संत भानुदास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संत भानुदास हे एकनाथाचे पणजोबा की ज्यानी विजयनगरला नेलेली पान्डुरगाची मुर्ति पुन्हा पन्ढरीत आणली आणि पुनर्स्थापित केली.

ते दामाजींचे समकालीन होत. इ. स. १४४५ ते १५१३ हा त्यांचा काळ. त्यांनी इ. स. १४६८ ते १४७५ या काळातील दुर्गादेवीचा दुष्काळ पाहिला होता. ‘ आमुचिये कुळी पंढरीचा नेम । मुखी सदा नाम विठोबाचे ’ असे त्यांनी म्हटले आहे. यावरून पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती त्यांच्या कुळात परंपरेने चालत आलेली होती. ज्ञानेश्वरांच्या काळानंतर महाराष्ट्रावर आलेले भयानक परकीय आक्रमण धार्मिक, सांस्कृतिक दृष्ट्याही अत्यंत हानीकारक होते. राजसत्तेच्या आश्रयाने होत राहिलेल्या या धार्मिक आक्रमणामुळे हिंदू लोकांत स्वधर्माचरणाची निष्ठा ढळू लागली होती. उत्तरेकडून येणाऱ्या परधर्मीयांबरोबर हजारो सूफी उत्तर - दक्षिण भारतात राजाश्रयाने धर्म प्रचाराचे कार्य करीत होते. इ. स. १३०० मध्ये निजामुद्दीन अवलिया सातशे सूफींचा तांडा घेऊन दक्षिणेत आला; हे लोंढे सतत येत राहिले. हजारो हिंदू आपणहून किंवा बलात्कारे बाटून मुसलमान झाले. देवळे - मठ उद्ध्वस्त होऊन त्या जागी पीर, दरगे, मशिदी उभ्या राहू लागल्या. हिंदू सरदारांना याचे काहीच वाटत नव्हते, कारण त्यांना आपापल्या जहागिरींचा विस्तार करायचा होता, म्हणून ते बादशहांच्या अंकित राहिले. पुणे, पुरंदर, पैठण, वैजापूर, गंगापूर, कंधार, मंगरूळ, उस्मानाबाद इत्यादी ठिकाणचे पीरांचे दर्गे सूफींचे आहेत. पैठण हे जसे महाराष्ट्राचे सांस्कृतिक केंद्र, पण या काळात सूफींनी पैठणातील गणेशाचे, एकवीरा देवीचे व महालक्ष्मीचे मंदिर उद्ध्वस्त करून त्याठिकाणी दर्गे उभे केले. ही गोष्ट इतिहासात नोंदली गेली आहे.

विजयनगरचा राजा कृष्णराय याने विठ्ठलाची मूर्ती पंढरपुराहून आपल्या राजधानीत नेली होती. ती भानुदासांनी प्रयत्नाने पंढरपुरात परत आणली. कृष्णरायाची कारकीर्द इ. स. १५०९ पासून १५३० पर्यंत झाली. या काळात केव्हातरी ही घटना घडली असावी. कृष्णरायाने या मूर्तीची प्रतिष्ठा एक भव्य देऊळ बांधून त्यात केली. हे विठ्ठलस्वामींचे मंदिर म्हणून ओळखले जाते. खोदकामाचा तो एक अद्वितीय नमुनाच होय. विजयनगरचे साम्राज्य इ. स. १५६५ मध्ये नष्ट झाले. तोवर हे काम पूर्ण झाले नव्हते. ते तसेच राहिले म्हणून विठ्ठल मूर्तीची स्थापना झाली नाही असे म्हणतात. विजयनगर स्मारक ग्रंथात इतिहास संशोधक ग. ह. खरे म्हणतात, “ मंदिरातील शिलालेखांवरून आपणाला माहिती मिलते. हे लेख इ. स. १५३३ ते १५६४ या काळातील आहेत. या लेखांवरून मंदिरात विठ्ठलमूर्ती काहीकाळ होती व तिची पूजा - अर्चा मोठ्या थाटाने होत असे ही गोष्ट निश्चित ठरते. मग मंदिराचे बांधकाम पुरे झाले असो वा नसो. ” काही शिलालेखांचे आधार देऊन ग. ह. खरे आपले हे मत सिद्ध करतात.

श्रीभानुदासांचा जन्म इ.स. १४४८ साली देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुळामध्ये झाला. बालपणीच सूर्यनारायणाची उपासना करून त्यांनी त्यांचे आशीर्वाद प्राप्त केले होते. नाथ म्हणतात - ज्याने बाळपणी आकळिला भानु । स्वये जाहला चिद्‍भानु । जिंकोनी मानाभिमानु । भगवत्पावनु स्वये जाला ॥ प्रपंच चालविण्यासाठी त्यांनी कपड्याचा व्यापार सुरू केला, व्यापाराच्या व्यापात असूनही त्यांनी पंढरीची वारी कधीही चुकविली नाही. कारण तो त्यांच्या कुळाचा नेम होता.

