डाउरी अँड इनहेरिटन्स (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डॉवरी अ‍ॅन्ड इनहेरिटन्स हे पुस्तक स्त्रीवादी मानववंशशास्त्रज्ञ व समाजशास्त्रज्ञ श्रीमती बसू[१] यांनी संपादित केलेले आहे. स्त्रियांवर विविध स्वरूपात होणारी हिंसा या मुद्यांवर भारतातील स्त्रीवाद्यांची अनेक मतमतांतरे व शोधनिबंध आहेत. या शोधनिबंधांचे संकलन या पुस्तकामध्ये केलेले आहे. हे पुस्तक, भारतातील विविध स्त्रीवाद मांडणारे बहुविध आवाज त्यांच्या भिन्नत्वासह एकत्र मांडण्याचा उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या इश्यूज इन कॉन्टेम्पररी इंडियन फेमिनिझम या मालिकेचा तिसरा खंड आहे.

निबंधांचे संकलन[संपादन]

हुंडा व वारसा या पुस्तकाचे ३ विभाग वर्गीकरण करण्यात आलेले आहे.

  1. हुंडा व वधुमूल्य
  2. वारसा आणि स्त्रियांची वंचितता
  3. हुंड्याशी संबंधित हिंसा आणि प्रतिबंध

या शोधसंकलनामध्ये मानववंशशास्त्रीय व समाजशास्त्रीय या दोन्ही दृष्टिकोनातून झालेल्या/करण्यात आलेल्या चर्चांचा समावेश आहे. तसेच देशातील विविध भागांमध्ये हे संशोधन करण्यात आलेले आहे. या पुस्तकातील सर्व शोधनिबंध परस्परांशी संवाद साधतात. तसेच या प्रत्येक शोधनिबंधांचा लेखिकांचा दृष्टिकोन आव्हानात्मक व चिकित्सात्मक असलेला दिसतो. याचे उदाहरण म्हणजे इंदू अग्निहोत्री यांनी बिना अगरवाल यांच्या शोधनिबंधाला दिलेली प्रतिक्रिया आणि मधु किश्वर व सी. एस.लक्ष्मी यांची वारस हक्कावरील वाद.

महत्त्वाचे युक्तिवाद[संपादन]

पारंपरिक प्रथांतून विवाहाच्या वेळी दिल्या गेलेल्या भेटवस्तू आणि हिंसा व हुंड्याबाबतच्या लोकप्रिय आकलनातून येणारी भीती यांचे परस्पर समस्यात्मक नाते श्रीमती बसू प्रस्तावनेत मांडतात. जेव्हा भारतातील स्त्रीचळवळ हुंड्याचा प्रश्न घेऊन उभी राहिली, आणि हुंडाबळी म्हणजे काय याभोवती केंद्रित झाली त्यावेळी हुंड्याचा मुद्दा हा भारतीय स्त्रीवादाशी संबंधित आहे, अशी एक धारणा युरोप- अमेरिकन स्त्रीवाद्यात असलेली दिसून आली. सांस्कृतिक संबंधांतून निर्माण होणार्‍या अन्य वादांसोबत, हुंड्याबद्दलचा वाद/हुंड्याचा प्रश्न हा सांस्कृतिक संबंधातून निर्माण होणार्‍या प्रश्नांशी/वादांशी समांतर म्हणून नेहमीच बघितला जातो परंतु श्रीमती बसू त्यांच्या प्रस्तावनेत त्या हे दाखवून देतात की, हा प्रश्न सांस्कृतिक संबंधांतून येणार्‍या प्रश्नांपेक्षाही अधिक गुंतागुंतीचा आहे. बसू यावर प्रकाश टाकतात की, लग्नाची रक्कम ही कशी वर्ग, जात आणि प्रतिष्ठेची निदर्शक असते.

लेव्ही स्ट्रॉस आणि यांच्या सामाजिक-अनुवंशशास्त्रीय सिद्धान्तातून हुंडा हा भरपाई या अर्थाने एकप्रकारे कसा रूढ होते याकडे श्रीमती बसू लक्ष वेधतात. बोझरप, वॉटसन, किश्वर इत्यादींच्या अभ्यासाचे संदर्भ आणत, हुंडा देण्याची परंपरा किंवा वधुमूल्य या गोष्टी वारसा, श्रम, प्रतिष्ठा आणि जात या मोठ्या शृंखलांशी जोडल्या गेलेल्या आहेत.

