बंजारा साहित्य
बंजारा साहित्य (Banjara Literature) भारतीय वाड:मयीन चळवळीतील एक समृद्ध साहित्य आहे. बंजारा साहित्य हे देवनागरी लिपीतून आज मोठ्याप्रमाणात पहायला मिळते. आजवर अधिकतेने लोकसाहित्य, मौखिक साहित्याच्या स्वरुपाने बंजारा साहित्य जतन केल्याचे दिसून येते. ज्या प्रमाणे मराठी साहित्य , दलित साहित्य , ग्रामीण साहित्य , आदिवासी साहित्य , स्त्रीवादी साहित्य , श्रमीक साहित्य म्हणून पाहिले जाते , त्याचप्रमाणे बंजारा साहित्य म्हणून बघितले जाते. बंजारा साहित्याला स्वतः ची स्वतंत्र बंजारा भाषा , वैभवशाली संस्कृतीचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. 'बंजारा साहित्याचा अस्तित्त्व त्यांच्या जीवनमूल्यात आणि तत्वज्ञानात आहे.' अखिल भारतीय स्तरावर बंजारा साहित्य संमेलन होतांना दिसून येते. ' थोर समाजसुधारक तथा आद्य इतिहासकार बळीरामजी पाटील ते आजच्या नव्या पिढीतील सर्जनशील साहित्यिक , गोर बंजारा साहित्य अकादमीचे शिल्पकार एकनाथराव पवार ' हा बंजारा साहित्य, संस्कृतीला समृद्ध करणारा मौलिक कालखंड मानला जातो.[१]
बंजारा लोकसाहित्य
[संपादन]•लडी •भजन •लेंगी •आरदास •ढावलो •कलापथक •केणावट •साक्तर •हवेली •वांजळा •नक्ता •साखी •रणोळी, रणेरी (युद्ध प्रसंगी लढायावर जाण्यापूर्वी पत्नी,आई किंवा ज्येष्ठांनी म्हटलेले स्फुर्ती गीत.
बंजारा साहित्याचा इतिहास
[संपादन]बंजारा साहित्याचा इतिहास हा प्राचीन काळापासून आहे. साहित्य आणि समाज यांच्यातील परस्परसंबंधाचा विचार बंजारा साहित्याच्या बाबतीत ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेनंतर करता येईल. बंजारा संस्कृती ही विमुक्त , स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी प्राचीन संस्कृती जरी असेल तरी , खऱ्याअर्थाने बंजारा साहित्याला १८९८ नंतरच कलाटणी मिळाली. १८९८ ते १९४८ हा या साहित्यनिर्मितीच्या पूर्वतयारीचा काळ आहे. 'प्राचीन बंजारा वाडःमयीन इतिहास' , 'मध्ययुगीन बंजारा वाडःमयीन इतिहास' , 'आधुनिक बंजारा वाडःमयीन इतिहास' साधारणतः असे कालखंड बंजारा साहित्याचे कालखंड म्हणता येईल. सन १८९८-१९४८ , १९४८-१९७३ , १९७३-१९९८, १९९८-२०२४ या १२५ वर्षांच्या प्रदीर्घ काळात बंजारा साहित्य विस्तारला. यानुसार '२०२४-२५' हे वर्ष आधुनिक बंजारा वाडःमयाचा शतकोत्तर रौप्यवर्ष' ठरतो. प्राचीन साहित्य आणि मध्ययुगीन साहित्याच्या कालखंडात लोकसाहित्याची भूमिका अग्रगण्य राहिली. बंजारा साहित्य संस्कृतीचा इतिहास मौखिक लोकसाहित्याच्या रुपाने आजही जीवंत आहे. ज्यात लडी , केणावट , लेंगी, भजन, साक्तर , आरदास, ढावलो , हवेली , रणेरी, साकी , कलापथक(नाट्य) हे साहित्य प्रकार दिसून येते. या माध्यमातून बंजारा भाषा , साहित्य आणि संस्कृतीचे संवर्धन होत