सारडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भंगारपाडा या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
  ?सारडे
महाराष्ट्र • भारत

१८° ४९′ ५९.८८″ N, ७३° ००′ २७″ E

गुणक: 18°50′04″N 73°00′51″E / 18.83444°N 73.01417°E / 18.83444; 73.01417
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर न्हावा-शेवा, उरण
प्रांत महाराष्ट्र
विभाग कोकण विभाग
जिल्हा रायगड
तालुका/के उरण
लोकसंख्या
लिंग गुणोत्तर
साक्षरता
• पुरूष
• स्त्री
१,३८९ (१३८९(२०११))
त्रुटि: "७.१५ :६.७४" अयोग्य अंक आहे /
त्रुटि: "८१.५३%" अयोग्य अंक आहे %
त्रुटि: "८९.८७%" अयोग्य अंक आहे %
त्रुटि: "७३.०२%" अयोग्य अंक आहे %
भाषा मराठी

गुणक: 18°50′04″N 73°00′51″E / 18.83444°N 73.01417°E / 18.83444; 73.01417 सारडे हे रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यातील गाव आहे. तालुक्याच्या पूर्व विभागात वसलेल्या या गावात मुख्यत्वे आगरी समाजाची वस्ती आहे. येथून जवळच असलेले भंगारपाडा हा याच ग्रामपंचायतीचा एक भाग आहे. गावच्या एकूण लोकसंख्येपैकी २.३% लोक कातकरी आहेत.

भौगोलिक स्थान आणि संस्कृती[संपादन]

गाव टेकडीवर वसलेले असून एकमेकांपासून जवळ घरे बांधली आहेत. वरती राधाकृष्णाचे मंदिर आहे जेथे मंदिराबरोबर सभामंडप आहे श्रीकृष्ण आणि राधेची मोहक मृर्ती आहे त्याच बरोबर हिंदू धर्मात पवित्र मानलेल्या गाईची देखील मृर्ती आहे. श्रीराधाकृष्णमंदिरात श्री राजारामबुवा सारडेकर यांचे कृष्णजन्माष्टमीच्या आधीच्‍या आठवड्यामध्ये होणारे भजन हे गावचे विशेष आकर्षण असते.

भंगारपाड्यात 'कराडी' समाजाची वस्ती आहे. गावाच्या दक्षिणेस 'श्री बहिरी देवाचे मंदिर' आहे त्या भागाला 'उघड' म्हणतात. तसेच भंगारपाड्यापाून वाहणारी खाडी उघडीवरून पुढे जाऊन पातळगंगा नदीच्या[ दुजोरा हवा] खाडीस जाऊन मिळते.

गावाच्या पूर्वेस आणि पश्चिमेस डोंगर रांगा आहेत. पूर्वेच्या डोंगर रांगा दक्षिणेला 'कडापे' ह्या आवरे गावातील एका भागापर्यंत पसरलेल्या आहेत. या दोन्ही पूर्व आणि पश्चिमेच्या डोंगरांच्यामध्ये येथे 'तांदळांची शेती' मोठ्या प्रमाणात करतात.

येथील पूर्वेकडील डोंगरात जेथून पाण्याचे झरे आणि ओढे वाहतात त्या भागाला 'घोल' म्हणतात. जेथे पावसाळ्यात पंचक्रोशीतले पर्यटक आंघोळ करण्यास येतात. येथे पवित्र देवता किंवा देवकन्या वास करतात असे मानले जाते. त्या देवकन्यांना गावातील लोक 'बाया' म्हणतात .

घोलाच्या पूर्वेला' कोमनादेवी डोंगरावर' 'कोमनादेवी' प्रगट झाली आहे ते तेथे पाषाणरूपात निवास करते. गावाच्या आख्यायिकेनुसार देवी पिरकोन गावातील एका भक्ताच्या स्वप्नात आली होती तिने स्वप्नांत दृष्टान्त देऊन सांगितले की मला मुक्त राहु दे .त्यामुळे तेथे अजून मंदिर बांधले गेले नाही, परंतु सारडे पिरकोन गावातील भक्तांसाठी तिचे महत्त्व अपरंपार आहे. येथे येणारे पर्यटक देवीचे दर्शन जरूर घेतात. ही देवता येथे प्रचंड प्रिय असून तिच्या रिक्षा चालक भक्तांनी स्वतःच्या वाहनांवर कोमनादेवी प्रसन्न हे तिच्या कृपेचे प्रतीक म्हणून लिहिले आहे.

