रितेश देशमुख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रितेश देशमुख
जन्म रितेश विलासराव देशमुख
१७ डिसेंबर, १९७८ (1978-12-17) (वय: ४५)
लातूर, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट अभिनेता, निर्माता
कारकीर्दीचा काळ २००३ - चालू
भाषा हिंदी, मराठी
प्रमुख चित्रपट एक व्हिलन, लय भारी, अपना सपना मनी मनी
वडील विलासराव देशमुख
आई वैशाली देशमुख
पत्नी जेनेलिया डिसूझा
अपत्ये रिआन देशमुख
अधिकृत संकेतस्थळ रितेश देशमुख

रितेश देशमुख ( १७ डिसेंबर १९७८) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेता आहेत तसेच ते भारतीय वास्तुकार आणि निर्माता देखिल आहेत. रितेश महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे दुसरे सुपुत्र आहेत. २००३ सालच्या चित्रपट तुझे मेरी कसमद्वारे रितेश यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून अनेक लहान-मोठ्या भूमिका त्यांनी केल्या आहेत. २००४ मध्ये प्रदर्शित झालेला मस्ती या चित्रपटापासून त्यांना व्यापारीदृष्ट्या यश मिळण्यास सुरुवात झाली.

त्यानंतर त्यांनी क्या कूल है हम, ब्लफमास्टर, मालामाल विकली, हे बेबी, धमाल, दे ताली, हाऊसफुल्ल, डबल धमाल, तेरे नाल लव हो गया, हाऊसफुल्ल २, क्या सुपर कूल है हम, ग्रॅंड मस्ती अशा यशस्वी चित्रपटांत त्यांनी काम केले. रितेश यांनी आजवर विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. मध्यंतरी आलेल्या काही सिनेमांद्वारे विनोदी कलाकार अशी त्यांची ओळख निर्माण झाली. रितेश यांनी २०१४ मध्ये आलेल्या एक व्हिलन चित्रपटात प्रथमच नकारात्मक भूमिका साकारली व ती प्रचंड लोकप्रिय ठरली.

जानेवारी २०१३ मध्ये रितेश यांनी पहिल्यांदाच बालक-पालक ह्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या लय भारी चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. चित्रपटांसोबतच रितेश यांनी अनेक पुरस्कार सोहळ्यांचे सूत्रसंचलन देखील केले आहे. रितेश यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अनेक मोठ्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये नामांकन व पुरस्कार रितेश यांनी पटकावले आहेत. अभिनयाशिवाय, सेलेब्रिटी क्रिकेट लीग मधील 'वीर मराठी' नावाचा संघ त्यांचा आहे तसेच ते या संघाचे कर्णधार देखील आहेत.

जीवन[संपादन]

रितेश यांचा जन्म लातूरमधील बाभळगाव या गावी झाला. माजी केंद्रीय अवजड उद्योग व विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत श्री. विलासराव देशमुखवैशाली देशमुख यांचे ते दुसरे सुपुत्र आहेत. रितेश यांचे ज्येष्ठ बंधू अमित देशमुख हे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत. तसेच, धाकटे बंधू धीरज देशमुख हे लातूर ग्रामीण मतदारसंघाचे आमदार आहेत. रितेश यांचे शालेय शिक्षण लातूर येथेच झाले आहे तसेच त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण जि.डी.सोमाणी मेमोरिअल स्कूल येथे झाले आहे. कमला रहेजा महाविद्यालय, मुंबई या महाविद्यालयातून त्यांनी आर्किटेक्ट ही पदवी प्राप्त केली.

२००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या तुझे मेरी कसम चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट सृष्टीत अभिनेता म्हणून पदार्पण केले. या चित्रपटाद्वारे जोडी जमलेल्या जेनेलिया डिसुझा यांना रितेश यांनी आयुष्याचा जोडीदार (पत्नी) म्हणून पसंत केले व २०१२ मध्ये हिंदू व ख्रिश्चन या दोन्ही रितीरिवाजानुसार ते जेनेलिया यांच्या सोबत विवाहबद्ध झाले. जेनेलिया या अभिनेत्री असून त्यांनी आजवर अनेक हिंदी व तेलुगू चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

रितेश यांच्या दोन्ही वहिनी आदिती घोरपडे (आदिती अमित देशमुख) व दीपशिखा भगनानी (दीपशिखा धीरज देशमुख) या देखील चित्रपटसृष्टीशी निगडीत आहेत. मोठ्या वहिनी आदिती यांनी हिंदी मालिकांमध्ये अभिनेत्री म्हणून काम केले आहे तर धाकट्या वहिनी दीपशिखा या स्वतः निर्मात्या असुन सुप्रसिद्ध निर्माते वासू भगनानी यांच्या त्या कन्या आहेत. रितेश आणि जेनेलिया यांना २ अपत्य असून रिआन व राहील अशी त्यांची नावे आहेत.