आले. पाश्चिमात्य देशांमधील क्रांतीमुळे एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात अनेक विचारप्रवाह उदयाला आले. भारतीय स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात देखील सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात स्थित्यंतरे झालीत. याच काळात बळीराम पाटील , फुलसिंग नाईक, हरीसिंह सदा पवार आणि अन्य काही आधुनिकतावादी समाजसुधारकांनी समाजसुधारणेची चळवळ राबविण्यास सुरुवात केली. पुढे महानायक वसंतराव नाईक सारख्या प्रख्यात राजनितीज्ञ , समाजसुधारक आणि क्रांतदर्शी व्यक्तिमत्त्वाच्या उदयाने बंजारा समाजजीवनात क्रांतिकारी बदल घडून आले. तथापि जलक्रांतीचे जनक सुधाकरराव नाईक (माजी राज्यपाल, मुख्यमंत्री) यांना पत्रकारिता आणि साहित्यक्षेत्रात फार रस होता. या विविध बाबींचा प्रभाव एकूणच बंजारा साहित्य संस्कृतीवर पडल्याचे दिसून येते.[२]
आधुनिक बंजारा वाडःमयीन इतिहास अभ्यासतांना विविध पैलूंचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. कालखंड म्हणजे केवळ वर्षगणना नसते.तर त्याला संस्कृतीचे संदर्भ जोडले जातात.त्या काळातील विशिष्ट मानवी वर्तनाचा अनुबंध असतो. या काळात बंजारा साहित्य संस्कृतीचे दर्शन आद्य इतिहासकार तथा थोर समाजसुधारक बळीराम पाटील यांनी घडवून आणले. त्यानंतर प्रतिभावंत साहित्यिक आत्माराम कनिराम राठोड यांनी बंजारा तांडा व्यवस्थेतील व्यथा आणि संघर्ष आपल्या 'तांडा' या आत्मकथा तून पुढे आणली. येथूनच पुढे बंजारा साहित्याचा लिखित प्रवास सुरू झाला. महेशचंद्र बंजारा , पद्मश्री सोमलाल नायक खेतावत, डॉ.रामकोटी पवार , उमा नाईक , रमेश आर्या , मांगीलाल राठोड , डॉ.विजया चंदावत , प्रा. मोतीराज राठोड,ग.ह.राठोड, चिनीया नाईक , धनंजय नाईक , मोहन नाईक, प्रकाश राठोड , इंदलसिंह जाधव ,प्रा.रमेश जाधव , अशोक पवार , पंजाब चव्हाण , वीरा राठोड,एकनाथ पवार , रमेश नायक आदि प्रतिभावंत साहित्यिक , लेखकांनी बंजारा साहित्याचा वारसा अबाधित ठेवला. बंजारा साहित्य, संस्कृतीला गतिमान करण्याचे स्तुत्य कार्य या प्रज्ञावंतानी केले. तांडयाला सुधारणाची बाराखडी बळीराम पाटील यांनी तर परिवर्तनाची विद्रोही बाराखडी आत्माराम राठोड यांनी दिली.आणि संविधानिक जाणिवेची चौदाखडी एकनाथ पवार यांनी दिली. वाडःमयीन क्षेत्रातील या सर्नजशीलतेची साहित्यसाधना एकूणच बंजारा साहित्य विश्वाला गतिमान करणारी ठरली.[३]
या काळात पारंपरिक रुढी ग्रस्त जीवनाची कालबाह्यता लक्षात आल्यानंतर समाजात प्रबोधनाची चळवळ सुरू झाली. त्यातून वैचारिक साहित्याची निर्मिती होऊ लागली. बंजारा साहित्यात स्वच्छंदवाद , सौंदर्यवाद , इहवाद ,बोधवाद ,रंजनवाद , जीवनवाद ,अभिजाततावाद , आधुनिकवाद अशा विविध तत्वविचारांचा ओळख होण्यास सुरुवात झाली.
