गोविंद स्वरूप
डॉ. गोविंद स्वरूप (२३ मार्च १९२९, ठाकूरद्वार, उत्तर प्रदेश,[१] ७ सप्टेंबर २०२०, पुणे[१]) यांना भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक मानले जाते.
शिक्षण
[संपादन]डॉ. गोविंद स्वरूप यांनी अलाहाबाद येथून १९४८ मध्ये बी.एससी.ची पदवी मिळवली. त्यानंतर १९५० मध्ये विज्ञानाची मास्टर्स (MSc) पदवी संपादन करून त्यांनी १९५२ मध्ये ऑस्ट्रेलियामधील सी.एस.आय.आर.ओ. येथे खगोलशास्त्र विषयक कार्य सुरू केले. पुढे १९६१ मध्ये त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पी.एचडी. संपादन केली.
कारकीर्द
[संपादन]डॉ. गोविंद स्वरूप यांनी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय भौतिकशास्त्र प्रयोगशाळेत १९५०-५३ आणि १९५५-५६ या काळात काम केले तसेच CSIRO ऑस्ट्रेलिया येथे १९५३-५५ या काळात काम केले. त्यांनी १९५६-५७ मध्ये हार्वर्ड विद्यापीठात संशोधन सहाय्यक म्हणून काम केले तर १९५७-६० या काळात स्टॅनफर्ड विद्यापीठात संशोधन सहाय्यक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी १९६१-६३ या काळात स्टॅनफोर्ड विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले.
सिडनी जवळील पॉट्स हिल येथे ६ फूट व्यासाच्या ३२ अन्वस्त (parabolic) ॲंटेना उभारण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील पहिली आधुनिक रेडिओ दुर्बीण मुंबई जवळील कल्याणच्या परिसरात उभारण्यात आली. या दुर्बिणीच्या सहाय्याने सूर्याची निरीक्षणे घेण्यात आली. त्यानंतर डॉ. गोविंद स्वरूप यांनी दक्षिण भारतात उटी येथेही रेडिओ दुर्बीण उभारली. उटी येथील दुर्बिणीच्या यशानंतर महाराष्ट्रातील पुण्यापासून ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या खोडद - नारायणगाव येथे जगातील दुसऱ्या क्रमांकाची महाकाय रेडिओ दुर्बीण उभारण्याचे काम त्यांनी केले.
पुरस्कार
[संपादन]- शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार (१९७२)
- पद्मश्री (१९७३)
- पी.सी. महालनोबीस पदक (१९८४)
- मेघनाद साहा पदक (१९८७)
- होमी भाभा जीवनगौरव पुरस्कार (२००९)
संदर्भ
[संपादन]- ^ a b "प्रा. गोविंद स्वरूप यांचे निधन". Maharashtra Times. 2020-09-09 रोजी पाहिले.