Jump to content

बारा मावळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


नदी डोंगरातून खाली उतरली की जो विस्तीर्ण प्रांत नदीभोवती तयार होतो, त्याला मावळ म्हणतात असा स.आ.जोगळेकर ह्यांच्या 'सह्याद्री' ह्या पुस्तकांत संदर्भ आहे. अर्वाचीन मराठीत ह्याच भूरचनेला खोरे, दरा (=पर्वतामधले खोरे) किंवा दरी (=लहान दरा) म्हणतात.

सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोऱ्याला "मावळ" म्हणतात. पुण्याखाली एकूण १२ मावळ आहेत. काही ठिकाणी असेही वाचायला मिळते की शिवाजी राजांचे मावळे म्हणजे सैनिक हे पुणे जिल्ह्याच्या ज्या भागातून आले त्या भागाला मावळ प्रांत असे म्हणले जाई, पण त्याला भक्कम पुरावा नाही, तसेच स्वराज्यात पश्चिमेकडे असलेला हा प्रदेश म्हणजेच सूर्याच्या मावळतीची दिशा म्हणून त्याला ‘मावळ’ म्हणतात, अशीही कथा सांगितली जाते. हेही बरोबर नाही. हा मावळ प्रांत विस्तीर्ण असल्यामुळे त्याचे बारा भाग करण्यात आले.

बारा मावळ प्रांताची नावे पुढीलप्रमाणे :   
  1. आंदर मावळ
  2. कानद खोरे
  3. कोरबारसे मावळ
  4. गुंजन मावळ
  5. नाणे मावळ
  6. पवन मावळ
  7. पौड खोरे
  8. मुठा खोरे
  9. मोसे खोरे
  10. रोहिड खोरे
  11. वळवंड खोरे
  12. हिरडस मावळ

१. आंदर मावळ : या भागातून आंध्र नदी उगम पावते व वाहते, म्हणून या प्रदेशाला आंदर मावळ म्हणतात. आंदर मावळातली गावे : आंबळे, इंगळूण, उकसाण, कचरेवाडी, करंजगाव, कल्हाट, कशाळ, कांब्रे, कांब्रेनामा, किवळे, कुणे-अनसुटे, कुसावळी, कुसूर, कोंडिवडे अमा, कोंडिवडे नामा, खांड(खांडी), गोवित्री, घोणशेत, जाधववाडी, जांभवली, टाकवे बुद्रुक, डाहूली, थोराण, नवलाख उंबरे, नागाथली, नाणे, निगडे, निळशी, पवळेवाडी, पाले, पिंपरी, फळणे, बधलवाडी, बेलज, बोरवली, ब्राम्हणवाडी, भाजगाव, भोयरे, मंगरूळ, माऊ, माळेगाव खुर्द, माळेगाव बुद्रुक, मिंडेवाडी, मोरमारवाडी(मोरमारेवाडी), राकसगाव, वडिवळे, वडेश्वर, वहाणगाव, वळवंती, वाउंड, शिरदे, शिरे, सावळा, सोमवडी, वगैरे.


२. कानद खोरे : या भागातून कानंदी नदी उगम पावते आणि वाहते म्हणून त्याला कानंद मावळ म्हणतात. कानंद मावळाच्या सीमेवर तोरणा हा किल्ला आहे. कादवे व भट्टीची ह्या खिंड, तर देवराई अशी ठिकाणे आहेत.


३. कोरबारसे मावळ : मुळशी नदीच्या खोऱ्याला कोरबारसे मावळ नाव होतं, मुळशी नदी आताच्या नकाशावर बिलकुल सापडणार नाही. तैलबैला, घनगड, कोरीगड, सुधागड हे किल्ले त्या प्रांतामधले आहेत.