बंजारा साहित्य हे आजघडीला मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलगू, कन्नड, गुजराती, राजस्थानी, बंजारा अशा विविध भाषांमधून दिसून येत आहे. मोतीराज राठोड, वीरा राठोड , रमेश नायक (2024) यांनी साहित्य अकादमीच्या पुरस्कार पर्यत मजल गाठली. तर वाशीम येथील विजय जाधव यांच्या कथासंग्रहास राज्य वाडःमयीन पुरस्कार देखील मिळाले. उल्लेखनीय बाब म्हणजे एकनाथ पवार यांंच्या एकूणच सामाजिक आणि वाडःमयीन क्षेत्रातील कार्याचा उल्लेख राज्याच्या विधानपरिषदेतही झाला. विधीमंडळात उल्लेखित होणारे एकनाथ पवार हे पहिले बंजारा साहित्यिक व अभ्यासक ठरले. 'बंजारा भाषागौरव गीत' सुद्धा एकनाथ पवार यांनी रचले.[४] तर सोमलाल नायक खेतावत हे पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलेले पहिले बंजारा साहित्यिक ठरले. राष्ट्रपती द्रोपदीजी मुर्मू यांच्या हस्ते खेतावत यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले. जयराम सिताराम पवार यांनी बंजाराचा प्राचीन इतिहास समर्पकपणे पुढे आणले. तर प्रा. अशोकराव पवार यांनी 'स्वर्णिम बंजारा' या शीर्षकाखाली बंजाराचा प्राचीन इतिहास पुढे आणण्याचे प्रयत्न केले. भिमणीपुत्र मोहन नाईक यांनी बंजारा भाषेचे सौंदर्य आपल्या लेखणीतून रेखाटली आहे. महानायक वसंतराव नाईक यांची सुपूत्री अरुंधती ऊर्फ वर्षा यांनी 'घुंगुरवाळा' तर उमा नाईक यांनी 'सिटी ऑफ मांडवी' ही साहित्य निर्मिती करून बंजारा साहित्यात योगदान दिले. बंजारेत्तर अनेक विद्वानांनी आणि इतिहासकारांनी बंजारा साहित्य आणि संस्कृतीवर प्रकाश टाकला आहे. ज्यात जगप्रसिद्ध शायर नजीर अकबराबादी यासह आचार्य श्रीराम शर्मा, पंडीत गौरीशंकर ओझा, श्रीराम लागू यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
श्रमिक साहित्य, दलित साहित्य, मराठी साहित्य, विद्रोही साहित्य, आदिम साहित्य या संपूर्ण वाडःमयीन वर्तुळात आता बंजारा साहित्य देखील नामोल्लेखित होवो पावत आहे. लेखणीबरोबरच लढा अर्थात 'सशक्त लिहिणारे आणि संविधानिक लढणारे' ही दोन्ही भूमिका पेलणाऱ्या साहित्य नायकाची आज बंजारा साहित्याला खरी गरज आहे. 'आत्माराम राठोड ते एकनाथ पवार' हा परिवर्तनवादी बंजारा साहित्य चळवळीचा एक सर्जनशील वारसा नव्या पिढीसाठी प्रेरक ठरला आहे.[५]
बंजारा साहित्य अकादमी
[संपादन]काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत वास्तव्यास असणाऱ्या वैभवशाली संस्कृतीच्या बंजारासाठी सिंधी आणि गुजराती अकादमीच्या धर्तीवर बंजारा भाषा, साहित्य, संस्कृती व कलांचे संवर्धन व्हावे. इतर भाषिकांच्या साहित्य अकादमी प्रमाणेच बंजाराचा समृद्ध वारसा अबाधित रहावे.तसेच बंजारा भाषेतून साहित्य निर्मितीला चालना मिळावी यासाठी साहित्य संस्कृती अभ्यासक तथा साहित्यिक एकनाथ पवार यांनी गोर बंजारा अकादमीची संकल्पना सर्वप्रथम सन २०१५ मध्ये पोहरागड भक्तीधाम येथे मांडली. मान्यवरांच्या उपस्थितीत पवारांनी बंजारा अकादमीची गरज व प्रारूप देखील मांडले होते.[६] या सभेत प्रसिद्ध प्रबोधनकार प्रेमदास महाराज वनोलीकर, महंत जितेंद्र महाराज , जि.