Jump to content

द पॉवर ऑफ जेंडर अँड द जेंडर ऑफ पॉवर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दि पावर ऑफ जेन्डर अँड दि जेन्डर ऑफ पावर[] हे कुमकुम रॉय[] लिखित पुस्तक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने २०१० मध्ये प्रकाशित केले आहे. प्रस्तुत पुस्तक हे कुमकुम रॉय यांच्या प्राचीन भारतातील लिंगभाव संबंध यावर त्यांच्या आधीच्या कामावर आधारित आहे.

प्रस्तावना

[संपादन]

प्रस्तुत पुस्तकाची सुरुवात स्त्रीवादी अभ्यासकांना सामोरे जावे लागणाऱ्या आव्हानांनी होते:

१. स्त्रियांच्या दमनातील वैविध्य निदर्शनास आणणे. उदा. सर्व स्त्रियांचे एकसारखे दमन होत नाही. याचा स्वीकार करणे.

२. वैदिक काळ जा स्त्रियांसाठी सुवर्णकाळ होता याची चिकित्सा करणे हे एक इतिहासकार म्हणून भारतीय स्त्रीवादी इतिहासकारांपुढील आव्हान आहे.

लेखिकेने प्राचीन काळातील लिंगभाव संबंध समजून घेण्यासाठी भारतीय प्राचीन इतिहास काळात लिहिलेल्या दस्तऐवजाचा आधार घेतला आहे. त्यांच्या मते, आपण स्त्रियांच्या दर्जाविषयक वर्णनांमधून स्त्रियांविषयक समजाचे एकजिनसीकरण करू शकत नाही. प्रत्येक ऐतिहासिक कालखंडाच्या सामाजिक संरचनावर स्त्रियांचा दर्जा अवलंबून असतो हे लक्षात घेणे जरुरीचे आहे.

ठळक मुद्दे

[संपादन]

सुरुवातीला पितृसत्ता ही कशाप्रकारे रचित होते हे समजण्यासाठी आपल्याला परत एकदा प्राचीन इतिहासाकडे वळणे गरजेचे आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये लेखिकेने प्रत्येक प्रकरणांची थोडक्यात ओळख करून दिलेली आहे. प्रस्तुत पुस्तकातून उपस्थित केलेले प्रश्न सुरुवातीच्या काळापासून ते सद्य काळातील लिंगभावविषयक विश्लेषणातील समज वृद्धिंगत करण्यास मार्गदर्शन करते. प्रस्तुत पुस्तक हे भारताच्या भूतकाळाच्या पूर्नसाचीकरणातील लिंगभावाचे महत्त्व याचे परिक्षण करते. त्याचबरोबर भारताच्या सुरुवातीच्या काळातील लिंगभाव नातेसंबंधातील विविधता आणि गुंतागुंत समजून घेत असताना स्त्रियांचा उच्च आणि कनिष्ठ दर्जा या द्वैताच्या पलीकडे जाऊन विचार करते. पुस्तकाची रूपरेषा ही नातेसंबंध, घरदार, विवाह, पुनरुत्पादन आणि लैंगिकता या विषयांसंदर्भात लेखिकेचा अनेक वर्षांपासूनच्या असलेल्या संबंधावर आधारित आहे. जरी प्रस्तुत पुस्तकातील निबंध वेगवेगळ्या कालखंडात लिहिले गेले असले तरी आधीचा भारताचा इतिहास समजून घेण्याचा स्त्रीवादी दृष्टीकोन आहे तो एकत्र बांधण्याचा प्रयत्न प्रस्तुत पुस्तकातून केला आहे.[]

पुस्तकातील पहिल्या भागामध्ये संस्था आणि प्रक्रिया यांचे लिंगभावी विश्लेषण केलेले आहे. दूसरा भाग साहित्यातील विश्लेषणावर आधारित आहे. पुस्तकाच्या शीर्षकावरूनच पुस्तकातील मुख्य मुद्दा लक्षात येतो तो म्हणजे लिंगभाव हाच सत्तेचा अक्ष घडवतो.

पुस्तकातील पहिल्या विभागातील प्रबंधामधून पाली आणि संस्कृत स्त्रोतांमधील स्त्रियांचे आवाज शहरी भागातील लिंगभावी नातेसंबंधाचे प्रतिनिधित्व, courtesanal परंपरा यांचे परिक्षण केले आहे. बऱ्याचशा लेखांमध्ये संस्कृत संहितेचे पूर्नअन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर त्यांनी थेरीगाथांचा अभ्यास केला आहे. लेखिकेने प्रबंधामधून आधीच्या काळातील बौद्ध भिक्खुनींनी रचलेली मुक्तीची गीते यावर लक्ष वेधले आहे की ज्यातून त्यांनी हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की, बौद्ध भिक्खुनींनी रचलेली मुक्तीची गीते ही बौद्ध भिक्खुनी रचलेल्या गीतांपेक्षा वेगळी आहेत.

