद कार्य दुर्गाबाईंनी केले. त्यांनी भाषांतरित केलेली आणि सरिता प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेली 'लोककथामाला' मराठीतील लोककथा आणि बालकथा यांमधला महत्त्वाचा ठेवा आहे.

छंद

संशोधन व साहित्य या क्षेत्रात रमणाऱ्या दुर्गाबाईंना पाककलेतही रुची होती. पाकशास्त्रात त्या पारंगत होत्या. त्यांनी काही नवीन पाककृतीही तयार केल्या आहेत. त्या विणकाम, भरतकामही उत्तम करत. दुर्गाबाई अविवाहित होत्या, घरातील कामात त्यांना विशेष आवड होती. .

प्रकाशित साहित्य

दुर्गा भागवत यांचे पुढील साहित्य प्रकाशित झाले आहे.[][][][][][][]

नाव साहित्यप्रकार भाषा प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अ‍ॅन आउटलाइन ऑफ इंडियन फोकलोअर माहितीपर इंग्रजी
अस्वल माहितीपर मराठी
आठवले तसे बालसाहित्य मराठी
आस्वाद आणि आक्षेप वैचारिक मराठी
ऋतुचक्र ललित मराठी १९५६
उत्तर प्रदेशाच्या लोककथा (पाच भागांत) कथा मराठी
कथासरित्सागर (पाच भागांत) रूपांतरित कथासंग्रह मराठी
कदंब ललित कथासंग्रह मराठी
कॉकॉर्डचा क्रांतिकारक व्यक्तिचित्र मराठी
काश्मीरच्या लोककथा (पाच भागांत) कथा मराठी
केतकरी कादंबरी समीक्षा मराठी
कौटिलीय अर्थशास्त्र वैचारिक मराठी
खमंग पाकशास्त्र मराठी
गुजरातच्या लोककथा (दोन भागांत) बालसाहित्य मराठी
गोधडी ललित मराठी
डांगच्या लोककथा (चार भागांत) बालसाहित्य मराठी
डूब ललित मराठी १९७५
तामीळच्या लोककथा (३ भागांत) कथा मराठी
तुळशीचे लग्न बालसाहित्य मराठी
दख्खनच्या लोककथा (चार भागांत) बालसाहित्य मराठी
द रिडिल्स ऑफ इंडियन लाइफ, लोअर अँड लिटरेचर वैचारिक इंग्रजी
दिव्यावदान ललित मराठी
दुपानी ललित लेख मराठी
निसर्गोत्सव ललित लेख मराठी
पंजाबी लोककथा बालसाहित्य मराठी
पाली प्रेमकथा कथासंग्रह मराठी
पूर्वांचल ललित कथासंग्रह मराठी
पैस ललित मराठी १९७०
प्रासंगिका लेखसंग्रह मराठी
बंगालच्या लोककथा (दोन भागांत) बाल साहित्य मराठी
बाणाची कादंबरी रूपांतरित कादंबरी मराठी
बालजातक बालसाहित्य मराठी
बुंदेलखंडच्या लोककथा बालसाहित्य मराठी
भारतीय धातुविद्या माहितीपर मराठी
भावमुद्रा ललित कादंबरी मराठी १९६०
मध्य प्रदेशच्या लोककथा (दोन भागांत) बालसाहित्य मराठी
मुक्ता ललित मराठी
रसमयी रूपांतरित कादंबरी मराठी
रानझरा लेखसंग्रह मराठी
राजारामशास्त्री भागवत यांचे निवडक साहित्य (सहा भागांत) समीक्षा मराठी
राजारामशास्त्री भागवत : व्यक्ती आणि वाङमयविवेचन मराठी स्वस्तिक पब्लिशिंग, मुंबई इ.स. १९४७
रूपरंग ललित मराठी १९६७
लहानी बालसाहित्य मराठी
लिचकूर कथा कथासंग्रह मराठी
लोकसाहित्याची रूपरेखा समीक्षा मराठी
व्यासपर्व ललितलेख मराठी
शासन, साहित्यिक आणि बांधिलकी वैचारिक मराठी
सत्यं शिवं सुंदरम माहितीपर मराठी
संताळ कथा(चार भागांत) बालसाहित्य मराठी
साष्टीच्या कथा (दोन भागांत) बालसाहित्य मराठी
सिद्धार्थ जातक (७ खंडांत) मराठी

निधनानंतर प्रकाशित साहित्य

दुर्गाबाईंच्या निधनानंतर तेरा वर्षांनी त्यांच्या चार पुस्तकांचे ‘शब्द पब्लिकेशन’तर्फे प्रकाशन झाले. मीना वैशंपायन यांनी ही पुस्तके संकलित व संपादित केलेली आहेत.