सांस्कृतिक परंपरा आणि सण[संपादन]

गोपाळकाला हा सारडे गावातील प्रमुख सण आहे. गावात होळी, दसरा, दिवाळी, आषाढी एकादशी हे सणसुद्धा साजरे होतात. गोपाळकाला ह्या सणाच्या आधी सात दिवस सप्ताह नावाचा समारंभ गावातील मुख्य मंदिरात असतो प्रत्येक घरातील एक पुरुष आळीपाळीने मंदिरात श्रीकृष्णाचे भजन आरती करत बसतात ,श्रावण कृष्ण अष्टमीच्या दिवशी सर्व सारडे गाव निर्षण उपवास करतात व गोपाळकाळ्याच्या दिवशी जेष्ठ व्यक्तींच्या पायापडुन उपवास सोडतात .

सारडे येथील अनेकजण लोक नोकरीच्या निमित्ताने बव्हंशी मुंबई, नवी मुंबई, उरण, पनवेल, पेण येथे राहतात क्वचित काही कुटुंबे अमेरिकेत स्थलांतरित झाली आहेत, तर काही नोकरीच्या निमित्ताने दुबई, दक्षिण ऑफ्रिकेत टांझानिया येथे जाऊन आली आहेत. परंतु त्यांचे गावाशी असलेले ऋणानुबंध अजूनही कायम आहेत. गावाबाहेर राहणार्‍या व्यक्ति गोपाळकालासाठी आणि गणपतीसाठी दरवर्षी गावाला भेट देतात.

श्री राधाकृष्ण उत्सव आणि सारडे गाव...

उरण तालुक्यातील डोंगरमाथ्यावर वसलेलं आणि अंगावर वृक्षरूपी हिरवी शाल घेऊन बसलेलं, अनेक गुणी विद्यार्थी आणि कलाकार घडवणाऱ्या शिक्षकांचं छोटंसं आणि सुंदर गाव म्हणजेच सारडे गाव. गावाच्या पूर्वेला खाडी, दक्षिणेला गावचं तलाव, पश्चिमेला घोल नावाचं प्रसिद्ध तसेच कोमना देवीचं वास्तव्य असलेले ठिकाण आणि उत्तरेकडून उरण, नवी मुंबई आणि मुंबईच्या दिशेने जाणारा मार्ग.

गावात भरवले जाणारे क्रिकेटचे सामने, गावातील वाद्यवृंद (बँड/बेंजो), आणि गावातील सांस्कृतिक सामाजिक मंडळं यांच्यामार्फत आजतागायत सारडे गावाने समाजात आपली वेगळीच छाप सोडली आहे. आणि त्याहूनही विशेष म्हणजे आजही विधिवत आणि परंपरेप्रमाणे राधाकृष्ण उत्सव साजरे करताना सारडे गाव दिसत आहे.

गावातील राधाकृष्ण मंदिराची स्थापना शके १८४८ पूर्वी झाली झाली. मंदिरासाठी जागा रामभाऊ काळ्या पाटील आणि हरिश्चंद्र काळ्या पाटील यांनी आपल्या वडिल काळ्या उधऱ्या पाटील यांच्या स्मरणार्थ मंदिरासाठी दान केली. मंदिर घडवणाऱ्या सुतार आणि गवंड्यांनी त्यावेळी दगड आणि लाकडावर केलेल्या कोरीव कामांची आजही कलाप्रेमीं वर्गाकडून स्तुती केली जाते. सभामंडप हे सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून म्हणजेच वर्गणी गोळा करून काही वर्षानंतर बांधलं गेलं. मंदिरातील राधाकृष्णाच्या मुर्त्या राजस्थान वरून मुंबई मार्गे आणि मुंबई वरून आवरे गावातील रामा गावंड (वडील) आणि सोमा गावंड (मुलगा) यांच्या बादऱ्या आणि कालांतराने दर्याबहाद्दूर म्हणून नामकरण झालेल्या मचव्यात भाऊच्या धक्क्यावरून (मुंबई) ते वशेणीच्या खाडीपर्यंत आणि पुढे गावापर्यंत आणल्या होत्या. त्यानंतर शके १८४८ रोजी विधिवत पूजा करून त्या मुर्त्यांची स्थापना केली गेली. आणि खऱ्या अर्थाने गावात उत्सव साजरे करायची सुरुवात झाली.

