निमाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

निमाड हा पश्चिम-मध्य भारतातील मध्य प्रदेश राज्याचा नैऋत्य प्रदेश आहे. त्याच्या भौगोलिक सीमांमध्ये निमाडच्या उत्तरेला विंध्य पर्वत आणि दक्षिणेला सातपुडा पर्वत आहे, तर मध्यातून नर्मदा नदी वाहते. निमाडला पौराणिक काळात अनूप जनपद असे संबोधले जात असे. नंतर त्याचे नाव निमाड असे पडले. निमाड प्रदेश हा खांडव आणि भुआणा अशा दोन उपप्रदेशात विभागलेला आहे. प्राचीन काळापासूनच उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा प्रमुख महामार्ग निमाडातल्या सध्याच्या बऱ्हाणपूर जिल्ह्यातील असिरगड किल्ल्याच्या अधिपत्याखाली राहिलेला आहे.

निमाड
(अनूप जनपद)
ऐतिहासिक प्रदेश
मध्य प्रदेश राज्याच्या मानचित्रावर निमाडचे स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य मध्य प्रदेश
जिल्हे १] खंडवा
२] खरगोन
३] बडवानी
४] बऱ्हाणपूर
५] धार (दक्षिण भाग)
६] देवास (दक्षिण भाग)
७] हरदा (कधीकधी)
भाषा निमाडी
भिली
भुआणी
कोरकू
मराठी
हिंदी
सर्वात मोठे शहर खंडवा
वासीनाम निमाडी

नामोत्पत्ती[संपादन]

आर्य आणि अनार्य अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचे वास्तव्य असल्यामुळे या प्रदेशास पूर्वी निमार्य प्रदेश म्हणून संबोधले जायचे; ज्याला कालांतराने नामभ्रंश होऊन निमाड म्हणून ओळखले जाऊ लागले.

संस्कृती आणि इतिहास[संपादन]

निमाडमध्ये हजारो वर्षांपासून उष्ण वातावरण आहे. निमाडचा सांस्कृतिक इतिहास अतिशय समृद्ध आणि गौरवशाली आहे. जगातील सर्वात प्राचीन नद्यांपैकी एक नर्मदा, निमाडमध्ये विकसित झाली आहे. महेश्वर नवदाटोली येथे सापडलेल्या पुरातन अवशेषांच्या पुराव्याच्या आधारे नर्मदा-खोरे-संस्कृतीचा काळ सुमारे अडीच लाख वर्षे मानला जातो. विंध्य आणि सातपुडा हे अतिशय प्राचीन पर्वत आहेत. प्रागैतिहासिक काळातील सुरुवातीच्या मानवांचे आश्रयस्थान म्हणजे सातपुडा आणि विंध्य. आजही आदिवासी समूह विंध्य आणि सातपुडा या जंगलात राहतात. नर्मदेच्या तीरावर असलेल्या आदि अरण्यवासीयांच्या निमाडाचे वर्णन पुराणात आहे. त्यांपैकी गोंड, बैगा, कोरकू, भिलाला, भिल्ल, शबर इत्यादी प्रमुख आहेत.

निमाडचे जीवन कला आणि संस्कृतीने संपन्न आहे, जिथे आयुष्यातील एकही दिवस असा जात नाही, जेव्हा गाणी गायली जात नाहीत किंवा व्रत उपवास कथाकथन ऐकले जात नाही.

निमाडच्या पौराणिक संस्कृतीच्या केंद्रस्थानी ओंकारेश्वर, मांधाता आणि महिष्मती आहेत. सध्याचे महेश्वर हे पुरातन महिष्मतीच आहे. कालिदासांनी नर्मदा आणि महेश्वरचे वर्णन केले आहे. पद्मश्री रामनारायण उपाध्याय निमाडच्या अस्मितेविषयी लिहितात - "जेव्हा मी निमाडबद्दल विचार करतो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर उंच-सखल घाटांमध्ये वसलेली छोटी छोटी गावं आणि तूरीच्या शेतांचा दरवळणारा सुुुुगंंध व त्या सर्वांच्या मध्ये गुडघ्यापर्यंत असलेला धोतरावरचा कुरता आणि अंगरखा परिधान केलेल्या भोळ्या भाबड्या शेतकऱ्याचा चेहरा तरंगू लागतो. कठोर दिसणारे हे जनपद लोक आपल्या हृदयात लोक साहित्याची अक्षय परंपरा जिवंत ठेवून आहेत.