बसू या हुंडा आणि स्त्रीधन यांचा अर्थ आणि उद्देश यांबद्दलच्या गुंतागुंतीच्या आणि विसंगत अशा दोन्ही बाजूंबद्दल बोलतात. हुंडा हा पूर्णतः स्त्रियांच्या दुय्यमत्वालाच साहाय्य करतो का? बर्‍याच स्त्रिया हुंडा प्रथेमध्ये सहभागी होताना दिसतात, कारण हुंडा ही गोष्ट कुटुंब, जिव्हाळा आणि प्रेम या गोष्टींशी संबंधित समजली जाते, मग या गोष्टीचा आपण कसा अर्थ लावणार आहोत? प्राचीन ग्रंथांमध्ये असणारे हुंड्याचे स्वरूप आणि सध्या ज्या स्वरूपात हुंडा अस्तित्वात आणला गेला आहे, या दोहोंमध्ये काय संबंध आहेत? जर एखादे सकारात्मक संशोधन होऊ शकते तर त्या प्रश्नांना आपल्याला भिडता येईल.

जेव्हा या प्रश्नावर संशोधन पुढे आले तेव्हा भारतातील स्त्रीवाद्यांनी हुंड्याच्या प्रश्नाकडे सामाजिक घटक म्हणून बघितले व कायद्याच्या माध्यमातून या प्रश्नाला भिडण्याचा प्रयत्न केला. कायद्याच्या परिपेक्ष्यातून हुंड्याकडे बघताना भेटवस्तूंची प्रथा आणि समूहाची मूल्ये व अस्मिता या दोहोंमधील जवळचा सहसंबंध बघणे कठीण गेलेले दिसते. त्याचप्रमाणे, हुंड्याकडे सामाजिक-सांस्कृतिक घटक म्हणून बघत या प्रश्नाशी होड घेताना वर्ग, विवाह, समूह आणि लिंगभावमूल्य आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे स्त्रियांची आर्थिक स्वायत्तता, वारसा हक्क व श्रम या सर्वांशी हुंडा संबंधित आहे हे निसटून जाते.

श्रीमती बसू, या हुंडा/वधुमुल्य आणि स्त्रियांचा वारसा हक्काचा कायदा या दोहोंतील नातेसंबंधांवर ज्या विविध चर्चा अभ्यासविश्वात झालेल्या दिसतात याकडे लक्ष वेधतात. भारतातील सर्व स्त्रीवादी हे मान्य करतात की, स्त्रियांची साधनांवर पकड निर्माण व्हायला हवी आणि उत्पन्नाचे स्रोत व भांडवल यांवर स्त्रियांनी नियंत्रण मिळवायला हवे. परंतु, या गोष्टी साध्य करण्याकरिता प्रत्येकाने अवलंबिलेले मार्ग वेगळे आहेत. संपत्ती धारणा करणे हा पुरुषाचा हक्क तर हुंड्यात मिळालेल्या दागिन्यांच्या भेटवस्तू आणि संसारोपयोगी वस्तू हीच स्त्रियांची संपत्ती आहे या विचारधारेला प्रश्न विचारणे आवश्यक आहे असे बसू प्रतिपादित करतात.

योगदान[संपादन]

भारतीय स्त्रीवादी विचारांचे प्रतिनिधित्व करणार्‍या जागोरी[२][३] या मासिकामध्ये 'Resisting Dowry in India' या प्रसिद्ध झालेल्या पेपरचा संदर्भ घेऊन हे पुस्तक लिहिले गेलेले आहे. (Women) विमेन अनलिमिटेड या प्रकाशनाच्या मते हे पुस्तक हुंड्याचे सामाजिक, कायदेशीर, सांस्कृतिक व आर्थिक परिणाम काय आहेत याचे परीक्षण करते. तसेच हुंडा व वधुमुल्य आणि स्त्रियांचे स्थान, वारसा हक्क आणि स्त्रियांच्या सक्षमीकरणावर झालेले परिणाम याची विविध स्त्रीवादी दृष्टीकोनातून या पुस्तकात चर्चा केलेली आहे.[४]

संदर्भ सूची[संपादन]

  1. ^ "USIEF". www.usief.org.in. 2018-04-01 रोजी पाहिले.
  2. ^ http://www.jagori.org/wp-content/uploads/2009/07/dowry_infopack.pdf
  3. ^ "Feminist, Women, Safety, Rights, Training, Helpline, Ending Violence Against Women, EVAW, Delhi, India". www.jagori.org (इंग्रजी भाषेत). 2018-04-01 रोजी पाहिले.
  4. ^ "Prof. Srimati Basu's Dowry & Inheritance is Published - DePauw University". DePauw University (इंग्रजी भाषेत). 2018-04-01 रोजी पाहिले.