४. गुंजन मावळ : हा गुंजवणी नदीच्या खोऱ्याचा प्रदेश म्हणून गुंजन मावळ.या मावळात 84 गावे होती. याच्या उत्तरेस कानद खोरे, ईशान्येस खेडबारे, पूर्वेस शिवगंगा नदी, आग्नेयेस वेळवंड खोरे, दक्षिणेस हिरडस मावळ, नैर्ऋत्य व पश्चिमेस कोकण आणि वायव्येस मोसे खोरे आहे. ह्या मावळ प्रांताची देशमुखी सरसेनापती हैबतराव शिळीमकर यांच्या घराण्याकडे होती. त्यांचा किताब हैबतराव असा आहे.

५. नाणे मावळ : हा मध्ययुगीन काळातील प्रशासकीय विभाग होता. सध्याच्या भाषेत सांगायचे तर हा मध्ययुगातील एक तालुका होता. नाणे मावळ हा भाग सध्याच्या मावळ तालुक्यात येतो. मध्ययुगीन तर्फे नाणे मावळात एकूण ८८ गावे होती. ह्या तर्फेचे मुख्य गाव कसबे नाणे होते व ह्या गावावरूनच नाणे मावळ हे नाव ह्या तर्फेस मिळाले आहे. लोहगड, विसापूर, राजमाची हे किल्ले ह्या मावळात मोडत. लोहगड-विसापूर ज्या डोंगर रांगेवर आहेत, ती रांग नाणे मावळची दक्षिण सीमा होती. तर जांभिवली, उकसान, माऊ ही उत्तर सीमेवरील गावे. खंडाळा, कुरवंडे ही गावे पश्चिम सीमेवर व मंगरूळ, वडगाव ही गावे पूर्व सीमेवर होती. नाणे मावळात इंद्रायणी व कुंडलिका ह्या मुख्य नद्या आहेत.

देशमुख हे तत्कालीन तालुक्यांचे प्रमुख असत. नाणे मावळचा कारभार दोन देशमुख पाहत असत. गरुड देशमुख ४४ गावांचा व दळवी देशमुख ४४ गावांचा कारभार पाहत असत. तसेच देशमुखांच्या मदतीसाठी देशपांडे किंवा देशकुलकर्णी हे वतनदार असत. नाणे मावळात दळवी देशमुखांचे दोन व गरुड देशमुखांचे दोन असे चार देशपांडे प्रत्येकी २२ गावांचा कारभार पाहत असत.

६. पवन मावळ : पवन मावळ किंवा पौन मावळ हा मध्ययुगीन काळातील प्रशासकीय विभाग होता. सध्याच्या भाषेत सांगायचे तर हा मध्ययुगातील एक तालुका होता. तत्कालिन पौन मावळात ८० गावे होती. पवना ही ह्या भागातील मुख्य नदी. ह्या नदीवरूनच ह्या भागास पवन किंवा पौन मावळ हे नाव पडले आहे. पौन मावळातील गावे ही सध्याच्या मावळ तालुक्यात व काही थोडी गावे पौड तालुक्यात मोडतात. उत्तरेला लोहगड विसापूरची डोंगर रांग; पश्चिमेला आतवण, मोरवे ही गावे; पूर्वेला चांदखेड, बेबडवोहोळ तर दक्षिणेला दखणे, सावरगाव ह्या पवन मावळच्या सीमा होत्या. शिंदे देशमुख व भोपतराव घारे देशमुख हे पौनमावळचा कारभार पाहणारे वतनदार होते. तुंग उर्फ कठीणगड व तिकोणा उर्फ वितंडगड हे ह्या मावळातील किल्ले. सतराव्या शतकाचा शेवट ते १९४७ सालापर्यंत पौन मावळातील हे दोन किल्ले व बरीच गावे पंतसचिवांच्या भोर संस्थानात होती. या मावळांचे रक्षण करण्यासाठी उत्तुंग असे लोहगड, विसापुर, तुंग, तिकोणा इ. गडकिल्ले सीमेवर छातीचा कोट करून उभे ठाकले आहेत. या पवन मावळात येण्यासाठी चौफेर बाजूला तळेगाव, उर्से, बऊर, आपटी व दुधिवरे खिंड येणाऱ्याचे स्वागत करतात. निसर्गाने संरक्षित केलेल्या या पवन मावळाला छत्रपती शिवाजी महाराजांनी साद घातली, त्याचे नैसर्गिकदृष्ट्या वेगळेपण ओळखले आणि म्हणूनच सुरतेच्या पहिल्या लुटीतील संपूर्ण खजिना लोहगडावर संरक्षित ठेवला. ही या मावळाची खासियत आहे. या मावळातील भाजे, कार्ले आणि बेडसे लेणी म्हणजे सह्याद्रीची आभूषणे होत.

