रामदास पळसुले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रामदास पळसुले
जन्म रामदास
३० मार्च १९६३
पुणे,महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा तबलावादक
मूळ गाव पुणे
पदवी हुद्दा बी.ई. (मेकॅनिकल)
जोडीदार मोहना पळसुले
वडील डॉ. गजानन पळसुले
आई कुमुद पळसुले


पंडित रामदास पळसुले (जन्म : पुणे, ३० मार्च १९६३) हे एक भारतीय तबलावादक आहेत.

पार्श्वभूमी[संपादन]

रामदास पळसुले यांचे वडील डॉ. गजानन बाळकृष्ण पळसुले हे संस्कृत व्याकरणाचे अभ्यासक, संस्कृत कवी, नाटककार होते. ते पुणे विद्यापीठात संस्कृत भाषेचे प्राध्यापक होते. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर वैनायकम हे महाकाव्य लिहिले. या महाकाव्याला बिर्ला फाऊंडेशनचा सर्वोत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार, कालिदास पुरस्कार, दालमिया पुरस्कार, वाचस्पती पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. [१]

रामदास पळसुले यांची आजी शांताबाई गोखले या कीर्तनकार होत्या. त्यांची बहीण प्रियंवदा नवाथे आणि मावशी रंजना देवल या शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेत असताना वयाच्या चौथ्या वर्षापासूनच पळसुले यांना तबलावादनात रस निर्माण झाला.[२] पळसुल्यांचे प्राथमिक शालेय शिक्षण पुण्यातील नवीन मराठी शाळेत तर माध्यमिक शिक्षण पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी प्रशालेत झाले.

शिक्षण[संपादन]

पळसुले यांचे तबल्याचे सुरुवातीचे शिक्षण पंडित जी.एल. सामंत यांच्याकडे झाले. वयाच्या आठव्या वर्षी सामंत गुरुजींच्या साठाव्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात पुण्यातील भरत नाट्यमंदिर येथे त्यांनी तबलावादन केले होते. त्यांनी १९८४ मध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. महाविद्यालयात शिकत असताना स्नेहसंमेलन, फिरोदिया करंडक स्पर्धा अशा निमित्ताने त्यांचे तबलावादन सुरू होते. या काळात त्यांनी विजय कोपरकर, धनंजय दैठणकर, अरविंद थत्ते, सुभाष कामत अशा कलाकारांना साथ केली. त्या काळात त्यांना सच्चिदानंद फडके आणि आनंद बदामीकर यांचे मार्गदर्शन मिळाले. अभियंता झाल्यावर त्यांनी काही काळ केएसबी पंप्स या कंपनीत नोकरी केली.[३] पुढे त्यांनी नोकरी सोडून तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्याकडे गुरुकुल पद्धतीने इ.स. १९८६ ते १९८९ या काळात तबलावादनाचे शिक्षण घेतले.

कारकीर्द[संपादन]

एकल तबला वादनाच्या कार्यक्रमांच्या बरोबरच पळसुले गायन, वादन आणि नृत्यासाठी तबल्याची साथ करतात. त्यांनी भारतातील तसेच परदेशांतील अनेक प्रसिद्ध संगीत महोत्सवांमध्ये आपल्या कलेचे सादरीकरण केले आहे. त्यासाठी त्यांनी अनेक गायक कलाकारांच्या बरोबर अमेरिका, कॅनडा, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि मध्य पूर्वेकडील देशांचे दौरे केले आहेत. त्यांनी अनेक वादकांनासुद्धा तबल्याची साथ केली आहे. पंडिता रोहिणी भाटे, शमा भाटे, शाश्वती सेन, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित जसराज, पंडित शिवकुमार शर्मा, उल्हास कशाळकर, उस्ताद शाहीद परवेझ, पंडित विश्वमोहन भट, तरुण भट्टाचार्य, पंडिता एन.राजम, पंडित रोणू मुजुमदार, पंडित पूर्वायन चॅटर्जी, पंडिता मालिनी राजूरकर, पद्मा देशपांडे, पंडिता वीणा सहस्रबुद्धे यांच्यासारख्या अनेक कलाकारांना त्यांनी मैफलीत साथ केली आहे. ते सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात अनेक वर्षे अनेक गायकांना तबल्याची साथ करत आले आहेत.

स्वतःच्या तबला वादनाच्या कार्यक्रमांच्या बरोबरच ते नवीन पिढीतील विद्यार्थ्यांना तबलावादन शिकवतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात ते गुरू म्हणून काम करतात. पळसुले यांनी शिरीष कौलगुड, अनिता संजीव आणि श्रीकांत शिरोळकर यांच्यासह ‘आवर्तन’ गुरुकुलाची स्थापना २०१६ मध्ये केली. तिथे अनेक विद्यार्थी तबलावादन,पखवाज वादन, नृत्य, शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतात. या गुरुकुलामध्ये तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, पंडित रामदास पळसुले, गुरू शमा भाटे, गुरू सुचेता भिडे चापेकर, पंडित उदय भवाळकर, पंडित उल्हास कशाळकर हे गुरुजन अध्यापन करतात.

कार्यक्रम[संपादन]

पळसुले यांनी ज्या महोत्सवांत आपल्या कलेचे सादरीकरण केले आहे. त्यापैकी काही :

संदर्भ[संपादन]

  1. ^ Data India (इंग्रजी भाषेत). Press Institute of India. 2002.
  2. ^ "'आंतरिक अपूर्णताच ऊर्जा देते' (रामदास पळसुले) | eSakal". www.esakal.com. 2019-10-21 रोजी पाहिले.
  3. ^ "'आंतरिक अपूर्णताच ऊर्जा देते' (रामदास पळसुले) | eSakal". www.esakal.com. 2019-10-21 रोजी पाहिले.
  4. ^ Jan 10, TNN | Updated:; 2010; Ist, 0:09. "An evening of ragas, vocalists and more | Pune News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2019-10-21 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  5. ^ Patil, Parashuram. "गिरीजाताई केळेकर संगीत महोत्सव". तरुण भारत (इंग्रजी भाषेत). 2019-10-21 रोजी पाहिले.