बादऱ्या नावाच्या मचव्याला दर्याबहाद्दूर हे नाव का पडलं हे जाणून घेऊ या !

सारड्याच्या ग्रामस्थांनी राधाकृष्णाच्या मुर्त्यांची ऑर्डर केल्यानंतर मुंबई येथे नोकरीसाठी गेलेल्या ग्रामस्थांकडे मुर्त्या तयार असल्याचा निरोप आला. तेव्हाचे भूमार्ग एवढे चांगले नसल्याने किंवा नसल्यानेच मुर्त्या समुद्रमार्गाने आणण्याचे सर्वानुमते ठरले आणि त्यासंदर्भात त्यावेळी आपल्या विभागातील सर्व रेतकर बांधवांना आणि नखवांना (होडीचा मालक) विचारणाही केली. पण उधाणातील आपली एक खेप (फेरी/दिवस) वाया जाईल म्हणून बऱ्याच नखवांनी आपला मचवा (रेती वाहून आणणारी मोठी होडी) घेऊन येण्यास नाकारलं. पण आवरे गावातील रामा आणि सोमा गावंड यांनी कोणत्याही नफा तोट्याचा विचार न करता आणि कोणतेही मानधन न घेता केवळ श्रद्धेपोटी मुर्त्या भाऊच्या धक्क्यावरून वशेणीच्या बंदरात घेऊन येण्याची तयारी दाखविली. मुंबईहून मुर्त्या घेऊन परत येत असताना त्या प्रवासात मचव्याने कोणालाही कल्पित नसताना जो काही वेग पकडला तो भाविकांच्या श्रद्धेला बळ देणारा आणि स्तुत्य होता. प्रवासात असलेल्या सर्व मचव्यांना मागे टाकून सर्व प्रथम वशेणीच्या बंदरात पोहचण्याचा मान बादऱ्याने मिळवला. आणि तेव्हापासूनच बादऱ्याच्या पराक्रमाची पावती म्हणून त्याला दर्याबहाद्दूर म्हणून संबोधले जाऊ लागले.

तेव्हापासून आजतागायत रामा आणि सोमा गावंड यांनी केलेल्या निशुल्क आणि निस्वार्थ सेवेचा सारडे गावात आजही यथेच्छ सन्मान केला जातो. आज ते दोघेही हयात नाहीत तरीदेखल सालाबादप्रमाणे पालखी मिरवणूक सुरु होण्याअगोदर त्यांच्या परिवारातील उपस्थित व्यक्तींना शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित केलं जातं.

सारडे गावात तसे ९ विभाग म्हणजेच आळ्या पण सर्व सहमतीने त्यांच्या ६ आळ्या करण्यात आल्या आणि याच आळ्यांपासूनच पासूनच गावातील उत्सवाला सुरुवात होते. चालूवर्षात ज्या आळीचा मान (पाळी) तीच आली त्या वर्षातील सर्व उत्सवांचं नियोजन करते. आणि उत्सवांची सुरुवात सप्ताहापासून होते.


सप्ताह (सप्ता) : मूळ उत्सव म्हणजेच कृष्णजन्म साजरा होण्यापूर्वी सात दिवस आगोदर ढोल, नाल, मृदूंग, टाळ आणि भक्तिगीतांद्वारे भगवंताच्या नावाचा कोणताही खंड न पडू देता सात दिवस सतत जयघोष करत जागर करणे म्हणजेच सप्ताह. यालाच आपण अखंड हरिनाम सप्ताह देखील म्हणू शकतो. पूर्वी सारडे गावात सप्ताहाची पहिली बारी हि डोखऱ्यांची म्हणजेच गावातील जेष्ठ व्यक्तींची असायची. पण सध्या सारडे गावातील ६ अळ्यांना दिवस आणि रात्रींमधील प्रत्येकी दोन दोन तास वाटून दिले असल्यामुळे सुरुवात अळीप्रमाणे होते. सर्व आळ्या सप्ताहात आपापले काम चोख बजावतात. वाट्याला आलेल्या त्याच दोन तासांच्या जागराला पहारा देणे असे म्हणतात. पहिला पहारा (पाळी) हि त्यावर्षीचा मान असलेल्या आळीची असतो आणि तिची वेळ सकाळी ६ ते ८ अशी असते. पहाऱ्यातील आपली वेळ संपण्या आगोदर चालू पहाऱ्यातील एक नियोजित व्यक्ती (हाकाऱ्या) पुढील पहारा देणाऱ्या आळीतील सदस्यांना बोलावण्यासाठी प्रत्येकाच्या घरी जाते. आळीतील प्रत्येक तरुणाला पहाऱ्याला येणे बंधनकारक असते न येणाऱ्याला किव्वा ज्यांना येणे शक्य नाही त्यांना गहाण धरलं जातं म्हणजेच सर्वसंमतीने दंड आकाराला जातो. पूर्वी तो दंड धान्य स्वरूपात असायचा आणि सध्या आर्थिक स्वरूपात जमा केला जातो. त्याच जमा झालेल्या दंडातून नंतर त्या संबंधित आळीमध्ये प्रसाद म्हणून गोडधोड वाटलं जातं.

