Jump to content

शिनकान्सेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जपानच्या नीगाता रेल्वे स्थानकावरील शिनकान्सेन गाड्या
तोक्योओसाका शहरांदरम्यान धावणारी तोक्काईदो शिनकान्सेन

शिंकान्सेन (जपानी: 新幹線}} ही जपान ह्या देशामधील द्रुतगती रेल्वे आहे. अतिउच्च वेगाने धावणाऱ्या रेल्वे गाड्यांची प्रणाली आहे. ताशी २१० कि.मी. (१३० मैल) या वेगाने धावणारी पहिली शिंकान्सेन - तोकाईदो शिनकान्सेन - १९६४ साली कार्यान्वयित करण्यात आली. आजच्या दिवसाला, एकूण २,४५६ कि.मी. (१,५२८ मैल) एवढ्या अंतराचे जाळे असलेली शिंकान्सेनची प्रणाली जपानच्या होन्शू आणि क्यूशू या बेटांवरील जवळ जवळ सर्व मुख्य शहरांना जोडते. भूकंप आणि टायफून (वादळे) प्रवण प्रदेश असून सुद्धा शिंकान्सेन प्रणालीतील गाड्या ताशी ३०० कि.मी. (१८५ मैल) पर्यंतच्या वेगाने धावतात. परीक्षणाच्या वेळेस, परंपरागत रुळांवर धावणाऱ्या गाड्यांनी १९९६ साली ताशी ४४३ कि.मी. (२७५ मैल)ची वेगमर्यादा गाठली, तर आधुनिक मॅगलेव्ह तंत्रज्ञानावर आधारित गाड्यांनी २००३ साली ताशी ५८१ कि.मी. (३६१ मैल) एवढी वेगमर्यादा गाठून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. आजच्या घडीला होक्काइदो बेटावरील सप्पोरो हे प्रमुख शहर वगळता जपानमधील बहुतेक सर्व मोठी शहरे शिनकान्सेन मार्गांनी जोडण्यात आली आहेत.

जपानी भाषेत शिंकान्सेन या श्ब्दाची अशी फोड होते - शिन्‌ (Shin) अर्थात नवीन, कान्‌ (Kan) अर्थात मुख्य (Trunk), सेन्‌ (Sen) अर्थात मार्गिका - जो रुळांच्या मार्गिकेला संबोधतो तर त्यावरून धावणाऱ्या गाड्याना अधिकृतरीत्या "Super Express" - 超特急 - चोऽतोक्क्यू) म्हणतात. परंतु खुद्द जपानम्ध्येदेखील हा भेदभाव न करता शिंकान्सेन या शब्दाने सर्व प्रणालीला संबोधले जाते. शिंकानसेन प्रणालीतील गाड्यांच्या मार्गिका स्टॅण्डर्ड गेज मापाच्या आहेत. अतिवेगाने धावता यावे म्हणून शिंकान्सेनचे मार्ग जेवढे आणि जिथे जमतील तिथे सरळ ठेवण्यात आले आहेत आणि वळणांची वक्रता जेवढी कमी ठेवता येईल तेवढी कमी ठेवण्यात आली आहे. सरळ मार्ग आखण्यासाठी डोंगरांमधून बोगदे आणि दऱ्यांवर वायाडक्ट (पूल) बांधण्यात आले आहेत. बहुतांशी हे मार्ग जनिनीपासून एक ते दोन मजले उंचीवरून जातात. अशा पद्धतीने शहरांमधील रस्ते, इतर रेल्वे मार्ग, घरे, शेते इत्यादींचा अडथळा टाळण्यात आला आहे.

