मीरा (कृष्णभक्त)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मीराबाई (सु. १४९८ - सु. १५५७) ही राजस्थानातील उच्चकुलीन हिंदू कृष्णभक्त होती. वैष्णव भक्तिपरंपरेतील संतांपैकी ती एक आहे. मीरेची १२००-१३०० भजने उपलब्ध आहेत आणि ती भारतभर प्रसिद्ध असून त्यांची अनेक भाषांतरे झालेली आहेत. आपल्या बहुतांश रचनांमध्ये मीरेने ईश्वराप्रती तिचे असलेले प्रेम व्यक्त केलेले आहे.


जीवन[संपादन]

सध्याच्या राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कुडकी गावात एका रजपूत कुटुंबात मीरेचा जन्म झाला. राव दूदाजी हे मीरेचे आजोबा तर मेडतिया जहागिरीचे राठोड असलेले रतनसिंह हे वडील. राव दूदाजी हे मंडसौर वसविणाऱ्या मांडोरच्या राव जोधाजीचे पुत्र होते.

बालपणीच झालेल्या मातृवियोगामुळे वैष्णव भक्त असलेल्या राव दूदाजी यांच्या छत्राखाली मीरेचे बालपण व्यतीत झाले. एका आख्यायिकेनुसार लग्नाची एक वरात बघून मीरेने आईला "माझा पती कोण होणार?" असे विचारले असता आईने तिला घरातील कृष्णाच्या मूर्तीपुढे नेले आणि "हा तुझा पती" असे सांगितले होते. मीरेच्या घरी येणाऱ्या एका साधूकडे असलेली कृष्णाची मूर्ती तिला भारी आवडे. ही मूर्ती तिने हट्टाने स्वतःकडे ठेवून घेतली. पुढे तू ईश्वराला खूष ठेवू शकणार नाहीस असे सांगून साधूने ही मूर्ती नेली. मीरा ललिता या मैत्रिणीला व जयमल या चुलतभावाला घेऊन साधूकडे गेली. त्यांनी पाहिले की, साधू देत असलेली कोणतीही गोष्ट ती मूर्ती स्वीकारीत नव्हती. आख्यायिकांमधील काही भेदांनुसार ती मूर्ती रडू लागली. दुसऱ्या दिवशी साधूने मूर्ती मीरेला दिली आणि मग ती कायम तिच्याजवळ राहिली. मीरा 'मूर्तिप्रेमी' बनली. तिने त्या मूर्तीशी स्वतःचे लग्न लावले, असेही सांगितले जाते.

कृष्णाचे भजन गाणारी मीरा

लहान वयातच चित्तोडच्या राणा संगाचा पुत्र असलेल्या भोजराज याच्याशी मीरेचा विवाह ठरला. कृष्णाशी आपले लग्न झाले आहे असे मानीत असल्याने मीरेला हा विवाह पसंत नव्हता. नव्या घराच्या कुलदैवताची उपासना करण्यास तिने नकार दिला. इ. स. १५२७ मध्ये दिल्लीपतीशी झालेल्या एका लढाईत भोजराज मारला गेला. वयाच्या विशीत मीरेने पाहिलेल्या मृत्यूच्या मालिकेचा हा एक भाग होता. क्षणभंगुर गोष्टी सोडून शाश्वताकडे तिने लक्ष देण्यास सुरुवात केली आणि दुःखाचे रूपांतर निस्सीम आध्यात्मिक भक्तीत केले. विरहाने पोळलेल्या मनाची अवस्था वर्णिणारी तिची भजने याची साक्ष देतात.

सुरुवातीला मीरेचे कृष्णप्रेम ही खाजगी बाब होती, पण नंतर ती अत्यानंदाने शहरातील रस्त्यांवर नाचू लागली. चित्तोडचा नव्याने राज्यकर्ता बनलेला विक्रमादित्य हा तिचा दीर तिच्या या वागण्यावर आक्षेप घेऊ लागला. मीरेला विषबाधा करविण्याचे अनेक प्रयत्न विक्रमादित्याने केले असे म्हटले जाते.मीराबाई कृष्णाची भक्ती निर्मल मानाने केली. तिने पतिव्रता जीवन त्यागले होते

==आख्यायिका== :

  • प्रसादात विष मिसळून मीरेला मारण्याचा प्रयत्‍न झाला, पण कृष्णाने त्या प्रसादाचे अमृतात रूपांतर केले, असे सांगतात.
  • मीरेच्या बिछान्यावर लोखंडाचे खिळे लावण्यात आले पण ईश्वरकृपेने खिळ्यांची जागा गुलाबाच्या पाकळ्यांनी घेतली. मीरेच्या एका भजनात याचा उल्लेख आढळतो : 'शूल सेज राणा नै भेजी, दीज्यो मीरां सुलाय/सांझ भई मिरां सोवन लागी, मानों फूल बिछाय'
  • फुलांच्या टोपलीत साप लपवून ईश्वराने दिलेली ही भेट आहे असे मीरेला सांगितले. मीरेने टोपली उघडली तेव्हा मात्र टोपलीत फुलांची माळ होती.

याच धर्तीवर अनेक गोष्टी सांगितल्या जातात. इ. स. १५३८ च्या सुमारास राजस्थान सोडून मीरा वृंदावनास आली असावी असा अभ्यासकांचा अंदाज आहे.

कधी काळी मीरेने रैदास यांना आपले गुरू घोषित केले ('गुरू मिलिया रैदासजी') आणि वृंदावन सोडले. कृष्णप्रेमापोटी वेडी झालेल्या ललिता या गोपीचा आपण पुनर्जन्म आहोत असे ती मानू लागली. त्या काळात रूप गोस्वामी हे उच्च प्रतीचे संत मानले जात. मीरेने त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली अशी एक आख्यायिका आहे. ब्रह्मचारी असल्याने आपण एका स्त्रीला भेटणार नाही, असा प्रतिसाद तिला मिळाला. यावर श्रीकृष्ण हाच अखिल विश्वातील खरा पुरुष आहे असे उत्तर मीरेने दिले. संपूर्ण उत्तर भारतात कृष्णप्रीतीची भजने गात ती फिरली. गुजरातमधील द्वारका इथे तिने आयुष्याची अखेरची वर्षे घालविल्याचा अंदाज आहे. द्वारकाधीशाच्या मूर्तीत मीरा विलीन झाली, अशीही आख्यायिका आहे.

काव्यरचना[संपादन]

पदावली मध्ये मीरेच्या रचना एकत्रित केलेल्या आहेत. राजस्थानी आणि ब्रज भाषेत मीरेच्या रचना आढळतात.मीरेने तयार केलेल्या पदांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार भारतभर झाला आहे.तिची पदे आजही  गायली जातात. हिने जयदेवाच्या गीत-गोविंद या काव्यरचनेवर आधारित टीका लिहिली. तसेच राग-गोविंद असा ग्रंथही लिहिला आहे.[१]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ मध्ययुगीन चरित्र कोश-चित्राव सिद्धेश्वरशास्त्री