मेळघाट गवळी
मेळघाटचा इतिहास[संपादन]
परतवाडा, अचलपूर, चिखलदरा, धारणी, या भागात गवळी समाजाची प्रमुख वसाहत आहे. व त्यांचा मुख्य व्यवसाय पशुपालन व शेती व्यवसाय आहे.
मेळघाटचे गवळी हे "नंदगवळी" म्हणून ओळखल्या जातात. मूळ हिंदू-गवळी जमातीच्या उपजाती वेगवेगळ्या असल्या, तरी श्रीकृष्ण हा त्यांचा महापुरुष आहे. श्रीकृष्ण यदु कुलातील होता. त्याची वसाहत मथुरेच्या प्रदेशात होती. पुढे यदुवंशातील यादव यमुनेच्या काठी येऊन राहू लागले. असेच गवळी भटकंती करता करता विविध भागातही वसलेले आढळतात. गवळी समाज हा भटक्या जमाती मधला असून तो पशुपालन करण्यासाठी भटकंती करत राहतो.
* गवळी / गोपाल नामाची उत्पत्ती *
गोपाल : गो+पाल = गाईचे पालन करणारा
गोप : गाईचा रक्षक, गुराखी, गुरे राखणारा
मेळघाट डोंगररांगा या निसर्गाने नटलेल्या आणि जीवविविधतेने समृध्द आहेत. या मेळघाट परिसराच्या कुशीत राहणारा जनजाती समाज हा खऱ्या अर्थाने निसर्गाचा पूजक, निसर्गाचा रक्षक आहे. वर्षानुवर्षे स्वतःच्या परंपरा, संस्कृती जपणाऱ्या या समाजाचे आणि निसर्गाचे परस्परावलंबित्व लक्षात घेतल्याशिवाय या परिसराचा विकास शक्य नाही.
मेळघाट हा मध्य भारताच्या दक्षिण सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेला भाग आहे. ह्या पर्वतरांगांना 'गाविलगड पर्वत' असेही संबोधतात. हा भाग अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेकडे असून मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सीमेवर असून चिखलदरा आणि धारणी या दोन तालुक्यांतील हा डोंगराळ भाग 'मेळघाट' नावाने ओळखला जातो. घाटांचा मेळ असल्यामुळेदेखील याला मेळघाट असे म्हटले जाते. वैराट हे सर्वोच्च शिखर समुद्रसपाटीपासून 1178 मीटर उंच आहे. मेळघाटातून खंडू, खापर, सिपना, गाडगा आणि डोलार ह्या पाच नद्या वाहतात आणि पुढे तापी नदीला मिळतात. मेळघाट हे महाराष्ट्र राज्याचे जीवविविधतेचे भांडार आहे. निसर्गाने काही नोंदी गुणासह एक खडबडीत भौगोलिक परिस्थितीच्या स्वरूपात देऊ केली आहे.
जीवविविधतेने संपन्न असलेल्या मेळघाटचा पूर्व वनप्रदेश म्हणजे चिखलदरा होय. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 3664 फूट उंचीवर आहे. कॅप्टन रॉबिन्सन या इंग्रज अधिकाऱ्याने सन 1823 मध्ये या गावाचा शोध लावला. हे थंड हवेचे ठिकाण असून विदर्भाचे महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. उंच अशा दऱ्याखोऱ्यांतून भटकताना येथील हिरवी गर्द वनराई मनाला मोहून टाकते. निसर्गाची विविध रूपे पर्यटकांना भूल पाडतात. मोरपिसासारखी सिल्व्हर ओकची झाडे आपले लक्ष वेधून घेतात. याशिवाय ऐतिहासिक प्राचीन महाभारताचा वारसा सांगणारे 'भीमकुंड', आवाजाचे पाच प्रतिध्वनी ऐकू येणारा 'पंचबोल', देवी पॉइंट, मोझरी पॉइंट, आठशे-नऊशे वर्षांचा इतिहास सांगणारा उपेक्षित किल्ला गाविलगड ही सर्व ठिकाणे येथील वैशिष्टये म्हणता येतील.
