Jump to content

प्राकृत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्राकृत भाषा या पानावरून पुनर्निर्देशित)

संस्कृत भाषा व आधुनिक हिंद-आर्य भाषा (उदा.मराठी भाषा) यांच्यातील पायरी.

प्राकृत हा शब्द प्रकृतीवरून आला. प्राकृत म्हणजे जे नैसर्गिक आहे ते. प्राकृत म्हणजे जनसामान्यांची भाषा. या भाषांचा उगम लक्षात घेता त्यांचे व्याकरण फार समग्र नव्हते. संस्कृतच्या मानाने प्राकृत भाषेतील व्यंजने, व्याकरण हे मर्यादित होते. बऱ्याच जुन्या संस्कृत नाटकांमध्ये उच्चभ्रू लोकांची भाषा संस्कृत, तर हलक्या लोकांची भाषा प्राकृत दिसते. लेखी आणि कामकाजाच्या भाषेसाठी प्राकृताचा वापर न होता संस्कृत वापरली जात असावी.

इ.स.पूर्व ६व्या शतकात प्राकृत भाषा बोलली गेल्याचे पुरावे आढळतात. तर सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत लेखी प्राकृताचे पुरावे मिळालेले आहेत. प्राचीन व मध्ययुगीन भारतात सुमारे ३८ प्राकृत भाषा बोलल्या जात, असे सांगितले जाते. असे असले तरी तत्कालीन समाजव्यवस्थेमुळे या भाषांना मातृभाषेचा किंवा राज्यभाषेचा दर्जा प्राप्त नव्हता.

प्राकृत भाषेचे प्रमुख प्रकार असे

  • वेदकालीन प्राकृत- प्राथमिक अवस्था.
  • मध्ययुगीन प्राकृत - पाली, महाराष्ट्री, शौरसेनी इत्यादी
  • महाराष्ट्री- शौरसेनी सारख्या भाषांची अपभ्रंश भाषा
  • हिंदुस्थानातील सध्याच्या रुढबोली.

वेदपूर्वकालीन भाषा, वैदिक भाषा, संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश इ. भाषेच्या स्वरूपावरून प्रत्येक भाषेतील काही वैशिष्ट्ये मराठी भाषेत दिसतात. त्यामुळे मराठी ही वेदपूर्वकालीन भाषेपासून, संस्कृतपासून, पालीपासून, प्राकृत भाषेपासून, महाराष्ट्री किंवा अपभ्रंश भाषेपासून तयार झाली असावी असा विचार अनेक अभ्यासक मांडतात; मात्र त्यांच्यात एकमत दिसून येत नाही.

काही प्राकृत भाषा याप्रमाणे - मागधी, शौरसेनी, पैशाची, महाराष्ट्री भाषा, अर्धमागधी भाषा, अपभ्रंश भाषा, पाली इत्यादी. यापैकी महाराष्ट्री भाषा ही भाषा सातवाहन राज्यकाळातील प्रमुख भाषा गणली जाते. या भाषेत साहित्य लिहिले गेल्याचे पुरावे मिळतात. ख्रिस्तपूर्व काळातील प्राकृत शिलालेखही सापडले आहेत, सातवाहन राजा हलाने प्राकृत कवितांचे संकलन केल्याचे उल्लेख मिळतात. मराठी हे महाराष्ट्री भाषेचे सुधारित रूप आहे.

