झेलमची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झेलमची लढाई
झेलमच्या लढाईचे आंद्रे कास्तेन्य याने काढलेले एक चित्र
झेलमच्या लढाईचे आंद्रे कास्तेन्य याने काढलेले एक चित्र
दिनांक मे, इ.स.पू. ३२६ - मे १६, इ.स. १७३९
स्थान पश्चिम पंजाब, पाकिस्तान
परिणती अलेक्झांडरचा विजय[१][२]
प्रादेशिक बदल पंजाब मॅसिडोनियन साम्राज्यात विलीन
युद्धमान पक्ष
मॅसिडोनिया
ग्रीसमधील राज्ये
तक्षशिला आणि इतर भारतीय राजे
पर्शियातील सरदार
पौरव राज्य
सेनापती
अलेक्झांडर द ग्रेट
क्रेटेरस
प्टॉलेमी
राजा पोरस (पुरुषोत्तम)
सैन्यबळ
३४,००० पायदळ,
७,००० घोडेस्वार[३][४]
२०,०००[५]-५०,०००[६] पायदळ,
२,०००[७]-४,०००[५] घोडेस्वार,
१,००० रथ,
८५-२०० हत्ती[७][५][६][८][९][१०]
बळी आणि नुकसान
८०[११]-७०० पायदळ[१२][१३], २३०[११] -२८० घोडेस्वार[१२] १२,०००-२३,०००,[११] ठार, ९,००० युद्धबंदी,[१४]

झेलमची लढाई (इंग्लिश: Battle of the Hydaspes, बॅटल ऑफ द हिडास्पेस[१५]) ही इ.स.पू. ३२६ साली अलेक्झांडर आणि पोरस यांच्यात झेलम नदीच्या काठी झालेली लढाई होती.

पार्श्वभूमी[संपादन]

तक्षशीलेचा राजा अंभी आणि झेलम आणि चिनाब नद्यांदरम्यान राज्य करणारा पोरस उर्फ पौरव (पुरू) हे प्रबळ राजे असले तरी त्यांचे आपापसात अजिबात पटत नव्हते. त्यांच्यात सतत संघर्ष होत असत आणि ते एकमेकांना आपल्या राज्यविस्ताराच्या धोरणातील अडथळे मानत असत. अलेक्झांडर सिंधू नदी पार करून आल्यानंतर अंभी राजाने लगेच अलेक्झांडराच्या छावणीत जाऊन त्याची औपचारिक शरणागती पत्करली आणि त्याला चांदीचे २०० टॅलेंट[१६], तीन हजार बैल, दहा हजार मेंढ्या, तीस हत्ती आणि इतर अनेक वस्तूंचा नजराणा दिला. पोरस आपल्या राज्याच्या सीमा पूर्वेकडे वाढवून त्या प्रदेशात आपले वर्चस्व स्थापन करण्याच्या प्रयत्नात असल्याने अंभीने पोरसाचा पराभव करण्यासाठी अलेक्झांडराशी सख्य करून त्याची मदत स्विकारली. नंतर अलेक्झांडराने एका दूताकरवी शरणागती पत्करण्याचा निरोप पोरसाकडे पाठवला पण पोरसाने त्याला दाद दिली नाही; उलट राज्याच्या सीमेवर आपण सशस्त्र भेटण्यास तयार असल्याचा निरोप पोरसाने अलेक्झांडरास पाठवला.

लढाईपूर्वी[संपादन]

पोरसाचा निरोप मिळाल्यानंतर अलेक्झांडराने वायव्य भारताच्या क्षत्रपपदी फिलिप याची नियुक्ती करून त्याचे मुख्यालय पुष्कलावती ऊर्फ पेशावर येथे केले. अंभीच्या तक्षशीला राज्यात सैन्याची एक तुकडीही तैनात केली आणि नंतर त्याने आपला मोर्चा पोरसाकडे वळवला. अंभीच्या सैन्यासह अलेक्झांडराचे ग्रीक सैन्य झेलम नदीपर्यंत पोहोचले. नदीला तेव्हा पूर आला होता तरीही ठरल्याप्रमाणे पोरस नदीच्या पलीकडील काठावर आपल्या सैन्यासह हजर होता. पोरसाने त्या परिसरातील पूंच आणि नौशेरा भागातील अभिसार जमातीच्या राजांचीही मदत घेण्याचा प्रयत्न केला होता पण त्याने आधीच अलेक्झांडरासमोर शरणागती पत्करली होती. रावी नदीच्या परिसरात राज्य करणाऱ्या पोरसाच्या एका आप्तानेही त्याला मदत करण्याचे नाकारले. अशा रितीने सर्व बाजूंनी कोंडी झाली असली तरी पोरसाने परिणामांची तमा न बाळगता खंबीरपणे अलेक्झांडराच्या सैन्याचा मुकाबला करण्याचा निश्चय केला.

