Jump to content

भालचंद्र दत्तात्रय खेर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


भालचंद्र दत्तात्रय खेर
जन्म जून १२, इ.स. १९१७
महाराष्ट्र, भारत
मृत्यू जून २१,इ.स. २०१२
महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, कादंबरी
वडील दत्तात्रय

भालचंद्र दत्तात्रय खेर (जन्म : कर्जत-अहमदनगर जिल्हा, जून १२, इ.स. १९१७ - - पुणे; जून २१,इ.स. २०१२) हे मराठी लेखक होते. बी.ए. एल्‌‍एल.बी. झालेले भा. द. खेर हे पंचवीस वर्षे केसरीचे उपसंपादक होते. तत्पूर्वी त्यांनी अग्रणी, हिंदुराष्ट्र, भारत आदी दैनिकांत काम केले होते. वसंतराव काणे यांच्या "रोहिणी' मासिकाचे संपादनकार्य काही काळ त्यांनी केले. तसेच 'सह्याद्री' मासिकाचे ते दहा वर्षे संपादक होते. भा.द. खेर हे मराठी लेखक वि.स.खांडेकर यांचे मामेभाऊ लागत.

खेर स्वतःला प्राध्यापक श्री.म. माटे यांचे शिष्य म्हणवून घेत. पत्रकारितेच्या क्षेत्रात वावरत असताना सामाजिक कार्यातही ते तेवढ्यात आत्मीयतेने सहभागी होत. "केसरी' गणेशोत्सवातील दहा दिवसांचे सांस्कृतिक कार्यक्रम लोकप्रिय करण्यात खेर यांचा मोठा वाटा असे. जयंतराव टिळक, वि.स. माडीवाले, हरिभाऊ कुलकर्णी, रामभाऊ जोशी आदींच्या "केसरी'च्या आवारात जमणाऱ्या मैफिलीतील गप्पा, हास्यविनोद आणि एकमेकांची थट्टा हा एक अविस्मरणीय अनुभव होता. स.मा. गर्गे यांनी संपादित केलेल्या "यशवंतराव चव्हाण आणि पत्रकार' या पत्रसंवाद ग्रंथांतील भा.द. खेर आणि यशवंतराव चव्हाण यांच्यातील पत्रव्यवहार वाचल्यानंतर खेरांच्या ’लेखनध्यास' किती होता हे ध्यानात येते. केवळ लेखन विषयाशी निगडित असलेले मनस्वी पत्रकार असूनही त्यांना नवनवीन साहित्यनिर्मितीचा अखंड ध्यास असणे, हेच खेरांचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल.

कारकीर्द[संपादन]

भा.द. खेरांनी इ.स. १९४१ ते इ.स. १९८४ या काळात त्यांनी विपुल आणि दर्जेदार कादंबऱ्यांचे लेखन केले. मनोहर माळगावकरांच्या कादंबऱ्यांचे 'अधांतरी', दे प्रिन्सेस' हे त्यांनी केलेले अनुवादही गाजले. शेक्सपियरच्या 'हॅम्लेट', किंग लियर, विंटर्स टेल' इत्यादी नाटकांचे अनुवाद, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चरित्राची व साहित्याची ओळख करून देणारे ग्रंथ, श्री गुलाबराव महाराज, गजानन महाराज, साईबाबा आदी महात्म्यांची महती पटवून देणारी पुस्तके, ऐतिहासिक गुजगोष्टी, नाना नवलकथा' असे त्यांचे संकीर्ण लेखन प्रकाशित झालेले आहे. त्यांची ११७ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांची एकूण पृष्ठसंख्या २५०००हून अधिक आहे. ’समग्र लोकमान्य टिळक’ या सप्तखंडी ग्रंथाचे भा.द.खेर एक सहसंपादक होते.