पूर्वी आपल्या विभागातील प्रत्येक गावात हि सप्त्याची परंपरा होती पण अनेक कारणांस्तव ती बंद झालेली दिसते. पण उरण पूर्व विभागात सारडे हे एकमेव असे गाव आहे कि त्या गावात दरवर्षी लहान थोर आणि वडीलधाऱ्या मंडळींकडून अखंडित हरिनाम सप्ताह सोहळा पार पडला जातो.

कृष्ण जन्म: कृष्णजन्म का साजरा केला जातो हे आपण सर्वानाच ज्ञात आहे. पण कृष्णजन्माच्या दिवशी सारडे गावातील राधाकृष्ण मंदिरात एकीकडे सप्ताह चालू असताना भगवंताची विधिवत पूजा केली जाते. अंगाई गीते गायली जातात. आरती करून झाल्यावर भगवंताच्या नावाचा जयघोष केला जातो. आणि भगवंता चरणी फुलं उधळली जातात. पाळण्यातल्या बाळकृष्णाचे दर्शन सर्व भाविकांना दिले जाते बाळकृष्णाला नमस्कार करून झाल्यावर. सर्व लहान थोरांना नमस्कार करून आशीर्वाद घेतले जातात. प्रसादही वाटला जातो. पूर्वी प्रसाद हा सुंठवडा आणि गावातून जमा केलेल्या पोह्यांचा वाटला जायचा आणि त्या सोबतच उपवास देखील सोडला जायचा. आजही तीच प्रथा जोपासत तश्याच पद्धतीत ग्रामस्थांना प्रसाद वाटला जातो.

गोपाळकाला: कृष्णजन्माच्या दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच गोपाळकाल्याला सकाळी ठीक आठ वाजता गावातील सर्व बाळ गोपाळ आपल्या वडीलधाऱ्या मंडळींसह दहीहंडी म्हणजेच गोविंदा खेळण्यासाठी मंदिराजवळ एकत्र जमतात. अर्थातच पहिला गोविंदा हा त्यावर्षीचा मान असलेली आळीच काढते. पूर्वी ढोलाच्या तालावर गोविंदा निघायचा आणि सध्या बँजोच्या तालावर गावभर मिरवणूक देखील काढली जाते. गावातील आमंत्रित आणि मानाच्या हंड्या फोडून ११ च्या सुमारास सर्व बालगोपाल तळ्यावर आंघोळ करण्यासाठी जातात. गोपाळकाल्याच्या दिवशी गावात जरी गोविंदा फिरत असला तरी मंदिरातील ढोलाचा आवाज त्याच तालात घुमत असतो म्हणजेच भगवंताच्या नावाचा गजर सुरूच असतो. प्रत्येक आळीतील एक जबाबदार आणि जेष्ठ नागरिक गोपाळकाल्याच्या दिवशीची आपली मौलिक कामगिरी बजावत असतो.

गावातील सर्व नागरिक तळ्यावरून अंघोळ करून आल्यावर दुपारी ठिक १२ वाजता मंदिरात आरती केली जाते. आरती झाल्यावर सर्व नागरिक भक्ती भावाने मंदिरातील देव आणि देवतांचं दर्शन घेतात. मंदिरात शेवटच्या दिवशी जागर करत असलेल्या सर्व थोरल्याचे आशीर्वाद घेतात. आणि त्याच वेळी अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप होतो. सर्व भाविक प्रसाद ग्रहण करून आपल्या घरी जातात. संपूर्ण गावभर प्रसाद देखील वाटला जातो आणि सध्या ग्रामस्थांकडून सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन केले जाते.