नेरबुड्डा(नर्मदा) विभागात ब्रिटीश राजवटीत एक जिल्हा म्हणून निमाडची स्थापना करण्यात आली होती, त्याचे प्रशासकीय मुख्यालय खंडवा येथे होते, जे मुस्लिम शासकांच्या काळात बुरहानपूर होते. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ४,२७३ वर्गमील (११,०६७ वर्ग कि.मी.) होते. तर, लोकसंख्या (१९०१) ३,२९,६१५ इतकी होती. कापूस आणि बाजरी ही येथील मुख्य पिके होती; गांजा किंवा भारतीय भांग देखील सरकारी देखरेखीखाली पिकवण्यास परवानगी होती. ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे जिल्ह्यातून जात होती आणि इंदूरहून खंडव्याला जोडणारी राजपुताना लाइनची एक शाखा होती. खंडवा येथे कापूस जिनिंग आणि प्रेसिंगचे कारखाने होते आणि बुरहानपूर येथे सोन्याचे नक्षीदार कापड तयार करण्याचे कारखाने होते. जिल्ह्यामध्ये विस्तृत जंगले आहेत आणि सरकारने पुनासा जंगलाचा एक भाग संरक्षित केला आहे, जो नर्मदेच्या दक्षिण तीरावर सुमारे १२० मील (१९० कि.मी.) क्षेत्रफळात पसरलेला आहे, साग (टेक्टोना ग्रँडिस), सायन (टर्मिनालिया टोमेंटोसा) आणि अंजन (हार्डविकिया बिनाटा) इत्यादी झाडे येथे मोठ्या प्रमाणावर आढळतात.

नर्मदेच्या दोन्ही तीरावर असलेल्या ब्रिटिश जिल्ह्याच्या पश्चिमेस असलेल्या इंदूरच्या संस्थानात देखील निमाड नावाचा एक जिल्हा होता. त्याचे क्षेत्रफळ ३,८७१ वर्ग मील (१०,०२६ वर्ग कि.मी.) होते; येथील लोकसंख्या (१९०१) २,५७,११० होती. १८२३ पासून ग्वाल्हेरच्या सिंधीया (शिंदे) राज्यकर्त्यांशी संबंधित असलेले हे संस्थान ब्रिटिशांच्या ताब्यात होते; १८६१ मध्ये त्याचे संपूर्ण सार्वभौमत्व इंग्रजांना देण्यात आले, परंतु १८६७ मध्ये ते इंदूरच्या होळकर शासकांकडे गेले.

१९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर, पूर्वीचा ब्रिटीश जिल्हा मध्य प्रदेशच्या नवीन राज्याचा निमाड जिल्हा बनला, त्याची प्रशासकीय जागा खंडवा येथे आहे; इंदूर राज्यातील निमाड जिल्हा हा मध्य भारत या नवीन राज्याचा निमाड जिल्हा बनला, त्याची प्रशासकीय जागा खरगोन येथे आहे. १ नोव्हेंबर १९५६ रोजी जेव्हा मध्य भारत मध्य प्रदेशात विलीन झाला तेव्हा पूर्वीचा मध्य भारतातील निमाड जिल्हा पश्चिम निमाड जिल्हा बनला, तर पूर्व जिल्हा पूर्व निमाड जिल्हा झाला. पश्चिम निमाड जिल्ह्याचे २४ मे १९९८ रोजी बडवानी आणि खरगोन जिल्ह्यांमध्ये विभाजन करण्यात आले आणि त्याचप्रमाणे पूर्व निमाड जिल्ह्याचे १५ ऑगस्ट २००३ रोजी खंडवा आणि बुरहानपूर जिल्ह्यांमध्ये विभाजन करण्यात आले.

भाषा[संपादन]

वर्तमान काळात मध्य प्रदेशात असलेल्या निमाड या प्रदेशाची कार्यालयीन भाषा ही हिंदी आहे; तर निमाडी ही येथील प्रमुख आणि सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. याव्यतिरीक्त निमाडात भिली भाषासमूहातीलही अनेक भाषा, उपभाषा व त्यांच्या बोलीभाषा बोलल्या जातात. त्यांमध्ये भिली, बारेली, भिलाली, कल्टो, देहवाली इत्यादी समाविष्ट आहे. हरदा जिल्ह्यात भुआणी भाषा बोलली जाते, जी निमाडी व माळवीची मिश्रित बोली भासते. तसेच बऱ्हाणपूर जिल्ह्यात मराठी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. निमाड मध्ये कोरकू ही द्रविड भाषा सुद्धा बोलली जाते. याचबरोबर अहिराणी, गुजराती, बंजारी व इतर काही भाषाही थोड्या प्रमाणात बोलल्या जातात.

हे सुद्धा पहा[संपादन]