विकिपीडिया:मासिक सदर/ऑगस्ट २००९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुखपृष्ठ सदर लेख
म्हैसूर शैलीतील त्रिमुख गणपतीचे चित्र

गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे.

पुराणांमध्ये गणपती शिवहर, पार्वतीपुत्र नावाने शंकरपार्वतींचा मुलगा नावाने उल्लेखित आहे. माघी शुक्ल चतुर्थी व भाद्रपद शुक्ल चतुर्थी असा दोनदा जन्म झाल्याने द्वैमातुर नावानेही ही देवता ओळखली जाते. या देवतेस अग्रपूजेचा मान असतो. हिंदू धर्मग्रंथात या देवतेची वर्णने स्थलपरत्वे बदलत असली तरी हत्तीचे मुख असलेली मनुष्य शरीरी देवता हे वर्णन समान आहे. या देवतेचे वाहन काही ठिकाणी उंदीर तर काही ठिकाणी सिंह सांगितले आहे. पुराण व साहित्यात गणपतीचे अनेक ठिकाणी उल्लेख आहेत. गणपती हा महाभारताचा लेखनिक होता.भारतात सर्वत्रच गणेशाची पूजा प्रचलित आहे. त्यातही महाराष्ट्र राज्यात गणेशाची सर्वाधिक मोठ्या प्रमाणावर पूजा व उत्सव होतात.

गणेश शब्दाचा अर्थ गणांचा- ईश वा प्रभू असा आहे. गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक होय. गणांचा अधिपती म्हणून गणपती असेही नाव या देवतेस आहे. महाराष्ट्रात हे नाव विशेष लोकप्रिय आहे. गणपतीस एक दात असण्याच्या अनेक पौराणिक कथा सांगतल्या जातात. प्रथम कथेनुसार, परशुरामाने युद्धात गणपतीचा एक दात उपटला. दुसर्‍या कथेनुसार कैलास पर्वतावर गणपतीने रावणास अडवले म्हणून रावणाने गणपतीचा एक दाताचे उत्पाटन केले. आणखी एका कथेनुसार खेळाखेळातील लढाईत कार्तिकेयाने गणपतीचा एक दात भग्न केला. महोदर आणि लंबोदर शब्दांचा अर्थ अनुक्रमे महा म्हणजे मोठे उदर (पोट) असणारा व लंब वा लांबडे उदर (पोट) असणारा असा आहे. ही दोन्ही नावे गणपतीचे स्थूलत्व दाखवतात.

गणपतीचा प्रथम उल्लेख प्राचीनतम हिंदू धर्मग्रंथ असलेल्या ऋग्वेदात मिळतो. दोन ऋक मंत्र (गणानाम गणपतीम् हवामहे...विषु सीदा गणपते...) वैदिक गणपतीचा स्पष्टपणे निर्देश करतात. जरी हा वैदिक गणपती व सध्या पूजिला जाणारा पौराणिक गणपती एक नसला तरी वेदोत्तर काळात ऋग्वेदातील गणपती-ब्रह्मणस्पती-वाचस्पती पासूनच पौराणिक गजवदन-गणेश-विघ्नेश्वर हे रूप उद्भवल्याचे अनेक संशोधक मान्य करतात.

ऋग्वैदिक गणपतीची दुसरी नावे होती -बृहस्पती, वाचस्पती. ही देवता ज्योतिर्मय मानली जाई. तिचा वर्ण लालसर सोनेरी होता. अंकुश, कुर्‍हाड ही या देवतेची अस्त्रे होती. या देवतेच्या आशिर्वादाविना कोणतीही इष्टकाम संभव होणार नाही असे मानले जाई. ही देवता कायम गण नामक एका नृत्यकारी दलासोबत विराजमान असे व देवतांची रक्षकही मानली जाई.

दुसर्‍या मतानुसार भारतातील अनार्यांच्या हस्तिदेवता व लम्बोदर यक्षाच्या एकत्रिकरणातून गणेश संकल्पना निर्मिली गेली. गणेश या मूळच्या अनार्य देवतेचे आर्यीकरण झाले असावे हा दुसरा कयास लावण्यात येतो. गणेशाचे वाहन उंदिर याच आदिम संस्कृतीचे प्रतीक म्हणून राहिले असावे. इसवीसनपूर्व आठव्या शतकापासून सहाव्या शतकाच्या मध्यापर्यंत लिहिल्या गेलेल्या बौधायण धर्मसूत्रात गणेशाचा उल्लेख नाही. इसवीसनाच्या चौथ्या शतकातील कालिदास, इसवीसनाच्या सहाव्या शतकातील भारवी, इसवीसनाच्या पाचव्या शतकातील पंचतंत्र वा भरताच्या नाट्यशास्त्रातही गणेश देवता दिसत नाही. गुप्त काळाच्या अस्तकाळापासून या देवतेची स्वतंत्र पूजा प्रचलित झाली असावी.

पुढे वाचा...