पुस्तकाच्या दुसऱ्या विभागामध्ये धर्मग्रंथ परंपरेचे पूर्नपरिक्षण केले आहे. कुमकुम रॉय यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या धर्मग्रंथांचे विश्लेषण केले आहे जसे की, वैदिक ग्रहसुत्र, धर्मसूत्र, अर्थसुत्र, मनुस्मृती, जातका आणि कामसूत्र. उदा. Unravelling Kamsutra या प्रकरणामध्ये त्यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे की, कामसूत्र हा ग्रंथ इतर धर्मग्रंथांप्रमाणे नीतीनियम सांगणारा धर्मग्रंथ नाही. स्त्रिया ह्या क्रियाहीन आणि नैसर्गिकरित्या हिंसेकरिताही सहनशील असतात. याविषयक मांडणी या ग्रंथामधून येते. लैंगिक संबंधातील स्त्रियांचे दुय्यमत्व वैध ठरविले जाते की जे आपोआप धार्मिक, शैक्षणिक किंवा इतर क्षेत्रांमध्ये विस्तारित होते.

या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्येच लेखिकेने पुस्तकाच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. त्यांच्या मते त्यांना बौद्ध, संस्कृत, जैन ग्रंथांचे त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या शिलालेखांचे विश्लेषण तेवढ्या चांगल्या पद्धतीने करता आलेले नाही. परंतु प्रस्तुत पुस्तकामध्ये लेखिकेने अभिजन परंपरेच्या पलीकडे जाऊन विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तसेच याप्रकारच्या ग्रंथांकडे वंचित समूहांच्या दृष्टीकोनातून बघण्याची नवी दृष्टी देते. पण त्याचबरोबर वंचितांच्या समूहाच्या परंपरेचे अर्थपूर्ण विश्लेषणाकरिता त्याविषयाशी एकजूट होणे गरजेचे आहे असे मत लेखिकेने व्यक्त केले आहे.

प्रतिसाद

[संपादन]

सोशल सायंटिस्ट या जर्नल मध्ये शालिनी शाह यांनी प्रस्तुत पुस्तकाची समीक्षा केली आहे. त्यांच्या मते कुमकुम रॉय लिखित भारताच्या आधीच्या इतिहासातील लिंगभाव संबंधाविषयक लेखांचे संकलन प्रस्तुत पुस्तकामध्ये केले आहे.[]

इंडियन जर्नल ऑफ जेंडर स्टडीज मध्ये मीरा विश्वनाथन मांडणी करतात की, भारताच्या आधीच्या इतिहासाचे अध्ययन करण्यासाठी सदर पुस्तक स्त्रीवादी दृष्टीकोन विकसित करतो. त्यांच्या मते लेखिकेने सदर पुस्तकामध्ये पितृसत्तेचे भारताच्या संदर्भात ऐतिहासिकरण केले आहे.[]

हे सुद्धा पहा

[संपादन]

भारताचा इतिहास

स्त्रीवाद

भारताचा इतिहास मध्ये वैदिक काळ विभाग

लैंगिकता

नाते

पाली भाषा

बौद्ध

कामसूत्र

प्राकृत

संदर्भ सूची

[संपादन]
  1. ^ Roy, Kumkum (2010-08-26). The Power of Gender and the Gender of Power: Explorations in Early Indian History (इंग्रजी भाषेत). OUP India. ISBN 9780198066767.
  2. ^ "Kumkum Roy | Welcome to Jawaharlal Nehru University". www.jnu.ac.in (इंग्रजी भाषेत). 2018-04-06 रोजी पाहिले.
  3. ^ "The Gender, Culture, and Power Reader - Paperback - Dorothy L. Hodgson - Oxford University Press". global.oup.com (इंग्रजी भाषेत). 2018-04-06 रोजी पाहिले.
  4. ^ Shah, Shalini (2011). "Review of The Power of Gender and the Gender of Power: Explorations Early Indian History". Social Scientist. 39 (5/6): 99–102.
  5. ^ Visvanathan, Meera (2013-10-15). "Book Review: The Power of Gender and the Gender of Power: Explorations in Early Indian History". Indian Journal of Gender Studies. 20: 469–472. doi:10.1177/0971521513495294.