Jump to content

नासिका भूषणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नासिका भूषणे हा अलंकाराचा एक प्रकार आहे. शिरोभूषणे, कंठभूषणे, बाहुभूषणे आदींच्या तुलनेने पाहता पुरुषांपेक्षा स्त्रियांतच नासिकाभूषणे वापरण्याची प्रथा दिसून येते. हा अलंकारप्रकार स्त्रिया एका नाकपुडीत, दोन्ही नाकपुड्यांत किंवा दोन नाकपुड्यांच्या मधील पडद्याला अडकवितात. इतर दागिन्यांच्या मानाने नासिकाभूषणांचे आकार-प्रकार मर्यादित आहेत. त्यांपैकी नथ, बेसर, चमकी, बुलाक, लवंग लटकन, घुंग्री, बाला, फुली, कतिया, मोरपंखी, संपानगी, मौनरिया व पोगूल इ. प्रकार प्रदेशपरत्वे विशेष प्रचलित आहेत. सामान्यत: सोने, चांदी, तांबे, पितळ इ. धातू त्याचप्रमाणे जडावकामासाठी हिरे, माणिक, मोती इ. मौल्यवान रत्ने यांचा नासिकाभूषणांसाठी उपयोग करण्यात येतो. त्यांतील काहींची जडणघडण वैशिष्ट्यपूर्ण आणि कलात्मक स्वरूपाची असते. उदा., चमकी हा नासिकाभूषणांतील आकाराने सर्वांत लहान असा प्रकार असून तो सोन्यावर रवे पाडून तयार करण्यात येतो. चमकीचा वापर पूर्वी हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश इ. भागांत विशेष रूढ असला, तरी आता भारतीय स्त्रीवर्गात तिचा वापर सार्वत्रिक झाला आहे. सामान्यत: एकाच नाकपुडीत घालावयाची चमकी स्त्रिया प्रदेशपरत्वे डाव्या अथवा उजव्या नाकपुडीत घालतात.

महाराष्ट्रीय स्त्रिया चमकी आणि नथ डाव्या नाकपुडीत घालतात तर दाक्षिणात्य स्त्रियांत सामान्यत: हे प्रकार उजव्या नाकपुडीत घालण्याची रूढी आढळते. चमकीचा वापर कुमारिकांप्रमाणेच विवाहित स्त्रियाही करतात. घुंग्री हे चमकीप्रमाणेच पण थोडे मोठ्या आकाराचे, सोन्यावर रवे पाडलेले, गोलाकार व संकीर्ण आकृतिबंधाचे नासिकाभूषण असून त्याचा वापर विशेषत्वाने नेपाळी व सिक्किमी स्त्रिया करतात.

स्त्रियांचे विशेष आवडते व आकारप्रकारांच्या बाबतीत अधिक कलात्मक असलेले नासिकाभूषण म्हणजे नथ होय. नथ हा शब्द संस्कृतातील ‘नाथ’ म्हणजे वेसण या शब्दावरून आलेला असावा, नथीचे अनेक प्रकार आढळतात. पुष्कळदाएक मोठी कडी व तिच्यात गुंफलेले वा जडवलेले मणी किंवा मौलिक खडे असे तिचेस्वरूप असते. अनेकदा मोठ्या आकाराच्या कडीवजा अशा या नथीचा नाकपुडीवरीलताण कमी करण्यासाठी ती एका साखळीने स्त्रिया आपल्या केसांना बांधतात. कतिया हीएक अशीच सोन्याची साखळी असून तिचे एक टोक नथीला अडकविलेले असते, तरदुसरे टोक एका आकड्याने केसात अडकविण्यात येते. त्यामुळे नाकपुडीवर पडणाराताण कमी होण्यास मदत होते. महाराष्ट्रात सोन्याचा फासा असलेल्या तारेत सात किंवाअधिक मोती व मधोमध लाल रत्ने बसविलेली, असे नथीचे स्वरूप असते. नथीला ‘मुखरा’ अशीही संज्ञा आहे. नथ ही सामान्यत: एकाच नाकपुडीत घालतात. सौभाग्याची निदर्शक म्हणून विशेषतः सौभाग्यवती स्त्रिया नथ वापरतात. पोगूल हे नासिकाभूषण जवळजवळ नथीसारखेच असून कोरोमंडलच्या किनाऱ्यावरील पुरुषही त्याचा वापर करतात, असे दिसते तर नथनी म्हणून ओळखली जाणारी कडी एखाद्या ख्यातनाम व्यक्तीच्या नावाने मुस्लिम समाजातील मुलांच्या नाकात घालण्याची प्रथा आहे. बाला या नासिकाभूषणाचा आकार चंद्रकोरसदृश असून त्याला मोत्यांचे झुपके लावलेले असतात.त्याचा वापर लाहोर भागातील स्त्रियांत आढळतो. फुली वा बेसर ही नक्षीदार नासिकाभूषणे चमकीवजा पण किंचित मोठ्या आकाराची असून त्यांचा वापर प्रौढ स्त्रियाकरतात. बेसर या नासिकाभूषणाला कधी कधी हिरे-मोत्यांनी जडविलेला एक पट्टा असतो व त्यावर सोन्याच्या चकचकीत टिकल्या बसविलेला दागिना लोंबकळत ठेवतात.नथधागा हे एक वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णाचे गोलाकार नासिकाभूषण असून त्याला सोन्याच्यादांडीत मोती अडकविलेली एक साखळी लावलेली असते. बुलाक हा एक लहान लोलकअसून तो कधी नथीत तर कधी दोन नाकपुड्यांमधील पडद्याला अडकविण्यात येतो. नथ व तिच्यातील पर्णाकार बुलाक हे कुलू प्रदेशातील स्त्रियांचे एक वैशिष्ट्यपूर्ण नासिकाभूषण आहे. भारतात इतरत्र तसे नासिकाभूषण आढळत नाही. लटकन हा एक नथीतील लोंबणारा लोलक असून लवंग या अंलकारात मोत्याबरोबर वैडूर्य किंवा एखादा चमकदार खडा जडविलेला असतो.