प. उपाध्यक्ष बाबूसिंग नाईक, ॲड.पंडीत राठोड, ज्येष्ठ साहित्यिक पंजाब चव्हाण पुसद, कवी रतन आडे ,बंजारा पुकारचे संपादक अवी चव्हाण आदिंची उपस्थिती होती. यातून पुढे शासन स्तरावर बंजारा अकादमी स्थापन करण्याबाबत पुढाकार घेण्यात आला. सन २०१८ मध्ये नगारा वास्तूसंग्राहालय भूमीपूजन सोहळा प्रसंगी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंजारा अकादमीची घोषणा केली. अकादमीसाठी मंत्री संजय राठोड , माजी खासदार हरिभाऊ राठोड आणि साहित्यिक एकनाथ पवार यांचे सातत्याने पाठपुरावा होते. परिणामी राज्य शासनाने बंजारा साहित्य संस्कृती व कलाच्या संवर्धनासाठी गोर बंजारा अकादमी स्थापन करण्याचा १६ मार्च २०२४ रोजी घेतलेला निर्णय बंजारासाठी ऐतिहासिक ठरला. साहित्यिक -भाषिक आदान - प्रदानातून राज्याचा सांस्कृतिक विकास साधून राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी या हेतूने शासनाने महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमी, महाराष्ट्र राज्य तेलुगू साहित्य अकादमी, महाराष्ट्र राज्य बंगाली साहित्य अकादमी बरोबरच महाराष्ट्र राज्य गोर बंजारा साहित्य अकादमी स्थापन करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी निर्णय घेतला. गोर बंजारा साहित्य अकादमीची संकल्पना, पायाभरणी, पाठपुरावा आणि प्रसार असे चौफेर पातळीवर योगदान दिल्याने प्रसिद्ध साहित्यिक एकनाथ पवार हे गोर बंजारा साहित्य अकादमीचे शिल्पकार मानले जातात.[७]
बंजारा नियतकालिके ,पत्रिका
[संपादन]•गोरवाणी •बंजारा पुकार •बंजारा दर्पण •तांडा वार्ता
बंजारा साहित्यिक, लेखक , कवी
[संपादन]बळीराम पाटील नायक• आत्माराम कनिराम राठोड •पद्मश्री सोमलाल नायक खेतावत •जयराम सिताराम पवार • सुरेश कापडिया • डा.वी.रामकोटी पंवार • डा.इंदलसिंह जाधव • भिमणीपुत्र मोहन नाईक • प्रा.अशोकराव पवार • एकनाथ पवार नायक • महेशचंद्र बंजारा • राजूसिंग बाणोत • रमेश आर्या • जयपाल सिंह राठौड • हरिभाऊ राठोड • हरलाल सिंह पवार नायक• इंदरसिंह बालजोत •यशवंत जाधव •विजया चांदावत •मोतीराज राठोड , वीरा राठोड •पजाबराव चव्हाण •रमेश नायक • विजय जाधव •प्रा.प्रकाश राठोड •सुभाष राठोड, •गणपत राठोड •प्रा.दिनेश राठोड • रतन बाणोत • जुन्या नव्या काळातील अशा अनेक साहित्यिक व लेखकांचा बंजारा भाषा, साहित्यामध्ये उल्लेख केला जातो. थोर समाजसुधारक आणि आद्य इतिहासकार बळीरामजी पाटील ते आजच्या नव्या पिढीतील सर्जनशील साहित्यिक आणि विचारवंत एकनाथराव पवार हा बंजारा साहित्याचा कालखंड बंजारा साहित्य संस्कृतीला समृद्ध करणारा मौलिक कालखंड मानला जातो.
बंजारा साहित्य समीक्षा
[संपादन]बंजारा वाडःमयीन परंपरा फार काळापासून चालत आलेली आहे. परंतु बंजारा साहित्य हे संधी , समीक्षा आणि राजाश्रय अभावी आजवर उपेक्षित राहिले. इतर साहित्य क्षेत्राप्रमाणे बंजारा साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास व्यापकपणे आजवर झालेले नाही. बंजारा साहित्यातील वेगळेपण जपणे गरजेचे आहे. बंजारा साहित्यातील प्रतिमा आणि आदीबंधाचा अन्वयार्थ नव्याने शोधणे गरजेचे आहे.
