दालन:इतिहास/नवीन लेख/२
झेलमची लढाई (इंग्लिश: Battle of the Hydaspes, बॅटल ऑफ द हिडास्पेस) ही इ.स.पू. ३२६ साली अलेक्झांडर आणि पोरस यांच्यात झेलम नदीच्या काठी झालेली लढाई होती.
तक्षशीलेचा राजा अंभी आणि झेलम आणि चिनाब नद्यांदरम्यान राज्य करणारा पोरस उर्फ पौरव (पुरू) हे प्रबळ राजे असले तरी त्यांचे आपापसात अजिबात पटत नव्हते. त्यांच्यात सतत संघर्ष होत असत आणि ते एकमेकांना आपल्या राज्यविस्ताराच्या धोरणातील अडथळे मानत असत. अलेक्झांडर सिंधू नदी पार करून आल्यानंतर अंभी राजाने लगेच अलेक्झांडरच्या छावणीत जाऊन त्याची औपचारीक शरणागती पत्करली आणि त्याला चांदीचे २०० टॅलेंट, तीन हजार बैल, दहा हजार मेंढ्या, तीस हत्ती आणि इतर अनेक वस्तूंचा नजराणा दिला. पोरस आपल्या राज्याच्या सीमा पूर्वेकडे वाढवून त्या प्रदेशात आपले वर्चस्व स्थापन करण्याच्या प्रयत्नात असल्याने अंभीने पोरसाचा पराभव करण्यासाठी अलेक्झांडराशी सख्य करून त्याची मदत स्विकारली. नंतर अलेक्झांडराने एका दूताकरवी शरणागती पत्करण्याचा निरोप पोरसाकडे पाठवला पण पोरसाने त्याला दाद दिली नाही उलट राज्याच्या सीमेवर आपण सशस्त्र भेटण्यास तयार असल्याचा निरोप पोरसाने अलेक्झांडराला पाठवला.
पोरसाचा निरोप मिळाल्यानंतर अलेक्झांडराने वायव्य भारताच्या क्षत्रपपदी फिलिप याची नियुक्ती करून त्याचे मुख्यालय पुष्कलावती उर्फ पेशावर येथे केले. अंभीच्या तक्षशीला राज्यात सैन्याची एक तुकडीही तैनात केली आणि नंतर त्याने आपला मोर्चा पोरसाकडे वळवला. अंभीच्या सैन्यासह अलेक्झांडराचे ग्रीक सैन्य झेलम नदीपर्यंत पोहोचले. नदीला तेव्हा पूर आला होता तरीही ठरल्याप्रमाणे पोरस नदीच्या पलीकडील काठावर आपल्या सैन्यासह हजर होता. पोरसाने त्या परिसरातील पूंच आणि नौशेरा भागातील अभिसार जमातीच्या राजांचीही मदत घेण्याचा प्रयत्न केला होता पण त्याने आधीच अलेक्झांडरासमोर शरणागती पत्करली होती. रावी नदीच्या परिसरात राज्य करणाऱ्या पोरसाच्या एका आप्तानेही त्याला मदत करण्याचे नाकारले. अशा रितीने सर्व बाजूंनी कोंडी झाली असली तरी पोरसाने परिणामांची तमा न बाळगता खंबीरपणे अलेक्झांडराच्या सैन्याचा मुकाबला करण्याचा निश्चय केला.