भानुदास महाराज म्हणतात - आमुचिये कुळी पंढरीचा नेम । वाचे सदा नाम विठ्ठलाचे ॥ भानुदासांची कीर्ती पसरली ते एका ऐतिहासिक घटनेने, विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय एकदा पंढरीस आला. श्रीविठ्ठलास आपल्या राज्यात नेऊन प्रतिष्ठीत करावे असा विचार त्याच्या मनात आला आणि त्याने तसे केले. आषाढी वारी जवळ आल्यानंतर पंढरीत वारकरी श्रीविठ्ठल दर्शनार्थ जमू लागले. परंतु ज्याच्या दर्शनासाठी आपण येथवर आलो आहोत तोच जागेवर नसल्याचे पाहुन वारकरी आलाप करु लागले. त्यावेळी भानुदासांनी सर्वांना आश्‍वासन दिलं कि, "मी विठ्ठलास परत" येथे आणीन! भानुदास निघाले, काही दिवसांनी ते मध्यरात्रीच्या सुमारास विठ्ठलासमोर येऊन उभे राहिले. देवास म्हणाले, "देवा सर्व भक्‍त तुझी पंढरीत वाट पाहत आहेत चल माझ्याबरोबर!"

विठ्ठलानं आपल्या गळ्यातील तुळशीच्या हारासह नवरत्‍नांचा हार भानुदासांच्या गळ्यात घालून थोडा धीर धरण्याचा सल्ला दिला. भानुदास तेथुन बाहेर पडले. पहाटे काकड आरतीच्यावेळी जेव्हां पुजारी तेथे आले तेव्हां त्यांच्या लक्षात आले कि देवाच्या गळ्यात नवरत्‍नांचा हार नाही. राजापर्यंत बातमी पोचली. जो कोणी चोर असेल त्यास परस्पर सुळवर चढविण्याचे फर्मान राजाने सोडले. सैनिक सर्वत्र पसरले. पहाटेच्यावेळी तुंगभद्रा नदीच्या किनारी भानुदास संध्या करित असताना एका सैनिकास त्यांच्या गळ्यात नवरत्‍नांचा हार दिसला. हाच चोर असावा असं गृहीत धरून सैनिकाने भानुदासांस बंदि बनविले. त्यांना सुळावर चढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी भानुदासांच्या मुखातुन अभंग प्रकटला - जै आकाश वर पडो पाहे । ब्रह्मगोळ भंगा जाये । वडवानळं त्रिभूवन खाये । तरी तुझीच वाट पाहे गां विठोबा ॥ ज्या सुळावर त्यांना चढविण्यात येणार त्या सुळास पालवी फुटली. सदर प्रसंगाचं वर्णन त्यांच्याच भाषेत पहायचं झाल्यास - कोरडिये काष्ठी अंकुर फुटले । येणे येथे जाले विठोबाचे ॥

ही बातमी राजापर्यंत पोचली. राजाचा थरकांप उडाला, ज्याला आपण चोर समजलो तो चोर नसून महान भगवद्‍भक्‍त असावा हे त्याच्या लक्षात आले. माझ्या भक्‍ताचा छळ झाल्यामुळे मी तुझ्याकडे राहणार नाही असा इशारा विठ्ठलानं दिला. भानुदास विठ्ठलाला घेऊन पंढरीस निघाले. पंढरीजवळ आल्यानंतर आनंदित झालेल्या वारकऱ्यांनी श्रीविठ्ठलाची रथावरून मिरवणूक काढली तो दिवस होता कार्तिक शुद्ध एकादशी इ.स. १५०६ चा. (आजही कार्तिकी एकादशीस रथोत्सव होतो तो या दिवसाचं स्मरण म्हणुन.) भानुदासांनी आपली इहलोकीची यात्रा संपविली.

श्रीविठ्ठल दर्शनास जाताना गरुड मंडपामध्ये उजव्या हातास दरवाज्याजवळ ज्या पहिल्या पादुका आहेत ती म्हणजे श्रीभानुदास महाराजांची समाधी होय. आजही त्यांच्या समाधीदिनाचा उत्सव वारकऱ्यांमध्ये साजरा करण्यात येतो. ह्या दिवशी त्यांच्या वंशजांकडुन परंपरेनं प्रतिवर्षी समाधीचे पूजन, नैवेद्य किर्तनादी करण्यात येते.

संत श्रीभानुदासांच्या भक्‍तितून अंशतःउतराई होण्यासाठी विठ्ठलानं त्यांच्या वंशात जन्म घेतला तो संतएकनाथमहाराजांच्या रूपात. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार । क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरीतीर ॥ निळोबा महाराज

परंपरा भानुदासांच्या संदर्भात जे सांगते ते महत्त्वाचे मानले जाते. भानुदासांचे काही अभंग आणि आख्यायिका परंपरेने जपून ठेवल्या आहेत. या आख्यायिकांपैकी एक तत्कालीन परिस्थितीस दुजोरा देणारी आहे. तिच्यात अद्भुतता असली तरी इतिहासाचेच ते एक पुराणीकरण म्हणून त्याला महत्त्व प्राप्त होते.[१]

  1. ^ "श्रीसंत भानुदास - मराठी साहित्य कट्टा". marathi.bookstruck.in (इंग्रजी भाषेत). 2018-06-25 रोजी पाहिले.[permanent dead link]