बंजारा नवसाहित्यात सर्जनशीलतेचा सजगपणे विचार होतांना दिसून येते. नव्या पिढीतील प्रज्ञावंताच्या लेखनीत लिओ टॉलस्टॉय , रुसो , विल्यम वर्ड्स्वर्थ , टी.एस. एलियट , आल्बेर काम्यू , डेल कार्नेगी , हेरॉल्ड लास्की , थॉमस पेण यासह गुरू नानकदेव , संत सेवालाल , संत कबीर , संत मीराबाई , राष्ट्रपिता महात्मा गांधी , महानायक वसंतराव नाईक यांसारख्या थोर तत्वचिंतकांचा , महात्म्यांचा प्रभाव झळकतांना दिसून येतो. बंजारा साहित्य कृतीची समीक्षा ही सैद्धांतिक , उपयोजित आणि संकिर्ण अशा विविध पातळीवर होत आहे.
अ.भा.बंजारा साहित्य संमेलन
[संपादन]1. अखिल भारतीय बंजारा साहित्य संमेलन , वाशिम , महाराष्ट्र - अध्यक्ष , ग.ह.राठोड
2. अखिल भारतीय बंजारा साहित्य संमेलन , नागपूर - अध्यक्ष , सुनिता अशोकराव पवार
3.अखिल भारतीय बंजारा साहित्य संमेलन , डोंबिवली मुंबई - अध्यक्ष , भिमणीपुत्र मोहन नायक
4.अखिल भारतीय बंजारा साहित्य संमेलन वाशिम, अध्यक्ष , प्रा.प्रकाश राठोड
5. अखिल भारतीय बंजारा साहित्य संमेलन , हैदराबाद, तेलंगणा - अध्यक्ष , डॉ. यशवंत जाधव
बंजारा ग्रंथमाला
[संपादन]• गोर बंजारा क्षत्रियोका इतिहास - बळीराम पाटील-नायक
•बंजारा समाज और संस्कृति - आचार्य श्रीराम शर्मा
• तांडा - आत्माराम कनिराम राठोड (डॅनियल राणा)
•गोर राजपूत के अनमोल रतन - इंदरसिंह बालजोत
•बंजारो का सांस्कृतिक इतिहास - डॉ जयपाल सिंह राठोड
•लोहगड जगातील सर्वात मोठा किल्ला - जयराम पवार
•शहिद ए आझम लखीशाह बंजारा - अशोकराव पवार
•दी हिस्टोरी ऑफ ग्लोबल बंजारा - एकनाथ पवार नायक
•बंजारा साहित्य एवं संस्कृति - इंदलसिंह जाधव
•लमाण बंजारा आणि वंजारी - हरिभाऊ राठोड , •सेनं सायी वेस - विरा राठोड , • राजा भोज :परमारो की गोरवंशीय विरासत - जयराम पवार , •अस्वस्थ तांडा - विजय जाधव , •याडी - पंजाब चव्हाण , • बंजारा समाज : गोरबोली आणि मौखिक वाड्.मय - डॉ. सुभाष राठोड
संदर्भ
[संपादन]- ^ चव्हाण, भट्टू वेंकण्णा (2024). "बंजारा साहित्य विश्व की एक गरिमापुर्ण विरासत". कुंटेडा. 4: 8.
- ^ Chavan, M.R. (2024). "History and inspiration of modern Banjara Literature". Kunteda. 4: 5–6.
- ^ Chavan, M.R (2024). "History and inspiration of modern Banjara Literature". Kunteda. 4: 6–7.
- ^ "बंजारा भाषागौरव गीत भाषेचे वैभव अन् अस्मिता जागवीणारे". इये मराठीचिये नगरी. २१ फेब्रुवारी २०२३.
- ^ 'तांडाकार ते वेदनाकार' : आधुनिक बंजारा साहित्य चळवळीचा वारसा. अ. भा. बंजारा साहित्य संमेलन वाशीम: बंजारा हुंकार. २०१६. pp. ९०-९४. ISBN 9788191054330.
- ^ "गाेर बंजारा साहित्य अकादमीला राज्य सरकारनं दिली मान्यता". Lokmat. 2024-03-17. 2024-03-17 रोजी पाहिले.
- ^ "बंजारा भाषा, साहित्य व संस्कृती ऐतिहासिक ठेवा | Gaurav Prakashan". www.gauravprakashan.com. 2024-03-21 रोजी पाहिले.