वेस्ट इंडीज त्रिकोणी मालिका, २०१३ ही एकदिवसीय सामन्यांची मालिका वेस्ट इंडीज मध्ये जून-जुलै २०१३ मध्ये खेळविली गेली. या मालिकेत भारत, श्रीलंका आणि वेस्ट इंडीज हे देश सहभागी झाले. या मालिकेतील पहिली फेरी सबाइना पार्क, किंग्स्टन, जमैका या मैदानावर आणि दुसरी फेरी व अंतिम सामना क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद येथे खेळविला गेला. या मालिकेला सेलकॉन मोबाईल कप असे नाव दिले गेले. भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोणीला दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना मांडीच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे २ सामन्यांना मुकावे लागले[१]. त्याच्या गैरहजेरीत विराट कोहलीकडे कर्णधार पदाची धुरा सोपविण्यात आली व अंबारती रायडूला खेळण्याची संधी मिळाली.
अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात हातातून निसटत चाललेला विजय कर्णधार महेंद्रसिंग धोणीने शेवटच्या षटकात फक्त ४ चेंडूत १५ धावा काढून खेचून आणला व भारताने श्रीलंकेला १ गडी राखून पराभूत करून सेलकॉन मोबाईल कपवरती भारताचे नाव कोरले[२].
पावसामुळे पहिल्या दिवशी श्रीलंकेच्या डावातील १९ षटकांनंतर खेळ थांबविण्यात आला. दुसऱ्या दिवशी पुन्हा आलेल्या पावसामुळे सामना प्रत्येकी ४१ षटकांचा खेळविण्यात आला.