पालखी मिरवणूक: गावातील मानाची पालखी तिला सुंदर वस्त्र, हार तुऱ्यांनी सजवून आतमध्ये परातीत ठेवलेले गुलाल आणि तांदूळ आणि त्यांच्यावर उभी केलेली राधाकृष्णाची मूर्ती मिरवणुकीसाठी रात्री बाराच्या सुमारास मंदिरातून बाहेर काढली जायची. पूर्वी ढोल, टाळ, नाल यांच्या तालावर भजनं गात सोबतच ग्रामस्थांतर्फे "जानबा तुकाराम" म्हणजेच "ज्ञानबा तुकाराम" नावाचा जयघोष करत पालखी निघायची. सोबत एक ढाल आणि पाच ते सहा भगव्या निशाण्या देखील असायच्या. तेव्हा गुलालाचा वापर क्वचितच म्हणजेच फार थोड्या प्रमाणात केला जायचा.

सदर उत्सवात तसेच पालखी मिरवणुकीत श्री. राधाकृष्ण भजन मंडळ आणि रायगड भूषण श्री. राजाराम बुवा सारडेकर यांची मोलाची कामगिरी पाहायला मिळते. सलग 50 वर्षे हीच परंपरा आणि जबाबदारी सांभाळताना राधाकृष्ण भजन मंडळ आणि श्री. राजाराम बुवा सारडेकर दिसत आहेत.

गावाच्या मधोमध पोहचल्यावर रात्री १ च्या सुमारास सामूहिक आरती केली जायची. चहापान झाल्यावर पुनः पालखी मंदिराच्या दिशेने निघायची रात्रीच सुमारे ५ च्या सुमारास पालखी मंदिरात पोहचविली जायची. निसर्गाचा कितीही प्रकोप झाला, अतिवृष्टी झाली तरीही पालखी मिरवणूक काढलीच जायची आणि आजही काढली जाते. पालखी मंदिरातून निघाल्यानंतर ते मंदिरात पोहचेपर्यंत पाऊस पडायलाच हवा. तो पडल्यानंतर देवांनी अंघोळ केली अशी ग्रामस्थांची श्रद्धा होती आणि ती आजही आहे.

सध्या पालखी मिरवणुकीचे स्वरूप जनरेशन प्रमाणे बदललेलं दिसतं DJ आणि बॅन्जोच्या साथीने मिरवणूक काढली जाते. पण उत्सव त्याच जोशात आणि मोठ्या हर्षाने साजरा केला जातो. जनरेशन जरी बदलेलं दिसत असलं तरी आजही आपली संस्कृती आणि परंपरा जोपासताना सारडे गावातील तरुण आणि ग्रामस्थ दिसतात. २१साव्या शतकात वेळ देऊन आपल्या पांपरेला जपणाऱ्या सारडे गावाला आणि गावातील तरुणाईला मनाचा मुजरा.

आपापल्या विभागात आणि सर्व गावात आपापल्या परीने आणि परंपरेप्रमाणे श्री. कृष्ण जन्म आणि गोपाळकाला उत्सव साजरे केले जातात. खोपटे, भेंडखळ, पुनाडे, आवरे, दिघाटी तसेच वशेणी गावात याच काळात अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं जातं. प्रत्येक गावाची काही ना काही वैशिष्ठे आहेत. पण पावसाळ्यात रात्री पालखी मिरवणूक काढणारे सारडे गाव थोडं वेगळं म्हणावं लागेल. गावातील राधाकृष्ण उत्सव राधाकृष्ण उत्सवातील भाविक आणि भक्तांची श्रद्धा, भक्ती-भाव, गमती-जमाती पाहण्यासाठी या वर्षी एकवेळ सारडे गावाला जरूर भेट द्या.

अर्थव्यवस्था[संपादन]

पूर्वेच्या व पश्चिमेच्या डोंगरांच्यामध्ये येथे मोठ्या प्रमाणात 'तांदळांची शेती' करतात. गावातील बहुतेक तरुण मंडळी गोडाऊनमध्ये काम करतात, तर काही न्हावा-शेवा बंदरात.तसेच येथील खाडीतून मासेमारी करून ती विकण्याचा उद्योग काही व्यक्ती करतात. त्यासाठी ते आसू, यंडी, वावरी, पाग या पारंपरिक जाळ्यांचा वापर करतात. तर काही जण उदरनिर्वाहासाठी मासेमारी करतात. गावात कोणती कंपनी नसल्याने खाडीमध्ये प्रदुषन झाले नाही.