७. पौड खोरे : यामध्ये पौड गाव, बावधन, पाषाण, कोथरूड, लवळे गाव, पिरंगुट, भूगांव, मुळशी गाव, ताम्हिणी घाटाचा भाग, दिसली गाव, चाचीवली गाव, अंबडवेट गाव इ. गावांचा समावेश होतो.

८. मुठा खोरे : हे मुठा नदीच्या उगमापासून पुढील काही भागात वसलेले आहे. मुठा खोरे हे शिवकाळातील बारा मावळातील एक मावळ आहे. शिवकालीन पत्रात मुठा खोऱ्याचा बऱ्याच वेळा उल्लेख आलेला आहे. पुण्याच्या नैर्ऋत्य दिशेने वाहत येणारी ही पुण्याची जीवनगंगा मुळशी तालुक्यात वेगरे या गावी उगम पावते आणि खाली वाहत येऊन सांगरून डावजे या गावाजवळ तिला मोशी आणि आंबी या तिच्या दोन उपनद्या मिळतात. मुठा खोऱ्यात ऐकून १९ गावे आहेत. वेगरे, भोडे, वेडे, आंदगाव, लव्हार्डे, कोळावडे, खारवडे, माळेगाव, मुठा, कोंढुर, भरेकरवाडी, दिघेवाडी, हाळंदेवाडी, जातेडे, बहुली ही त्यातील काही गावे होत. बहुलीच्या पुढे कर्यात मावळ सुरू होते. मुठा खोऱ्याची देशमुखी मारणे घराण्याला होती. त्यांचा किताब गंभीरराव हा आहे.

९. मोसे खोरे : हा प्रांत वेल्हे तालुक्यात मोसे / मुसे नदी जवळ येतो. सरसेनापती यशवंराव (बाजी) पासलकरांकडे या प्रांताची देशमुखी होती, निगडे-मुसे गावापासून ते सांगरून-डावजेपासून, धामन-ओव्होळपर्यंतची ८४ खेडी त्यांच्या अखत्यारीत होती.

१०. रोहिड खोरे : रोहिड खोरे हे नीरा नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे. या खोऱ्यात ४२ गावे होती. त्यापैकी ४१ गावे सध्याच्या पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात मोडतात.

११. वळवंड खोरे : हे वेळवंडी नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे, याच नदीला येळवंती (Yelwanti), येलवंती, किंवा येळवंडी म्हणतात. वळवंड धरण आणि भोर तालुक्यातले भाटघर धरणही याच नदीवर आहे.

