पुष्यमित्र शुंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
शुंग साम्राज्याचा विस्तार

पुष्यमित्र शुंग हा मगध साम्राज्याचा मौर्यांच्या पाडावानंतरचा शासक होता. इतिहासात याने बौद्ध धर्मीयांच्या पाडावासाठी अनेक क्रूर कृत्ये केली. त्यामुळे इतिहासात हा क्रूरकर्मा म्हणून ओळखला जातो. पुष्यमित्र हा सुरुवातीला मौर्य साम्राज्याचा सेनापती होता. अशोकानंतर ५० ते ६० वर्षातच मौर्य साम्राज्य लयाला गेले. अशोकानंतर कोणताही मौर्य शासक प्रभावी नव्हता. पुष्यमित्र शुंगने शेवटचा मौर्य सम्राट बृहदत्त याची एका लष्करी कार्यक्रमाच्या वेळेस दगाफटका करून हत्या केली व तो स्वतः मगध साम्राज्याचा शासक बनला. अशा प्रकारे शुंग वंशाची स्थापना झाली. शुंग वंशाने मगधवर व उत्तर भारतावर पुढील दीड शतक राज्य केले.

इतिहासकारांची पुष्यमित्र शुंग बद्दल अनेक मते आहेत. एका मतप्रवाहानुसार तो एक महान सेनानी होता. त्याने डेमेट्रियसचे ग्रीक आक्रमण परतवून लावले, तसेच शक राज्यकर्ते व सातवाहनांबरोबर युद्धे करून शुंग साम्राज्य वाढवले. तर इतरांच्या मते पुष्यमित्र ब्राम्हणवादाच्या अतिरेकी विचारांचा होता व आपल्या कारकिर्दीत बौद्ध धर्माचे वाढलेले स्तोम कमी करण्याचा त्याने प्रयत्न केला. त्यासाठी आपल्या आक्रमणांदरम्यान बौद्ध स्तूपांना लक्ष्य केले. अशोकाच्या कारकिर्दीत बांधलेले अनेक बौद्ध स्तूप त्याने पाडले व बौद्ध धर्मीयांना मिळणाऱ्या राजकीय सुविधा बंद केल्या.