मेळघाटामधील प्राणी आणि पक्षी[संपादन]
मेळघाटच्या घनदाट जंगलात चिलादरी, पातुल्डा आणि गुगमाळ यासारखी दुर्गम ठिकाणेदेखील आहेत. मेळघाटमध्ये 'सिपना' (सागवान) नदी महत्त्वाची आहे. या जंगलात रानडुक्कर, वानरे, अस्वले, चितळ, नीलगाय, चौशिंगे, भुईअस्वले, रानमांजरे, कृष्णमृग, उडत्या खारी, तरस, कोल्हे, लांडगे, ससे, मोर, भूरबगडा, करकोचे, बलाक, बदके, रानकोंबडया, वाघ, तसेच सर्पगरुड, ससाणे, घार, पोपट, सुगरण, पारवे, बुलबुल, सुतार, मैना असे रानपक्षी बघायला मिळतात.
मेळघाट हा परिसर 1974 मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केला. एकूण सुमारे 1677 चौ.कि.मी. क्षेत्रातील 361.28 चौ.कि.मी. जागा 'गुगामल राष्ट्रीय उद्यान' क्षेत्राकरिता आणि 688.28 चौ.कि.मी. क्षेत्र रिझर्व्ह मेळघाट वाघ अभयारण्य म्हणून राज्य सरकारद्वारे 1994 मध्ये पुन्हा सूचित करण्यात आला. तसे गुगामल राष्ट्रीय उद्यान 1987 मध्ये अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले.
सण आणि उत्सव[संपादन]
प्रत्येक समाजात आपापल्या मान्यते नुसार देवी देवतांचे विधिपूर्वक पूजन केले जाते. मेळघाट मधील गवळी समाजही विविध देवांचे पूजन करतो, जसे भगवान श्री कृष्ण, एकविरा, मुऱ्हादेवी, अमरावती ची अंबादेवी, माहूरगड ची रेणुका देवी, वैराट ची दुर्गादेवी, चिखलदरा देवी, बहिरम येथील भैरवनाथ ( बहिरमबाबा ) यांची पण पूजा केली जाते. मेळघाट गवळी समाजाचा मोठा सण म्हणजे दिवाळी.
- दिवाळी
हजारो वर्षांचा इतिहास असलेला सण देश-विदेशात साजरा होतो, आणि सण साजरा करण्याची पद्धत प्रदेशानुसार थोडीफार बदलते. मेळघाटातील गवळी लोकांची दिवाळी मात्र आगळी असते. लक्ष्मीपूजनापासून सुरू होणारी ही दिवाळी आठवडाभर वैविध्यपूर्ण पद्धतीने साजरी केली जाते.
‘दिवाळीचा सण मोठा..नाही आनंदाला तोटा...’
या शब्दांत दिवाळीचे महत्त्व सांगितले जाते. दिवाळी हा प्रकाशाचा सण. स्नेहसुगंधाचा दरवळ हा आनंदसण देतो. सर्वांच्या जीवनात सौख्य-समृद्धी लाभो, चांगले आरोग्य लाभो, अशा शुभेच्छा दिवाळी येताच दिल्या जातात.
पाच दिवसांच्या दिवाळीतील प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळे. म्हणजे या माध्यमातून आनंद साजरा करायचा आणि समृद्धीची मनोकामना करायची ! ग्रामीण भागातील दिवाळी यात मोठा फरक आहे. कुठली चांगली आणि कुठली वाईट हा मुद्दा नाही तर विषय दिवाळी साजरी करण्याच्या पद्धतीचा आहे. प्रत्येक ठिकाणी दिवाळी तेथील परिस्थितीनुसार साजरी होते. ‘साजरे’ पणाचे हे वेगळेपण "मेळघाटातील गवळी" बांधवांनी जपले आहे. त्यांची दिवाळी आगळीवेगळी असते. दिवाळीला लक्ष्मीपूजनाची प्रथा. पूर्वी गाई-वासरे समृद्धीचे प्रतीक होते.
