एकांकिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एकांकिका म्हणजे एक अंकी नाटक. स्थलकालाच्या मर्यादित अवकाशात आपल्या सर्व नाट्यशक्ती एककेंद्रित करणारा; थोडक्यात उत्कट, एकसंघ व एकजिनसी परिणाम साधणारा संपूर्ण, स्वयंपूर्ण, एक अंकी नाट्यप्रकार म्हणजे एकांकिका. भरताने संस्कृत नाट्यशास्त्रात नाटकांचे दहा प्रकार सांगितले आहेत. त्यांतले भाण, उत्सृष्टिकांक, व्यायोग आणि वीथी हे चार प्रकार एकांकिकांचे आहेत. याचा अर्थ, भरताच्या काळातही ही चार प्रकारची नाटके होत असावीत. स्थल-काल व कथानकाची एकता साधणाऱ्या, प्रभावी व्यक्तिरेखा असणाऱ्या व एकसंघ स्वरूपाच्या पाच स्वयंपूर्ण एकांकिका भास या नाटककाराने लिहिल्या आहेत. पण भासाला अनुसरून नंतरच्या नाटककारांनी अशा एकांकिका लिहून एक प्रवाही परंपरा निर्माण केल्याचे आढळत नाही. त्यानंतर, भारतामधल्या ब्रिटिश राजवटीच्या काळात मुख्यत्वे संस्कृत आणि इंग्रजी वाङ्मयावरून स्फूर्ती घेऊन मराठी एकांकिका लिहिल्या गेल्या. भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळात मात्र हा नाट्यप्रकार मराठीत भरभराटीला आला.

एकांकिका सुमारे अर्ध्या ते पाऊण तासाची असते. ती बहुरूपिणी असते. तिला कोणत्याही विषयाचे वावडे नसल्याने ती काव्यमय, चर्चात्मक, प्रहसनासारखी, तत्त्वचिंतनपर किंवा रहस्यकथेसारखी असू शकते. एखाद-दुसरीच मध्यवर्ती व्यक्तिरेखा, अर्थभारित आणि नाट्यगर्भ असे मोजके संवाद, तीव्र व उत्कट परिणाम साधणारे प्रसंग या सर्वांच्या साह्याने एकांकिका एकात्म परिणाम साधते. आजची मराठी एकांकिका ही एकप्रवेशी न राहता बहुप्रवेशी आणि बहुकेंद्री झाली आहे.

मराठीतील सुरुवातीच्या एकांकिका या इंग्रजी एकांकिकांचे अनुवाद आणि रूपांतरे असत. उदा० इंग्रजी 'दि सीक्रेट'चा किरातांनी केलेला 'संशयी शिपाई' हा अनुवाद; 'दि डिअर डिपार्टेड' आणि 'कमिंग थ्रू द राय' या एकांकिकांची माधव मनोहर यांनी केलेली अनुक्रमे 'आजोबांच्या मुली' आणि 'जन्मापूर्वी' ही रूपांतरे. तसेच दिवाकरांचे 'आंधळे'(मूळ इंग्रजी लेखक -मेटरलिंक) वगैरे, राम गणेश गडकऱ्यांचे 'दीड पानी नाटक' ही बहुधा अनुवादित नसलेली स्वतंत्र एकांकिका असावी. पुढील काळात अनंत काणेकर, दत्तू बांदेकर, भा.वि. वरेरकर, मो.ग.रांगणेकर, व्यंकटेश वकील, शं.बा.शास्त्री इत्यादी लेखकांच्या एकांकिकाही प्रकाशित झाल्या.

इ.स. १९५० मध्ये मुंबईतील भारतीय विद्या भवन या संस्थेने आंतरमहाविद्यालयीन एका़किका स्पर्धा घ्यावयास सुरुवात केली, आणि मराठीत एका़किका हा नाट्यप्रकार बहरास आला. आता एकांकिकांच्या अनेक स्पर्धा होतात आणि मराठीत दर वर्षी असंख्य एकांकिका लिहिल्या जातात आणि रंगमंचावर सादर होतात.

मराठी एकांकिका[संपादन]

तंजावरच्या ‘सरस्वती महाल’ या ग्रंथालयात जी मराठी नाटके हस्तलिखित स्वरूपात आहेत, त्यांमध्ये एकांकी नाट्य रचनेचा आढळ होतो. त्या एकांकिकांचा उद्देश आपल्या आराध्य देवतांच्या लीलांचे नाट्यरूपाने दर्शन घडविणे हा आहे. त्यांची रचना सरळ, साधी असून ती शृंगार-हास्य-रसमिश्रित व गीतनृत्यप्रधान असते. १७०० च्या सुमाराची श्री लक्ष्मीनारायण कल्याण नाटक ही नाट्यरचना मराठी एकांकिकेचा मूळारंभ म्हणता येईल. १८७० ते १९०० पर्यंत पौराणिक नाटकांच्या जोडीने प्रहसने करून दाखविण्याची मराठी रंगभूमीवर टूम निघाली. ही सर्वच प्रहसने एकांकिकांच्या स्वरूपाची आहेत, असे नाही पण त्यांतील कित्येक प्रहसने अनेकप्रवेशी एकांकी नाटकाच्या स्वरूपाची आहेत. केवळ स्थलांतर दाखविण्यासाठी हे प्रवेश येत. सरळ रेषेत धावणारे आटोपशीर कथानक, उपकथानकांचा अभाव, सुटसुटीतपणा आणि एकजिनसीपणा यांमुळे ही प्रहसने एकांकिकासदृश्यच आहेत. त्यांपैकी दत्तात्रय वासुदेव जोगळेकर यांच्या सुस्त्रीचातुर्यदर्शन प्रहसन अथवा गुलाबछकडीचा मनोरंजक फार्स (१८८५) यासारखी प्रहसने नीतिबोध करणारी आहेत.