१२.हिरडस मावळ :हिरडस मावळ : भोर तालुक्यातील आळंदे ते उंबर्डे या ५३ गावच्या भागाला हिर्डस मावळ म्हणून ओळखले जाते. या 53 गावाच्या देशमुखीचा कारभार बांदल नाईक देशमुख यांच्याकडे होता. बांदल देशमुख कधीही निजामशाही आणि आदिलशाहीला जुमानत नसत. या बांदल घराण्याचे कर्तबगार पुरुष कृष्णाजी नाईक बांदल देशमुख होते. कृष्णाजी आणि कारीचे जेधे यांच्यात एकूण सात युद्धे विविध कारणावरून झाली. त्यात सातवे युद्ध रोहीड आणि हिर्डस मावळाच्या सीमेवर असणा-या कासारखिंडीत झाले. त्यात बंदलांचा विजय झाला पण दोन्ही कडील एकूण 300 लोक धरातीर्थी पडले. अनेकांचे संसार उध्वस्त झालेले पाहून बांदल आणि जेधे यांनी सलोखा केला. आणि त्यांच्यातली कटकट वारली. पुढे दादोजी कोंडदेव आदिलशाह चा सिंहगडाचा (कोंढाणा) किल्लेदार म्हणून काम पाहू लागला. दादोजी आणि बांदलांचे खटके उडाले.कृष्णाजी नाईक बांदल यांनी दादोजीचे घोडे बुंढे करून पाठवले. हा राग मनात ठेवून एकदा कृष्णाजी व इतर देशमुख गोत सभेसाठी 1636 ला भेटले असता दादोजी ने कपाटाने कृष्णाजींना कैद केले त्यातच त्यांचा मृत्यू झाला. कृष्णाजी नाईक बांदल यांच्या पत्नी मुलगा बाजी बांदल यांना घेऊन माहेरी फलटणला जाऊन राहिल्या. बाजी हे राजेनिंबाळकर यांच्या तालमीत वाढू लागले. एकदा शहाजीराजे यांनी बाजींना लढतांना पाहिले व निंबाळकरांना विचारले हा योद्धा कोण? त्यावर त्यांनी शहाजीमहाराजांना सर्व हकीकत सांगितली. शहाजी महाराजांनी बाजींना बोलवून घेतले आणि परत हिर्डस मावळात जाऊन देशमुखी चालवण्यास सांगितले. पुढे हे बाजी बांदल आणि दीपाऊ आपल्या फौजेनीशी स्वराज्यात सामील झाले. खळद-बेलसरच्या लढाईत बांदल घराण्याचे 250 वीर स्वराज्याच्या कामी आले. जावलीच्या दोन्ही स्वारी मध्ये बांदल वीर सहभागी झाले होते. अफजल खानाच्या वधा प्रसंगी बांदलसेना पार घाटात तैनात केली होती. या सेनेने बाजींचा मुलगा रायाजींच्या नेतृत्वात कोल्हापूर च्या विशालगड पर्यंत मजलं मारली आणि पन्हाळा आणि विशालगड मजबूतीकरण करून स्वराज्याची नवी सिमा निश्चित केली. पुढे सिद्धी जोहर स्वराज्यावर चालून आल्यावर बांदलसेनेने स्वराज्यासाठी सर्वोच्च बलिदान देऊन महाराजांना पन्हाळ्यावरून विशालगड ला सुखरूप पोहचवले. या युद्धात बांदलांचे दिवान बाजीप्रभू आणि 300 बांदल वीर स्वराज्याच्या कामी आले. हे बांदलांचे शौर्य पाहुन महाराजांनी स्वराज्याच्या पहिल्या तलवारीचा मान रायाजी बांदल यांना दिला.

शाहिस्तेखान पुण्यात आल्यावर महाराजांनी लाल महालावर छापा टाकला या छाप्यात कोयाजीराव बांदल सहभागी होते.त्यांनी पराक्रम गाजवला. त्यांना चार वार लागले. त्यांची समाधी नेकलेस पॉईंट जवळ आहे.

शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयास गेले असता १६७७ साली पुण्याजवळच्या गाधाडी म्हणजे आत्ताचे शिक्रापूर याठिकाणी मोगली फौजेचा हल्ला झाला. हा हल्ला परतवून लावण्यासाठी रायाजी नाईक देशमुख मोगली फौजेवर चालून गेले. त्या युद्धात त्यांनी पराक्रम गाजावला पण ते धरातीर्थी पडले. त्यांना बाजीप्रभूंच्या मुलाने वतनावर आणले आणि त्यांचा अंत्यविधी पिसावरे या गावी केला. आजही भोर तालुक्यातील पिसावरे गावात बांदलविरांच्या समाध्या पाहायला मिळतात. तिथे कृष्णाजी,दीपाऊ,बाजी,रायाजी या बांदल घराण्यातील मातब्बर व्यक्तींच्या समाध्या आहेत.