Jump to content

वामन अवतार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वामन अवतार

वामनावताराचे चित्र
वडील महर्षी कश्यप
आई आदिती
या अवताराची मुख्य देवता विष्णू

वामन अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी पाचवा अवतार मानला जातो. मत्स्य, कूर्म, वराह आणि नृसिंह या अवतारांनंतर ब्राह्मण बाटु स्वरूपातला हा अवतार आहे.

श्रीमद भागवत पुराणात यासंदर्भात विस्तृत विवेचन करण्यात आले आहे.

बळीचा यज्ञ

[संपादन]

भागवत पुराणातील वामन अवताराच्या कथेनुसार, देव व असुरांच्या युद्धामध्ये राक्षसांचा पराभव होण्यास सुरुवात होते. अशाने राक्षसकुळ संपून जाईल, या भीतीने असुरांचे गुरू शुक्राचार्य आपल्याला अवगत असलेली संजीवनी विद्या वापरून राक्षसांना पुन्हा जीवंत करतात. शुक्राचार्य हे असुरांचा राजा बळीराजासाठी मोठा यज्ञ करतात. बळीराजाला अग्नीकडून दिव्य रथ, बाण, अभेद्य चिलखत, विविध अद्भूत शक्ती मिळवून देतात. यानंतर असुरांची शक्ती अनेकपटीने वाढते. असुरांचे सैन्य इंद्राची राजधानी अमरावतीवर हल्ल्याची तयारी करतात. बळीचे शंभर यज्ञ पूर्ण झाल्यावर तो इंद्र होईल, अशी इंद्राला भीती वाटू लागते. म्हणून इंद्र श्रीविष्णूंना शरण जातात. श्रीविष्णू त्यांना मदत करण्याचे वचन देतात.


वामन जन्म

[संपादन]

महर्षी कश्यप आणि आदिती यांच्या पोटी श्रीविष्णू बालकाच्या रूपात जन्म घेतात. महर्षी कश्यप आणि माता आदिती या बाळाचे 'वामन' असे नामकरण करतात. महर्षी कश्यप ऋषींसह वामनावर यज्ञोपवीत संस्कार करतात. वामन बटुला महर्षी पुलह यज्ञोपवीत, अगस्त्य ऋषी मृगचर्म, मरिची ऋषी पलाश दंड, अंगिरसा ऋषी वस्त्र, सूर्य छत्र, भृगु ऋषी खडावा, गुरू देवांनी कमंडळु, माता अदितीने कौपीनवस्त्र, सरस्वती देवी रुद्राक्षाची माळ आणि कुबेर भिक्षा पात्र देतात.


बळीकडे तीन पावले भूमीची मागणी

[संपादन]

वामन वडिलांच्या आज्ञेने यज्ञस्थळी जातात. राजा बळी नर्मदेच्या उत्तर किनाऱ्यावर अखेरचा यज्ञ करीत असतो. वामन अवतारातील श्रीहरी राजा बळीकडे भिक्षा मागण्यासाठी दाखल होतात. श्रीविष्णू भिक्षेमध्ये तीन पावले भूमी मागतात. शुक्राचार्यांना धोका लक्षात येतो. ते बळीला नकार देण्यास सुचवतात. परंतु, बळी तीन पावले जमीन देण्याचे वचन देतो. वामन रूपातील विष्णू एका पावलात स्वर्ग व दुसऱ्या पावलात पृथ्वी आणि तिसरे पाऊल कोठे ठेवू, असे विचारतात. सत्यवचनी राजा बळीवर धर्मसंकट ओढवते. देण्यास काहीच जागा शिल्लक राहिली नाही, परंतु तरीही जर दिलेल्या वाचनाला जागलो नाही तर तो अधर्म ठरेल असा विचार करतो. शेवटी राजा बळी वामनासमोर आपले डोके धरतो व आपल्या डोक्यावर तिसरे पाऊल ठेवावे, अशी विनंती करतो. वामन अगदी तेच करतो आणि राजा बळीला पाताळात ढकलतो. सर्वकाही हरपून बसलेल्या बळीला आपल्या वचनाशी कटिबद्ध असलेले बघून वामनदेव प्रसन्न होतात. श्रीविष्णू बळीराजाला पाताळलोकाचे स्वामी करतात आणि स्वतः त्याचे द्वारपालपद स्वीकारतात.


वामनजयंती ही भाद्रपद शुक्ल द्वादशीला असते. वामन जयंती देशभरातील अनेक ठिकाणी साजरी केली जाते.

पहा: त्रिविक्रम मंदिर, तेर