अर्वाचीन काळात हरिभाऊ आपटे (जबरीचा विवाह), राम गणेश गडकरी (सकाळचा अभ्यास, दीडपानी नाटक), नाट्यछटाकार दिवाकर (सुट्टी ! शाळेला सुट्टी !!, ऐट करू नकोस इ.) यांसारख्यांनी एकांकिका लिहिल्याचे आढळते. १९३० पर्यंत एक स्वतंत्र साहित्यप्रकार म्हणून एकांकिकेकडे पाहिलेच गेले नव्हते. इब्सेनची एक अंकी, एकप्रवेशी नाटके परिचित झाली. नभोवाणी हे एक नवे माध्यमही उपलब्ध झाले आणि श्रुतिकांची नियमितपणे निर्मिती व प्रसार होण्याची एक हुकमी यंत्रणाच हाती आली. इंग्रजी एकांकिकांचा स्वतंत्रपणे डोळस अभ्यास सुरू झाला. प्रारंभीच्या काही उत्कृष्ट एकांकिकांचे स्वरूप नभोनाट्याचे आहे, हे विसरून चालणार नाही. हा कालखंड म्हणजे मराठी एकांकिकेचे जणू भाषांतर-युगच! अनंत काणेकर आणि माधव मनोहर यांनी या बाबतीत भरघोस कार्य केले. याच काळात शामराव ओक यांनी एकांकिकांमधील विडंबनाचे सामर्थ्य अधिक जोपासले. व्यंकटेश वकील आणि वि. मा. दी. पटवर्धन यांचेही एकांकिकालेखन उल्लेखनीय आहे. ‘नाट्यनिकेतन’ या संस्थेने मो. ग. रांगणेकरांच्या तुझं माझं जमेना, सतरा वर्षे आणि फरारी या तीन एकांकिका व्यावसायिक रंगभूमीवर यशस्वी करून दाखविल्या. या काळात एकांकिकेच्या प्रयोगक्षमतेपेक्षा तिच्या वाचनीयतेकडे व श्राव्यगुणाकडे लक्ष देण्यात येत होते. पण गेल्या पंधरा वीस वर्षांत एकांकिकेकडे एक स्वयंपूर्ण नाट्यप्रकार म्हणून पाहिले जात आहे. या कालखंडात जीवनाकडे व साहित्यकलेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात क्रांतिकारक बदल घडला. माणसाचे व्यक्तिमत्त्व हे एकेरी, एकपदरी नसून ते संमिश्र स्वरूपाचे असते. मानवी मनाच्या दर्शनी भागाच्या पलीकडचे भाग दृश्यमान करणारे क्ष-किरण टाकण्याचे कार्य ललित साहित्य करू लागले. एखादा उत्कट प्रसंग, एखादी उत्कट भाववृत्ती, एखादी सखोल जीवनानुभूती, मनावर आघात करणारा एखादा व्यक्तिगुण, एखादे अर्थपूर्ण वातावरण इत्यादींतून नवी एकांकिका जन्माला येऊ लागली. अभिनय आणि रंगभूमिविषयक कल्पना यांतही क्रांतिकारक बदल घडून आला. ‘इंटिमेट थिएटर’, ‘लिट्ल थिएटर’ आदींचा उदय झाला नाट्यशिक्षणसंस्था उदयास आल्या, एकांकिकास्पर्धा नियमितपणे सुरू झाल्या विद्यापीठे नाट्य-शिबिरे भरवू लागली. मराठी एकांकिकेच्या आजच्या स्वायत्त आणि महत्त्वपूर्ण विकासाला ही सर्व परिस्थिती पोषक ठरली.

एकांकिकेला साहित्य आणि रंगभूमी या क्षेत्रांत प्रतिष्ठा मिळवून देण्याचे फार मोठे श्रेय पु.ल. देशपांडे आणि विजय तेंडुलकर यांना आहे. भोवतालच्या जीवनातील हास्यगर्भ नाट्य टिपून त्याचा एकांकिकेच्या रूपाने समर्थपणे आविष्कार करण्याचे कार्य मुख्यत: पु. ल. देशपांडे यांनी केले, तर गंभीर नाट्याचा आविष्कार विजय तेंडुलकर यांनी केला, असे स्थूलमानाने म्हणता येईल. एकांकिकेच्या पृथगात्मतेची, जीवननाट्य व्यक्त करण्याच्या तिच्या सामर्थ्याची व तिच्या यशस्वितेची खातरजमा त्यांनी करून दिली. पु. ल. देशपांडे, वसंत सबनीस, पद्माकर डावरे, गंगाधर गाडगीळ आदींच्या विनोदी एकांकिकांनी आणि विजय तेंडुलकर, रत्नाकर मतकरी, वसुधा पाटील, महेश एलकुंचवार, चंद्रकांत देशपांडे आदींच्या गंभीर एकांकिकांनी आज मराठी एकांकिकेला एक सुंदर तोल लाभला आहे.

आज काही नवे लेखक अस्तित्ववादी म्हणता येईल, अशा जीवनवृत्तीने हा प्रकार हाताळत आहेत, तर विद्याधर पुंडलिकांसारख्या कथालेखकाने चक्रसारख्या एकांकिकेतून अत्यंत मूलगामी धर्मकर्ममीमांसा मांडली आहे. माधवी–एक देणे लिहिणाऱ्या पु. शि. रेगे यांनी एकांकिकेला काव्यात्म रूप दिले आहे. अशा विविध प्रवाहांनी मराठी एकांकिकांची प्रगती झपाट्याने होत आहे, असे दिसते.