सामाजिक कार्य[संपादन]

रितेश देशमुख हे युवक बिरादरी (भारत) या राष्ट्रीय पातळीवरील युवा संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. रितेश यांनी त्यांचे मूळ गाव असलेल्या लातूर येथे जलयुक्त लातूरसाठी २५ लाख रुपये एवढी देणगी दिली आहे. रितेश आणि त्यांची पत्नी जेनेलिया देशमुख यांनी अवयव दान करण्याचा निर्यय घेतला आहे.[१]

चित्रपट[संपादन]

वर्ष नाव भूमिका टिपण्णी
२००३ तुझे मेरी कसम ऋषी बॉलीवूड पदार्पण
२००३ आऊट ऑफ कंट्रोल जसविंदर
२००४ मस्ती अमर
२००४ बर्दाश्त अनुज श्रीवास्तव
२००४ नाच वीर
२००५ क्या कूल है हम करण पांडे
२००५ मि. या मिस. शेखर
२००५ ब्लफमास्टर आदित्य श्रीवास्तव (दित्तू)
२००६ फाईट क्लब-मेम्बर्स ओन्ली सोमिल शर्मा
२००६ मालामाल विकली कन्हैया
२००६ डरना जरुरी है अल्ताफ
२००६ अपना सपना मनी मनी किशन/सानिया
२००७ कॅश लकी
२००७ हे बेबी तन्मय जोगळेकर / एडी टेडी
२००७ धमाल रॉय
२००८ दे ताली पग्लू/परेश
२००८ चमकू अर्जुन
२००९ डू नॉट डीस्टर्ब गोवर्धन
२००९ अल्लादिन अल्लादिन चटर्जी
२०१० रन पूरब शास्त्री
२०१० जाने कहा से आयी है राजेश पारेख
२०१० हाऊसफुल्ल बाबूराव (बॉब)
२०११ फालतू बाजीराव
२०११ डबल धमाल रॉय/ली/तुक्या/हिरा
२०११ कुची कुची होता है कोंबडीचं पिल्लू (आवाज) ॲनिमेटेड चित्रपट
२०१२ तेरे नाल लव हो गया विरेन चौधरी / छोटू
२०१२ हाऊसफुल्ल २ ज्वाला / जॉली
२०१२ क्या सुपर कूल है हम सिड
२०१३ ग्रॅंड मस्ती अमर सक्सेना
२०१४ हमशकल्स कुमार
२०१४ एक व्हिलन राकेश महाडकर
२०१४ लय भारी माऊली / प्रिन्स पदार्पण मराठी चित्रपट
डबल रोल
२०१५ बंगीस्तान हाफीज बिन अली / ईश्वरचंद शर्मा
२०१६ हाऊसफुल्ल ३ टेडी
२०१६ ग्रेट ग्रॅंड मस्ती अमर सक्सेना [२]
२०१६ बॅंजो तराट
२०१७ बँक चोर [३]
२०१८ माऊली मराठी चित्रपट[४]

विशेष भूमिका (पाहुणा कलाकार)[संपादन]

वर्ष नाव भूमिका टिपण्णी
२००५ होम डिलिव्हरी आपको घर तक पार्टी टाइम
२००७ नमस्ते लंडन बॉबी बेदी
२००७ ओम शांती ओम स्वतः (रितेश) "दिवानगी दिवानगी" या गाण्यामध्ये विशेष वर्णी
२००९ कल किसने देखा काली चरण
२००९ आओ विश करे अडल्ट बॉनी
२०१० झूठा ही सही फोन करणारा दुसरा व्यक्ती / अमन आवाज
२०११ लव ब्रेकअप्स जिंदगी कुणाल
२०१३ हिम्मतवाला रवी
२०१४ एंटरटेनमेंट सरल मोन्दल
२०१६ क्या कूल है हम ३ दुकानदार
२०१६ मस्तीजादे बीप / ओर्गेस्म बाबा

चित्रदालन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील रितेश देशमुख चे पान (इंग्लिश मजकूर)

  1. ^ "रितेश व जेनेलिया देशमुखनं घेतला अवयवदानाचा निर्णय". लोकसत्ता. ५ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "Grand Masti 3 shoot begins with a selfie!". Zee News (इंग्रजी भाषेत). 20 May 2015.
  3. ^ "Vivek Oberoi to have two releases this year". The New Indian Express (इंग्रजी भाषेत). 18 June 2016. Archived from the original on 2016-06-20. 2016-06-20 रोजी पाहिले.
  4. ^ "Riteish Deshmukh, Nishikant Kamat team up for Marathi film 'Mauli'". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 16 April 2015. 2016-06-20 रोजी पाहिले.