गवळी बांधवांसाठी त्यांच्या गाई, म्हशी आणि वासरे हीच धनसंपत्ती. त्यांच्यासाठी हीच लक्ष्मी. एरवी गो-बारस किंवा ‘वसूबारस’ ला गाई-गुरांची पूजा होते, पण मेळघाटातील दिवाळी ही लक्ष्मीपूजनापासून सुरू होते आणि पुढील दहा दिवस हा सण साजरा होतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गाई व म्हशींना जंगलातील नदीवर नेऊन आंघोळ घातली जाते. त्यानंतर नदीवरच कुलदैवताची पूजा केली जाते.
घरी परतल्यानंतर सायंकाळी गोठ्यात शिरण्याआधी गाईंच्या पायावर पाणी घातले जाते. यथासांग पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदेला दुभत्या जनावरांची विशेष पूजा केली जाते. त्यांना गोडधोड खाऊ घातले जाते. "गवळी समाजाच्या दिवाळी हा दिवस सर्वांत महत्त्वाचा मानला जातो". यादिवशी घरातील सर्वजण नवीन कपडे परिधान करतात. अंगावर घोंगडी घेऊन गाई-म्हशींची पूजा करण्याचीही प्रथा आहे.घरातील सर्व सदस्य या दिवशी गुराख्याच्या पाया पडतात. त्यानंतर गाई, म्हशींचेही पाय धरले जातात. घरातील मायलेकी या गुरांची पूजा करतात. सारे सदस्य गोधनाकडून आशीर्वाद घेतात. पुढील प्रत्येक दिवशी गाई-म्हशींना दूध किंवा दुग्धपदार्थांनी आंघोळ घातली जाते. पुढील सात दिवस हा उत्सव सुरू असतो. गुराख्याला या दिवशी मोठा मान असतो. त्याला गाई, म्हशींचा मालक नवे कपडे देतो. काळाच्या ओघात गावेही आधुनिक होत आहेत. मात्र गावक-यांनी परंपरा तितक्याच निष्ठेने जपल्या आहेत. परंपरा या जगण्याचा आधार असतात, असा ग्रामस्थांचा ठाम समज. हाच समज गवळी बांधवांनी पारंपरिक उत्सवप्रियतेतून जपला आहे. त्यांच्याकडे आज दुभती जनावरे ही मोठ्या प्रमाणात आहे.
- गोकुळाष्टमी
श्रावणातील कृष्ण अष्टमीला श्रीकृष्ण जन्माचा उत्सव करून हा सण साजरा करण्याची प्रथा आहे. मध्यरात्री श्रीकृष्णजन्माचे स्मरण करून, एकत्र येऊन उपवास करून भाविक हा दिवस साजरा करतात. दुसऱ्या दिवशी ठिकठिकाणी उंचावर मडक्यात दही ठेवून, मडके दोरीने उंचावर बांधतात. तरुणांनी एकमेकांच्या आधाराने मानवी मनोरा करून ते मडके (हंडी) फोडण्याची एक प्रथा आहे. त्याला ‘दहीहंडी’ म्हणतात.
श्रीकृष्ण म्हणजे खट्याळ, खोडकर, दही-दूध-लोणी चोरून खाणारा अशी त्याची प्रतिमा पिढ्या-न-पिढ्या सांगितली जाते. अनेक गाणी-गोष्टी त्याच्या या लीलांवरच रचलेल्या आहेत. श्रीकृष्णाने त्याच्या सवंगड्यांसह, मनोरे करून दही-दूध-लोण्याच्या हंड्या फोडल्याच्या कथा प्रचलित आहेत. दुष्टांचा संहार करणार्या भगवान श्रीकृष्णाची-आठवण करण्याचा हा दिवस. काही कथांमुळे श्रीकृष्णाची प्रतिमा लहानपणापासून प्रत्येकाच्या मनात कोरली गेलेली आहे. तरुणांनी चपळाईने, संघटितपणे उंचावरचे दही खाली काढण्याच्या निमित्ताने साहसी वृत्ती जागवावी अशाही पद्धतीने या उत्सवाकडे पाहिले जाते.