ज्या समूहाने मूळ भाषेचे संस्कारित रूप स्वीकारून त्याच्यात व्यवहार केला, त्या शिष्टांच्या भाषेचे, म्हणजेच संस्कृतचे व्याकरण महर्षी पाणिनीने सिद्ध केले. पाणिनीच्या अष्टाध्यायीवर कात्यायन वररुचीने वार्तिक लिहिले आणि याच वार्तिककाराने महाराष्ट्री, पैशाची इत्यादी प्राकृत भाषांचे व्याकरण सिद्ध करणारा 'प्राकृत प्रकाश' हा ग्रंथ लिहिला. कात्यायनासाठी या दोन भाषाप्रकारांमधील श्रेष्ठ कोण, कनिष्ठ कोण? कोणापासून कोण निघाला? हे प्रश्न नाहीत. प्राकृत भाषांपैकी महाराष्ट्रीचे व्याकरण सांगून इतर प्राकृत भाषांचे व्याकरण सांगताना, त्यांची त्यांची वैशिष्ट्ये विशद करून 'शेषं महाराष्ट्रिवत्' असा शेरा मारून तो विषय संपवून टाकतो. तसाच प्रकार त्याला संस्कृतचे व्याकरण सांगून झाल्यावर प्राकृत भाषांची वैशिष्ट्ये सांगून 'शेषं संस्कृतवत्' असे म्हणून करता आला असता; पण तो तसे करीत नाही, याचे कारण त्याला भाषांचा इतिहास ज्ञात असावा, हेच असावे. संस्कृत या भाषारूपामुळे होणारी जनसामान्यांची कोंडी फोडण्यासाठी बौद्धजैनादि धर्माचार्यांनी प्राकृतचा आश्रय करुणाबुद्धीने केला, हे त्यांचे उपकारच होत, यात शंका नाही. असे करताना त्यांनी गरजेप्रमाणे संस्कृतच्या अभिमान्यांना आव्हाने दिली, हेही योग्यच होते. याचे प्रमाण बौद्धांपेक्षा जैन धर्मीयांमध्ये अधिक दिसून येते.

महाराष्ट्रात ही परंपरा संतांनी चालवली. संस्कृत काव्यात व म्हणून संस्कृत काव्यशास्त्रात अभावाने आढळणाऱ्या गोष्टी ज्ञानेश्वरांनी मराठीत करून दाखवल्या. एकनाथांनी तर 'संस्कृत भाषा देवे केली। प्राकृत काय चोरापासून आली?' असा भेदक प्रश्न उपस्थित करून, पंडितांना मोठाच धक्का दिला.

दासोपंत प्राकृताबद्दल लिहितात :

संस्कृत घटु म्हणती । आतां तयाचे भेद किती ? ।
कवणा घटाची प्राप्ति । पावावी तेणें ? ॥७३॥
हारा, डेरा, रांजणु । मुढा, पडगा, आनु ।
सुगड, लौली, सुजाणु । कैसी बोलैल ? ॥७४॥
घडी, घागरी, घडौली । अलंदे, बाचिकें, बौळी ।
चिटकी, मोरवा, पातली । सांजवणें तें ॥७५॥

नाट्यशास्त्र आणि प्राकृत

[संपादन]

भास व भरतमुनी यांच्या प्राचीन नाटकांतील सर्व महत्त्वाची पुरुष पात्रे संस्कृत बोलतात, तर स्त्रिया, मुले व इतर सामान्यजन प्राकृतात बोलतात. नाट्यशास्त्रात कोणी कोणती भाषा बोलावी याबाबत नियम केलेले आहेत, आणि निरनिराळ्या लोकांसाठी निरनिराळ्या भाषा वापरल्या आहेत. जसे, नाटकातील स्त्रिया, मुले व विदूषक शौरसेनी बोलतात, बायका गाताना महाराष्ट्री भाषा वापरतात. सेवक वर्ग, कोळी व इतर सामान्यजन मागधी भाषा वापरतात तर राजे, अमात्य, विद्वान संस्कृतात बोलतात.

एक उदाहरण द्यायचे झाले तर शाकुंतलात शकुंतला आपल्या सख्यांशी प्राकृतात बोलते. राजा दुष्यंताशीही प्राकृतात बोलते परंतु दुष्यंत शकुंतलेशी संस्कृतात बोलतो.

प्राकृताचा विचार करायचे झाल्यास प्राकृतातही नाटके, नैतिक, ऐतिहासिक काव्यसंग्रह लिहिले गेले. जैन धर्मातील साहित्य प्राकृतातच लिहिलेले आढळते. इसवी सनानंतर पंधराव्या शतकापासून प्राकृत साहित्याला उतरती कळा लागली. याचे कारण संस्कृत+प्राकृताच्या संगमातून आधुनिक भाषांचा उदय हे असू शकते.

संस्कृत भाषा->प्राकृत->आधुनिक भारतीय भाषा