दळणवळणाची साधने आणि वाहतूक व्यवस्था[संपादन]

येथे शेतकर्‍यांसाठीचा खाडी पार करणारा पूल कोसळला आहे, त्यामुळे पलीकडे जायचे असेल तर खाडीतून जावे लागते किंवा वाहतुकीच्या पुलावरुन पलीकडे जावे लागते. वाहतूकदारांनी बेजबाबदारपणे अवजड जड माल वाहून नेणारी वाहने चालविल्यामुळे अनेक अपघात होतात. भरधाव वेगात येणार्‍या एका टाटा सुमो या वाहनाचा गावातील एका व्यक्तीस अपघात झाला होता आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

राज्य महामंडळाच्या बसने सारडे गाव उरण, पनवेल, पेण, अलिबाग या शहरांस जोडले गेले आहे.

प्रशासन[संपादन]

पाणी व्यवस्था :- बहुंताशी पाणीपुरवठा पुनाडे धरणातून होतो, परंतु जेव्हा तो खंडित होतो तेंव्हा गावातील सार्वजनिक विहिरी आणि घोलातील असलेल्या डोर्‍यांवर अवलंबून रहावे लागते. तेथे पाण्याचा उपसा झाला तर बाभळीवर, तेथे नसेल तर थेट चोंडी या पाणवठ्यावर जावे लागते. गावातिल तलावाचे पाणी पित नाहित ते कपडे धुण्याकरिता वापरतात.

विजेची सोय :- गावात नेहमीच विजेचे भारनियमन चालू असते. अनेकदा, विशेषत:पावसाळ्यामध्ये, गावातील लोकांना अंधारात रहावे लागते. दरवर्षी येथे बिघाड होतोच.

प्रशासकीयदृष्ट्या जरी मराठी ही कार्यालयीन भाषा असली तरी येथे सर्व लोक आगरी बोली भाषा बोलतात.

आरोग्यसुविधा[संपादन]

गावात एकही दवाखाना, मेडिकल स्टोअर्स किंवा हॉस्पिटल नाही. आरोग्यविषयक बाबींसाठी गावकर्‍यांना इतरत्र जावे लागते.


  • गुन्हेगारी :- हल्ली अलिकडच्या काळात रस्त्याचे रुंदिकरण केल्यापासुन गावातिल तरुण बेपत्ता होणे,अपघात होणे ,कारचे टायर चोरणे ,रिक्षा जाळणे असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे प्रकार घडु लागले आहेत त्यांमुळे गावामध्ये पोलिस स्टेशनची किंवा चौकीची गरज निर्माण झाली आहे , परंतु प्रशासन दुर्लक्ष करीत आहे .

सामाजिक[संपादन]

"सारडे विकास मंच" नावाची संघटना 'श्री नागेंद्र म्हात्रे' यांच्या नेतृत्वाखाली गावातील विविध सामाजिक कार्ये करीत आहे. "गावाचा लोकांचा विकास गावाचा विकास हाच हेतु" हे संघटनेचे ब्रीदवाक्य आहे. गावातील लहान मुलांपासून ते तरुण, वृद्ध व्यक्तींनी ’सारडे विकास मंच’च्या स्वच्छता मोहिमेला प्रचंड[ व्यक्तीगतप्रमाणपत्र?संदर्भ हवा!]प्रतिसाद दिला होता. ही संघटना खालील कामेही करते:-

  • वृक्षारोपण, ग्राम स्वछता अभियान
  • मुलांसाठी किल्ले स्पर्धा, उन्हाळ्यात पक्षांसाठी घरटी आणि पाण्याची व्यवस्था करणे
  • संघटनेने जिल्हा परिषदेच्या शाळेला १०००० रुपयांची अर्थिक मदत केली आहे
  • शालेय साहित्य वाटप करणे आणि मुलांमध्ये स्वछतेविषयी जनजागृती निर्माण करणे
  • गावातील लोकांमध्ये ग्राम सभेचे महत्त्व पटवुन देऊन शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहचवणे
  • गरजूंना आर्थिक मदत करणे, वगैरे.