  • 'संस्कृतिसंचित' - या पुस्तकात विविध ज्ञानशाखांच्या आधारे दुर्गाबाईंनी घेतलेला संस्कृतीचा मागोवा आहे.
  • 'विचारसंचित' - या पुस्तकात दुर्गाबाईंचे विविध सामाजिक, राजकीय विषयांवरील वैचारिक लेख एकत्रित करण्यात आलेले आहेत.
  • 'भावसंचित' - या पुस्तकात दुर्गाबाईंचे ललित लेख संकलित करण्यात आलेले आहेत.
  • 'दुर्गुआजीच्या गोष्टी' - या पुस्तकात दुर्गाबाईंनी आजीच्या भूमिकेतून सांगितलेल्या बालकथा आहेत.[]

दुर्गा भागवत यांच्यासंबंधी प्रकाशित साहित्य [१०]

नाव लेखक/लेखिका भाषा प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी प्रतिमा रानडे मराठी राजहंस प्रकाशन १९९८
दुर्गाबाई रूपशोध अंजली कीर्तने मराठी ? २०१२?
दुर्गा भागवत : व्यक्ती, विचार आणि कार्य अरुणा ढेरे मराठी पद्मगंधा प्रकाशन २०११
बहुरूपिणी दुर्गा भागवत अंजली कीर्तने मराठी मनोविकास प्रकाशन २०१८
मुक्ता Archived 2016-03-09 at the Wayback Machine. मीना वैशंपायन मराठी लेख-लोकसत्ता २०१२

पुरस्कार

खालील पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे.

इतर

  • अंजली कीर्तने यांनी दुर्गा भागवतांवर एक लघुपट केला आहे.
  • ‘शब्द द बुक गॅलरी’ दरवर्षी वैचारिक साहित्य, ललित लेखन आणि अनुवादित साहित्य यासाठी क्रमवारीने दुर्गा भागवत शब्द पुरस्कार देते. (२००६ सालापासून)

विशेष : या लेखाचे चर्चापान पहावे.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ रानडे प्रतिभा. "कॅलिडोस्कोप ( ४. ३. २०१७)".
  2. ^ Bhagwat, Durga (1993). Kadamba. Athenā Prakāśana.
  3. ^ Bhagwat, Durga (1975). Siddhārtha jātaka. Varadā Buksa.
  4. ^ Bhagwat, Durga (1970). Paisa. Mauja Prakāśana Gr̥ha.
  5. ^ Bhagwat, Durga (1991). Āṭhavale tase. Nānā Jośī.
  6. ^ Bhagwat, Durga (1962). Vyāsaparva. Mauja Prakāśana Gr̥ha.
  7. ^ Bhagwat, Durga (1977). Lokasāhityācī rūparekhā. Varadā Buksa.
  8. ^ Bhagwat, Durga; Vaiśampāyana, Mīnā (1991). Āsvāda āṇi ākshepa. Dimpala Pablikeśana.
  9. ^ भूमिका घेतली पाहिजे! -Maharashtra Times. Maharashtra Times. 26-04-2018 रोजी पाहिले. दुर्गाबाईंच्या लेखनाचा झपाटा एवढा जबरदस्त होता की, त्यांचं बरचसं लेखन आजवर विखुरलेल्या स्वरुपात पडूनच राहिलं होतं. ते कुठेकुठे प्रकाशित झालेलं होतं, परंतु ते एकत्र संकलित झालेलं नव्हतं. मात्र दुर्गाबाईंच्या निधनाला गुरुवारी १३ वर्षं पूर्ण झालेली असताना, उद्या, शनिवारी त्यांच्या चार पुस्तकांचं एकत्र प्रकाशन होत आहे. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  10. ^ Bhagwat, Durga (1998-01-01). Aisapaisa gappā, Durgābāī̃śī. Rājahã̃sa Prakāśana. ISBN 9788174341327.