लढाई[संपादन]

अलेक्झांडरने झेलम नदी पार केल्याचे ठिकाण दाखवणारे चित्र

झेलम नदीच्या दुसऱ्या काठावरील पोरसाच्या सैन्याची रचना पाहून अलेक्झांडरच्या सैन्यातील सेनापतीला आश्चर्याचा धक्काच बसला. पोरसाच्या सैन्यात तीस हजार पायदळ, चार हजार घोडेस्वार, आणि दोनशे हत्ती होते[१७]. मध्यभागी असलेल्या पायदळाच्या समोरच्या बाजूला हत्तींची एक प्रकारची अभेद्य भिंतच पोरसाने उभी केली होती. पायदळाच्या दोन्ही बाजूला घोडेस्वार आणि त्यांच्यासमोर रथ ठेवण्यात आले होते. दोन्ही प्रतिस्पर्धी सैन्य झेलम नदीच्या दोन्ही काठावर समोरासमोर होते. त्यांच्यात दोन आठवडे एकही चकमक झाली नाही. अलेक्झांडराचे सैन्य पोरसाला नकळत नदी पार करण्याच्या सुरक्षित मार्गाच्या शोधात होते. नदीकाठच्या दलदलीमध्ये त्यांना नदीचा एक उथळ प्रवाह आढळला पण तो मुख्य छावणीपासून उत्तरेला सत्तावीस किलोमीटर अंतरावर होता. एका अंधाऱ्या रात्री भर पावसाची संधी साधून तराफ्यांच्या तात्पुरत्या पुलावरून अलेक्झांडरचे अकरा हजार घोडेस्वारांचे मुख्य सैन्य नदी पार करून गेले. त्या अंधाऱ्या रात्री पावसाची संततधार असल्याने पोरसाचे सैनिक काहीसे गाफील राहिले. पोरसाला ही घटना कळल्यावर त्याने दोन हजार घोडेस्वार आणि एकशे वीस रथांसह आपल्या मुलाला शत्रुसैन्याचा मुकाबला करण्यासाठी रवाना केले; मात्र त्याचा दणदणीत पराभव झाला. सैन्याची फेररचना करण्यास पोरसाला पुरेशी संधी मिळाली नाही. पावसानेही त्याच्या सैन्याची रचना विस्कळीत झाली. त्याचे रथ फसले, घोडे आणि सैनिकांना मुक्त हालचाली करणे अशक्य झाले. हत्ती आणि आघाडीच्या तुकडीला शत्रूच्या हालचालीवर नियंत्रण ठेवता आले नाही. सिरवल आणि पकराल या दोन खेड्यांमधील मैदानात ही निर्णायक लढाई झाली. खुद्द अलेक्झांडराने सैनिकांच्या एका तुकडीसह शत्रुसैन्यात मुसंडी मारल्याने पोरसाच्या सैन्याची दाणादाण उडाली. पोरसाचे बारा हजार सैनिक, दोन पुत्र, आणि बहुतेक सेनापती या युद्धात मारले गेले. पोरसाने शेवटपर्यंत लढा दिला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. घायाळ पोरसाला अलेक्झांडराच्या सैनिकांनी अटक केली.

लढाईनंतरच्या घडामोडी[संपादन]

बंदीवान पोरसाला ज्यावेळी अलेक्झांडरासमोर उभे करण्यात आले त्यावेळी अलेक्झांडरने पोरसाला विचारले "मी तुला कसे वागवावे ?" त्यावर पोरसाने सांगितले "एका राजाने दुसऱ्या राजाला जसे वागवावे तसे."[१८] या निर्भीड उत्तराने अलेक्झांडर खूष झाला आणि त्याने पोरसाला अतिशय औदार्याची वागणूक दिली. अलेक्झांडराने त्याचे राज्य त्याला लगेच बहाल करून त्याच्याशी मैत्री केली. एवढेच नव्हे तर भारतातून परत जाण्यापूर्वी पोरसाच्या राज्याच्या पूर्वेचा त्याने जिंकलेला प्रदेशही पोरसाच्या हवाली करून टाकला.

संकीर्ण[संपादन]

अलेक्झांडराने पोरसाच्या राज्यात दोन ग्रीक अधिवास (नगरे) वसवले. त्यापैकी निकाइया अधिवास लढाईतील विजयाच्या स्मरणार्थ रणभूमीजवळच होता, तर बुसेफॉलस हा दुसरा अधिवास अलेक्झांडराच्या त्याच नावाच्या आवडत्या घोड्याच्या स्मरणार्थ वसवला गेला.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. Fuller, pg 198
  साचा:Quote
 2. Fuller, pg 181 साचा:Quote
 3. According to Arrian 5.14, 6,000 foot and 5,000 horse were under Alexander's command in the battle.
 4. Fuller estimates a further 2,000 cavalry under Craterus' command.
 5. ५.० ५.१ ५.२ Arrian, 5.15
 6. ६.० ६.१ Diodorus, 17.87.2
 7. ७.० ७.१ Plutarch 62.1:
  साचा:Quote
 8. Green, p. 553
 9. Curtius 8.13.6; Metz Epitome 54 (following Curtius)
 10. Plutarch 60.5
 11. ११.० ११.१ ११.२ Arrian, 5.18
 12. १२.० १२.१ Diodorus 17.89.3
 13. According to Fuller, pg 199, "Diodorus' figures appear more realistic."
 14. Diodorus 17.89.1-2
 15. झेलम नदीला वैदिक काळातील प्राचीन भारतीय लोक वितस्ता या नावाने तर प्राचीन ग्रीक लोक हिडास्पेस (रोमन लिपी: Hydaspes) या नावाने ओळखत.
 16. टॅलेंट हे ठराविक वजनाचे नाणे प्राचीन ग्रीक आणि रोमन राज्यात प्रचलित होते.
 17. परकीयांची आक्रमणे. १३ फेब्रुवारी, इ.स. २०१२ रोजी मिळवले. (मराठी मजकूर) 
 18. एनाबेसिस. एलायन्स विथ पोरस. २० एप्रिल, इ.स. २०१३ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)

बाह्य दुवे[संपादन]