कथा, कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन, निबंध, चरित्र, चरित्रात्मक कादंबरी, कुमार वाङमय, संतचरित्रे अशा विविध वाङ्मयप्रकारात खेर यांनी बहुमोल योगदान दिले. पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असताना सर्जनशील साहित्यिक म्हणून नावलौकिक मिळविणारे खेर ‘केसरी’चे सहसंपादक आणि ‘सह्याद्री’चे संपादक होते. त्यांचा जन्म नगर जिल्ह्यातील कर्जत येथे झाला. १९३९मध्ये वकिलीची पदवी मिळवतानाच त्यांचा ‘नादलहरी’ हा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला. १९६८ पर्यंत त्यांच्या जवळपास पन्नास सामाजिक, कौटुंबिक कादंबऱ्या, चरित्रे आणि इतर पुस्तके प्रकाशित झाली. त्यांचे आतेबंधू ज्येष्ठ साहित्यिक वि.स. खांडेकर यांच्याशी झालेल्या चर्चेतून ते चरित्रात्मक कादंबऱ्यां वळले. ‘यज्ञ’ ही त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरील लिहिलेल्या पहिल्या चरित्रात्मक कादंबरीची प्रकाशनापूर्वीच ११ हजार प्रतींची नोंदणी झाली होती. त्यांच्या गाजलेल्या साहित्यकृतींचे गारूड आजही रसिक वाचकांच्या मनावर कायम आहे. लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावरील ‘अमृतपुत्र’ ही कादंबरी लिहिण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना ताश्कंदला आणि ‘हिरोशिमा’ ही कादंबरी लिहिण्यासाठी जपानला राज्य अतिथी (स्टेट गेस्ट) म्हणून पाठविले होते.

भा.द. खेर यांच्या ‘लोकमान्य टिळक दर्शन’ नावाच्या ग्रंथाची नवी आवृत्ती २२ जून २०१७ रोजी प्रकाशित झाली.

सन्मान[संपादन]

 • ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात भा.द. खेर यांचा सत्कार करण्यात आला होता.
 • भा.द.खेर यांनी लिहिलेल्या हिरोशिमा या कादंबरीचे प्रकाशन भारताचे तत्कालीन उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले होते.
 • ’हिरोशिमा’चा इंग्रजी अनुवाद(बेल ऑफ हिरोशिमा) भारताचे राष्ट्राध्यक्ष ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या हस्ते प्रकाशित झाला.
 • पुणे महापालिकेने शहरातील सिंहगड रस्त्यावरील एका (संतोष हॉल)चौकाला ’भा.द.खेर चौक’ असे नाव त्यांच्या हयातीतच दिले होते.
 • जपान फाउंडेशनने १९७६साली भा.द.खेर यांना ’हिरोशिमा’ लिहिण्यासाठी जपानला आमंत्रित केले होते.

भा.द. खेर यांना मिळालेले पुरस्कार[संपादन]

कादंबऱ्या[संपादन]

 • आई माझी आहे
 • आनंद जन्मला (कुटुंबनियोजन या विषयावरील कादंबरी)
 • कल्पवृक्ष (महाभारतावरील कादंबरी)
 • क्रांतीच्या वाटेवर
 • गुलाबाचं फूल
 • चक्रव्यूह
 • तुका झाला पांडुरंग
 • नंदादीप
 • प्रायश्चित
 • बर्लिन गंगेला मिळाले.
 • वादळवारा
 • विजय
 • शुभमंगल
 • सुखाचा लपंडाव
 • हिरोशिमा

कथासंग्रह[संपादन]

 • आणखी संस्कार-कथा
 • कथा चिरेबंदी (लेखकाच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी)
 • नादलहरी (१९३९)
 • संस्कार-कथा
 • शिळोप्याच्या गोष्टी (निशीराज पब्लिकेशन)

चरित्रामक कादंबऱ्या[संपादन]

अनुवादित कादंबऱ्या[संपादन]

 • अधांतरी
 • ज्युलियस सीझर (नाटक)
 • मकिको कॉन(अपूर्ण)
 • दे प्रिन्सेस
 • हॅम्लेट (नाटक)
 • किंग लियर (नाटक)
 • विंटर्स टेल (नाटक)

नाटके[संपादन]

 • येथे ग्रह बदलून मिळतील

साहित्य समीक्षा[संपादन]

 • परदेशातील साहित्य सफर
 • माझे साहित्य स्वप्न

संदर्भ[संपादन]