गायी-वासरे चरण्यासाठी रानात आणि पाण्यासाठी यमुनेच्या तीरावर घेऊन जाणारे सर्व गो-पालक आपापले खाद्यपदार्थ एकत्र करून मजेत खात असावेत अशी कल्पना केली जाते. हाच गोपाळकाला होय. गोकुळअष्टमी‘ च्या दिवशीच संध्याकाळी मंदिरांत काल्याचे कीर्तन असते. नंतर प्रसाद म्हणून पोहे-काकडी-डाळ-दाणे-चुरमुरे (गोपाळकाला) करून प्रसाद म्हणून वाटले जाते. प्रत्येकाने एक एक पदार्थ नेऊन, सर्वांचे पदार्थ एकत्र करून अनेक ठिकाणी रात्रभर भजन करण्याचीही प्रथा आहे. हा प्रसाद सर्वांना दिला जातो.
बोलीभाषा[संपादन]
प्रत्येक भागात वेगवेगळी भाषा बोलली जाते, मेळघाटातही "गवळी " बोली बोलतात. "आहे" या शब्दासाठी या बोलीत "शे" वापरतात. काही लोक गवळी या बोलीभाषेला "अहिराणी" या भाषेशी पण जोडतात. अहिराणी भाषा ऐकायला जरी सारखी वाटत असली तरीही तेथील जागे आणि परिस्थिती नुसार वेगळी आहे, ती भाषा खानदेशातच बोलली जाते.
गवळी बोली | मराठीत अर्थ | इंग्लिश अर्थ |
---|---|---|
तुना नाव काय शे ? | तुझे नाव काय आहे ? | What's your name ? |
तू कुठे राहस ? | तू कुठे राहतो ? | Where do you live ? |
तू कोणता काम करस ? | तुझा व्यवसाय कोणता आहे? | Which is your occupation ? |
गवळी समाजातील आडनावे[संपादन]
खडके, येवले, चव्हाण, हेकडे, झामरे, शेळके, शनवारे, चावंडे, निखाडे, काळे, गायन, भाकरे, सुडस्कर, बावस्कर, तोटे, भक्ते, आलोकर, घाटोळ, पाटणकर, घुमारे इ.
समाजातील जुन्या पिढीतील नावे[संपादन]
- पुरुषांची नावे :- कृष्णा, किसन, तेजू, गजा, कुसन, येशा, भिका, टुन्या, रघु, विठ्ठल, लक्ष्मण, गोविंदा, भीमा, झाबु, भैया, शंकर, गोश्या , नकुल, नत्थू, गणपत, गोपाल, लंगड्या, नाम्या, गुलाब, गोंडु, रामू, पप्पू, दिगांबर, उमराव, चरण, हिरु, पांडू, फकीर, सुखदेव, कोल्ह्या, पांड्या, गोंड्या, उदेभान, महादेव, लहान्या, मोतीराम, बाळू, राजू, तुकड्या, राजा ,चंद्रभान, साधुराम, धर्मराज, मारोती, मधु, सहादेव, काल्या इ.
- स्त्रियांची नावे :- नंदा, सुभद्रा, रुख्मी, लैमी, मंथरा, ठकी, राजी, बेडी, जानकी, देवकी, झिमाई, जमनी, मकु, तुयसा, सखू, अमरी, गोदी, द्रौपदी, सोनकी, मनकी, गेंदा, लखी, सीती, सखू, सोनी, कम्बोई, चिडी, सीता, लसमी, पार्वती, कमला, मंथरा, मीरा, पुंजी, बनू, नर्मदा, सिंधू, बोपी, ठमी इ.