इतर नासिकाभूषणे

[संपादन]

मोरपंखी किंवा संपानगी ही दोन्ही नासिकाभूषणे ओरिसातील असून पहिल्याचा आकार मयूरसदृश असतो व त्यामध्ये तारेत तासकाम केलेले असते तर दुसऱ्याचा आकार पॅगोडासारखा असतो आणि त्याच्या साखळ्यांना सु. २·५४ सेंमी.चेएक वेधक पिंपळपान अडकविलेले असते. मौनरिया हे राजस्थानी नासिकाभूषण म्हणजेमोठ्या आकाराचे गोल कडेच असून त्याचा आकार व सजावट पुष्पगुच्छसदृश असते.याचा वापर बहुधा लग्नसमारंभप्रसंगी विवाहित स्त्रियाच करतात. काश्मीरमधील गोलाकार नासिकाभूषणांत मात्र नक्षीकाम व कलाकुसर बरीच केलेली असून त्याला गोंडे लावलेले असतात तर काही वन्य जमातींतील स्त्रियांच्या नासिकाभूषणांमध्ये मोठ्या आकाराच्या कड्यात मणी आणि खडे बसविलेले असून या कड्यांनाच दोन्ही नाकपुड्यांच्या मधोमध लोंबकळणारी पदकेही लावलेली असतात. तमिळनाडूकडील नासिकाभूषणे ही कुलूप्रदेशातील नासिकाभूषणांच्या धर्तीवर दोन नाकपुड्यांच्या मधोमध घालण्याची पद्धत आहे.

इ. स. पू. १००० च्या काळातील नासिकाभूषण

[संपादन]

इ. स. पू. १००० च्या सुमारास हिब्रू स्त्रियांमध्ये एक वा अनेक नासिकाभूषणे घालण्याची प्रथा असल्याचे म्हणले जाते. तसेच आपले सामाजिक स्थान व प्रतिष्ठा दर्शविण्यासाठीही आफ्रिकेतील काही टोळ्यांमधील विवाहित स्त्रिया नाकात कडे अडकवीत तर काही स्त्रिया नाकपुडीत साळूची पिसे घालीत आणि काही टोळ्यांत हस्तिदंती नासिकाभूषणे घालण्याची पद्धत असल्याचेही उल्लेख सापडतात. भारतातील प्राचीन शिल्पे व भित्तिचित्रे यांतून नवव्या शतकापर्यंत तरी नासिकाभूषणे दिसत नाहीत. तसेच त्यांचे उल्लेखही अभिजात साहित्यातून आढळत नाहीत. नथ हा नासिकाभूषणातील एक महत्त्वाचा प्रकार असून हिंदू स्त्रियांत तो सौभाग्यालंकार म्हणूनच रूढ होऊन बसला आहे.तथापि ‘नथ’ शब्दाऐवजी दहाव्या शतकानंतरच्या संस्कृत साहित्यात ‘नासाग्रमौक्तिक’, ‘नासाग्रमुक्ताफल’ वा ‘मौक्तिक नासिकायाम्’ असे उल्लेख आढळतात. त्यामुळे नवव्या-दहाव्या शतकांनंतरच भारतात ‘नथ’ हा अलंकारप्रकार मुसलमानांच्या संपर्काने आला असण्यासाठी शक्यता काही विद्वानांनी दर्शविलेली आहे.