इतिहास

[संपादन]

दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जपान देशाने झपाट्याने प्रगती केली व तेथील नॅरोगेजवर चालणारी रेल्वेसेवा अपूरी पडू लागली. तोक्यो ते कोबेदरम्यान धावणारी तोकायदो मार्गिका १९५० च्या दशकामध्ये पूर्णपणे वापरली जात होती व जपान रेल्वेचा तत्कालीन अध्यक्ष शिंजी सोगा ह्याने विजेवर धावणाऱ्या द्रुतगती रेल्वेची कल्पना उचलून धरली व एप्रिल १९५९ मध्ये तोक्यो ते ओसाकादरम्यान पहिल्या शिनकान्सेन रेल्वेच्या बांधकामाचे काम सुरू झाले. सुमारे २०,००० कोटी येन इतका खर्च अपेक्षित असलेल्या ह्या मार्गासाठी आलेला वास्तविक खर्च ४०,००० कोटी येन इतका होता. १ ऑक्टोबर १९६४ रोजी १९६४ उन्हाळी ऑलिंपिकच्या बरोबर १० दिवस आधी पहिली शिनकान्सेन रेल्वे धावली व तिने तोक्यो ते ओसाकादरम्यानचे ५१५ किमी अंतर ४ तासांत पार केले, ज्यासाठी विद्यमान रेल्वेगाडीला ६ तास ४० मिनिटे लागत असत. १९६५ साली हा वेळ तीन तास १० मिनिटांवर आणण्यात आला. शिनकान्सेनमुळे ह्या दोन शहरांदरम्यान वाहतूकीमध्ये अमुलाग्र बदल घडून आला ज्यामुळे व्यापाराला प्रचंड चालना मिळाली. जलदगतीने वेळेवर धावणारी व अत्यंत आरामदायी प्रवासाचा आनंद देणारी शिनकान्सेन जपानी जनतेमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली व केवळ तीन वर्षांत सुमारे १० कोटी प्रवाशांनी शिनकान्सेनने प्रवास केला होता. २०१४ साली शिनकान्सेनच्या ५०व्या वर्धापन वर्षामध्ये तोकाईदो शिनकान्सेनवरील दैनंदिन प्रवासीसंख्या ३.९१ लाख इतकी होती.

तोकाईदो शिनकान्सेनच्या यशानंतर जपान सरकारने झपाट्याने देशाभरात शिनकान्सेनचे अनेक मार्ग बांधायचा प्रकल्प हाती घेतला. १९७५ साली ओसाकाफुकुओकादरम्यान सॅन्यो शिनकान्सेन, १९८२ साली तोक्यो व ओमोरीदरम्यान तोहोकू शिनकान्सेन तसेच ह्याच वर्षी तोक्यो व निगातादरम्यान जोएत्सू शिनकान्सेन हे मार्ग चालू झाले.

मर्गिका

[संपादन]
जपानच्या नकाशावर सर्व शिनकान्सेन मार्ग
मार्ग सुरुवात शेवट लांबी चालक सुरुवात वार्षिक प्रवासी संख्या[]
किमी मैल
तोकाईदो शिनकान्सेन तोक्यो ओसाका ५१५.४ ३२०.३ मध्य जपान रेल्वे कंपनी १९६४ १४,३०,१५,०००
सॅन्यो शिनकान्सेन ओसाका फुकुओका ५५३.७ ३४४.१ पश्चिम जपान रेल्वे कंपनी १९७२-१९७५ ६,४३,५५,०००
तोहोकू शिनकान्सेन तोक्यो ओमोरी ६७४.९ ४१९.४ पूर्व जपान रेल्वे कंपनी १९८२ ७,६१,७७,०००
जेत्सू शिनकान्सेन सैतामा नीगाता २६९.५ १६७.५ १९८२ ३,४८,३१,०००
होकुरिकू शिनकान्सेन ताकासाकी कनाझावा ३४५.४ २१४.६ पूर्व जपान रेल्वे कंपनीपश्चिम जपान रेल्वे कंपनी १९९७ ९४,२०,०००
क्युशू शिनकान्सेन फुकुओका कागोशिमा २५६.८ १५९.६ क्युशू रेल्वे कंपनी २००४ १,२१,४३,०००
होक्काइदो शिनकान्सेन ओमोरी हाकोदाते १४८.९ ९२.५ होक्काइदो रेल्वे कंपनी २०१६

हेही पाहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "鉄道輸送統計調査(平成23年度、国土交通省) Rail Transport Statistics (2011, Ministry of Land, Infrastructure and Transport) (Japanese)". Mlit.go.jp. 26 March 2013 रोजी पाहिले.